शेतकऱ्यांच्या दु:खाबद्दल, आत्महत्यांबद्दल विस्तृत परिपूर्ण अभ्यासू व हृदयस्पर्शी अशी एकत्रित माहिती आपल्याला पी. साईनाथ यांच्या लेखनाने व ‘दुष्काळ आवडे सर्वाना’ अशा पुस्तकातून मिळाली. शेतकऱ्यांची परवड समजली. त्यांचे बुडीत अर्थव्यवहार कळले. त्यांच्या कर्जाची सावकारी गणिते व त्यापायी होणारी पिळवणूक दृष्टीस पडली. त्यांच्या जीवनात निसर्गाच्या अनियमिततेमुळे येणारी अनिश्चितता, अनिश्चिततेच्या सारख्या वाहणाऱ्या चिंतांमुळे जीवनात जाणवणारी पराभवाची सल, अर्थशून्यता, सततच्या फसवणुकीमुळे निर्माण झालेली भीती, राजकारणात, बदलाच्या निर्णयप्रक्रियेत डावलले गेल्यामुळे आलेले एकाकीपण, शहरीकरण व तंत्रज्ञानामुळे बदलत जाणाऱ्या भवतालाबरोबर जुळवून न घेता आल्याचे अपराधीपण, संकोचत जाणारे भावविश्व, तुटलेपण, तळ गाठलेली गरिबी अशा भारतीय खेडय़ातील माणसाचे, शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, शेतीवर अवलंबून असलेल्या छोटय़ा कारागिरांचे, लहान व्यावसायिकाचे जीवन गेली काही वर्षे पुन:पुन्हा आत्महत्यांच्या अविरत आणि अगणित घटनांमुळे आपल्यासमोर वारंवार येत आहे.
सरकारी योजना, कर्जमाफी, स्वस्त वा विनामूल्य वीज, पाणी, शेतकरी- शेतमजुरांची आंदोलने अशी अनेक कामे व चळवळी यंत्रणा व विरोधी आवाज यांतून अनेक वर्षे जाऊनही आत्महत्यांची संख्या फारशी कमी होताना दिसत नाही. अनेक कोरडे अर्थतज्ज्ञ, आकडय़ांच्या करामती करणारे अभ्यास निबंध, आत्महत्या हा खासगी निर्णय आहे, असे म्हणणारे अर्थशास्त्रज्ञ आणि सनसनाटी चर्चा घडविणारे टीव्ही चॅनल्सचे पोपटपंच या पलीकडे जाऊन आत्महत्यांचा मानसशास्त्रीय राजकीय व तात्त्विक अभ्यास करून त्यावरील चिंतनातून बदलाच्या व्यापक उपायांचे काम हाती घेतलेले दुर्दैवाने जाणवत नाही.
शेतकऱ्याबरोबरच शहरातील असंघटित कामगारांच्या, शेतकाम सोडून शहरात आलेल्या व झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांच्या, बेकार तरुणांच्या, स्त्रियांच्या व नव्या वेगवान- ‘टबरे’ भांडवलशाहीच्या बाजारपेठेसाठी उभ्या राहिलेल्या मॉल्स, बांधकाम उद्योग, कॉल सेंटर्स आदी अनेक नव्या व तुटपुंज्या पगारात काम करणाऱ्या असंघटित चाकरमान्यांच्या आत्महत्येविषयी एकत्रित अशी माहिती आपल्याकडे पुरेशी संकलित झालेली नाही. ती जर असती तर या दोन्ही वेगवेगळ्या जीवन पद्धतीत किती व कशी कीडा-मुंग्यांसारखी स्वत:च स्वत:ला माणसे मारून टाकीत आहेत याची कल्पना येईल.
