पुराणमित्येव न साधु सर्वम् (जुने ते सर्वच चांगले असते असे नाही.) असे कविकुलगुरु कालिदास दोन हजार वर्षांपूर्वी सांगून गेला आहे. परंतु आमच्या पुराणप्रिय समाजाच्या काही ते पचनी पडले नाही. उलट एखादी गोष्ट जितकी जुनी तितकी ह्या समाजाला जास्त प्रिय असते. काळाची पुटे चढून ती जेवढी अंधुक होईल तेवढी ती आम्हाला अधिक आकर्षक वाटते. निराधार परंपरांवर डोळे मिटन विश्वास ठेवलण्यात आम्हाला अतिशय आनंद वाटतो. प्राचीन काळापासून रूढ झालेली गृहीतके हे आमचे आवडते विचारधन आहे. कुठलीही प्रायोगिक सिद्धता न लाभलेल्या गूढ, गहन, अनाकलनीय, धूसर अशा गोष्टींचे विलक्षण आकर्षण आमच्या समाजाला असते .सुबोधतेपेक्षा दुर्बोधतेकडे ओढा असणे, स्पष्टतेपक्षा धूसरता अधिक आवडणे, प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे,ज्ञानापेक्षा अज्ञानात सुख वाटणे, आकाराऐवजी निराकारात रमावेसे वाटणे हा वैचारिक जगतातील फार मोठा विरोधाभास आहे.
ह्या विरोधाभासाला आणखी एका विचित्र विरोधाभासाची जोड लाभली आहे. आकर्षण जुन्याचे पण उपभोग मात्र नवीनाचा असा ह्या साजाचा विलक्षण स्वभाव बनला आहे.आधुनिक विज्ञानाने उपलब्ध करून दिलेली सर्व सुखे, सर्व सुविधा आम्हाला हव्याहव्याशा वाटतात. कौतुक मात्र जुन्याचे होत असते. शरीर आधुनिक समृधींमध्ये लोळत असते, मन मात्र जुन्या काळात रेंगाळत असते. अर्वाचीन वैद्यकाने शोधून दिलेल्या उपचारपद्धतीचा हक्काने लाभ घ्यायचा पण तिलाच नाके मुरडत गोडवे मात्र आयुर्वेदाचे गायचे अशी पुराणमतवाद्यांची पद्धत आहे. आधुनिक चिकित्सकांनी सुचविलेल्या सर्व चाचण्या धावत जाऊन करून घ्यायच्या, एवढेच व्हे तर आणखी करण्यासाठी गळ घालायची पण गोडवे मात्र जुन्या वैद्याच्या नाडीपरीक्षेचे’ गायचे अशी रीत जुन्याच्या अभिमान्यांची असते. डॉक्टरांकडून आजार बरे करून घ्यायचे पण श्रेय मात्र नवसाला पावलेल्या (?) देवाला किंवा केलेल्या ग्रहशांतीला द्यायचे त्यांचा खाक्या असतो.
अशा विसंगतींचे मूळ विवेकाच्या संपूर्ण अभावामध्ये सापडते. विवेकाची जर कास धरली, तर निखळ असा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणतो व हया विसगती आपल्या आपल्यालाच हास्यास्पद वाटू लागतात. पण हा दृष्टिकोन समाजाला लाभणे मात्र महत्त्वाचे आहे. अनेक बुद्धिप्रामाण्यवादी ह्यासाठी जिवाचे रान करून झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश लाभो हीच सदिच्छा. पण ही इच्छा फळणे वाटते तेवढे सोपे नाही. कारण, एखाद्याची मूळची दृष्टी चांगली असेल व तिच्यात काही दोष निर्माण झाला असेल तर त्यावर उपचार करता योतात. परंतु कितीही मोठा नेत्रविशारद असला तरी तो जन्मांधाला दृष्टी देऊ शकत नाही.
bhalchandra.kalikar@gmail.com