न्यायालयाने सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात दोषी ठरवून पाच वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनविली आहे.(या शिक्षेला उच्च न्यायालयात त्वरित स्थगितीही मिळाली, त्यामुळे सलमानची तुरूंगवारी सध्यातरी टळली आहे). पण सलमानला शिक्षा सुनावताच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींचे कंठ दु:खाने दाटून आले होते. परंतु सलमानच्या गाडीखाली जो माणूस झोपेतच चिरडून मारला गेला आणि आणखी काही लोक जखमी होऊन कायमचे अपंग झाले, त्यांच्याबद्दल या वर्गाने कधी कळवळा व्यक्त केल्याचे आठवत नाही.
उलट अभिजित भट्टाचार्य नामक गायकाने प्रतिक्रिया देताना गरिबांविरोधात जी मुक्ताफळे उधळली आहेत ती या अभिजन वर्गाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानली पाहिजे. तो म्हणाला, फुटपाथ गरिबांच्या बापाची आहे काय? जे फुटपाथवर कुत्र्यासारखे झोपतात ते कुत्र्यासारखेच मरणार. वर म्हटल्याप्रमाणे स्वत:ला सुसंस्कृत अभिजन म्हणवणाऱ्या वर्ग- जातीतील लोकांची ही प्रतिक्रिया आहे. इतर उघडपणे असे म्हणणार नाहीत इतकेच. पण अभिजित भट्टाचार्याने आपल्या वर्ग-जातीच्या भावना आणि विचार वरील प्रतिक्रियेत व्यक्त केलेल्या आहेत. त्यातून आपला हा आधुनिक म्हणवला जाणारा अभिजन वर्ग कसा रानटीपणाकडे झुकला आहे हेच दिसून येते.
एकेकाळी गुरू दत्तच्या `प्यासा’मध्ये ही जी अभिजन वर्गाची दुनिया आहे त्याबद्दल साहीरने याच चित्रपटसृष्टीत जला दो इसे फूक डालो ये दुनिया, मेरे सामनेसे हटा दो ये दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है किंवा लोग कहते है ठीकही कहते होंगे, मेरे मोहल्लेमें इन्सान न रहते होंगे अशा शब्दात गरिबांची ठाम बाजू घेतली होती. अर्थात अशी हजारो उदाहरणे देता येतील पण आज याच चित्रपटसृष्टीतील एक गायक वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त करून गरिबांचा जगण्याचा अधिकारच नाकारत आहे आणि त्याबद्दल त्याची कानउघाडणी कोणी करीत नाही. याचा अर्थ आपण काय घ्यायचा?
मार्क्सने बाजारवादासंबंधी लिहिताना असे म्हटले आहे की, बाजार समाजासाठी आवश्यकच असतो, पण काही मानवी मूल्ये ही बाजाराच्या वर असतात. परंतु बाजारच जेव्हा समाजाची मूल्ये ठरवू लागतो तेव्हा पुन्हा एकदा रानटी युगाची सुरूवात होते. आज जगात आणि आपल्या देशात घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने पाहिल्यास मार्क्सच्या वरील वाक्याची सत्यता प्रकर्षाने जाणवते. आज बाजारवादाने जगभर थैमान घातले आहे.
या बाजारवादाने माणसाचे माणूसपण मारून टाकले आहे. सर्व गोष्टी शेअर बाजाराच्या हिशोबात पाहणाऱ्या या उच्चभ्रू समाजाकडून गरिबांसाठी साधा नि:श्वासही दुर्लभ झाला आहे. तो अप्पलपोटी, स्वकेंद्री, आपल्याच पोळीवर तूप ओढण्यात शौर्य असल्याचा गर्व बाळगणारा बनला आहे. तसे नसते तर एक दीडदमडीचा गायक असे उद्गार काढण्याची हिंमत करू शकला नसता.
