महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.
पुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कसे जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत – तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.
जातीचा प्रश्न
एकूण या वादामध्ये ब्राह्मणी छावणी (ब्राह्मण नाही) हुशारीने ‘मूळ प्रश्न ‘जातीचा आहे’, ‘पुरंदरेंच्या जातीमुळे त्यांना विरोध’ असे ‘तांडव’ करून आपण किती ‘सोवळे’, ‘जात पात विसरून पुढारलेले’ अशी मुद्द्याला बगल देत आहे. हिंदुत्व हा मुळात त्याचाच व्यापक परिपाक आहे- ब्राह्मणी छावणीच्या जात-विस्मरणातील आटोकाट प्रयत्नांचा. त्याला विरोध म्हणून ‘मराठा-विरुद्ध ब्राह्मण’ असा वाद लागणे हे ब्राह्मणी छावणीसाठी सोयीचे आहे. त्यांच्या मानभावी कारस्थानाला पोषक आहे. पुरोगामी संघटनांनी हा कावा ओळखला पाहिजे.
आता पुरोगामी संघटना हा कावा खरे तर ओळखून आहेतच. त्याला प्रतिक्रिया म्हणूनच तर स्थूलपणे communist आणि समाजवादी संघटना ‘पुरंदरे यांच्या प्रतिगामी इतिहास-दृष्टीलाही विरोध आणि संभाजी ब्रिगेड च्या मराठा केंद्रित राजकारणाला सुद्धा विरोध’ अशी ‘दोन्ही पक्षांपासून एक समान अंतर ठेवणारी’ भूमिका घेतात- मुक्ता दाभोलकर यांच्या ‘लोकसत्ता’ मधील पत्राने हा मुद्दा अधिक स्पष्ट झाला आहेच. खरे तर पुरंदरे यांच्या जेम्स लेन प्रकरणी सुद्धा अशीच भूमिका पुरोगामी संघटनानी घेतली होती. पण कळीचा प्रश्न असा आहे, की या भूमिकेचा राजकीय अर्थ काय निघतो? या भूमिकेतून वादाला काही नवे वळण मिळाले आहे काय? की त्यामुळे केवळ राजकीय नैतिकता जपली जाते? पुन्हा त्या नैतिकतेचा राजकीय फायदा होईल अशी काही संघटनात्मक बांधणी करून लोकांना आपली भूमिका पटवून देणे असाही पवित्रा दिसत नाही.
दुसऱ्या बाजूला विशेष नजरेत भरते तो दलित संघटना, साहित्यिक यांचे मौन. आता त्या मौनाचा अर्थ ‘हा झगडा ब्राह्मण आणि मराठा यांचा सत्ता वर्चस्वाचा आहे. या नागनाथ आणि सर्पनाथ यांच्या लढाई मध्ये आम्ही दलितांनी काय म्हणून पडावे’ असा काहीसा निघतो. म्हणजे दलित, पुरोगामी यांच्या भूमिका समांतर जात आहेत. ‘ह्या दोन बोक्यांच्या लढाई मध्ये आम्ही पडणार नाही. आमची लढाई वेगळी आहे, दुष्काळ, अत्याचार, आरक्षण अशा सामाजिक, आर्थिक म्हणजे ताबडतोबीच्या गोष्टींवर आम्ही लढतो आहोत. आम्ही FTII, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल अश्या शिक्षणाच्या भगवीकरनाबद्दल जरूर संघर्ष करू. पण उगीच लोकप्रिय इतिहास आणि त्याचे आकलन, त्याचे सांस्कृतिक राजकारण ह्यामध्ये आम्हाला गोवू नका’. असा काहीसा एकूण सूर दिसतो.
प्रश्न संभाजी ब्रिगेड किंवा शरद पवार यांचे आंधळेपणाने समर्थन करायचे का असा नाही. प्रश्न आपल्या राजकीय भूमिकेचा आणि तौलनिकपणाने अधिक घातक शत्रू कोण हे ठरवून त्याप्रमाणे लढण्याचा आहे. आणि एका पातळीवर, आपला इतिहास सांप्रदायिक तऱ्हेने लिहिण्याला आपला विरोध केवळ समान अंतर ठेवून किंवा सोयीस्कर मौन पाळून स्पष्ट होत नाही. केवळ समान अंतर ठेवून ‘शुचिता’ जपता येईल, त्याने राजकारण सिद्ध होणार नाही. होत नाही. त्याने केवळ आपला गोंधळ किंवा आपली क्षीण राजकीय ताकद दिसते.
