असा सार्वत्रिक समज आहे की, आपल्या देशातल्या ब्राह्मणांनी अन्य जातीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले. आणि हे कार्य त्यांनी हेतुपुरस्सर केले ते अशासाठी, की त्यांना (ब्राह्मणांना) समाजातील विषमता कायम ठेवायची होती, आणि त्यायोगे त्यांना अन्य जातीयांचे शोषण करायचे होते. उच्चवर्णीयांवरचा हा आरोप कितपत खरा आहे, हे तटस्थपणे तपासण्यासाठी आपल्याला आपल्या देशाची तत्कालीन स्थिती समजून घ्यावी लागेल व अंदाजे दोनशे वर्षे मागे जावे लागेल. इंग्रजांचे राज्य भारतात येण्यापूर्वीची समाजस्थिती आपल्याला तपासावी लागेल. प्रतिपादनाच्या सोयीसाठी काही जुन्या, स्त्री-शूद्र अशा संज्ञांचा वापर करण्याची देखील गरज पडेल.
ब्राह्मणांनी शूद्रांना शिकविले नाही, हे अगदी खरे आहे; पण त्यांनी शूद्रांच्या बरोबर आपल्या स्वतःच्या मुलीबाळींनाही शिकविले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या काळात ब्राह्मण स्वतः शिकत होते, दुसऱ्या जातींना शिकू देत नव्हते त्या काळात ते काय शिकत होते हे जसे पाहिले पाहिजे, तसेच स्त्रियांचा आणि शूद्रांचा दिनक्रम कसा होता, हेही पाहिले पाहिजे.
इंग्रजांचे राज्य येथे येण्यापूर्वी शिक्षण देणारे ब्राह्मण असायचे व शिक्षण घेणारेही ब्राह्मण असायचे. याचा अर्थ असा नव्हे की, ब्राह्मणांशिवाय इतर जाती साक्षर होत नव्हत्या व जे शिक्षण साक्षरतेमुळे मिळते ते प्राप्त करत नव्हत्या. समाजाची विभागणी ढोबळपणे चार वर्णांत झालेली होती. साक्षरता प्राप्त करणाऱ्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तीनही वर्णांचे लोक असत. ह्या तीनही वर्णांच्या स्त्रिया त्याचप्रमाणे शूद्र निरक्षर असत. ब्राह्मणांचे व्यवसाय तीन चार प्रकारचे असत. ते उपाध्याय असत, पुराणिक असत, जोशी म्हणजे ज्योतिषी असत, त्याचप्रमाणे शासनकर्त्यांच्या हाताखाली ते कारकुनी करीत. याशिवाय त्यांच्या वाट्याला आचारी, पाणकी यांचीदेखील कामे येत. फार थोडे जण यज्ञ करण्यासारखे विधी कसे करावेत ते शिकत. आणि त्याहून थोडे लोक व्याकरण, न्याय, काव्य अशी शास्त्रे शिकत. यापलिकडे ब्राह्मणांना कोणतेही काम करता येत नव्हते.
उत्तर भारतात इंग्रज येण्यापूर्वी लहान मोठ्या संस्थानिकांच्या दरबारात मुख्यतः कायस्थांचा भरणा असे. कायस्थ हे स्वतःला मसीजीवी क्षत्रिय म्हणवत; (मसी = शाई) आणि फारसी भाषा अवगत करून घेत.
दरबारातला पत्रव्यवहार त्याचप्रमाणे दप्तर, जे फारसी भाषेत असे, ते त्यांच्या स्वाधीन असे. महाराष्ट्रात या दप्तराला फड म्हणत आणि दप्तरदारांना फडणवीस अशी संज्ञा असे. महाराष्ट्रातील राजांच्या पदरीदेखील फारसी जाणणारे लोक असत त्यांना फार्सीनवीस म्हणत. आजही पारसनीस हे आडनाव येथे आढळते. पण हे शिकणाèयांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी होती. महाराष्ट्रातील जे कायस्थ होते तेसुद्धा दप्तरदार होते. ते स्वतःला चांद्रसेनीय कायस्थ प्रभु म्हणवीत. साक्षर वैश्य हे त्यांच्या व्यापारासाठी आणि सावकारीसाठी आपली साक्षरता वापरीत.
