कर्नाटकातील हंपी विश्वविद्यालयाचे माजी उपकुलगुरू, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथील त्यांच्या राहत्या घरी 30 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 8.40 वाजता 2 अज्ञात इसमांकडून गोळी घालून हत्या करण्यात आली. कुठल्याही उपचारापूर्वीच त्यांचा जीव गेला होता. मृत्यु समयी त्यांचे वय 77 वर्षाचे होते. डॉ. एम. एम. कलबुर्गी हे ख्यातनाम साहित्य संशोधक, विमर्शक व जुन्या कन्नड लिपीचे अभ्यासक होते. कन्नड संस्कृती, कन्नड इतिहास, लोकगीत (जानपद) साहित्य, व्याकरण, ग्रंथ संपादन शास्त्र, इत्यादी विषयात त्यांनी संशोधन पर प्रबंध लिहिलेले होते. त्यांनी 41 प्राचीन ग्रंथांचे संपादन केले व शंभराहून जास्त संशोधित लेख लिहिले. याच बरोबर पुरोगामी विचारांचे प्रचारक, प्रसारक व काही प्रसंगी विरोध पत्करून स्पष्टपणे विधान करणारे होते.
अशा प्रकारे विचारवंतांची हत्या म्हणजे समाजाला एक कलंक आहे. तालिबान प्रवृत्तीच्या काही धर्मांध शक्ती या समाजात वावरत असून त्यांनी गेल्या दोन वर्षात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व आता डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची दिवसा ढवळ्या हत्या करून पसार झाले आहेत. ऊठ सूट भारतीय संस्कृतीचे गुणगान करणारे नेहमीच आपण भारतीय फार सहिष्णु आहोत, आपल्या देशात विविध धर्माचे, विविध विचार प्रणालीचे, विविध संस्कृतीचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात आणि या सामाजिक वर्तनात आपल्या संस्कृतीचा फार मोठा वाटा आहे असे अभिमानाने ऊर बडवून सांगत असतात. धार्मिक, आस्तिक, विविध पंथांचे उपासक, मूर्ती पूजक यांच्या बरोबरच धर्म नाकारणारे, देवाचे अस्तित्त्व नाकारणारे, धर्म चिकित्सा करणारे, समाजातील प्रचलित अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी-परंपरा याबद्दल चिकित्सा करणारे इत्यादींनासुद्धा सहिष्णुतेने वागवले जाते, असा त्यांचा दावा असतो. परंतु डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनानंतर या अत्युच्च संस्कृतीतील ढोंगीपणा, खोटारडेपणा उघड होत आहे, असे म्हणता येईल.
दिवसा ढवळ्या एखाद्याच्या दरवाज्यावर बेल वाजवून दार उघडल्यानंतर बेछूटपणे गोळ्या झाडून एखाद्याची हत्या करणे इतपत या धर्मांधांची मजल गेली आहे. कायद्याचा धाक नाही, पकडण्याची भीती नाही, शिक्षा होण्याची शक्यता नाही, अशा परिस्थितीत हा समाज वावरत असल्यामुळे विचारवंतानी जिवंत राहायचे की नाही हा प्रश्न आता विचारावासा वाटतो. हिंदू धर्मासंबंधी अस कायदा वा तालिबानी टाइप मनोवृत्ती असलेल्यांची संख्या दिवसे न दिवस वाढत आहे. म्हणूनच कुणाचे विचार पटले नाहीत, किंवा लेखनात केव्हातरी धर्मांधांच्या विरोधात ओझरता उल्लेख आहे किंवा वागण्या-बोलण्या-लिहिण्यात देव-धर्माची, संत-महंतांची वेगळी बाजू मांडण्याच्या प्रयत्नात आहेत अशा सर्वांना लक्ष्य करून संपवायचेच या मनोवृत्तीचे कदापि समर्थन होऊ शकणार नाही.
डॉ. कलबुर्गी यांनी कर्नाटक सरकारसाठी समग्र वचन संपुट या नावाच्या ग्रंथाचे संपादन केले होते. त्यांना याच सरकारने पंप, वर्धमान या पारितोषकाने सन्मानित केले होते. त्यांच्या मार्ग या ग्रंथाला साहित्य अकॅडेमीचे पारितोषक मिळाले होते. डॉ. कलबुर्गी नेहमीच त्यांच्या भाषणातून व लेखनातून धर्मातील – विशेष करून लिंगायत जातीतील – विसंगती व अंधश्रद्धा यांच्यावर कडाडून टीका करत होते. 1989 मध्ये त्यांनी बसवेश्वरांच्या कालखंडातील वचन साहित्याचे संकलन मार्ग 1 मध्ये करून प्रकाशित केले होते. संशोधक वृत्तीने केलेल्या या ग्रंथात लिंगायत समाजातील मूठभर अभिमान्यांना (दुरभिमान्यांना) काही विधान आक्षेपार्ह वाटली. म्हणून त्यांना एकाकी पाडण्याचा घाट घातला. सल्मान रश्दीच्या सॅटानिक व्हर्सेस या पुस्तकासंबंधी उठलेल्या गदारोळाप्रमाणे कन्नड साहित्याच्या वर्तुळात मोठ्या प्रमाणात कलबुर्गींच्या विरोधात कुजबुज व नंतर उघड आक्षेप नोंदविण्यात आले.