दुसरा मुद्धा पुरंदरे यांच्या ‘इतिहासाचा’. एका बाजूला त्यांनी आपल्या शाहिरीने महाराष्ट्रातील लोकांना ‘शिवाजी महाराजांची ओळख करून दिली’ असे जे लबाडीने खपवले जाते ते बाजूला ठेवू. फुले, आणि टिळक यांनी ते काम आधीच करून ठेवले होते. पण, पुरंदरे यांनी ‘नव्याने’ ओळख दिली हा भाग खरा आहे आणि fascist इतिहास पुनर्लेखन किती यशस्वी झाले आहे त्याचा पुरावा आहे. आता पुरंदरे यांन्च्याबद्दल ‘प्रतिगामी’ आणि ‘ब्राह्मणी’ अशी विशेषणे वापरताना एक सावधगिरी बाळगली पाहिजे. ‘सामना’ चे संपादकीय, पुरंदरे यांचे लेखन, आणि दर रोजच्या व्यवहारात लोकांचे सांप्रदायिकपण यासाठी एकच एक ‘प्रतिगामी’ असे विशेषण वापरताना त्या प्रत्येक प्रतिगामी व्यवहारात असलेले निराळे संदर्भ, त्यांचे व्यवहारातील वेगळेपण हे लक्षात ठेवले पाहिजे.
पुरंदरे यांचा इतिहास, हिंदुत्वाच्या प्रिय अश्या ‘द्विराष्ट्र’ सिद्धांतावर उभा आहे. यादव, विजयनगर यांच्या पाडावानंतर ३५० वर्षांची काळरात्र होते ती ह्याच ‘हिंदू राष्ट्र’ च्या कल्पनेला धरून. ‘सकळ पृथ्वी आंदोळली ‘धर्म गेला’ असे मंदिरांच्या लुटीचे वर्णन होते. ‘गरीब बिचारे हिंदू (गायीप्रमाणे) परकीय मुस्लीम कसाई राज्यकर्त्यांचे जुलूम सहन करत राहतात, कुणी एखादा अवतारी पुरुष शिवाजीप्रमाणे आला तर हेच हिंदू दगाबाजी करतात, राष्ट्र महान आहे, पण इथले लोक अज्ञ आहेत’ असे १९८० नंतर जोमाने पुढे आलेले राजकीय हिंदुत्व, पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मशागतीवर उभारलेले आहे. खरे तर त्याला मूळ आधार आहे तो इतिहासाच्या ‘प्राचीन च्या ऐवजी हिंदू, मध्ययुगीन च्या ऐवजी मुस्लीम आणि आधुनिक च्या ऐवजी ब्रिटीश’ अश्या विभागणीचा. अगदी रियासतकार सरदेसाई देखील ह्या ब्रिटीश राजवटीतल्या इतिहासाच्या काळ विभागणीचा आसरा घेतात. ‘हिंदू हे मूळ रहिवासी आणि मुस्लीम हे मूळ आक्रमक‘ अशी ही विभागणी RSS च्या प्रिय सिद्धांताला पोषक आहे. साम्राज्यवादविरोधी लढ्यात फूट पाडणारी आहे. खरी चिंतेची बाब अशी आहे की ‘मूळ निवासी’ हा सिद्धांत लोकप्रिय झाला आहे, लढ्याचा पाया बनला आहे. ब्राह्मणी असो की अब्राह्मणी, दोन्ही छावण्या ‘मूळ निवासी’ ह्या मांडणी ला धक्का देत नाहीत. आणि तसे झाले की अगदी ‘पुरोगामी’ म्हणवणाऱ्या आंदोलनाना देखील कसे प्रतिगामी वळण मिळते हे आपल्या चांगलेच परिचयाचे आहे. त्या अर्थाने दलित- पुरोगामी संघटना ह्या वादापासून का फटकून राहिल्या आहेत हे समजण्याजोगे आहे. पण तितकेच धोकादायक देखील आहे.
