मानवी बुद्धी आणि ज्ञान

गीतेच्या तिसर्‍या अध्यायातील बेचाळीसावा श्लोक आहे :

इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।
मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स: ।(गीता 3.42)

अर्थ: (स्थूल शरीराहून) कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे. तर मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि बुद्धीच्याही पलीकडे सर्वश्रेष्ठ असा “तो” आहे. इथे तो या सर्वनामाच्या ठिकाणी आत्मा अभिप्रेत आहे.
या श्लोकात श्रेष्ठतेची जी चढती भाजणी दिली आहे ती अचूक आहे. इंद्रियांवर मनाचे नियंत्रण असायला हवे. तसेच मनावर बुद्धीचे. बुद्धीच्या पलीकडे असलेला आत्मा हा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. मनाचे अधिष्ठान मेंदू आहे. म्हणजे सर्व भाव-भावनांचा उद्गम मेंदूत होतो. तसेच मानवी बुद्धीसुद्धा मेंदूतून उद्भवते. म्हणून बुद्धीहून श्रेष्ठ मेंदू आहे. उपनिषदांत तसेच गीतेत त्यालाच आत्मा म्हटले असावे. कारण त्याकाळी मेंदू आणि त्याचे कार्य या विषयीचे कोणतेच ज्ञान माणसाला नव्हते. पण अद्भुत कार्य करणारी काही यंत्रणा शरीरात आहे असे त्या ऋषींना वाटत होते. म्हणून त्यांनी हृदयस्थ आत्म्याची कल्पना केली. पण ती यंत्रणा म्हणजे मानवी मेंदू.
मानवी मेंदू हे अब्जावधी मज्जापेशींपासून बनलेले, अत्यंत गुंतागुंतीचे, व्यामिश्र असे विद्युत-रासायनिक ( इलेक्ट्रो-केमिकल ) यंत्र आहे. मेंदूच्या अनेक क्षमता आहेत. त्यांतील जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, अपोहन (निरीक्षणांवरून तर्कसुसंगत निष्कर्ष काढण्याची क्षमता), प्रतिभाशक्ती, अंत:स्फुरणशक्ती, आणि विवेकशक्ती या क्षमतांचा समुच्चय म्हणजे मानवी बुद्धी होय. म्हणजे बुद्धीची नऊ अंगे – नऊ घटक – आहेत. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसात यांतील पहिले सहा घटक कमी-अधिक प्रमाणात असतात. प्रतिभा, अंत:स्फुरण, आणि विवेक या क्षमता प्रत्येक व्यक्तीत असतीलच असे नाही. मतिमंद व्यक्तीत स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि तर्कशक्ती हे तीनच घटक अल्प प्रमाणात असतात.
बुद्धिद्वारे माणूस ज्ञान प्राप्त करतो. त्यातून तंत्रज्ञानाची निर्मिती होते. माणसांसाठी उपयुक्त साधनांचे उत्पादन होते. त्यामुळे माणसाचे जीवन अधिकाधिक सुख-सुविधापूर्ण, सुकर आणि सुरक्षित होते. तसेच बुद्धीच्या सहाय्याने माणूस नवीन ज्ञान निर्माणसुद्धा करतो. जे समाजाच्या ऐहिक प्रगतीला उपयुक्त ठरते तेच खरे ज्ञान होय. इथे सर्वांगीण प्रगती विचारात घ्यायला हवी . म्हणजे आर्थिक प्रगती, सांस्कृतिक प्रगती, सामाजिक प्रगती इत्यादि. मानवी ज्ञानाचे चार प्रमुख प्रकार सांगता येतील. ते आहेत:
• अर्जित ज्ञान (माणसाने निसर्गातून प्राप्त केलेले ज्ञान ).
• निर्मित ज्ञान (माणसाने निर्माण केलेले उपयुक्त ज्ञान.)
• भ्रमित ज्ञान (माणसाच्या चुकीच्या संकल्पनांमुळे निर्माण झालेले अज्ञान.)
• भंपक विज्ञान (स्यूडो सायन्स)
आता या चार प्रकारांविषयी थोडक्यात पाहू.
