‘देवनगरीत शेजाऱ्यावर प्रेम करणारे कमी आहेत, त्यामानानं शेजाऱ्यांच्या मांजरावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मांजरवेडय़ांना इथे शहाणं समजलं जातं, मात्र अशा या प्रात:स्मरणीय मांजरांना देवनगरीत हमरस्त्यावर यायला बंदी आहे. कारण मांजरं माणसांना आडवं जाऊन त्यांचा खोळंबा करतात, ही सामूहिक श्रद्धा. देवनगरीत एकदा एक माणूस साप चावून मेला. त्याला जिवंत करण्यासाठी इथला सुप्रसिद्ध मांत्रिक लगबगीनं निघाला, पण वाटेवर मांजर आडवं गेलं म्हणून मेलेला माणूस जिवंत होऊ शकला नाही.. कामं उरकण्याचा कंटाळा करणाऱ्या देवनगरीच्या माणसांना मांजरं खूप आवडतात, असंही माझं निरीक्षण आहे..’
‘ईश्वर डॉट कॉम’ या विश्राम गुप्ते यांच्या कादंबरीतला हा एक परिच्छेद. एवढय़ावरून या कादंबरीच्या जातकुळीची, पार्श्वभूमी म्हणून निवडलेल्या परिसराची कल्पना यावी. लेखकानं कल्पनेनं उभे केलेल्या एका जगात आणि एका विशिष्ट समाजात ही कादंबरी आपल्याला नेते. देवनगरी (सिटी ऑफ गॉड) हे या जगाचं नाव. देवनगरीतल्या हालचाली, तिथल्या रहिवाशांचं मानसिक, भावनिक पर्यावरण आणि त्यातून आकारलेलं वैचारिक, सांस्कृतिक आणि चर्चिक नाटय़ हे सारं या कादंबरीत एका फॅण्टसीमय विश्वात खेळतं ठेवण्यात आलं आहे. प्रस्तावनेत लेखकानं मात्र आपली कादंबरी फॅण्टसी आहे हे नाकारलं आहे. ज्या नगरीत देवाची अधिसत्ता चालते ती देवनगरी, असं सांगून तो म्हणतो, ‘आपला भारतच एक देवनगरी आहे. भारतीय देवनगरीतले रहिवासी आहेत.’ त्याच्या मते, ‘ईश्वर डॉट कॉम’ ही कादंबरी म्हणजे देव-धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या व्यापारीकरणाची धमाल कथा आहे. या चारही गोष्टी आज आपल्या देशातही धमाल कथा-उपकथांना जन्म देत आहेत. तेव्हा लेखकाचा दावा पूर्णपणे असत्य म्हणता येणार नाही. लिखाणाचा बाज विनोदी, भाषा अतिखटय़ाळ. अथपासून इतिपर्यंत खेळकर शैलीत लेखक देवनगरीची कहाणी सांगतो. विनोद निर्मितीतला आवश्यक मानला जाणारा अतिशयोक्ती हा घटक इथं विपुल प्रमाणात आहे. अतिशयोक्तीची अतिशयोक्ती म्हणा ना! लेखकानं या तंत्राचा चतुर उपयोग करून घेतला आहे खरा, पण या तंत्रामुळेच या कथेचे पाय वास्तव भूमीपासून सुटले आहेत. लेखकाच्या आग्रहाशी प्रामाणिक राहून, त्याला सहमती दर्शवून या फॅण्टसीपर कथेचं वर्णन करायचं तर ‘या कथेतलं वास्तव आहे काल्पनिक’ असं म्हणता येईल. एक मात्र खरंय- पुस्तकातले अनेक तपशील आजच्या वातावरणाशी मिळतेजुळते आहेत. समाजाच्या आजच्या मानसिकतेवर भाष्य करण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे; आणि त्यात लेखकाला कितपत यश आलं आहे हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. पुस्तक हाती पडल्यावर त्यातलं कोणतंही पान उघडून वाचा, आपण एका आगळ्या दुनियेत येऊन दाखल झालो आहोत असा अनुभव येईल. देव-धर्म संकल्पनेवर विश्वास असणाऱ्यांच्या भाबडेपणानं देवनगरीत टोक गाठलं आहे. आज आपल्या समाजाचा प्रवासही त्याच दिशेनं चालला आहे.