त्या काळातल्या शाळा तात्या-पंतोजींच्या असत. त्या देवळाच्या सभामंडपात किंवा कोणाच्या तरी ओसरीवर भरत. त्यांध्ये जे शिक्षण मिळे ते दोन प्रकारचे—लेखन-वाचन आणि गणित. बाळबोध आणि मोडी लिहायला वाचायला शिकवीत आणि औटकी पर्यंतचे पाढे पाठ करून घेऊन अंकगणिताचा प्रारंभ म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार एवढे मुलांकडून करवून घेत. ब्राह्मणांच्या मुलांना जे वरचे शिक्षण घेता येईल ते बहुधा त्यांचे वडीलच देत. त्यात धार्मिक विधी कसे करायचे हे शिकविले जाई. पंचांग वाचायला शिकवीत आणि त्यावरून शुभमुहूर्त काढणे, कुंडली मांडणे, त्याचबरोबर चतुर्थ्या, एकादश्या, अमावस्या, पौर्णिा, सूर्यचंद्रग्रहणे आणि काही सणवार आणि त्याचबरोबर त्या-त्या काळात करावयाची व्रते आणि त्यासाठी लागणारे जुजबी संस्कृत यांची माहिती त्यांना दिली जाई. फार क्वचित एखाद्याला जिज्ञासा असेल तर तो याज्ञिकी शिके किंवा व्याकरण, काव्य अशी शास्त्रे शिकण्यासाठी तीर्थक्षेत्री जाई. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे कृष्णानदीच्या काठची वाई आणि गोदावरीच्या काठावरचे पैठण, नाशिक अशी मोजकी असत. हे शिक्षण वांझोटी धार्मिक कर्मकांडे करण्यासाठी उपयोगी पडे. हे शिकण्याची ठिकाणे वेदशाळा म्हणवीत. तात्या पंतोजींचा निर्वाह मुले त्यांना काही शिधा देत त्यावर होई व वेदशाळा कोणा धनिकाच्या, राजांच्या किंवा संस्थानिकांच्या आश्रयाने चालत. तात्या पंतोजींच्या शाळेत शिकून तयार झालेल्या मुलांना कुळकर्णीपण म्हणजे पटवाऱ्याचे काम, तलाठ्याचे काम करता येई, किंवा त्यांना एखाद्या देशमुखाकडे मुनीम, दिवाणजी, कारकून अशी कामे मिळत. वर्षाला पगार वीसपचवीस रुपये मिळत असे. बलुतेदार म्हणजे गावातले कारूनारू. बलुतेदार आणि शेतकरी व्यवहारापुरते गणित आपल्या वाडवडिलांकडून शिकत. ज्यांचे पोट हातावर होते अथवा जे शेतांचे मालक होते त्यांना अक्षरओळख करून घेण्याची गरज भासत नव्हती. साक्षर होऊन कोणताही जास्तीचा लाभ होणार नसल्यामुळे निरक्षर असण्यात कोणतेही वैगुण्य त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे निरक्षरांना जे काही ज्ञान प्राप्त होई ते कथाकीर्तनांतून होत असे. सार्वजनिक शाळा नव्हत्याच. हे चित्र पुरुषांच्या शिक्षणाचे आहे.