फुटपाथवर झोपणारे गरीब बेघर लोक एक तर मुस्लीम किंवा दलित म्हणवले जाणारे हिंदुच असतात, धर्मांतरित बौध्द असतात, भटके विमुक्त, आदिवासी समाजातील असतात. जात-वर्ग-धर्म या सर्वच पातळीवर त्यांच्याबद्दल भेदभावाचीच भावना उच्च समजल्या जाणाऱ्या जात-वर्गातील लोकांची असते. ती खासगी चर्चेतून ते निष्ठूरपणे व्यक्त करीत असतात. सलमान प्रकरणात मेलेला माणूस आणि जखमी होऊन कायमचे अपंग झालेले मुस्लीम धर्माचेच आहेत. ते जर हिंदू असते तर `गर्वसे कहो’ म्हणणाऱ्यांनी यातून वेगळेच राजकारण पुढे आणले असते. आज देशात जे धार्मिक विद्वेषाचे वातावरण सरकारी पक्षाचे म्हणवले जाणारे लोक निर्माण करीत आहेत, त्यामुळे एकेकाळी खलिस्तानवाद्यांशी निधडया छातीने लढणाऱ्या जुलिओ रिबेरोसारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला भीती वाटू लागली आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टपणे नमूद केले आहे, केवळ ख्रिश्चन म्हणून ते मला गोळ्यां घालतील. ही परिस्थिती मार्क्सने वर म्हटल्याप्रमाणे रानटी युगाचीच नांदी आहे.
बाजारवादाच्या पूर्ण आहारी गेलेल्या आपल्या अध:पतित भांडवली समाजात ज्याला बाजारात पत आहे, त्यालाच समाजात पत आहे. बाकी लोक त्यांच्या दृष्टीने भुईला भार आहेत. त्यांना जगण्याचा अधिकारच नाही. हिटलरच्या नाझी तत्वज्ञानाचा मुख्य गाभा हाच होता. जे त्यांच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहेत त्यांनाच जगण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही आणि म्हणूनच ज्यूंची कत्तल केली गेली. आपल्याकडील जातिव्यवस्थेचे सार तेच आहे. म्हणूनच संघ परिवाराला हिटलर आदर्श वाटतो. त्यामुळेच त्यांनी नाझी पक्षाच्या धर्तीवर आपले संघटन उभे केले आहे. नाझींचे तत्वज्ञान जसे ज्यू द्वेषावर आधारित आहे तसेच यांचे मुस्लीम-दलित यांच्या द्वेषावर उभे आहे. स्त्री, शूद्र, नरनारी ताडण के अधिकारी ही दृष्टी नाझीवादाचाच भारतीय आविष्कार आहे. ही गोष्ट आज या बाजारव्यवस्थेचे जे लाभार्थी आहेत ते अभिजीत भट्टाचार्यच्या मुखातून प्रातिनिधिकपणे बोलत आहेत. गरीब जनतेला मुंबई शहरात किंबहुना एकंदरच शहरात घरे नाहीत, नोकऱ्या नाहीत. ती या भांडवली व्यवस्थेची दिवाळखोरी आहे. कारण ती फक्त मूठभर पैसेवाल्या लोकांचेच चोचले पुरविणारी धोरणे आखते. गरिबांच्या जीवनाची किंमत त्यांच्या दृष्टीने शून्य आहे. गरिबांना नष्ट करणे हाच गरिबी नष्ट करण्याचा त्यांच्या दृष्टीने उपाय आहे. पण हा गरीब, कष्टकरी माणूस नष्ट झाला तर हे लोक कोणाचे रक्त पिणार आहेत? जगात श्रमाशिवाय काहीही निर्माण होत नाही, त्यामुळे जे निर्माण होते त्यावर श्रमिकांचाच अधिकार असला पाहिजे, हे मार्क्सने उगीचच लिहून ठेवलेले नाही. भांडवली समाजात बरोबर याच्या उलटी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांची आधुनिक समजली जाणारी चंगळवादी, बांडगुळी संस्कृती या गरिबांच्या श्रमावरच उभी आहे.
