‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’

आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्‍न केला आहे. पण केवळ कल्पनेशिवाय अन्य कोणतेही साधन जवळ नसल्यामुळे त्यांच्या हाती कांही लागले नाही. एक प्रकारची गोंधळाची स्थिती सर्व वैचारिक जगतात होती.
परंतु 1859 साली चार्ल्स डार्विनचा ” दि ओरिजिन ऑफ स्पीसीज” हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि सर्वच स्थिती पालटून गेली. नैसर्गिक निवडीच्या आधाराने सर्व सजीवांची उत्क्रांती झाली आहे असा सिद्धान्त डार्विनने मांडला. या सिद्धांताचा पुढे अनेक शास्त्रज्ञांनी सखोल व सप्रयोग अभ्यास करून विस्तार केला. अनेक ग्रंथ जगाच्या सर्वच भाषांतून ह्या विषयावर प्रसिद्ध झाले. मराठीतही बरीच पुस्तके ह्या बाबतीत उपलब्ध आहेत. त्यांतच अलीकडे एका सुंदर पुस्तकाची भर पडली आहे.”गोफ जन्मांतरीचे (अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे).” हेच ते पुस्तक. लेखिका आहेत कराडच्या डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर. विषयाचा सखोल अभ्यास करून, अनेक ग्रंथांचे परिशीलन करून व त्यांना आपल्या तर्कशुद्ध चिंतनाची जोड देऊन डॉ. ब्रह्मनाळकरांनी एक देखणे पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे.
अगदी प्रस्तावनेपासूनच पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेते. पारंपरिक दृष्टिकोन सोडून जगाकडे पाहण्याचा एक वेगळा परंतु सत्यनिष्ठ दृष्टिकोनही असू शकतो हे प्रस्तावनेमधून वाचकाच्या मनावर ठसायला सुरवात होते.
पुस्तकाच्या सुरवातील डार्विनविषयी वैयक्तिक माहिती, त्याचा जगप्रवास, त्याने केलेला सजीवांचा अभ्यास व मांडलेला सिद्धांत, डार्विनचे समकालीन तसेच त्याच्यानंतर झालेले शास्त्रज्ञ, त्यांनी मांडलेल्या उपपत्ती आणि सिद्धांताचा केलेला विस्तार इत्यादि सर्व गोष्टींचे थोडक्यात पण सर्वस्पर्शी विवेचन लेखिकेने केले आहे. त्याच बरोबर एकाच आदिपूर्वजापासून ते थेट आजच्या मानवापर्यंत सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली, जीवसृष्टीच्या वंशवृक्षाला वेगवेगळ्या फांद्या कशा फुटत गेल्या, नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून टिकून राहिलेल्या सजीवांच्या निरनिरळ्या जाती, प्रजाती कशा निर्माण झाल्या याचे सुंदर , सचित्र वर्णन लेखिका करतात.
सूक्ष्मदर्शकासारख्या आधुनिक उपकरणांच्या अभावी डार्विनच्या काळात अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची नंतरच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली उत्तरे नेटक्या पद्धतीने लेखिकेने मांडली आहेत. आर्.एन्.ए., डी.एन्.ए., गुणसूत्रे (क्रोमोसोम्स), जनुके(जीन्स), जिनोम आदि पारिभाषिक संज्ञांचे अर्थ उत्कृष्टपणे समजावून सांगितले आहेत. क्रीक-वॅटसन ह्या शास्त्रज्ञांच्या शोधांमध्ये आनुवंशिकतेच्या कणांच्या रेण्वीय रचनेचा अंतर्भाव आहे. तर नीरेन्बर्ग-खुराणांना पेशींमध्ये असलेल्या गुणसूत्रांमधील माहितीचा माग लागला. ह्या गुणसूत्रांमध्येच सजीवाचा संपूर्ण इतिहास दडलेला असतो असे आढळून आले. ह्या इतिहासावर म्हणजेच “जिनोम” वर पुस्तकाचे रूपक कल्पून लेखिकेने ते आपल्या ग्रंथात सर्वदूर खेळविले आहे. त्यामुळे विषय समजणे वाचकांसाठी फारच सोपे झाले आहे. आपल्या नेहमीच्या पुस्तकात ज्याप्रमाणे प्रकरणे, परिच्छेद, वाक्यें, शब्द, अक्षरे असतात तशीच याही पुस्तकात आहेत. फक्त त्यांची भाषा सांकेतिक असते. ही जनुकांची भाषा आहे. अनेक शास्त्रज्ञांनी मोठ्या परिश्रमांनी ह्या संकेतांची उकल करण्यात यश मिळविले. ही उकल होऊन पुस्तकाचे “वाचन ” होताच अलीबाबाच्या गुहेचे दार उघडल्यासारखे झाले. सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा संपूर्ण इतिहास दृष्टिक्षेपात आला. पृथ्वीवरील अणुरेणु आणि त्यांची जोडणी करणारे भौतिक नियम हेच या पुस्तकाचे “लेखक” आहेत. व त्यांतील आज्ञावलींना अनुसरूनच सर्व सृष्टीचे व्यवहार चालतात. अन्य कुणाकडेही सृष्टीचे कर्तृत्व आणि चालकत्व जात नाही. असे डॉ.ब्रह्मनाळकर निक्षून सांगतात. पटवूनही देतात. ह्याच नियमांनुसार डी.एन्. ए. व प्रथिने यांचे रूपांतर सजीवांच्या शरीरात होते असे त्या वैज्ञानिक प्रयोगांचे संदर्भ देऊन सांगतात.