त्या काळात मुलींचे लग्न नवव्या दहाव्या वर्षापर्यंत होई आणि त्यांचा पूर्ण दिवस घरकाम करण्यात जाई. भल्या पहाटे उठून दळण दळणे; सूर्योदयाच्या वेळी घराची साफ-सफाई, सडासारवण करणे; त्यानंतर रात्रीची भांडी घासणे, स्वयंपाक करणे, दुभत्या जनावरांचे चारापाणी बघणे, दूध दोहणे, पाणी भरणे (नदीवरून किंवा विहिरीवरून), धुणे नदीवर जाऊन धुणे, मुलांचे हागणे-मुतणे काढणे, मुलांना अंगावर पाजणे; निवडण-टिपण करणे, कांडणे-कुटणे, शेतात निंदणे-खुरपणे, घरातल्या रुग्ण असणाèयांची सेवा करणे, सरपण गोळा करण्यासाठी वणवण करणे, लहान भावंडांचा सांभाळ करणे अशी त्यांची कामे असत. हे सर्व करण्यात बायकांचा पिट्ट्या पडत असे. त्या काळातल्या स्त्रियांच्या मागे सणवार, व्रत-वैकल्ये, कुळधर्म, कुळाचार आणि ब्राह्मणांच्या घरात सोवळे-ओवळे याचेही प्रस्थ मोठे होते. त्यामुळे साक्षर होण्याचा विचार करण्यासही वेळ मिळणे शक्य होत नसे. अशी परिस्थिती असतानाही ज्या स्त्रिया शिकल्या त्या संपन्न घरातल्या होत्या. त्यांना काही कामे नोकरांकडून करून घेता येत असत. म्हणून त्या शिकण्यासाठी थोडा वेळ काढू शकत असत.
पुरुषांना शेतीची आणि त्यांच्या व्यवसायाप्रमाणे किंवा जातीप्रमाणे कामे करावी लागत. बलुतेदारांपैकी विणकर, धनगर, माळी, कोळी यांच्या कामाचे स्वरूप असे होते की त्यांना त्यासाठी दिवसाचे चोवीस तास कमी पडत. लोहार, सुतार, गवंडी अशासारख्यांचे काम हंगामी असे. जेव्हा काम असे तेव्हा त्यांनाही चोवीस तास कमी पडत; आणि जेव्हा काम नसे तेव्हा ते उद्याच्या विवंचनेत गढून जात. त्यांनासुद्धा साक्षर होऊन कसलाही फायदा होणार नव्हता. आजही ही स्थिती फारशी बदललेली नाही. इतकेच नाही तर निरक्षरांनी साक्षर होणे म्हणजे एका सभ्यतेतून दुसऱ्या सभ्यतेत, एका युगातून दुसऱ्या युगात प्रवेश करण्यासारखे आहे. ज्ञान ग्रहण करण्यासाठी जे आजवर कानांचा उपयोग करत होते त्याऐवजी त्यांना आता डोळ्यांचा उपयोग करावा लागणार होता. हे एक प्रकारचे संस्कृत्यंतर होते. याचा ताण सुरुवातीला फार थोड्यांना सोसता आला. शासनकर्त्यांनाही त्यांच्या प्रजेने साक्षर झाले पाहिजे असे वाटत नव्हते, त्या आघाडीवरही सामसूच होती. शाळांध्ये वापरण्यासाठी छापील पुस्तके नव्हती कारण छापखानेच नव्हते. कागद, पेन्सीलचा वापर नव्हता कारण त्यांचेही कारखाने नव्हते. अक्षर-ओळख धूळपाटीवर होत असे. ही अशी स्थिती इंग्रजांचे आगमन होण्यापूर्वी होती आणि आजही तीच जुनीपुराणी मानसिकता घेऊन आम्ही भारतीय जगतो आहोत.