हे फुटपाथवर राहणारे लोकच तुमचे रस्ते साफ करतात, तेच काच पत्रा गोळा करून शहराच्या स्वच्छतेला हातभार लावतात. छोटी-मोठी कामे करून तुम्हाला सुविधा पुरवितात. तुमच्या पाळलेल्या कुत्र्यांची निगा राखतात, त्यांना फिरायला घेऊन जातात. तुमचे बूटपॉलीश करतात, तुमच्या महागडया गाडया धुतात. म्हणूनच तुम्हाला ते किडामुंगी वाटतात. त्यांचे मरण तुम्हाला कुत्र्यांचे मरण वाटते. पण ही माणसे स्वत:च्या श्रमावर जगणारी माणसे आहेत. भांडवलशाहीने मूठभर भांडवलदारांच्या आणि त्यांची दलाली करणाऱ्या वर्गाच्या हितासाठी राबवलेल्या धोरणातून ही माणसं विस्थापित झाली आहेत. सर्वस्व गमावून बसलेली आहेत. कधी काळी वर म्हंटल्याप्रमाणे समाजातील संवेदनशील मध्यमवर्गाला त्यांच्याबद्दल कणव होती. आज हा वर्गही संवेदनाहीन बनत चालला आहे. उच्चवर्गीय मानसिकतेने त्याला कोडगा बनवला आहे. गरिबी हा त्यांनाही गरिबांचाच गुन्हा वाटतो, त्यासाठी व्यवस्था जबाबदार नाही तर गरीबच जबाबदार आहेत असे त्यांना वाटते. आज अशी उलटी गंगा वाहू लागली आहे. आज सलमान खानला शिक्षा झाल्याबद्दल काही लोक न्यायव्यवस्थेची देर है अंधेर नही अशी वाहवा करीत आहेत. पण तेरा वर्षे न्याय मिळायला लागणे हे न्यायव्यवस्थेनेच म्हटल्याप्रमाणे, न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणे होय. एका अर्थाने हे न्यायव्यवस्थेचे अपयशच आहे. सलमानच्या गाडीखाली फुटपाथवर झोपणारे गरीब मेले पण प्रतिष्ठित मेले असते तर इतका उशीर झाला असता काय? आणि आज सलमानबद्दल गळा दाटून बोलणारे त्या मेलेल्या आणि अपंग झालेल्या गरिबांबद्दल दोन शब्द तरी बोलायला तयार आहेत काय? उलट निर्लज्जपणे सलमानकडून भरपाई घ्यावी आणि त्याला समाजकार्य करण्यास सांगावे अशी गुन्ह्यांची भलावण करीत आहेत.
माणसाचे मूल्य तुम्ही ठरवू शकता काय? अर्थात जेथे पैशावरच माणसाची किंमत ठरते तेथे असाच दृष्टीकोन समोर येणार. शेवटी फुटपाथवर राहणाऱ्या माणसांची त्यांच्या दृष्टीने किंमत ती काय? पाच पन्नास हजार किंवा जास्तीत जास्त चार-पाच लाख. पैसे द्या आणि मोकळे व्हा! किती सोपा न्याय! यांच्या कुत्र्यांची किंमतही माणसापेक्षा जास्त असते! या मुंबईच्या फुटपाथनेच नारायण सुर्वे यांच्यासारखा महाकवी घडवला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना या फुटपाथनेच आश्रय दिला. त्यामुळे या फुटपाथवर राहणाऱ्या माणसांना तुच्छ लेखू नका. या दोन महाकवींनी आपल्या काव्यातून भांडवली व्यवस्थेच्या मरणाची अटळता लिहून ठेवली आहे. ती कामगारवर्गाच्या मुक्तियुद्धासाठी सतत प्रेरणा देत राहील आणि आपण आज ना उद्या अटळपणे हे मुक्तियुद्ध जिंकू. जेव्हा कोणालाच फुटपाथवर राहण्याची आणि मरण्याची वेळ येणार नाही.
तूर्तास मार्क्सने म्हटल्याप्रमाणे पुन्हा रानटी युग अवतरले आहे आणि या युगाला मूठमाती देऊन माणसाला पुन्हा माणूस बनवण्याचे काम ही फुटपाथवरची जनताच करेल यात काहीच शंका नाही.
जीवनमार्गच्या सौजन्याने
kiranm.subhasht@gmail.com