अनैतिहासिक इतिहास आणि राजकारण
अखेर ‘उदारमतवादी आणि मानभावी लोकांच्या समजुतीप्रमाणे जुन्या इतिहासकारांनी पुरंदरे यांच्या इतिहासाबद्दल काय म्हटले आहे ते सांगून’ वाद मिटणार नाही, मिटत नसतो. कारण तेव्हा सोयीने पुरंदरे यांची होते ‘शाहिरी’, ‘ललित कला’. मग ‘शहाजी- जिजाबाई विरुध्द रामदास-दादोजी’ असले वर्गीकरण हे आपल्या वर्तमान संघर्षाचे एक rhetorical ऐतिहासिक रूप बनते आणि त्यात कल्पनाविस्तार होतात, ‘आपले विरुध्द त्यांचे’ अशा तऱ्हेने. आता हे कल्पनाविस्तार एका पातळीवर ‘हिंदू विरुध्द मुस्लीम’ असला काल्पनिक संघर्ष देखील त्या काळात होता (शिवाजी- चंद्रराव मोरे, जय सिंग किंवा शिवाजी कुतुब शहा संबंध विसरून), ह्या logic च्या तऱ्हेचे राहतात. इतिहास लेखन म्हणजे आजच्या राजकीय संघर्षाचे विस्तारित रूप असते. ‘identity’ ला मूळ ठेवणाऱ्या राजकारणात असले अनैतिहासिक प्रकार होतच राहणार. जातीचा प्रश्न, इतिहास की शाहिरी असले वाद निव्वळ मानापमानाच्या लढाईत सुटणारे नाहीत. उलट ते जास्त गडद होतात.
‘कुळवाडी भूषण’ शिवाजी आणि राष्ट्रक
तेव्हा ह्या अनैतिहासिक इतिहासाच्या राजकारणात महात्मा फुले- कॉम्रेड पानसरे यांच्या ‘कुळवाडी भूषण’ शिवाजीला मध्यभागी आणायची आवश्यकता आहे. १७व्या शतकात ‘राष्ट्र’ किंवा ‘धर्म’ आजच्या आधुनिक अर्थाने किंवा तऱ्हेने वापरात नव्हते. त्या काळातील उत्पादन संबंध, त्यातील शिवाजीचे योगदान आणि महत्व, जमीनदाराना बसवलेला चाप हे खरे त्या राष्ट्रवादाचे मूळ आहे. नाहीतर, राजपूत राजे कमी ‘हिंदू’ नव्हते. पण महाराष्ट्र हे राष्ट्र बनले, जुलमी पेशवाई मधेही टिकून राहिले, ते शिवाजीच्या ह्या क्रांतिकारक धोरणामुळे. त्यामुळे त्याला एकदम महाराष्ट्रातील लेनिन करायची गरज नाही. (राजवाडे यांनी रामदासाला महाराष्ट्राचा हेगेल म्हटले होते तसे). पण ‘जातिच्या आधारित विरोध आहे’ असे जे म्हणतात त्यांचा प्रतिवाद केवळ जातीसंबंध आणि त्यातील जुलूम, अपमान उलगडून होत नसतो- त्यातील वर्गसंबंध देखील लक्षात ठेवावे लागतात. फुले यांचे मोठेपण त्यासाठीच कि त्यांनी ‘कुळवाडी भूषण’ हे ‘व्यापक जाती-सूचक आणि वर्ग-वाचक’ अभिदान वापरले. आणखी महत्वाचे म्हणजे आजही आपली राष्ट्रक म्हणून जी ओळख आहे ती ‘शिवाजी’शी निगडीत आहे. केवळ प्रतिगामी शक्तींना दोष देऊन, ती ओळख बदलणार नाही. आपले आजचे उत्पादन संबंध, जाती संघर्ष हे विशिष्ट तऱ्हेने व्यक्त होतात आणि त्यासाठी आजही ‘राष्ट्रक’ ही ओळख महत्वाची आहे. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड पानसरे अश्या communist नेत्यांनी ‘शिवाजी’ ही राष्ट्रक म्हणून महाराष्ट्राची ओळख लक्षात ठेवून ‘शिवाजी आमचा आणि त्यांचा’ अशी रोखठोक ‘लोकांचा राजा शिवाजी’ म्हणून आपली भूमिका मांडली. ‘फुले शाहू आंबेडकर’ यांचा महाराष्ट्र आहेच, पण शिवाजी आणि महाराष्ट्र ही ओळख देखील मूलभूत आहे, तिला पुरेसे महत्व देण्याची गरज आहे. पुरोगामी विचार आणि राष्ट्रवाद याबद्दलचा यशस्वी fascist प्रचार कुठेतरी आपल्या राष्ट्रवादाच्या व्याखेतील त्रुटीचा आणि तिला प्रतिगामी राष्ट्रावादापासून वेगळ्या अशा पायावर उभी न करण्याचा परिपाक आहे. मग एकीकडे ‘सर्वच राष्ट्रवाद घातक’ अशी समजूत होते, किंवा ‘आर्थिक बाबतीत पुरोगामी डावी भूमिका आणि सांस्कृतिक क्षेत्र उजव्या शक्तींना मोकळे’ अशी परिस्थिती होते.
माझ्या माहितीप्रमाणे विद्याधर दाते यांनी आपल्या countercurrents.org मधील लेखात शिवाजीला ‘पुरोगामी, secular, किंवा जमीन महसुलात क्रांतिकारी सुधारणा करणारा लोकप्रिय राजा’ असे ठरवण्याची गरज नाही असे प्रतिपादन केले आहे. प्रश्न असा आहे- की शिवाजीला कोणीही डाव्या पक्षांनी क्रांतिकारक ठरवलेले नाही. पण मग ‘शिवाजी आणि महाराष्ट्र’ असा संबंध कसा वाचायचा? राजकारणाला सतत आर्थिक पाया आणि इमला असे पाहणे किती धोकादायक असते ते नव्याने सांगायला नको. पण शिवाजीच्या लोकप्रियतेचा आणि महाराष्ट्र या राष्ट्रकाच्या उदयाचा आर्थिक संबंध कसा पहायचा ते देखील महत्वाचे आहे. मध्ययुगीन राजावर आधुनिक कल्पनांचे आरोपण नको हे ठीक आहे. पण त्या काळाच्या संदर्भात आणि जमीनदारांशी असलेल्या शिवाजीच्या राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा इतिहास मांडला पाहिजे. तरच त्याचा अर्थ लागायला मदत होते.
अखेरीस, लोकप्रिय संस्कृतीमध्ये पुरोगामी विचारांची पीछेहाट काही आजची नाही. त्यात कॉम्रेड पानसरे यांचे बलिदान हे सर्वात ठळक. एकीकडे रेशीमबागेच्या तालावर चालणारे फडणविशी सरकार कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येकडे डोळेझाक करते, आणि दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरे सारख्याना ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणून गौरवते हा विरोधाभास नाही. त्यात एक उघड राजकीय सातत्य आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या लढाईचा खरा अर्थ ह्या ब्राह्मणी छावणीला, इतिहासाच्या विकृतीकारणाला एक सातत्यपूर्ण राजकीय विरोध आहे. ही लढाई शिवाजी चे केवळ banner, sticker किंवा ‘मराठ्याचा अपमान’ असे नारे देऊन जिंकता येणार नाही. ब्राह्मणी छावणीकडे त्याला पुरून उरेल इतका पैसा, वेळ, कावा, चातुरी आणि पुरंदरे आहेत. त्याला शह कसा द्यायचा हा खरा प्रश्न आहे. आणि त्यासाठी पुरोगामी- दलित चळवळीचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. म्हणूनच ‘केवळ ‘समान अंतर’ ठेवू नका, किंवा मौन पाळू नका, गो. पु. देशपांडे म्हणत तसे ‘धिटाईने वादंगात सहभागी व्हा!’
rahul.democrat@gmail.com,