अर्जित ज्ञान
म्हणजे प्राप्त केलेले ज्ञान. विशेषत: निसर्ग नियमांचे ज्ञान. मुख्यत्वेकरून जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती आणि अपोहन क्षमतांद्वारे हे ज्ञान प्राप्त होते. पृथ्वीवरील चराचर सृष्टीत अनेकविध गोष्टी आहेत. (सजीव प्राणी, निर्जीव वस्तू). त्यांचे गुणधर्म शोधून ते जाणणे. परस्पर संयोगांचे (अभिक्रियांचे) परिणाम शोधून ते जाणणे. सृष्टीत तसेच विश्वात ज्या अनेक नैसर्गिक घटना घडतात त्यासंबंधीचा कार्य-कारण भाव उलगडणे. थोडक्यात म्हणजे निसर्गनियमांचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे अर्जित ज्ञान संपादन करणे होय.
माणसाची जिज्ञासा आणि निरीक्षणशक्ती यांमुळे त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न उद्भवतात. पाऊस का पडतो? धरणीकंप का होतात? वादळे कशी निर्माण होतात? अरण्यात वणवा आपोआप लागलेला दिसतो त्याचे कारण काय असावे? सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन का होते? सूर्य- चंद्र यांना ग्रहणे का लागतात? थोड्या वेळात ती का सुटतात? ऋतुचक्र का होते? चंद्राच्या कला का दिसतात? अशा अनेक प्रश्नांवर माणसाने सतत विचार केला. या सर्व प्रश्नांची सत्य उत्तरे माणसाला यथाकाल सापडली. त्याला अनेक निसर्गनियमांचे ज्ञान प्राप्त झाले. हे नियम माणसाने निर्माण केलेले नाहीत. ते निसर्गात अस्तित्वात आहेत. त्या नियमांनुसार घटिते घडत असतात. असे निसर्गनियम अनेक आहेत.
झाडावरचे फळ खाली पडताना पाहून न्यूटनची जिज्ञासा जागृत झाली. त्याच्या डोक्यात प्रश्न उद्भवला की फळ खाली का पडते ? तसेच चेंडू वर उंच फेकला तरी थोड्या वेळाने खाली का येतो ? या प्रश्नावर त्याने तर्कशक्तीने विचार केला आणि वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रकट झाला. माणसाला समजला. ग्रह सूर्याभोवती का फिरतात ते स्पष्ट झाले. ग्रहांच्या गतीचे गणित सुटले.
पाण्याने काठोकाठ भरलेल्या टबात आर्किमेडीज आंघोळीसाठी शिरला. काही पाणी टबाबाहेर सांडले. आर्किमेडीजचे विचारचक्र सुरू झाले. बाहेर सांडलेले पाणी किती असेल ? हीरो राजाच्या मुकुटाविषयींच्या प्रश्नावर तो आधीच विचार करीत होता. त्याला उत्तर सापडले. या संदर्भात त्याने शोधलेल्या तत्त्वांना शालेय पुस्तकात आजही स्थान आहे. माणसाच्या मेंदूतील जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती, आणि अपोहन (म्हणजे तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची शक्ती), यांद्वारे निसर्गनियम शोधता येतात. निसर्गनियमांचे ज्ञान म्हणजे सत्यज्ञान. गेल्या काही शतकांत जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी निसर्गनियम शोधले. ते पुन:पुन्हा तपासले. या संशोधित नियमांना वैज्ञानिक तत्त्वे असेही म्हणतात. विविध क्षेत्रांत माणसाचे ज्ञान वाढू लागले.
• वाफेतील ऊर्जेचा शोध लागला. त्यांतून वाफेवर चालणारे इंजीन विकसित झाले. आगगाड्या धावू लागल्या. अथांग महासागरात बोटी चालू लागल्या.
• इंधनाच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते हे समजले. त्यांतून इंटर्नल कंबश्चन इंजिन आले. दुचाकी, चौचाकी स्वयंचलित वाहने पळू लागली. वाहतूक कितीतरी सुलभ, कितीतरी वेगवान झाली.