आपण ज्या महाराष्ट्राविषयी आता विचार करीत आहोत तो इंग्रजांचे राज्य येथे प्रस्थापित होण्यापूर्वीचा. त्याकाळी भारतात अनागोंदी माजली होती असे म्हणायला हरकत नाही. पुष्कळ लहानमोठी राज्ये होती. त्यांचे आपसातले संघर्ष सतत चालत होते. प्रत्येक राजा आपल्या राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत होता. संपूर्ण भारताचा किंवा भारताच्या हिताचा विचार कोणत्याही राजाच्या मनात नव्हता; आणि सामान्य लोक आपल्या कुटुंबाचा, फार तर आपल्या जातीचा विचार करीत होते. ह्या परिस्थितीमुळेच परदेशी आक्रमकांचे फावले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
समाजाचे नेतृत्व मुख्यतः ब्राह्मणांकडे होते. आणि ते ब्राह्मण अंधश्रद्धांनी पछाडलेले होते. केवळ भाकड कर्मकांडे करण्यात गुंतले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या पापपुण्याच्या कल्पना एका बाजूला निराधार होत्या आणि दुसरीकडे तीव्र होत्या. त्यामुळे ते इतरांवर घोर अन्याय करीत. त्यांनी आपल्या कुटुंबातल्या विधवांवर अनन्वित अत्याचार केले आहेत. तेव्हाच्या विधवा जे अत्याचार निमूटपणे सोसत होत्या त्या त्यांच्या देवाधर्माच्या आणि पापपुण्याच्या कल्पनेवर. त्या कल्पना बदलणचे काम शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी सुधारकांनी सुरू केले. ते अजून अपूर्ण आहे. तेव्हा विधवांची संख्याही फार मोठी होती. याचे कारण पुरुषांपेक्षा स्त्रियांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. पुरुष जितक्या सहजपणे साथीच्या रोगांना बळी पडू शकतो तितक्या लवकर स्त्रिया बळी पडत नाहीत. अशा नवऱ्याच्या मागे राहिलेल्या – ‘पांढऱ्या पायाची! – म्हणविणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत तत्कालीन पुरुषांना अजिबात सहानुभूती नव्हती आणि स्त्रियांनाही नव्हती. शकुन-अपशकुनांचा जबरदस्त पगडा सगळ्याच स्त्री-पुरुषांवर होता. अशा लवकर मरणाऱ्या पुरुषाचा मृत्यू कशामुळे झाला याच्या वैज्ञानिक कारणांकडे नजर न जाता तो त्याच्या बायकोचा पायगुण असे ठरवले जाई. ते तिची (स्त्रीची) पदोपदी मानहानी करीत. विधवांना सती जाण्याला भाग पाडत. हे सारे अंधश्रद्धेतून होत होते. विधवांचे सती जाणे हे त्यांच्या स्वतःसाठी पुण्यप्रद मानले जाई तसेच ते केल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही पुण्यलाभ होत होता. विधवांचे केशवपन होईपर्यंत त्या अस्पृश्य मानल्या जात असत. त्यांचे दर्शन आणि स्पर्श दोन्ही वर्ज्य मानले जाई. तेव्हा विटाळ-चांडाळाच्या कल्पनाही फार चमत्कारिक होत्या. त्यामुळे भोजनप्रसंगी सारेच पंक्तिभेद करीत. कोणाच्या बरोबर जेवायचे आणि कोणाबरोबर जेवायचे नाही याचे नियम फार कडक होते. याला रोटीव्यवहार म्हणत होते. जिथे निरनिराळ्या जातींमध्ये रोटीव्यवहारच नव्हता तिथे बेटीव्यवहार अजिबात शक्य नव्हता. ब्राह्मणांना सकेशा विधवांचाच विटाळ होत होता असे नाही तर सगळ्याच मांसाशन करणाऱ्या जातींचा विटाळ होत असे. प्रत्येक जात स्वतःला उच्च समजत असे. आणि त्यांच्यापेक्षा नीच मानल्या गेलेल्या जातींबरोबर रोटीव्यवहार करीत नसे. ज्या जातींचा किंवा व्यक्तींचा रक्ताशी संबंध येत होता त्या सगळ्यांचा विटाळ ब्राह्मणांना होत होता. त्यामुळे घरातल्या स्त्रिया रजस्वला असताना त्यांचा आणि बाळंतिणींचाही विटाळ होत असे. आणि साहजिकच रक्ताशी किंवा मृत्यूशी संबंधित जे-जे व्यवसाय ते करणाऱ्या जातींचा विटाळ मानला जात असे. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातले पंचहौद मिशन प्रकरण लक्षणीय आहे. तेथे गेलेल्या ब्राह्मणांवर चहाबिस्किटे खाल्ल्याचा आरोप करून त्यांना वाळीत टाकण्यात आले होते. या सगळ्या अंधश्रद्धा आमच्या हिंदू धर्माशी आणि त्यांच्या पापपुण्याशी निगडित मानल्या गेल्यामुळे त्यांच्याविरुद्ध काम करणारे, मग ते सहभोजन करणारे असोत की विधवाविवाह करणारे असोत; धर्मभ्रष्ट मानले जात. वाळीत टाकले जात. ख्रिस्त्यांनी पाव टाकलेल्या विहिरींचे पाणी प्याल्याने गोव्यातील गावेच्या गावे कायमची बाटली आहेत. जातिभेद आणि अस्पृश्यता या दोन्ही प्रथा अत्यंत दृढ अशा अंधश्रद्धामुंळे निर्माण झाल्या आहेत. आणि शोषण म्हणाल तर ते आम्ही सगळेच एकमेकांचे करीत आलो आहोत.