कादंबरीला प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन लाभलं असलं तरी ‘मी’सह इतर पात्रांनी परस्परांचे विचार, कृती व अंधश्रद्धेनं ग्रासलेल्या देवभोळ्या परंपरावादी समाजावर केलेली अखंड व उलटसुलट चर्चा त्यात आहे. फाजील परंपराप्रेमातून जो चिकित्साशून्य समाज आकाराला येतो, त्याची रेवडी उडवणारं हे खटय़ाळ लेखन आहे. म्हटलं तर चित्र भयावह आहे, पण ते रेखाटण्यासाठी लेखकानं जो कुंचला वापरला आहे तो व्यंगचित्रकाराचा कुंचला आहे. ‘ईश्वर डॉट कॉम’ ही कादंबरी म्हणजे मॉडेल म्हणून समोर एक काल्पनिक समाज उभा करून चितारलेलं श्रद्धाप्रेमानं अंध झालेल्या आजच्या देववेडय़ा समाजाचं व्यंगचित्र आहे.
आजच्या धर्मकल्लोळी वातावरणातले ताजे संदर्भ कादंबरीची वाचनीयता वाढवायला उपयोगी पडले आहेत. ही कादंबरी आपल्याला देवधर्म, श्रद्धा, परंपरा या संकल्पना आणि त्यांनी मानवी व्यवहारात घातलेले घोळ यावर नुसती चर्चा करत नाही; ती त्याकडे आपल्याला उलटसुलट पाहायला लावते. प्रसंगी ती वाचकांचा वैचारिक गोंधळ उडवून देते. लेखकानं अवलंबलेल्या विडंबन शैलीतील भेदकता लक्षात घेता सनातनी लोक हे पुस्तक चार-पाच पानांपलीकडे वाचू शकतील असं वाटत नाही. पुस्तकातली टोकाची उपरोधिक भाषा या आजच्या परंपराप्रिय समाजगटाला औद्धत्यपूर्ण वाटली तर नवल नाही. नास्तिक वाचकांची समस्या आणखी वेगळी. इतका प्रखर सामाजिक विषय अशा प्रकारे थट्टा-मस्करीत मांडला जाणं त्यांना कदाचित रुचणार नाही. आजच्या वास्तव वातावरणावर गंभीर आणि थेट हल्ला केला जावा अशी आपली अपेक्षा असणं ठीक आहे. पण लेखक विश्राम गुप्ते यांनी हा मार्ग अवलंबला असता तर पेरुमल मुरुगन या तमिळ लेखकाचा मराठी अवतार आपल्याला पाहायला मिळाला असता. लेखकानं हे पुस्तक मुद्दामहून धर्म संकल्पनेची थट्टा उडवण्यासाठी लिहिलंय असं म्हणता येणार नाही. पण आपल्याकडल्या भावना-दुख्या जमावाचं काही सांगता येत नाही.
धर्माचे मानवी अन्वय आणि श्रद्धा आणि परंपरा या घटकांनी त्याची लावलेली विल्हेवाट सर्वासमोर खेळकरपणे मांडणं आणि त्या निमित्तानं भाषिक सादरीकरणाचे थोडेफार प्रयोग करू पाहणं, अशी भूमिका या लेखनामागे दिसते. धर्मवादीच धर्माकडे सदोष नजरेनं पाहाताहेत हे सर्वमान्य सत्य पुस्तकातल्या अनेक चर्चा आणि घटनांतून उघड होतं. देव-धर्म संस्कृती अन् परंपरेच्या व्यापारीकरणात हृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो. उत्तर आधुनिक काळात तरी आपण विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर अन् प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा ही त्रिसूत्री मानणार आहोत का? असा सवाल पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये विचारण्यात आला आहे. या कादंबरी लेखनामागील प्रेरणेचं एक अंग या प्रश्नातही सामावलेलं आहे.