•विद्युत् ऊर्जेचा शोध लागला. रात्रीचा अंधार दूर झाला. सुखसोयीची अनेक साधने विकसित झाली. माणसाचे शारीरीक कष्ट कमी झाले. विजेमुळे निर्माण झालेल्या सुविधांची यादी न संपणारी आहे.
• निसर्गातील सर्व मूलद्रव्ये शोधली. पीरिऑडिक टेबल सिद्ध केले. पदार्थांतील रेणूंची रचना समजली. अणूचे अंतरंग उलगडले. कितीतरी नवनवीन वस्तू ,नवनवीन साधने निर्माण हाली.
• सूक्षदर्शक यंत्रातून जंतू दिसले. अनेक रोगांवर, प्रतिबंधक लसी, प्रभावी परिणामकारक औषधे मिळू लागली. अनेक माणसांचे अकाली मृत्यू टळले.
अशाप्रकारे जगातील वैज्ञानिकांच्या वैयक्तिक तसेच सांघिक प्रयत्‍नांतून मानवाच्या अर्जित ज्ञानाचे अधिकृत ज्ञानभांडार निर्माण झाले. त्यात प्रत्यही भर पडतच आहे. आपण शाळा-कॉलेजांतून जे ज्ञान म्हणून शिकतो ते या अधिकृत ज्ञानसंग्रहाचा भाग असते. जगभरातील अधिकृत शिक्षण संस्थातून हेच ज्ञान शिकवितात.
या ज्ञानभांडारावर कोणाचा एकाधिकार नाही. ते जगातील सर्वांना विनामूल्य उपलब्ध आहे. हे सत्यज्ञान स्थल-काल-व्यक्ति निरपेक्ष आहे. ते वस्तुनिष्ठ आहे. हे ज्ञान पौर्वात्य, पाश्चिमात्य, औत्तरात्य, दाक्षिणात्य असे नसते. मानवाने प्राप्त केलेले हे ज्ञान सर्वांसाठी असते.
सत्यान्वेषणाची म्हणजे निसर्गनियम शोधण्याची वैज्ञानिक पद्धत संशोधकांनी विकसित केली आहे. ती पूर्णत्वाला पोहोचली नसेल. प्रत्येक गोष्टीत सुधारणा करणे शक्य असते. ती कालौघात घडून येते. ज्ञान वाढत असते. सत्यान्वेषणाची ही (वैज्ञानिक पद्धत) एकमेव विश्वासार्ह पद्धत आहे. सत्यशोधनाचा अन्य कोणताही मार्ग नाही. ध्यान-धारणा-समाधी-साक्षात्कार सद्गुरुने शिष्याच्या डोक्यावर हात ठेवल्याने होणारा शक्तिपात (ज्ञानाचे संक्रमण) असल्या भ्रामक गोष्टींतून सत्यज्ञान प्राप्त होत नसते. अशा मार्गांनी ज्ञान संपादन केल्याचा दावा कोणी मांडला तरी त्या ज्ञानाने वैज्ञानिक निकष पूर्ण केल्याविना त्या ज्ञानाला माणसाच्या अर्जित ज्ञानाच्या अधिकृत भांडारात स्थान मिळत नाही.
माहिती आणि ज्ञान यांतील भेद (फरक) जाणला पाहिजे. ज्ञानाचे आकलन व्हावे लागते. त्यासाठी बुद्धीच्या तर्कशक्तीची आवश्यकता असते. माहिती लक्षात ठेवायची असते. त्याकरिता स्मरणशक्ती चांगली असावी लागते. भूमितीच्या प्रमेयाची सिद्धता एकदा समजून घेतली की स्मरणात ठेवावी लागत नाही. ती केव्हाही लिहिता येते. कारण त्यामागे तर्कसंगती असते. पण “वसईच्या तहाच्या अटी “स्मरणात असतील तरच लिहिता येतील. त्यामागे कोणतेही तर्कशास्त्र नसते. जगातील सर्व देशांच्या राजधान्यांची नांवे कांही मुलांना तोंडपाठ असतात. त्यांची बुद्धी अलौकिक असते असे नाही. घोकंपट्टी केलेली असते, स्मरणशक्ती चांगली असते एवढेच.