उत्क्रांतीच्या इतिहासाचे फारच मनोज्ञ वर्णन लेखिकेने केले आहे.”ल्यूका” (लास्ट युनिव्हर्सल कॉमन अ‍ॅन्सेस्टर) ते माणूस हा प्रवास कसा झाला हे त्यांनी सुबोध पद्धतीने स्पष्ट करून दाखविले आहे. नैसर्गिक निवडीचे तत्त्व सर्व सजीवांना लागू असून त्याला अनुसरूनच सजीवसृष्टी उत्क्रान्त झाली. ह्या ’चाळणी’तून निवडले गेलेले सजीवच टिकून राहातात. जे निवडले जात नाहीत त्यांच्या जाती-प्रजाती नष्ट होतात याविषयीं असंख्य दाखले लेखिकेने दिले आहेत. प्रत्येक प्रजाती जीवनकलहात टिकून राहण्यासाठी धडपडत असते. ही धडपड, हा संघर्षच उत्क्रांतीचा गाभा आहे. हे अधिक स्पष्ट करून दाखविण्यासाठी लेखिकेने जणू आपले बोट धरून उण्या-पुर्‍या साडेतीन अब्ज वर्षांचा प्रवास घडवला आहे. सामान्यत: आपण “स्थळां”चा प्रवास करतो. लेखिका आपल्याला “काळा” तून घेऊन चालतात. एच्. जी. वेल्स ह्यांनी संकल्पिलेल्या “कालयंत्रा (टाईम मशीन) मधून जात असल्याचा भास होतो. “वाटे”मध्ये विविध जाती-प्रजाती कशा उद्भवल्या व उत्क्रांत झाल्या ह्याचे त्यांनी काही प्रातिनिधिक उदाहरणे देऊन मनोहारी दर्शन घडविले आहे. चाळणीत अडकून पडल्यामुळे पुढे सरकू न शकलेल्या दुर्दैवी प्रजातींचे त्यांनी कारणे दाखवून उल्लेख केले आहेत. एकंदरीत हा प्रवास करीत असताना एखादा अद्भुतरम्य चित्रपट पाहात असल्यासारखे वाटते.
उत्क्रांती एकाएकी एका रात्रीतून घडत नसते. ती एक अतिशय संथपणे घडत जाणारी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे आपण एका उडीत पर्वताचे शिखर गाठू शकत नाही; परंतु तेच एकएक पाऊल पुढे टाकीत, हळूहळू ,चढत गेलो तर शिखरापर्यंत पोचू शकतो हे चपखल उदाहरण देऊन उत्क्रांती ही साठत-साठत जाणारी गोष्ट आहे हे लेखिका सहज पटवून देतात. “ह्या सर्व गोष्टी हळू हळू एक एक पायरीने होत होत हजारो पिढ्यांमध्ये घडल्या” असे सांगतात. “पण घाई कोणाला आहे?” असे काहीसे मिष्कील पण वास्तव असे प्रश्नरूप विधान सुलभाताई करतात. आणि लगेच, “न संपणारा काळाचा पट्टा हे उत्क्रांतीचे बलस्थान आहे.” असे सुभाषितवजा वाक्यही टाकतात.
संपूर्णपणे निसर्गाच्या आज्ञेप्रमाणे होत असलेली उत्क्रांती ही एक हेतुशून्य प्रक्रिया आहे. तिला कोणताही उद्देश नाही, ठरलेले असे गंतव्य नाही. निसर्गावर कोणत्याही भाव भावनांचे आरोप करता येत नाहीत. तो नुसता असतो. तो सुष्ट नाही की दुष्ट नाही, सुरूप नाही वा कुरूप नाही, कनवाळू नाही किंवा क्रूर नाही, त्याला कोणीही कर्ता, चालक वा नियंता नाही हे लेखिका आवर्जून सांगतात.