विश्राम गुप्ते यांचा आजवरचा लेखन प्रवास नजरेखालून घातला की ठळकपणे एक गोष्ट पुढे येते, ती म्हणजे हा लेखक नवतेचा खंदा पुरस्कर्ता आहे. मराठी वाङ्मयातील प्रायोगिकतेची तो नेहमी जाणीवपूर्वक दखल घेत आला आहे. नव्या प्रयत्नांचं कौतुक करण्यापेक्षा त्यांची चिकित्सा करण्याची भूमिका त्यानं वेळोवेळी अवलंबली आहे आणि या भूमिकेशी प्रामाणिक राहता यावं, म्हणून त्यानं स्वत:ला कंपूबाजीपासून दूर ठेवलं आहे. नव्या लेखनातील अभिनवता समजून घेणे आणि आपल्याला समजलेले वाचकांना समजावून सांगणे हे काम विश्राम गुप्ते व्रतस्थपणे करत आले आहेत. वाचकाभिमुख धोरण न अवलंबता त्यांनी सर्जनशील लेखन केलं आहे आणि समीक्षालेखन केलं आहे. या नव्या मंडळीचा अब्सर्ड रचनेकडे असलेला ओढा सर्वपरिचित आहे. हा आकृतिबंध स्वीकारला की स्वैर संचार करता येतो, मांडणीत लवचीकपणा येतो; चौफेर शेरेबाजी करता येते. ‘ईश्वर डॉट कॉम’मध्ये लेखकाचं अबसर्डिटीचं आकर्षण पानोपानी दिसत राहतं. कादंबरीसाठी त्यांनी निवडलेल्या आशयसूत्राला त्याची गरजही होती. अबसर्डिटीच्या प्रेमप्रवाहात कथाविषय वाहून जाण्याचा धोकाही असतो. गुप्ते यांनी या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापकी यश मिळवलं आहे.
चिकित्सा या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या लेखकाच्या कोणत्याही कलाकृतीकडे पाहताना आपणही चिकित्सक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. या नजरेनं ‘ईश्वर डॉट कॉम’कडे पाहिलं, की काही गडबडी समोर येतात. या कादंबरीत उपरोधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आशय मांडणीसाठी अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे, पण कादंबरीत हा उपरोधाचा डोस जरा अतीच झाला आहे हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. उपरोधिक विधानांचा अतिरेक आणि जागोजागी विनोदनिर्मिती करण्याचा अट्टहास लेखकानं टाळला असता तर या चच्रेला अधिक गांभीर्य प्राप्त झालं असतं. उपरोधाच्या या माऱ्यामुळे सुरुवातीची पानं वाचताना कादंबरीतील जगाशी समरस होणं कठीण होऊन बसतं. नंतर या भाषेची सवय होऊन जाते हा भाग अलाहिदा.
मीडियाचा प्रतिनिधी असावा म्हणून ज्या वर्तमानपत्राचा वावर या कादंबरीत आहे, त्या वर्तमानपत्राचं नाव ‘दै. भंबेरी’ आहे. वृत्तपत्राच्या नावातून विनोद साधण्याचा प्रकारही खूप ओल्ड फॅशन झाला. अगदी आचार्य अत्र्यांच्या काळातला. हा ढोबळपणा कादंबरीच्या एकूण परिपक्व मांडणीशी विसंगत वाटतो.
धर्म, देव, श्रद्धा, परंपरा यासंदर्भातल्या चच्रेत सहभाग घेणारी या कादंबरीतली पात्रं चच्रेत विभिन्न बाजूंचे विचार यावेत, म्हणून मुद्दामहून नेमलेली वाटतात. अशा नेमणुकीमुळे संवादातील आणि कादंबरीतल्या नसíगक वातावरणाला धक्का पोचतो. रचनाबद्ध आराखडय़ात कादंबरीचा आशय फिरू लागतो. उदाहरणार्थ एक उदारमतवादी हिंदू, दुसरा धर्माला वैज्ञानिक अधिष्ठान द्यायला धडपडणारा कोणीतरी एक दलिताचा नेता असल्याचा दावा करणारा आणि हिंदू धर्माची चिकित्सा करू पाहणारा.. एखाद्या व्यावसायिक नाटकात सापडावीत अशी ही फिल्डिंग आहे. देव-धर्म, परंपरा यावरल्या चिकित्सक चर्चेवर रोख असल्यानं कृत्रिम रचनेतून निर्माण होणाऱ्या साचेबद्धपणाकडे लेखकानं दुर्लक्ष केलं असेल, पण याचे वाचनीयतेवर विपरीत परिणाम झाले आहेत. वाचकाला हा सर्व विशिष्ट विचारसरणी रेटण्यासाठी आयोजलेला खेळ आहे असं वाटू लागतं.