“कौन बनेगा करोडपती” सारख्या सामान्य ज्ञानाच्या(जी.के) स्पर्धांत चौफेर वाचनाची आणि स्मरणशक्तीची कसोटी लागते. संपूर्ण बुद्धीची नव्हे. स्मरणशक्ती हे तर बुद्धीचे गौण अंग आहे. तर्कशक्ती आणि अपोहन ही प्रधान अंगे आहेत. या स्पर्धेत तर्कावर आधारित प्रश्न कधी विचारल्याचे ऐकिवात नाही.
इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे केवळ माहितीचे विषय आहेत. त्यांत तर्काला फारसा वाव नाही. भाषा विषयातील व्याकरणाचा भाग कांही प्रमाणात तर्काधिष्ठित आहे. अन्य प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्ती यांचा उपयोग होतो. अंकगणित आणि भूमिती हे विषय पूर्णतया तार्किक आहेत. बीजगणितातही तर्कशक्तीचा बराच उपयोग करावा लागतो.
निर्मित ज्ञान
माणसाने निसर्गातील नियम शोधून काढून सत्यज्ञान प्राप्त केले. तसेच आपली कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती आणि अंत:स्फुरणशक्ती यांच्या बळावर नवीन ज्ञान निर्माण केले. हे ज्ञान अमूर्त संकल्पनांविषयी आहे तसेच मूर्त संकल्पनांविषयीही आहे. व्याकरणशास्त्र, गणितशास्त्र, अर्थशास्त्र, आदि अमूर्त शास्त्रे आहेत तर नाट्यशास्त्र, शिल्पशास्त्र, संगीतशास्त्र, नृत्यशास्त्र, सूपशास्त्र इत्यादि मूर्त शास्त्रे आहेत. या विषयींचे सर्व ज्ञान हे मानवनिर्मित आहे. अर्जितज्ञानाप्रमाणे हे ज्ञान सुद्धा नियमबद्ध आहे. गणितशास्त्र सोडले तर अन्य शास्त्रांचे नियम स्थळ-काल निरपेक्ष नाहीत. ते संस्कृतिसापेक्ष, भाषासापेक्ष आहेत.
संस्कृतभाषेच्या व्याकरणाविषयी सांगायचे तर पाणिनीची अष्टाध्यायी आणि त्यावरील पातंजल महाभाष्य हे दोन महान ग्रंथ आहेत. त्यांतील मानवनिर्मित ज्ञान उच्च कोटीचे आहे. पाणिनीने व्याकरणशास्त्र पूर्णत्वाला नेले. त्यांतील सूत्रे म्हणजे अत्युच्च बुद्धीचा आविष्कार आहे. या अष्टाध्यायीवर महर्षी पतंजलीनी रचलेले पातंजल महाभाष्य हे तितकेच श्रेष्ठ आहे.
गणितशास्त्र एकदम परिणत झाले नाही. आवश्यकते अनुसार हळू हळू विकसित होत गेले. आज या शास्त्राचा फार मोठा विस्तार झाला आहे. अनेक प्रगत शास्त्रांना गणिताचे साहाय्य घ्यावे लागते. व्याकरणशास्त्र हे एका भाषेसाठी मर्यादित असते. गणितशास्त्राला भाषेच्या तसेच संस्कृतीच्या, स्थल-कालाच्या मर्यादा नाहीत. ते जागतिक आहे. सर्वांसाठी आहे. आजवर जगात अनेक महान गणिती होऊन गेले. भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे नाव सर्वश्रुत आहे.
माणसाने अनेक खेळ, क्रीडाप्रकार निर्माण केले. ते मुख्यत्वेकरून मनोरंजनार्थ असले तरी ते नियमबद्ध आहेत. म्हणून विविध क्रीडाप्रकार मानवनिर्मित ज्ञान आहे असे मी मानतो. सारीपाट, बुद्धिबळ, पत्ते, तसेच अनेकानेक मैदानी खेळ यांचा विचार केल्यास हे मानवनिर्मित ज्ञान आहे हे पटू शकेल. मला तरी हे ज्ञान वाटते. कारण प्रत्येक क्रीडा प्रकार नियमांनी बद्ध आहेत आणि ते नियम सर्वमान्य आहेत. निर्मित ज्ञानाचे आणखी अनेक विषय आहेत. कांही थोड्यांचाच इथे निर्देश केला आहे.