नव्वदीच्या दशकात मुक्त झालेल्या बाजारपेठेपाठोपाठ, अजस्र भांडवल अनिर्बंध व अतिवेगवान संचाराला सुरुवात झाल्यानंतर, जागतिकीकरणाच्या रेटय़ानंतर समाजाच्या शहरी व ग्रामीण भागात आत्महत्येचे अखंड सत्र अधिक स्पष्टपणे सुरू झाले काय? आत्महत्येचे शेवटचे मानसिक स्वरूप टोकाचे डिप्रेशन- खिन्नता, औदासीन्य व त्यातून आलेले अतिटोकाचे तुटलेपण- विथड्रावल असते. असे एक भयंकर औदासीन्य साऱ्या जगभरच जगण्याच्या इच्छेला झाकोळून टाकत आहे काय? डिप्रेशनचे वेगवेगळे व निरनिराळ्या देशांत विविध समाजसमूहांत केलेले अभ्यास अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. ते भयावह आहेत. आपला शेजारचा जवळपास प्रत्येकजण म्हणजे सारा समाजच खिन्न आणि उदास झाला आहे काय? हॅपिनेस इंडेक्स किंवा आनंदाचे मानक दिवसेंदिवस अशक्त होत जात असल्याचेही निष्कर्ष विविध समाजमानसशास्त्रज्ञांनी काढलेले वारंवार वाचनात येतात. एका बाजूला विकासाच्या भल्याथोरल्या तुताऱ्या फुंकल्या जात असताना उदासीनतेची काळी छाया अधिक अधिक गडद होताना का दिसावी! की विकासाचे गणित जे नवभांडवलशाहीच्या, जिचे एक नाव ‘सेव्ह कीप भांडवलशाही’ म्हणजेच अतिएकांडी, स्वत:पुरते व स्वत:साठी जगायला लावणारी, अतिमुक्त बाजारपेठेमुळे माणसाला माणसापासून तोडणारी जी व्यवस्था, तिच्यातच बिनसलेले उदासपण आहे? वरवर पाहता अतिवेगवान शहरी जीवन व दुसरीकडे तुलनेने संथ दिसत असलेले ग्रामीण जीवन अशी विभागणी असली तरीही या दोन्ही जीवनांतील नव्या मुक्त बाजारपेठेचा धागा समान आहे. संपर्क साधनांच्या नव्या जाळ्यामुळे दोन्हीकडे वाढलेले सांस्कृतिक व भवतालाचे भकासपण, बकालपण जवळपास सारखेच आहे. भाषाव्यवहारातून त्यांचे होणारे प्रगटीकरण स्पष्ट आहे.
जीवनातील प्रत्येक संस्थेचे मग ते शिक्षण असो वा उद्योग, शासन असो वा कुटुंब, अशा सगळ्याचेच झपाटय़ाने होत असलेले ‘कार्पोरेटायझेशन’ फारसे वेगळे नाही. शेतीमध्ये घुसलेले प्रगत बी-बियाणांचे राजकारण, खते-औजारे आदींचे अर्थकारण व नव्या शहरांसाठी उत्पादित करावयाच्या शेतमालाचे- बाजाराभिमुख व्यवस्थाकरण हे शहरी जीवनपद्धतीसारखेच तणावपूर्व, स्पर्धाखोर व चंगळवादी जीवनाचे सौंदर्यमानक किंवा मापदंड असलेले आहे.
सर्व भांडवलशाहीच्या ज्या टोकावर आज आपण उभे आहोत, जिथे कुणीच कुणाचे नाही त्या व्यवस्थेत औदासीन्य किंवा डिप्रेशन हा दैनंदिन जीवनाचा भाग न बनला तर नवल; परंतु आपण उदासीन नाही, तंदुरुस्त आहोत, हसतो, मजा करतो, असे भासवत जगण्याची सध्याच्या स्पर्धाखोर जगात सक्ती आहे. स्वत:ला (स्वत:च्या खिन्नतेला) दाबून हसऱ्या चेहऱ्याने काढलेली व सतत काढलेली, ती पुन्हा फोटोशॉप करून गुळगुळीत केलेली सेल्फी- हे या समाजाचे सेल्फपोर्टेट आहे. प्रत्येक एका ‘यशस्वी’ आत्महत्येमागे जवळपास ‘वीस अयशस्वी ‘ आत्महत्यांचे प्रयत्न असतात हे जागतिक हत्येचे अभ्यास निष्कर्ष शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या आत्महत्यांच्या निष्कर्षांपुढे फिके पडतील अशी आपल्याकडील दैना आहे.