****
उपर्युक्त अंधश्रद्धांतून आम्ही अंशतः बाहेर पडण्याची सुरुवात झाली इंग्रजाच्या आगमनानंतर. भारतात इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर येथे प्रचंड फरक घडून आला. इंग्रजांची विचारपद्धतीच आपल्यापेक्षा वेगळी होती. त्यांनी केवळ कवायती फौज आपल्याबरोबर आणली असे नव्हे तर छापील पुस्तके आणली, सार्वजनिक शाळा आणल्या, सार्वजनिक दवाखाने आणले, स्थानिक स्वराज्य संस्था (म्युनिसिपालिट्या) आणल्या. हे सर्व आमच्यासाठी अगदी नवीन होते. भारतात इंग्रजांचे व युरोपीयांचे आगमन झाल्यानंतर त्यांचा धर्म वाढवण्यासाठी का होईना त्यांनी आमच्या धर्माचे अध्ययन केले. त्याचबरोबर दुर्ग अशा जंगलांत जाऊन तेथे लोकांची सेवा करून त्यांचे मन ख्रिस्ती धर्माला अनुकूल करून घेतले. येथल्या जाती-जमातींच्या रीतिरिवाजांचे अध्ययन केले.
जमिनीची मोजणी आणि सर्वेक्षण केले. आगगाड्या आणल्या, तारायंत्रे आणली, टपाल खाते निर्माण केले, छापखाने आणले, बहिèयांसाठी खुणांची भाषा आणली आणि आंधळ्यांसाठी ब्रेललिपी आणली. हे सारे आमच्या कल्पनाविश्वात तोपर्यंत आलेच नव्हते.
आमच्याकडे लोहार होते, सुतार होते पण ते एकएकटे, आपआपल्या कुटुंबात काम करीत होते. आमच्या लोहारांनी एक न गंजणारा लोहस्तंभ बनविला तो दिल्लीला आहे, पण ती विद्या सर्वांपर्यंत पोहचली नाही. आम्ही साखळदंड बनविले पण रूळ आम्हाला बनविता आले नाहीत. आमच्याकडे बैलगाड्या होत्या पण त्यांनी ट्रामगाड्या आणल्या. सुरुवातीच्या ट्रामगाड्या लाकडी रुळांवरून चालत आणि घोडे त्यांना ओढत. त्यामुळे दोन घोडे पुष्कळ लोकांना सहजपणे वाहून नेऊ शकत. त्यांनी सर्वांत मोठी गोष्ट जर कोणती आणली असेल तर ती म्हणजे बाष्पयंत्र. या सगळ्यांतून कमी श्रमांतून जास्त कार्य कसे करायचे याचे धडे त्यांनी आम्हाला दिले.