भ्रमित ज्ञान
भ्रमित ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. म्हणजे अज्ञानच. माणसाला सत्यज्ञान शोधायचे असते. पण कधी कधी (खरे तर बरेचदा) मूळ संकल्पना अथवा गृहीत तत्त्व सदोष म्हणजे चुकीचे असते. कारण त्या त्या काळच्या ज्ञानाची ती मर्याद असते. तसेच सत्यान्वेषण करण्यास प्रवृत्त झालेल्या काही जणांचे काही पूर्वग्रह असतात. त्यामुळे ते भरकटतात. भलत्याच मार्गाने जाऊ लागतात. त्यातून विपरीत म्हणजे भ्रमित ज्ञान निर्माण होते.
उपनिषद् कालीन (हा काळ इ.स.पू.1500असावा.) ऋषि-मुनींचे उदाहरण घ्या. पुरुष, स्त्रिया, मुले हा 700/800 माणसांचा समूह असावा. त्याकाळी असे समूह ठिकठिकाणी असतील. पण त्यांचा फारसा परस्पर संबंध नसावा. कारण त्याकाळी संपर्कसाधने नव्हती. रस्ते, पूल काहीच नव्हते. पायी, अथवा फार तर बैलगाडीतून, घोड्यावरून प्रवास. एका समूहात प्रतिभावंत, बुद्धिमान, विचारवंत अशा ऋषींची संख्या अधिकतर 30/40 असेल. ते एकत्र जमून चर्चा करीत. त्यात त्यांचे काही शिष्यही असत. सजीव शरीरात आत्मा असतो. तो अमर असतो. अशा त्यांच्या पूर्वजांच्या कल्पना त्यांना मान्य होत्या. त्या गृहीतकावर त्यांनी पुढे विचार केला. माणूस मृत्यु पावतो. दहन केल्यावर शरीर नष्ट होते हे प्रत्यक्ष दिसत होते. अनुभवाला येत होते. मग अमर आत्म्याचे काय होते ? यावर विचारमंथन करून त्यांनी चार पर्याय शोधले. पुनर्जन्म, स्वर्ग, नरक आणि मोक्ष. ज्या माणसाच्या संचितात पुण्य कर्मांचे तसेच पाप कर्मांचे भोग शेष (शिल्लक) असतात त्याचा पुनर्जम होतो. ज्याच्या संचितात केवळ पुण्यकर्मांचे भोग राहिले आहेत, तो स्वर्गाला जातो. ज्याच्या संचितात केवळ पापाचे भोग आहेत, तो नरकात जातो. तर ज्याचे सर्व कर्मभोग भोगून संपले आहेत , संचितात काहीही राहिले नाही, त्याला मोक्ष मिळतो. हे त्यांना सयुक्तिक वाटले. जो माणूस मोक्षाचा अधिकारी आहे त्याचे निधन झाल्यावर त्याच्या आत्म्याची काय गती असते त्याचे उपनिषदांतील वर्णन पुढील प्रमाणे आहे:-
मोक्ष मिळविण्यास पात्र असलेल्या माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा सुषुम्ना नाडीतून वर वर येत, ब्रह्मरंध्र भेदून शरीराबाहेर पडतो. आत्म्यासमवेत प्राणही बाहेर येतात. तसेच पंच ज्ञानेंद्रिये (म्हणजे त्यांच्या अधिष्ठात्री देवता) मृतशरीराबाहेर पडतात. आत्मा, प्राण आणि ज्ञानेंद्रिये सर्व सूक्ष्म रूपात असतात. ती सूक्ष्म शरीरात म्हणजे लिंगदेहात प्रवेश करतात. आता हा लिंग देह सूर्य किरणावर आरूढ होतो आणि त्यावर बसून वर वर सूर्यलोकी पोहोचतो. पृथ्वीपासून सूर्यापर्यंतच्या प्रवासाच्या या वाटेला अर्चिमार्ग म्हणतात. सूर्यलोकातून वर वर जात तो आत्मा चंद्रलोकात जातो. तिथून विद्युत्लोकात पोहोचतो. इथपर्यंतचा मार्ग लिंगदेहाला ठाऊक असतो. कारण सूर्य-चंद्र-विद्युत् पृथ्वीवरून दिसतात. तिथून पुढे ब्रह्मलोकाचा मार्ग आत्म्याला ठाऊक नसल्याने एक अमानवी पुरुष त्या आत्म्याला विद्युत् लोकातून ब्रह्मलोकी घेऊन जातो. तिथे त्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. आत्मा परब्रह्मात विलीन होतो. त्याचे जन्म-मृत्यूचे फेरे थांबतात. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या प्रवासाचा आत्म्याचा हा जो मार्ग आहे त्याला देवयान मार्ग असे म्हणतात.