कर्नाटकात लिंगायत समाजाचे वर्चस्व असून या समाजाचे आधिपत्य राज्यभर विखुरलेल्या हजारो लहान मोठ्या मठाधिपतींच्याकडून होत असते. महाराष्ट्रातील बुवा-बाबांसारखे चमत्कार, अघोरी उपचार यावर विसंबून न राहता हे मठाधीश लिंगायत समाजासाठी शिक्षण संस्था, हॉस्टेल्स, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत बोर्डिंग अशा समाजोपयोगी कार्य करत असल्यामुऴे संपूर्ण समाजात त्यांनी चांगलाच जम बसविला आहे. आणि हे मठाधीश स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. या मठाधीशांचे आदेश म्हणजे सामान्य लिंगायतांना प्रत्यक्ष देववाणीच असे वाटत असते. त्यामुळे कलबुर्गी यांना जेव्हा बसवेश्वरासंबंधी लिहिलेल्या विमर्शात्मक लेखनाला अकॅडेमिक सर्कलमध्ये विरोध होऊ लागला तेव्हा त्यांनी वैतागून बसवेश्वर वा बसवेश्वराच्या वचनसाहित्यावर यानंतर संशोधन करणार नाही असे निक्षून सांगितले. परंतु ही एका प्रकारे बुद्धीनिष्ठतेची आत्महत्याच आहे असे त्यानी सांगितले.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातल्या प्रमाणे अंधश्रद्दा विरोधी कायद्याची ड्राफ्ट प्रत तयार करण्यात आली. या ड्राफ्टवर कर्नाटकात उलट सुलट चर्चा झाली. 2014 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कृत कन्नड साहित्यिक डॉ. यू आर अंनंतमूर्ती यांनी अशा प्रकारचा कायदा हवा म्हणून जागोजागी भाषण देत होते. आणि त्याच वेळी डॉ. कलबुर्गी यांनी डॉ. अनंतमूर्ती यांना पाठिंबा दिला. एका भाषणात पूजेसाठी वापरत असलेल्या दगडी मूर्तीसंबंधी काही विधान केली. खरे पाहता अनंतमूर्तींच्या नागड्याने केलेल्या पूजेचा निषेध या लेखाचा संदर्भ नग्नपूजेच्या प्रथेच्या विरोधासाठी होता. परंतु समाजातील कट्टर धार्मिकांना ही विधानं आक्षेपार्ह वाटल्यामुळे अनंतमूर्तीवर खटला भरण्यात आला. काही दिवसात या विरोधाचे सूत्र विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या मूलतत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या हातात एकवटल्या. मंगळूरू, पुत्तूरू, उडुपी इत्यादी ठिकाणी कलबुर्गींचा फोटो जाळून निषेध करण्यात आला. कलबुर्गींना अटक करा अशा घोषणा देण्यात आल्या. कलबुर्गींच्या राहत्या घरावर दगडफेक झाली. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आले. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती (1824-1883) यांनीसुद्धा दगडी मूर्तीच्या पूजेच्या विरोधात प्रक्षोभक भाषणं दिली होती. ते जर आज असते तर त्यांचीसुद्धा हत्या झाली असती, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.
खरे पाहता डॉ. कलबुर्गी हे धार्मिकच होते. फक्त त्यांनी धर्मचिकित्सेचा वसा घेतला होता. कलबुर्गी यांचे लेख बीदर येथील अग्नी अंकुर या कन्नड साप्ताहिकातून प्रसिद्ध होत होते. या साप्ताहिकाचे संपादक, लिंगण्णा सत्यमपेटे हे कलबुर्गींचे चांगले मित्र होते. काही महिन्यापूर्वी लिंगण्णा यांचे प्रेत एका लिंगायत मठाजवळील गटारात सापडले. अजूनही त्या खुनाचा तपास लागला नाही. कलबुर्गींच्या लेखनात 800 वर्षापासून चाललेल्या विरक्तपीठ विरुद्ध पंचपीठ यांच्यातील एकमेकावरील कुरघोडींचा उल्लेख होता. ते या मठाधीशाना रुचले नव्हते. त्याच्या काही लेखात बसवेश्वर यांच्या लिंगायत धर्मात त्या काळच्या शेकडो जाती-जमातींनी धर्मांतर केले म्हणून हा धर्म टिकून आहे, अशी विधानं होती. त्यांच्या लेखातील लक्ष्य लिंगायत मठाधीश असल्यामुळे त्यांचा राग कलबुर्गीवर होता.
बांगला देश येथे धार्मिकांच्या विरोधात लिहिणाऱ्या ब्लॉगर्सची होत असलेल्या हत्येप्रमाणे आपल्या येथील पुरोगामी विचारवंतांचा गोळी घालून ठार करण्याचे हत्यासत्र असेच होत राहिल्यास संस्कृतीची स्तुती करणाऱ्या भाटांचेच वर्चस्व यानंतर असणार आहे. लिंगायत समाजाचे आद्यपुरुष बसवेश्वर यांचासुद्धा त्या काळी खून झाला होता. (तुकारामाच्या वैकुंठ गमनाप्रमाणे बसवेश्वराची जलसमाधी असे गोंडस नाव त्याला दिले गेले होते.) कारण एका ब्राह्मण मुलीची दलित मुलाशी लग्न लावल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
विचारांशी लढा देण्याची तयारी नसलेले कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात हेच डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या संदर्भात अधोरेखित होते. आम्ही जे म्हणतो तेच सर्वानी म्हटले पाहिजे आणि तसे न करणाऱ्यांना या जगात राहण्याचा अधिकार नाही व आम्ही त्यांना सुखासुखी जगू देणार नाही, हाच संदेश हे धार्मिक दहशतवादी पोचवत आहेत. ज्या समाजाला (चिकित्सक) विचारांची कदर नाही तो समाज रसातळाला जातो, हेच या संदर्भात पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आलेली आहे.
pkn.ans@gmail.com