समाजातील तंत्रविज्ञानाचा व अधिकतम प्रावीण्याचा विस्तार जोवर चालू असतो, तोवर प्रत्येक समाज बाहेरच्या समाजांच्या दडपणाला समर्थपणे तोंड देतो. किंबहुना तो फारच रसरशीत असला, तर दुबळ्या समाजांचे शोषण करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. पण याउलट तो एकदा घसरगुंडीला लागला की, त्याचा अन्य समाजांशी चाललेला संघर्ष अधिकाधिक कष्टप्रद आणि अपयशी होऊ लागतो. जरा वेगळ्या भाषेत सांगावयाचे, म्हणजे एखादी संस्कृती अधिकतम प्रावीण्य प्राप्त करून घेईपर्यंत सतेज असते आणि तोपर्यंत ती जगातील एक उदयोन्मुख बलदंड सत्ता म्हणून मानली जाते. याउलट प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तिचे तेज मंदावत जाते व ती संस्कृती अन्य संस्कृतींचे भक्ष्य बनते. अशा रीतीने मानवी इतिहासात सत्ता व समृद्धीचे स्थलांतर अखंडपणे चालू आहे. म्हणून अंतर्गत व बाह्य़ घटकांचा व गतींचा एकत्र अभ्यास केला, तर असे दिसते की, आजवरचा सर्व मानवी इतिहास म्हणजे वर्ग व वर्ण यांची समाजांतर्गत अदलाबदल आणि सामर्थ्य व समृद्धी यांचे एका संस्कृतीतून व प्रदेशातून दुसऱ्या संस्कृतीत व प्रदेशात होणारे बाह्य़ स्थलांतर यांचा इतिहास होय, असे दिसून येईल.
राम बापट