ज्याला आधुनिक विज्ञानाची थोडीतरी ओळख आहे; तो हे देवयान मार्गाचे वर्णन वाचून म्हणेल, ” काय हे लिहिले आहे ! याला काही अर्थ आहे का? आत्मा, प्राण, ज्ञानेंद्रिये सूक्ष्म रूपात लिंगदेहात बसतात काय. मग तो देह सूर्यकिरणावर बसून सूर्यलोकात जातो काय. तिथून चंद्रलोक, विद्युतलोक करीत शेवटी ब्रह्मलोकापर्यंत पोहोचतो काय? कशाला काही अर्थ? सूर्य आहे इथून 15 कोटी किमी अंतरावर. आधी तिथे जायचे. तिथून चंद्रावर म्हणजे 14 कोटी 96 लक्ष किमी मागे यायचे (कारण पृथ्वी पासून चंद्राचे अंतर आहे 4 लक्ष किमि.). आणि तो विद्युत्लोक कुठे आहे? वीज ढगात निर्माण होते.म्हणजे चंद्रावरून ढगात यायचे. मग तिथून ब्रह्मलोकात जायचे? हा द्राविडी प्राणायाम कशाला? भूमीवरून ढगात गेले की विद्युत्लोक आला. पण उपनिषद्कालीन ऋषींच्या कल्पना वेगळ्या होत्या. सूर्यप्रकाश प्रखर असतो तर चंद्रप्रकाश सौम्य दिसतो. म्हणून सूर्यापेक्षा चंद्र खूप दूर असला पाहिजे. विद्युत् तर दिसते न दिसते तो अदृश्य होते. ती खूपच दूर आहे अशा त्या काळच्या कल्पना होत्या. त्यावेळच्या ज्ञानाच्या त्या मर्यादा आहेत.
पण हे सारे उपनिषदांत आहे म्हणून सत्य असले पाहिजे असे मानणारे पुष्कळ लोक आहेत. ऋषी त्रिकालज्ञ होते. ते चुकीचे सांगणारच नाहीत. असे त्या धार्मिकांचे म्हणणे असते. पण आपण आज जाणतो की हे अज्ञान आहे.म्हणून याचा समावेश मानवनिर्मित भ्रमित ज्ञानात करायचा. हे असे चुकीचे का निर्माण झाले? कारण अमर आत्मा असतो. ब्रह्मलोक अस्तित्वात आहे. मोक्षाची संकल्पना खरी आहे. अशी भ्रामक गृहीतके खरी मानली. गृहीतक चुकीचे असले की अंतिम निष्कर्ष चुकीचा निघणारच. त्यामुळे या भ्रमित ज्ञानाची निर्मिती झाली. देव आणि धर्म यांच्याशी निगडित बहुतेक संकल्पना भ्रामक आहेत. त्यामुळे देव-धर्म विषयांशी संबंधित बहुतेक तथाकथित ज्ञान, ब्रह्मज्ञान, अध्यात्मज्ञान हे भ्रमित ज्ञान आहे. म्हणजे अज्ञानच आहे. कारण देहाहून भिन्न असा आत्मा अस्तित्वात नाही.