“मानवी जगा”विषयी चर्चा करण्यासाठी लेखिकेने एक स्वतंत्र विभाग ग्रंथाला जोडला आहे. मानवाचे या सृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थान मान्य करूनच त्या ही चर्चा करतात. अर्थात ती करतानाही त्यांनी विज्ञानाचा पदर सोडलेला नाही. उत्क्रांतीच्या मूळ तत्त्वांशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. विज्ञानाच्या मध्यवर्ती धाग्याभोवतीच तर त्यांनी हा संपूर्ण गोफ गुंफला आहे. ह्या अथांग कालप्रवाहात उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या काडीचा आधार घेत वाहात आलेल्या या द्विपादाचे महत्त्वाचे बलस्थान म्हणजे त्याचे भावविश्व.
माणसाचे मन हे परस्पर भिन्न (आणि कित्येकदा तर परस्परविरुद्धही) अशा अनेक भावभावनांची गुंफण आहे. राग, लोभ, दया, करुणा, वात्सल्य, हेवा, मत्सर, सहानुभूती, प्रेम, सहिष्णुता, कृतज्ञता, कृतघ्‍नता, क्रौर्य, आदि किती तरी विकारांनी मानवी मनाचा आश्रय घेतलेला असतो. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाला कधीतरी अशा विकारांचा फायदा झाला असावा. आणि म्हणूनच त्या त्या भावना निर्माण करणार्‍या जोडण्या मेंदूत होऊन त्यांच्यात स्रवणारी रसायने उत्क्रांत झाली असावीत. ह्या भावनांना चांगले , वाईट अशी विशेषणे आपण लावतो. निसर्गात त्या फक्त “वृत्ती” असतात. काहींना सद्गुण तर काहीना दुर्गुण ठरविले जाते ते आपल्या त्याविषयींच्या प्रतिक्रियांवरून. ह्या प्रतिक्रियांमधून माणसाचे विचारविश्व विस्तारले. ह्या विस्ताराचेच नाव “संस्कृती”.
माणूस हा “माणूस” म्हणून उत्क्रांत होण्यापूर्वी “स्वार्थ” हाच सर्व सजीव सृष्टीचा पाया होता. (मानवेतर सृष्टीत तो अजूनही तसाच आहे.) परंतु कुठल्यातरी टप्प्यावर स्वार्थाबरोबरच परार्थसुद्धा प्रजाती टिकून राहाण्यासाठी फायद्याचा ठरतो हे उमगले. आणि परार्थ माणसाच्या जीवनात स्थिर झाला. अर्थात स्वार्थ पूर्णपणे सुटला नाही. एका परीने परार्थातही स्वार्थाचा भाग असतोच. ह्यामुळे एक पेच उभा राहिला. माणसाला “दुहेरी अस्तिवाला ” सामोरे जावे लागले. एक स्वत:साठी आणि एक समाजासाठी. एकीकडे तो “स्वतंत्र जीव” आहे. तर दुसरीकडे “समाजाचा घटक” आहे. त्यात त्याच्या भावविश्वाची ओढाताण होते आहे. स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या हिताची चिंता वाहात असतानाच तो समाजाच्या कल्याणाचीही सोय पाहात असतो. समाजासाठी रामराज्य आणण्याचे, महामानव बनण्याचे स्वप्न तो पाहातो आहे. ते पूर्ण होण्यासाठी संस्कृतीच्या प्रवासात विकसित झालेली जीवनमूल्ये टिकून राहणे आवश्यक आहे. कारण ती दिशादर्शकाचे दीपस्तंभ म्हणून कार्य करतात, असा लेखिकेचा निष्कर्ष आहे आणि त्यासाठी त्या “नेचर ” आणि “नर्चर” अशा दोन्हीची आवश्यकता अधोरेखित करतात.