साऱ्या जगभर आत्महत्येची साथ पसरली आहे काय, हा प्रश्न गैर तर नाहीच; पण तो कोणालाच कसा घाबरवत नाही? एखाद्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा मोठय़ा संख्येने आपल्या आजूबाजूची माणसे मरत असताना आपण त्याची दखल ‘खासगी निर्णय’, ‘भित्रा डरपोक माणूस’ अशी किंवा आणखी कोणत्या तरी निबर वक्तव्याने व निर्लज्जपणे कशी करू शकतो?
शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, बेकाराची, शहरी उद्योगातील कामगाराची, जर्मन विंगच्या पायलटची ते अगदी दहशतवादी आत्मघातकी पथकातील तरुणाची आत्महत्या यांना नव्या जगाच्या भांडवली जगाचा, ‘सोव्ह की प’ अर्थव्यवस्थेचा, उत्सवी चंगळवादाचा, बेफाम पिळवणुकीचा एकच धागा जोडत तर नसेल ना?
आत्महत्यांच्या अभ्यासाची जी पहिलीवहिली मोठी कामे झाली त्यातील कार्ल मार्क्सने केलेल्या कामाची मला मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते. हद्दपारीनंतर पॅरिसमध्ये राहत असताना त्याने 1843 च्या सुमारास जॅक पेशे याने लिहिलेल्या, संकलित केलेल्या पॅरिसमधील, मुख्यत: स्त्रियांच्या आत्महत्यांच्या पुस्तकाचे भाषांतर केले व त्यासाठी प्रस्तावना लिहिली. या लिखाणात मार्क्सचे स्त्रीविषयक दृष्टिकोन जसे प्रगट होतात, तसेच मुख्यत: भांडवली समाजात माणसाचे त्याच्या स्वत:च्या सामर्थ्यांपासून व शेवटी स्वत:पासून दूर जाणे कसे अपरिहार्य ठरते, या परात्मतेतून येणाऱ्या तुटलेपणातून कसे अटळ डिप्रेशन निर्माण होते व अशा खिन्नतेतून माणूस मृत्यूला कसे कवटाळतो याचे हृदयद्रावक वर्णन आहे.
समाजापासून दूर गेलेला ‘अपार एकटा’ माणूस ही व्यवस्था कशी घडविते हे तो प्रस्तावनेतच सांगतो. अमर्याद मालमत्ता जमवण्याचे व ती स्वत:च्या मर्जीनुसार उधळण्याचे मुक्त बाजारपेठेचे कायदे प्रबळांची अर्थव्यवस्था कशी निर्माण करतात व अशी व्यवस्था प्रबळांच्या विकासाचीच वाट कशी ठरते, सामान्य माणसाला अशी व्यवस्था कशी ठोकरते याचे विवेचन आपले पंतप्रधान व त्यांचे सल्लागार यांनी वाचले तर त्यांना त्यांचा भूमी बळकाव कायदा शेतकऱ्याच्या कसा विरोधात आहे आणि त्यांची विकास नीती इथल्या धनदांडग्यांना किती धार्जिणी आहे याचेच नव्हे, तर अशा व्यवस्था सामान्यांच्या जीवनात स्वत:च्याच हत्येची बिजे कशा रोवतात याचेही आकलन होईल. भांडवली अर्थव्यवस्थेत माणसाला एकटे बनवल्यानंतर येणाऱ्या टोकाच्या नैराश्य भावनेचे स्वत:च्या खुनात रूपांतर कसे होते याचे विवेचन करताना फ्रॉइड जन्माला येण्यापूर्वीच ‘इच्छांच्या दमना’ची जाणीव त्याला झाली होती व व्यवस्थाबदल हा त्याचा उपाय होता हे आपल्याला त्याचे आत्महत्येवरील पुस्तक वाचताना समजते. आज सुमारे 175 वर्षांनंतर भांडवली व्यवस्थेने जीवनाचा प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापलेला असताना खिन्नता, नैराश्य व स्वत:च्या एकटेपणातून, स्पर्धाखोरीच्या पराभवातून निर्माण झालेला स्वत:चा तिरस्कार किती घनदाट झाला असेल याचेच प्रत्यय आपल्या समाजात पसरलेल्या हत्येच्या साथीतून मिळतात.
