जीर्णशीर्ण हवेलीतला मार्क्सवादी!

संसदेच्या कॉरीडॉर किंवा प्रांगणात अनोळखी असणाऱ्याने जरी अभिवादन केले तरी आवर्जून सस्मित प्रतिसाद देण्याचा सुसंस्कृतपणा जपणारे तसेच आपण कोणी तरी बडे राजकीय आसामी आहोत याचा मागमूसही न लागू देता दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळात सहजपणे वावरणारे सीताराम येचुरी आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणजे ‘सेनापती’ झाले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, जनाधार गमावल्याने सध्या अत्यंत हालाखीच्या अवस्थेत असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते आता भारतातील सर्वोच्च नेते आहेत. चेहेऱ्यावर मुक्कामाला आलेले हलकेसे स्मित, कपाळावर उडणारी केसाची एक-दोन झुल्पे तसेच नजरेत भरणाऱ्या दोन उभ्या अठ्या आणि चुरगळलेला कुडता घातलेला माणूस म्हणजे सीताराम येचुरी! वर्णाने गव्हाळ आणि कांती तुकतुकीत असणारा हा माणूस राजकपूरप्रमाणे कधी गोर-गरीबांतला वाटलाच नाही. त्यामुळे कोणत्या तरी विद्यापीठातून राज्यसभेत पोहोचलेला एखादा स्वत:वर खूष असणारा प्राध्यापकाला शोभेशी देहबोली तसेच विद्वत्ता आणि ओतप्रोत भरलेला आत्मविश्वास ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. बोलणे सभागृहात असो की, सभेत की पत्रकारांशी बोलताना माईकसमोर , सीताराम येचुरी एका आश्वासक संथ लयीत आणि कोणताही कर्कश्शपणा ना येऊ देता बोलणार!
12 ऑगस्ट 1952रोजी तेव्हाच्या मद्रास आणि आताच्या चेन्नईत जन्मलेल्या सीताराम येचुरी यांचा उभा जन्म दिल्लीत गेला. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून पदवी आणि पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवणारे सीताराम येचुरी महाविद्यालयीन जीवनापासूनच कम्युनिस्ट विचाराकडे आकर्षित झाले. एक कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून काम करताना आर्थिक विषयांवर मुद्रित माध्यमांसाठी त्यांनी भरपूर स्तंभलेखन केले; ‘Left Hand Drive’, ‘What Is the Hindu Rashtra’ , ‘Socialism in 21st Century’ ही इंग्रजी तसेच ‘घृणा की राजनीती’ हे हिंदी; अशी ग्रंथसंपदा त्यांच्या खाती जमा आहे. 2005 पासून राज्यसभेचे सदस्य असणाऱ्या सीताराम येचुरी यांनी संसदेच्या विविध समित्यांवर काम केलेले आहे. एक अभ्यासू सदस्य आणि ‘आम आदमी’विषयी सच्ची तळमळ बाळगणारा माणूस अशी मार्क्सवादी पक्षाच्या या नेत्याची प्रतिमा आहे.
कम्युनिस्ट खरे तर भारतात काँग्रेसपेक्षा जास्त जुने. काँग्रेसजण किंवा भारताच्या स्वातंत्र्याची उत्कट आंस बाळगणाऱ्या क्रांतिकारकांपेक्षा ब्रिटिशांना कम्युनिस्ट जास्त धोकादायक वाटत! एकेकाळी म्हणजे, सुमारे 40 वर्षापूर्वी कम्युनिस्ट पक्ष केडरबेस्ड पक्ष कसा असावा याचे उदाहरण म्हणून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असे. या चळवळीला बी.टी. रणदिवे, अजय घोष, श्रीपाद अमृत डांगे, ईएमएस नंबुद्रीपाद अशी वलयांकित नावे नेतृत्व म्हणून लाभली. आमच्या पिढीने पत्रकारितेत उडी घेतली तेव्हा चारू मुजुमदार यांच्या नावाची क्रेझ तेव्हा बुद्धिवंतांच्या वर्तुळात होती एखाद्या चित्रपटाच्या हिरोपेक्षा जास्त चर्चेत होते. तेव्हा नक्षलवादी चळवळ नुकतीच रुजली होती. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेवर जेव्हा नक्षलवाद्यांनी प्रवेशासाठी थाप मारली तेव्हा प्रा. सुरेश द्वादशीवार, राजाभाऊ पोफळी, प्रकाश दुबे आणि आस्मादिक अशी काही पत्रकार मंडळी त्यांचे लेखनातून स्वागत करायला हजर होतो. विषमता नष्ट करायला निघालयाचा तेव्हा दावा केलेल्या (आणि नंतरच्या काळात त्याबाबत निराशा करणाऱ्या) चळवळीचे उद्गाते चारू मुजुमदार समजले जात. ढोबळमानाने या पक्षात सोव्हिएत रशियाधार्जिणे आणि चीनधार्जिणे असे दोन प्रवाह होते. मॉस्कोत बर्फवृष्टी झाली तर भारतातले कम्युनिस्ट भर उन्हाळ्यात थंडीने काकडतात आणि माओला ऊसन भरली तर भारतातील कम्युनिस्टांची पाठ दुखते, असे तेव्हा गमतीने म्हटले जायचे. पण ते असो! या ‘धार्जिणे’पणातून पक्षातील या