मात्र, काही प्रमाणात साचेबंद रचना असूनही ‘ईश्वर डॉट कॉम’ वाचकांना धरून ठेवते, ती त्यातल्या चच्रेमुळे आणि कादंबरीभर पेरल्या गेलेल्या हुशार, चमकदार विधानांमुळे. सुखवस्तूची व्याख्या स्पष्ट करताना एके ठिकाणी म्हटलंय, ‘सुखवस्तू म्हणजे वस्तू विकत घेऊन ज्यांना सुख मिळतं तो वर्ग. दुसऱ्या एका ठिकाणी विधान येतं- ‘संस्कृती संवर्धन त्रस्त किरकिऱ्या माणसाकडून होणार नाही, त्यासाठी माणूस सुरक्षित आणि सुखवस्तूच हवा,’ अशी अनेक उदाहरणं देता येतील. मात्र अशा चतुर विधानातून लेखक दिसतो. इथं कादंबरीच्या विषयनिवडीतून, आशयामागील भूमिकेतून, प्रसंगातून पात्रांच्या तोंडच्या संवादातून विश्राम गुप्ते हा पुरोगामी आधुनिक विचाराचा लेखक, समीक्षक दिसत राहतो. लेखकाच्या विचारसरणीचं प्रतिबिंब साहित्यकृतीत पडणं हे अटळ असतं. भल्या-भल्यांची यातून सुटका झालेली नाही.
देव-धर्म, परंपरा या प्रतिगामी संकल्पनेबाहेर पडून जे स्वतंत्रबुद्धीनं आपल्या आयुष्याला सामोरे जाऊ पाहताहेत अशा वाचकांना देव-धर्म, परंपरा याची ही गमतीशीर चर्चा केवळ वाचनीय वाटणार नाही तर सुखावून सोडेल. कादंबरीभर विखुरलेली आपल्या विचारांना दुजोरा देणारी विधानं वाचताना त्यांना कादंबरीच्या रचीव स्वरूपाचा, साचेबद्ध पात्रयोजनेचा विसर पडेल आणि अतिरिक्त उपरोधही सुसह्य़ होईल. याला वाचकाभिमुखता म्हणायची का? आणि वाचकाभिमुख म्हटलं तर आजच्या धर्मप्रदूषित वातावरणात असे वाचक किती? समाजप्रबोधनाचं ठाम उद्दिष्ट लेखकासमोर असेल असं वाटत नाही. अभिनिवेश आशयापेक्षा त्याच्या प्रयोगशील मांडणीत आहे. पण तरीही एक शक्यता जाता जाता व्यक्त करावीशी वाटते. कादंबरीच्या आशय-विषयाशी पूर्णत सहमत नसलेला, देव-धर्म पाळणारा पण त्यातल्या पारंपरिक दृष्टिकोनावर आणि कर्मकांडांवर संशय घेणारा मोठा वर्ग आज समाजात आहे. या वर्गाला ही कादंबरी आणि त्यात उभं केलेलं चर्चानाटय़ आकर्षित करू शकले; त्यातून बाहेर येणारा आशय त्यांना नेणिवेच्या पातळीवर अस्वस्थ करून सोडू शकला तर ते विश्राम गुप्ते यांच्या ‘ईश्वर डॉट कॉम’चं मोठं यश म्हणता येईल. या यशापुढं समीक्षक या कादंबरीचं मूल्यमापन कसे करतात, मराठी साहित्यविश्वात या कादंबरीचं योगदान काय, हे प्रश्न बिनमहत्त्वाचे ठरतात.
‘ईश्वर डॉट कॉम’
विश्राम गुप्ते,
राजहंस प्रकाशन, पुणे,
पृष्ठे- ३००, किंमत- ३०० रुपये.
महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने
awdhooot@rediffmail.com
आपले योगदान म्हणजे समाजात वैचारिक क्रांतीच्या मशाली प्रज्ज्वलीत करणारे आहे…विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अप्रतिम पुस्तकांचं परीक्षण, लेखन आपण करीत आहात…आपल्या कार्याला दिल से सलाम…