भ्रमित ज्ञानाच्या निर्मितीचा मूळ हेतू सत्यान्वेषण हा असतो. पण चुकीच्या गृहीतकांमुळे तसेच अन्य काही कारणांमुळे मार्ग भटकतो आणि अज्ञान निर्माण होते. पुढे वैज्ञानिक शोधांमुळे हे सिद्ध झाल्यावर माणसाने भ्रमित ज्ञानाचा त्याग करायला हवा. पण तसे होत नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे हितसंबंध. या भ्रमित ज्ञानाने श्रद्धाळूंना फसवून त्यांचे आर्थिक शोषण करता येते हे समजल्यावर हितसंबंधी धूर्त आणि लबाड माणसे हे भ्रमित ज्ञान समाजात टिकवून धरण्याचे नाना प्रयत्‍न करतात. त्यांचे आर्थिक सामर्थ्य मोठे असल्याने ते यात यशस्वीही ठरतात. त्यामुळे अनेक धार्मिक कर्मकांडे , फलज्योतिषासारखी थोतांडे अजून टिकून आहेत. अनेक माणसे अज्ञानाच्या अवगुंठनात (पांघरुणात) आहेत. त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. पण शोषितांना त्याची काहीच कल्पना नाही. समाजाची वैचारिक प्रगती खुंटली आहे.
या वैज्ञानिक युगातही भ्रमित ज्ञान दीर्घकाळ टिकून रहिल्याचे आणखी एक कारण म्हणजे आपले पूर्वज, ऋषि-मुनी, वेद-उपनिषदे-पुराणे-सर्वच धर्मग्रंथ यांविषयी अतिरिक्त दुरभिमान. त्यामुळे ही भ्रमितज्ञानप्रेमी श्रद्धावंत माणसे ” आमच्या वेद-उपनिषदांत सर्व ज्ञान आहेच. आम्हांला आधुनिक विज्ञानाची आवश्यकता नाही. वेदांचा अभ्यास करून त्यांचा अर्थ लावला, यज्ञ-यागादि श्रुति-स्मृति-पुराणोक्त कर्मकांडे यथासांग केली म्हणजे झाले. आम्हांला सगळे येणारच. आम्ही जगाचे नेतृत्व करणारच. ते विधिलिखितच आहे. पूर्वी आपण विश्वगुरू होतो. ते पद आम्हांला पुन: प्राप्त होईल.” अशा भलभलत्या अवास्तव कल्पनांत गुंग होऊन राहातात.
ज्ञाननिर्मितीचा हेतू सत्यान्वेषण (सत्य शोधणे) हा असतो.पण चुकीच्या गृहीतकांमुळे तसेच अन्य काही कारणांनी अन्वेषणाचा मार्ग भरकटतो. आणि भ्रमित ज्ञान निर्माण होते, हे आपण पाहिले.
भंपक विज्ञान (स्यूडो सायन्स)
हे मानव निर्मित आहे. कारण हे ज्ञान विश्वात आधीच असित्वात असलेल्या निसर्गनियमांचे ज्ञान नव्हे. हे भंपक विज्ञान म्हणजे अज्ञानच आहे. भ्रमितज्ञान आणि भंपकविज्ञान ही दोन्ही मानवनिर्मित असली आणि दोघांचाही समावेश अंतत: अज्ञानात होत असला तरी आपल्या देशात त्यांच्या निर्मितीप्रक्रिया मूलत: भिन्न आहेत. म्हणून हे दोन वेगळे प्रकार मानले आहेत. भ्रमितज्ञान निर्मितीचा मूळ हेतू सत्यान्वेषण हा असतो हे वर सांगितलेच आहे. आपल्याकडे भंपकविज्ञानाचा मूळ हेतू श्रद्धाळूंना फसवून आर्थिक लाभ उठवणे हा असतो. भ्रमितज्ञान प्राचीन काळापासून आहे. तर आपल्याकडचे भंपक विज्ञान हे अलिकडचे, विज्ञानाच्या विकासानंतरचे, म्हणजे गेल्या तीन/चारशे वर्षांतले आहे.