पी. साईनाथ व इतर अन्य संशोधकांनी नगदी पीक घेणाऱ्या, अतिआधुनिक किंवा जी. एम. आदी बियाणे वापरून, महागडी औषधे व संप्रेरके वापरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी गळ्यात फास अडकवणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दर्शविले आहे याचा अर्थ काय? कोणत्या प्रकारची व्यवस्था व तिची मागणी, मागणीचा दबाव माणसाला असह्य़ होतो याकडेच हे आकडे लक्ष वेधतात. बाजारपेठ निर्णय घेईल व मुक्त म्हणजे प्रबळांच्या हाती असलेली बाजारपेठ निर्णय घेईल अशी विधाने वारंवार व उच्चवर्गीयांच्या व्यासपीठावरून जेव्हा केली जातात तेव्हा समाजातील लोकशाही निर्णयप्रक्रियेच्या पाठीत खंजीर खुपसून तिला घायाळ केले जाते. अशा घायाळ समाजात हुकूमशाहीची दुंदुभी उघडपणे वाजविणे जेव्हा शक्य होते तेव्हा पर्यावरणाचे इशारे धुडकावून, कायद्याचा बडगा उगारून, शेतकऱ्याच्या मुलाला विकासाचे वेड लावून, तळच्या माणसाची घरे-दारे उद्ध्वस्त करून, दिखाऊ घमघमाटी व चमकदार रंजनाचे उत्सव मांडून निवडून आलेले सरकारच बळीराजाचे नव्हे तर ‘बळी तो कानपिळी’मधल्या बलवानाचे एजंट किंवा बटीक बनते. विचारवंत अशा वेळी ‘शेतीत राम नाही, विकून टाका, व्यवसाय करा’ असे दीडशहाणे सल्ले देऊ लागतात.
कोणता व्यवसाय, कोणी करायचा, कोठे करायचा? त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण? उत्पादन व विक्रीची व्यवस्था? कोणासाठी करायचा? असल्या प्राथमिक प्रश्नांचाही अशा वेळी ऊहापोह केला जात नाही. शेती फायद्याची नाही म्हणून जमीन विकायची असेल तर त्या जर्मन विंग्जच्या चालकाने जेव्हा स्वत:सकट दीडशे निष्पाप जीवांचा खून केला तेव्हा त्याने काय विकायचे होते वा विकत घ्यायचे होते? उठताबसता अमेरिकन व्यवस्थेचे तळवे चाटणाऱ्या अशा अनेक तज्ज्ञांना अमेरिकेतला दुष्काळ व त्यामुळे उद्भवलेला पर्यावरण व सामाजिक आर्थिक प्रश्नांचा गुंता दिसत नाही काय? नव्वदीच्या दशकात माइक डेव्हिसने लिहिलेल्या ‘इकॉलॉजी ऑफ फिअर’पासून अलीकडच्या ‘प्लॅनेट ऑफ स्लम्स’पर्यंतच्या पुस्तकातून ही मंडळी काहीच शिकणार नाहीत काय? शहरी कामगार असो वा ग्रामीण शेतकरी असो, त्याची आत्महत्या हा त्याचा ‘खासगी निर्णय’ नाही, ती त्याची गळचेपी आहे, व्यवस्थेने तो त्याच्यावर लादलेला निर्णय आहे. अशा हत्यांच्या रोगाची साथ पसरणे ही व्यवस्थेच्या विरुद्ध उमटलेली नकाराची शोकांतिका आहे. अशा शोकाकुल समाजात तरीही संपत्तीच्या माजावर जमीन बळकाव वा पर्यावरण धुडकाव असे कायदे लादणे ही हुकूमशाहीचीच नांदी नव्हे तर आपल्या दरवाजावर उमटलेली राक्षसाची पाउले आहेत.
लोकसत्ताच्या सौजन्याने
sanjeevkhandekar@gmail.com,