माणसाला हे शक्य आहे. कारण त्याला निसर्गविज्ञानाचा आधार आहे. ह्या आधाराचे मूळ मेंदूत आहे. सजीवाच्या मेंदूवर जनुकांच्या आज्ञावलींचे नियंत्रण असते. परंतु मानवी मेंदू इतर सजीवांप्रमाणे केवळ प्राथमिक अवस्थेत रेंगाळला नाही. त्याच्यात लवचिकता आहे.त्यामुळे तो विकसनशील बनला आहे. त्याच्या ठिकाणी संस्कारक्षमता आली आहे. तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो. परंतु मेंदूच्या या स्वातंत्र्याचा उपयोग एका मर्यादेतच केला जातो. कारण माणूस हा समाजाचा घटक असतो. ’स्व’ तंत्राने वागण्यापेक्षा ’समाज’ तंत्राने वागणे त्याला सोयीचे व सुरक्षिततेचे वाटत असते. कधीकाळी उत्क्रांतीच्या प्रवासात फायद्याची ठरलेली “टोळीची मानसिकता ” माणसाच्या मेंदूत पक्की रुजली आहे. त्यामुळे लहानपणी मनावर झालेले संस्कार, त्यांतून रूढ झालेल्या समजुती, श्रद्धा, अंधश्रद्धा दृढ होत जातात. घट्टपणे धरून ठेवलेल्या ह्या खुंट्या सोडणे कठीण होऊन बसते. परंतु माणसाच्या स्वातंत्र्याला पडणार्‍या या सांस्कृतिक मर्यादा ओलांडण्याची क्षमताही ह्या मेंदूत आहे. तिचे नाव “विवेक प्रज्ञा “(रीझन).
गेल्या कांही लाख वर्षांत विकसनशील मेंदूत कांही गुंतागुंतीची चक्रे उत्क्रांत झाली आहेत. त्यांतूनच या विवेकप्रज्ञेची प्राप्ती झाली आहे. ही प्रज्ञा मानवाला ’योग्य-अयोग्या’ चा विचार करण्यासाठी मार्दर्शन करते. ज्ञानाचा निकष लावून त्याप्रमाणे कृती करण्याचा आदेश देते. चुकीच्या समजुती, अंधश्रद्धा, जुन्या रूढी यांच्यावर मात करण्याचे बळ देते. थोडक्यात ही विवेकप्रज्ञासुद्धा नैसर्गिकपणे उत्क्रांत झाली असून पूर्णपणे विज्ञानसिद्ध आहे. हे सुलभाताई मोठ्या खुबीने वाचकांना समजावून देतात. “एखाद्या तत्त्वाची, व्यक्तिविरहित चिकित्सा करण्याची क्षमता ही मानवी बुद्धीची फार मोठी झेप आहे.” हे ह्या प्रज्ञेच्या संदर्भात केलेले विधान लेखिकेच्या प्रतिभेचीही झेप दर्शविते.
ग्रंथामध्ये लेखिकेने आपल्या विषयाची अगदी सांगोपांग विस्तृत चर्चा केली आहे. ती करण्याच्या ओघात त्यांनी निसर्गाचे महत्त्व विशद केले आहे. ह्या सृष्टीचा कोणी कर्ता-करविता नाही,कोणी चालक वा नियंता नाही सर्व व्यापार विज्ञानाच्या नियमांनुसार होतात. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे सर्वशक्तिमत्व, तसेच व्रत-वैकल्ये , सक्षात्कार, गूढात बोट दाखवून केलेले भविष्यकथन, अंतर्ज्ञान, चमत्कार आदि समजुती निरर्थक असून त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही हे त्या सहजपणे पण निश्चितपणे नमूद करतात. मुख्य म्हणजे त्यात कुठलाही अभिनिवेश नाही. त्यांनी केलेल्या व्यासंगपूर्ण विवेचनाचा तो अगदी सहज, स्वाभाविक निष्कर्ष आहे.
पुस्तकाची भाषा सुबोध आणि रसाळ तर आहेच, शिवाय त्यात लालित्य आहे. लाघव आहे. विज्ञानासारखा काहीसा गद्य विषय सुलभाताईंनी अतिशय प्रसन्न आणि खेळकर पद्धतीने हाताळला आहे. (हे दोन गुण बहुधा लेखिकेच्या व्यक्तिमत्वातच असावेत.) लेखनशैली इतकी वेधक आणि बोलकी आहे की जणु काही लेखिका आपल्या समोर बसून विषय समजावून सांगत आहेत असा सारखा भास होतो. उद्बोधन, प्रबोधन आणि रंजन अशा तीनही गोष्टी सहज साध्य झाल्या आहेत. सहज लक्ष वेधून घेईल असे सुंदर मुखपृष्ठ आणि सुबक छपाई ह्या आणखी दोन जमेच्या बाजू.
थोडक्यात हे एक अप्रतिम पुस्तक असून विज्ञानाची आवड असलेल्या (आणि नसलेल्यासुद्धा) सुशिक्षित वाचकांनी आवर्जून वाचावे अशी शिफारस करणे अनाठायी होणार नाही. अल्पावधीत पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या हे त्याच्या यशस्वितेचे गमक ठरावे. वाचकप्रियतेचेही.
गोफ जन्मांतरीचे
डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर,
राजहंस प्रकाशन, पुणे.
पृ.सं. 346, किं रु 300

bhalchandra.kalikar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.