साधारणत: पंधराव्या शतकात आधुनिक विज्ञानाचा प्रारंभ झाला. सत्यान्वेषणाची वैज्ञानिक पद्धत समजली. विज्ञान वेगाने विकसित होऊ लागले. त्यावर आधारित तंत्रज्ञानामुळे माणसाला जीवनोपयोगी अशा अनेक सुखसुविधा निर्माण झाल्या. वैज्ञानिक तत्त्वांची सत्यता आणि विश्वासार्हता यांचा प्रत्यय प्रत्यही येऊ लागला. विज्ञानाची लोकप्रियता वाढली. तेव्हा भंपक विज्ञान पसरू लागले. भौतिक शास्त्रातील विद्युत्चुंबकीय लहरी, ऊर्जा लहरी, एलेक्ट्रो- मॅग्नेटिक फिल्ड, तरंग, स्पंदने, पुंज सिद्धान्त, (क्वांटम थिअरी), प्रिन्सिपल् ऑफ़ अन्सर्टन्टी, असल्या संज्ञा वापरून भंपक विज्ञान हे खरे विज्ञानच आहे असा आभास निर्माण करून श्रद्धाळूंची फसवणूक सुरू झाली. शासन यंत्रणा तसेच वैज्ञानिक यांनी प्रसार माध्यमांद्वारे वैज्ञानिक तत्त्वांची ओळख जनसामान्यांना सोप्या शब्दांत करून द्यायला हवी होती. त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करायला हवी होती. ते झाले नाही. त्यामुळे सामान्य जनांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नाही. त्याचा भंपक विज्ञानवाद्यांनी अपलाभ घेतला. काही करून पैसे मिळविणे हाच त्यांचा हेतू असतो. त्या स्वार्थी माणसांना लोकांच्या भल्याची, समाजाच्या हिताची, देशाच्या प्रगतीची पर्वा नसते.
फलज्योतिष हे जरी प्रारंभी भ्रमितज्ञान म्हणून निर्माण झाले असले तरी प्रबळ हितसंबंधांमुळे आता त्याला भंपक विज्ञानाचे रूप आले आहे. फलज्योतिषाची मूळ गृहीतके चुकीची म्हणजे खोटी आहेतच. पण श्रद्धाळूंना सतत अज्ञानात ठेवून त्यांचे आर्थिक शोषण करणे हे आतां प्रमुख उद्दिष्ट झाले आहे. सर्व भंपक शास्त्रांचा देव-धर्म, ऋषि-मुनी, परंपरा-रूढी, यांच्याशी ओढून-ताणून संबंध जोडला आहे. कारण बहुसंख्य माणसांच्या देवा-धर्मावरील श्रद्धा दृढ आहेत. या श्रद्धाळू मनोवृत्तीचा अपलाभ(गैर फायदा) भंपक विज्ञानवाले घेतात.
वास्तु(दिशाभूल)शास्त्र हे मानवनिर्मित भंपक विज्ञानच आहे. या विषयावरील पुस्तके अथपासून इतिपर्यंत हास्यास्पद विधानांनी भरलेली असतात. ” आपली जन्म तारीख 1,10, 19, किंवा 28असेल तर आपल्या घराला पिवळा रंग लावावा. त्यामुळे व्यवसायाची भरभराट होईल.” “हिरव्या रंगाचे फुलपाखराचे चित्र घरातील उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावे. त्यामुळे घरात शांती नांदेल.” असली वास्तुतत्त्वे(!) माणसाला खरी कशी वाटू शकतात ? माणसाची बुद्धी इतक्या रसातळाला कशी जाऊ शकते याचे आश्चर्य वाटते. प्राणिक हीलिंग तथा प्राणशक्ति उपचार हे भंपक विज्ञानच आहे. ते वास्तु (दिशाभूल) शास्त्रा इतकेच हास्यास्पद आहे. अशी अनेक भंपक शास्त्रे (स्यूडो सायन्सेस) आहेत. श्रद्धावंत माणसे या शास्त्रांना वेळोवेळी बळी पडत असतात.आणि त्यांचे आर्थिक शोषण होत असते. पण दुर्दैवाने ते त्यांच्या लक्षातच येत नाही.

ynwala@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.