दोन्ही विचाराच्या गटात मतभेद होते; पुढे ते मतभेद तीव्र होत गेले. मूळ भारतीय कम्युनिस्ट पक्षातून स्वत:ला लोकशाहीवादी म्हणवून घेत काही कम्युनिस्ट स्वत:ला ‘मार्क्सवादी’ म्हणवून घेत बाहेर पडले. ते वर्ष होते 1964. तेव्हा मूळ कम्युनिस्ट म्हणजे उजवे आणि मार्क्सवादी म्हणजे डावे-पुरोगामी-लोकशाहीवादी अशी सर्वसाधारणपणे विभागणी होती. पण, या दोन पक्षातील दोन समान बाबी उल्लेखनीय आहेत; एक- सत्तेसाठी हे दोन्ही गट एकत्र होते आणि पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा अशा काही राज्यात हे दोन्ही गट युती करून सत्तेत सहभागी होते. दोन- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आधी जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्षाचा विस्तार चिरडण्यासाठी हे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष हिरीरीने पुढाकार घेत. हा विरोध अनेकदा रक्तलांच्छित झालेला आहे. दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या रक्ताचे डाग अजूनही त्या-त्या प्रदेशाच्या राजकारणावर आहेत.
कम्युनिस्ट, मार्क्सवादी आणि या दोन्ही गटांशी नाळ न जुळलेल्यांनी स्थापन केलेला फॉरवर्ड ब्लॉक या क्षीण अस्तित्व असलेल्या तीन पक्षांचा गड होता तो पश्चिम बंगाल. काँग्रेसचा एकछत्री अंमल मोडून सिद्धार्थ शंकर रे यांना पायऊतार करत कम्युनिस्ट युतीच्या ज्योती बसू यांनी या पश्चिम बंगालवर मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्य केले. एक वेळ केंद्रात अशी आली की, लोकसभेत काँग्रेस अल्पमतात, विरोधी पक्षात एकही पक्ष देशव्यापी आणि बहुमताच्या जवळपास नाही अशी बिकट राजकीय परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी विविध पक्षांची आघाडी स्थापन करून ज्योती बसू यांनी पंतप्रधानपद सांभाळण्याबद्दल जवळजवळ एकमत झाले होती. पण, ‘हट्टीपणा करणार नाहीत तो कम्युनिस्ट सापडणारच नाही’ असे जे म्हणतात त्याला स्मरून पक्षाने पंतप्रधानपद न स्वीकारण्याचे आदेश ज्योती बसू यांना दिले. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या पक्षाच्या भारतात सुरु झालेल्या घसरणीची ही सुरुवात होती. त्यातच पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना तत्कालिन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी आणलेल्या जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा वेध तसेच परिणाम न जोखता दोन्ही कम्युनिस्ट पक्ष (हळूहळू कालबाह्य ठरू पाहणाऱ्या) आयडियालॉजीला चिकटून बसले. त्यामुळे तरुण वर्ग दुरावत गेला. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालात आधी स्थानिक स्वराज्य संस्था, मग विधानसभा आणि गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना धूळ चारली .
1964 साली स्थापन झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने खरे तर देशात चांगल्यापैकी जम बसवला होता . सुमारे वीस पेक्षा जास्त राज्यात पक्षाचे डोळयात भरण्यासारखे अस्तित्व होते. लोकसभेत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून अनेक वर्ष मार्क्सवादी पक्ष मिरवला. महाराष्ट्रात तर काही वेळा विधानसभेत जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त सदस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असत. मार्क्सवादीप्रणित विद्यार्थी विंग असलेली एसएफआय, तरुणांची डीवायएफआय, सिटू ही कामगार संघटना, बँक कर्मचाऱ्यांची बलवान संघटना मोठा बोलबाला होता. 1991 साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर देशात प्रचंड राजकीय अस्थिरतेचा काळ सुरु झाला तेव्हापासून ते 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार केंद्रात अस्तित्वात येईपर्यंत; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालिन सरचिटणीस हरकिशन सुरजित हे देशातील राजकारणात एक प्रमुख ‘की मेकर’ म्हणून कामगिरी बजावते झाले. 1992 ते 2005 असा प्रदीर्घ काळ सरचिटणीसपद भूषविलेल्या सुरजित यांच्या शब्दाला या काळात ‘सोन्या’चा भाव होता!
