मरणभय-आत्मा-पुनर्जन्म

सजीव येई जन्मासी। अटळ असे मृत्यू त्यासी।
जाणीव प्रत्येक व्यक्तीसी। जी का असते सज्ञानी ॥१॥
अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन ।
निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥
सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ ।
सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥
व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्‍या-गाई-गुरे ।
मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥
पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण ।
परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप तो सातवा ॥५॥
यांसी म्हणितले चिरंजीव । कल्पना केवळ मानीव ।
त्या त्या काळी सजीव । ते असतील सातही ॥६॥
परंतु काळीं सांप्रत । या सातांतील जिवंत ।
कोणीही नसे निश्चित । वैज्ञानिक सत्य हे ॥७॥
देव मानिले अजरामर । नाही मरण नसे आजार ।
स्वर्गीं तयांचा संचार । सारे कल्पित डोलारे ॥८॥
तैसेचि ते अमृतसत्त्व। नाही तयासी अस्तित्व ।
मानव इच्छिती अमरत्व । मानसिकता ऐसी दिसे ॥९॥
मरण अटळ सर्वां पटे । परी अंतरी भीती दाटे ।
मरणासंबंधीचा शब्द वाटे । अशुभ, अभद्र, अमंगळ ॥१०॥
मयत-प्रेत-मढे- स्मशान । चिता-मर्तिक आणि सरण ।
तिरडी-गोवर्‍या-मसण । ऐशा शब्दां घाबरती ॥११॥
दशक्रिया-अकरावे-बारावे । शब्द अपवित्र न उच्चारावे ।
शुभकार्यीं अवश्य टाळावे । पाळिती संकेत अलिखित॥१२॥
भान औचित्याचे असावे । भय शब्दांचे नसावे ।
कोठे काहीही बोलावे । ऐसा अनर्थ न घ्यावा ॥१३ ॥
घडण्याची जें निश्चिती । टाळणे न कोणा हाती ।
तयाविषयीं ऐसी भीती । वाटे कोण्या कारणे ॥१४॥
बुद्धिवंतासी ऐसे भय ।अनावश्यक अशोभनीय ।
मरणी भयदायक काय । घटना एक नैसर्गिक ॥१५ ॥
वेदकाळी वदले चार्वाक । मरणीं गूढ न काही एक ।
जीवनी भोगावे सुख । आनंदाने मनुजांनी ॥१६॥
यद्यपि मरण नैसर्गिक । जगावे काळ अधिकाधिक ।
प्राणिमात्रासी प्रत्येक । स्वाभाविक ऊर्मी ही ॥१७ ॥
म्हणौनि मृत्यू अप्रिय । टाळण्या सजीव सक्रिय ।
परंतु मानवा मरणभय । कदापीही नसावे ॥१८॥
प्रत्येकासी येते मरण । याचे जैविक कारण ।
जीवशास्त्रज्ञां उमगले जाण । सर्वमान्य असे हे ॥१९ ॥
टेलोमियर-जिनोम-जीन । गुणसूत्रे पेशी विभाजन ।
जिनोम लांबी त्रुटीकरण । प्रकरण ऐसे बिकट हे ॥२० ॥
द्यावे इथेच सोडोन । परी ऐसे जाणोन ।
नैसर्गिक मरणाचे कारण । ज्ञात आता मानवा ॥२१ ॥
अटळ मरण नि:संदेह । कांही न उरे जाता देह ।
जगाचा ऐसा चिर विरह ।असह्य वाटे मनुजासी ॥२२॥
यास्तव आत्मा असे अमर । ऐसा रचिला विचार ।
नाशवंत केवळ शरीर ।आत्मा जन्मे पुन:पुन्हा ॥२३॥
आत्मयासी शस्त्र छेदीना ।आत्मयासी अग्नी जाळीना ।
आत्मयासी पाणी भिजवीना । ऐसी ख्याती आत्मयाची ॥२४॥
आत्मा नाही देहीं कोठे । आत्म्याचे अस्तित्वचि खोटे ।
परी श्रद्धाळूंसी सारे पटे । कारण अमरत्व इच्छिती ॥२५ ॥
शरीर म्हणजे मी नोहे । ओळख माझी आत्मा आहे ।
तो अमर म्हणौनि पाहे । मीही अमर जाहलो ॥२६॥
विचार करिता खोटे सारे । श्रद्धावंता वाटे खरे।
जगी वेगे असत्य पसरे । सत्या लागे विलंब ॥२७॥
संतवाणी- कथा -कीर्तने । गोष्टी-गाणी- आख्याने ।
नाटके-चित्रपट-प्रवचने । अनेक माध्यमे प्रभावी ॥२८॥
यांद्वारे पुनर्जन्म संकल्पना । सातत्याने जनमना–।
वरती बिंबविली भावना । मनी ठसोनी दृढ झाली ॥२९॥
असोनी असत्य आघवे। सश्रद्ध मानिती भावे ।
शंका काही न उद्भवे । सत्यासत्याविषयींची ।।३० ॥
आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म ।
त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥
आपण प्रयत्‍न करावे । गतजन्मीचे काही आठवावे ।
तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥
याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देती लोक ।
पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥
गतजन्मीचे काहीही । आठवते ना कोणाही ।
पुनर्जन्म कल्पना ही । सत्य कैसी मानावी ? ॥३४॥
शरीरशास्त्रग्रंथी देख । आत्म्याचा ना नामोल्लेख ।
इंद्रियांचे कार्य हृदयादिक । तयांचे वर्णन परिपूर्ण ॥३५॥
शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती ।शल्यकर्म यशस्वी करिती ।
परी आत्म्याचे ना नाम घेती । कधीही देहीं न दिसे तो ॥३६॥
यापरी आत्मा नाही नाही । कोणाच्याही हृदयीं देही ।
तैं पुनर्जन्म कोण घेई । असत्य पुनर्जन्म संकल्पना ॥३७॥
पहिला तैसाचि शेवटचा । एकचि जन्म प्रत्येकाचा ।
गतजन्म-पुनर्जन्म कोणाचा । शक्य नसे कालत्रयी ॥३८॥
जाणावे आपण सर्वांनी ।शंका असली काही मनीं ।
विचारे विवर-विवरोनी । निरसन पूर्णत्वे करावे ॥३९॥
असे सत्य वैज्ञानिक । जाणिती मानिती जे विवेक ।
पूर्वग्रहपीडित श्राद्धिक । अज्ञानासी कवटाळिती ॥४०॥
आत्मा-पुनर्जन्म-संचित । अज्ञान सारे खचित ।
यास्तव याची संगत । निश्चये आपण सोडावी ॥४१॥
वृथा भीती मरणाची । काढून टाकावी अंतरीची ।
अंतिम घटना आयुष्याची । काही नाही तदनंतर ॥४२॥
अर्चिरादि मार्ग सूर्यलोक । चंद्रलोक विद्युतलोक ।
पितृयान देवयान ब्रह्मलोक । कल्पित सार्‍या भरार्‍या ॥४३॥
जाणणे हे आवश्यक । मानव प्रजातीं जन्म एक ।
लाभला गेला निरर्थक । ऐसे होईल अन्यथा ॥४४॥

ynwala@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.