कमी श्रमात जास्त काम उरकणे ही विद्या आम्हाला माहीतच नव्हती. श्रम सतत कमी करत जाण्याची साधने सुधारायची, नवनवीन उपकरणे बनवायची आणि मानवाच्या अथवा पशूंच्या स्नायूंच्या ऊर्जेचा वापर न करता दुसऱ्याच कुठल्या तरी ऊर्जेचा वापर करायचा ही आम्हाला नसलेली दृष्टी त्यांच्या ठिकाणी होती. दळण दळण्यासाठी, सूत कातण्यासाठी त्यांनी अगोदर वाहत्या पाण्याचा वापर केला. पुढे वाफेचा वापर आला आणि विजेचा शोध लागल्यानंतर बाष्पयंत्र वीज निर्माण करण्यासाठी वापरण्यात आले. हे त्यांनी इंग्लंडध्ये सुरू केले आणि लवकरच भारतात वापरायला सुरुवात केली. आम्ही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी स्तोत्रे म्हणत राहिलो आणि त्यांनी माणसाचे कष्ट वाचवून वेळदेखील वाचवला. माणसाचे श्रम आमि वेळ वाचवणे म्हणजेच लक्ष्मी प्रसन्न होणे, हे त्यांना कळले. आम्हाला समजलेच नाही. आपला आर्थिक इतिहास असे सांगतो की शोषणाशिवाय समृद्धी येऊ शकत नाही असा आपला समज आहे. नुसता समजच नव्हे तर ते वास्तव आहे. आपली कामे दुसऱ्याला करावयाला लावून, त्याला त्या कामांचा पुरेसा मोबदला न देणे म्हणजे शोषण. कोणाचे तरी शोषण केल्याशिवाय संपत्तीचा संचय होऊ शकत नाही आणि धनसंचय केल्याशिवाय भांडवलाची निर्मिती होऊ शकत नाही या समजावर आपले सर्व अर्थकारण आम्ही आज उभारले आहे. (परंतु हा एक वेगळा विषय आहे. त्याचा विचार स्वतंत्र लेखात करू.)
या शोषणामुळे तीव्र विषमता निर्माण झाली. आणि त्या विषमतेतून स्पर्धा, संघर्ष, दुःख, भेदभाव निर्माण झाले. हे सर्व टाळावयाला आणि कोणालाही दुसऱ्याचे शोषण करण्यापासून थांबवायला महात्मा गांधींनी स्वावलंबनाचा मार्ग सांगितला. आणि स्वावलंबनाचे प्रत्येकाने करण्याजोगे एक काम म्हणून सूतकताई निवडली.
त्याचे प्रतीक म्हणून त्यांनी चरखा स्वीकारला. ते स्वतः अत्यंत नियमितपणे चरख्यावर सूत कातत. विनोबांनी तोच विचार पुढे नेऊन ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. प्रत्येकाला पूर्णपणे स्वावलंबी होणे शक्य नाही हे जाणून त्यांनी एक गाव स्वावलंबी कसे होईल हे पाहिले. त्यांच्या ग्रामस्वराज्याच्या कल्पनेप्रमाणे एका खेड्याच्या, किंवा गाव मोठे असल्यास त्यातल्या एका पेठेच्यासगळ्या गरजा त्या गावात (किंवा त्या पेठेत) पूर्ण व्हाव्या यासाठी वस्तीतल्या लोकांनी एकमेकांसाठी आवश्यक ती कामे करावयाची अशी योजना मांडली. एवढ्यापुरते (त्या खेड्यापुरते) परस्परावलंबन त्यांनी मान्य केले. विनोबांनी स्वतः वर्षानुवर्षे ऋषिशेती केली. ऋषिशेती म्हणजे शेतीची सर्व कामे माणसांनी करावयाची, बैलांची मदत घ्यावयाची नाही. पूर्वी ऋषिपंचमीच्या व्रतामध्ये बैलांच्या श्रमाने निर्माण झालेले खाद्यपदार्थ वर्ज्य असत. बैलांचे श्रम नाकारणे म्हणजे ऋषिकार्य करणे असे विनोबा मानत. त्यावरून बैलांच्या श्रमाशिवाय केलेल्या शेतीला त्यांनी ऋषिशेती हे नाव दिले. विनोबांची ग्रामस्वराज्याची ही सूचना लोकप्रिय झाली नाही किंवा असे म्हणूया की लोकांनी ती नाकारली. याचे कारण आपल्याला इंग्रजांनी येथे आल्यावर जी उत्पादनपद्धती वापरली तिच्यामध्ये सापडते. आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे इंग्रजांनी स्नायूंच्या ऊर्जेऐवजी कृत्रिम ऊर्जा वापरली. सूत कातण्यासाठी आणि वस्त्रे विणण्यासाठी त्यांनी वाफेची यंत्रे वापरली. प्रचंड आकाराचे बॉयलर्स बनविले. बॉयलरच्या खाली जाळल्या जाणाऱ्या दगडी कोळशाचा धूर इकडे-तिकडे पसरू नये म्हणून उत्तुंग चिमण्या बांधल्या. अशा मिल्समुळे फार थोड्या श्रमांत पुष्कळ कपडा निर्माण होऊ लागला. या मिलच्या कपड्यामुळे सगळ्यांची श्रीमंती वाढली. म्हणजे कपडा स्वस्त झाला; तो प्रत्येकापर्यंत पोहचवणे शक्य झाले. आणि दुसरीकडे पूर्वी तितका कपडा विणण्याकरता जितके मॅन-अवर्स (मनुष्य-तास) लागत त्यांत बचत झाली. पुढे-पुढे सगळ्याच वस्तूंच्या उत्पादनपद्धतीत कृत्रिम ऊर्जेचा वापर सुरू झाला आणि त्यामुळे माणसाचे त्याचप्रमाणे बैल, घोडे अशा प्राण्यांचेही श्रम प्रचंड प्रमाणात कमी झाले.