आता वयाची साठी उलटल्यावर सीताराम येचुरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सूत्रे स्वीकारली आहेत. तरी आतापर्यंत झालेल्या सर्व सरचिटणीसांत तेच सर्वात तरुण म्हणायला हवेत कारण, वयाची सत्तरी तरी पार केल्याशिवाय ‘या’ काय किंवा ‘त्या’ काय कम्युनिस्ट पक्षात या पदासाठी कोणाचा विचारच होत नव्हता. संदर्भ बदलले तरी मुळार्थ तोच असणारी पण गतिमान झालेली अर्थ व्यवस्था आणि वाढता दहशतवाद यामुळे चिंताग्रस्त असलेल्या जगाचे भान बाळगत पोथीनिष्ठतेशी त्याची सांगड घालत पक्षाची पुन्हा बांधणी करणे ही तारेवरची कसरत येचुरी यांना करावी लागणार आहे. राजकीय आघाडीवर ज्याला शत्रू समजून मार्क्सवाद्यांनी कायम दूर ठेवले तो कॉंग्रेस पक्ष मोडकळून पडलेला आहे. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीएचे सरकार असताना अणुकराराला विरोध करण्याची जी टोकाची असमंजस, हट्टी भूमिका तत्कालिन सरचिटणीस प्रकाश कारत यांनी घेतली आणि पक्षाला घ्यायला लावली त्यामुळे भारतातील मार्क्सवाद्यांना आधुनिकतेशी जुळवून घेता येत नाही असा संदेश गेला; परिणामी बराच मोठा सुशिक्षित मतदार पक्षापासून दुरावला. ममता बॅनर्जी यांनी तर या पक्षाचे कंबरडेच सहज दुरुस्त न करता येण्याइतके मोडून ठेवलेले आहे. पक्षाच्या आतापर्यंतच्या आयुष्यात ज्यांच्याशी कडवा संघर्ष केला, प्रसंगी रक्त सांडले आणि सांडवले, तो भारतीय जनता पक्ष देशात क्रमांक एकवरच नाही तर केंद्रासहसह अनेक राज्यात सत्तेत आलेला आहे.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, भारतातील राजकीय पक्ष आणि एकूणच राजकीय चळवळीचे ‘कार्पोरेटायझेशन’ झाले आहे. आता केवळ उमेदवार, त्याची आणि त्याच्या राजकीय पक्षाची प्रतिमा, त्याचे चारित्र्य. केडरबेसड कार्यकर्ते निवडणूक जिंकल्यावर काय करणार याची जाहीरनाम्यातून दिलेली हमी. या आधारे निवडणुका लढवण्याचे दिवस इतिहासजमा झालेले आहेत. धर्म-जात-पंथ-पक्ष-धन आणि गुंडशक्ती अशा अनेक ‘अन्य’ बाबी महत्वाच्या ठरल्या आहेत. हे वास्तव आता पोथीनिष्ठ कार्यकर्त्याना कळून चुकले आहे आणि बहुसंख्येने कार्यकर्तही या ‘कार्पोरेटायझेशन’चा एक भाग झालेले आहेत. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची केवळ संघटनात्मक चौकट मोडून पडली आहे एवढ्यापुरती ही बिकट राजकीय परिस्थिती मर्यादित नाही तर; आहे त्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना मरगळ आलेली आहे, ते निराश झालेले आहेत आणि त्यांची उमेदही हरवलेली आहे. थोडक्यात सांगायचे तर, जनाधार आणि विश्वासार्हता गमावलेले जे समाजवादी ‘जनता परिवार’ नावाने अस्तित्वाची लढाई खेळण्यास सज्ज झालेले आहेत त्यापेक्षाही प्रत्यक्षात जास्त वाईट अवस्था मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची झालेली आहे. एखाद्या जीर्णशीर्ण हवेलीसारखा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आता भासू लागलेला आहे आणि त्यातून ऐकू येणारे पूर्ववैभवाचे स्वर आता विरलेल्या गतकातर आठवणींची उदास विराणी झालेली आहे.
या अत्यंत कठीण विपरीत परिस्थितीतून सीताराम येचुरी कसा मार्ग काढतात हे पाहणे म्हणूनच उत्सुकतेचे आहे.

आभारःwww.praveenbardapurkar.com/newblog

praveen.bardapurkar@gmail. com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.