कोळ्यांना त्यांच्या नावा हातांनी वल्हवण्याची गरज उरली नाही. बैलगाड्यांची जागा मोटारींनी घेतली. मोटारी आल्याबरोबर माणसाचे कष्ट आणि वेळ दोन्ही वाचले. या सगळ्या व्यवहारात काहींजवळ पैसा पुष्कळ साठला हे खरे असले तरी कष्ट बऱ्याच जणांचे वाचले. आज विज्ञानाची प्रगती इतकी झाली आहे की आता कष्ट सर्वांचेच वाचू शकतील. ते होत नाही याचे कारण त्यासाठी आपली मने अजून तयार नाहीत. सर्वत्र समानता यायची असेल तर ती बाह्य ऊर्जेचा वापर केला तरच येऊ शकेल असे माझे मत झाले आहे. आजपर्यंत आपल्याऐवजी दुसऱ्याला श्रम करायला लावणे म्हणजे श्रीमंत होणे असे मानले जात आहे. माणसाच्या श्रमाच्या ऐवजी यंत्रांनी कामे करवून घेतल्यास आणि ती यंत्रे बाह्य उर्जेवर चालविल्यास सगळ्यांचेच कष्ट वाचतील आणि सगळे श्रीमंत होतील. त्यांच्यात याबाबतीत समता येईल.
वस्तूंच्या उत्पादनासाठी स्नायूंच्या बाहेरची ऊर्जा वापरायचे ठरवले तर पर्यावरणाची अपरिमित हानीहोते हा एक मोठा दोष या ऊर्जेच्या वापरण्याला आहे. (तो वेगळा विषय आहे. त्याचाही विचार वेगळा करू.) थोडक्यात काय तर स्नायुबाह्य ऊर्जा उपलब्ध झाल्यानंतरच स्त्री, शूद्रांपर्यंत शिक्षण पोचू शकले आहे.
ती ऊर्जा जोपर्यंत भारतात उपलब्ध नव्हती तोपर्यंत सार्वत्रिक शिक्षणाचा विचार अशक्य होता. स्नायुबाह्य ऊर्जा कशी निर्माण करावयाची हे आम्हा भारतीयांनाच नव्हे तर आशिया, आफ्रिका व अमेरिका ह्या खंडांत त्या स्थानिक लोकांना माहीत नव्हते. ते फक्त युरोपातल्यांना सुचले आणि त्यामुळेच ते आपल्यासारख्यांवर दीर्घकाळ राज्य करू शकले.
या साऱ्या घटनाक्रमाचा विचार करता स्त्री-शूद्रांना उच्चवर्णीयांनी शिक्षणापासून मुद्दाम वंचित ठेवले असे मला जाणवत नाही, पण या विषयाचे सखोल अध्ययन होणे आवश्यक आहे. माझेच म्हणणे बरोबर असा माझा आग्रह नाही.
dpmohoni@gmail.com