अतुल पेठे हे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, संयोजक अशा विविध अंगाने तीस वर्षांहून अधिक काळ नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. एक गंभीर, प्रयोगशील रंगकर्मी असा त्यांचा सार्थ लौकीक आहे. ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, भाषणे आणि त्यांच्या मुलाखती यांचे संकलन आहे. एका विचारी रंगकर्मीच्या धारणा, चिंतन, त्याच्या प्रवासात या सगळ्यात होत गेलेले बदल, त्याला आलेले अनुभव, यावर पुस्तकातून स्पष्ट प्रकाश पडतो. वेगळ्या वाटेवरच्या नाटकाचे अर्थकारण काय याची कल्पना येते आणि अनपेक्षिपणे ग्रामीण दारिद्र्यायाबाबत चटका लावणारे वाचायला मिळते. हा लेख अतिशय अस्वस्थ करणारा आहे, त्याविषयी पुढे.
आतला आवाज या पहिल्याच लेखात अतुल पेठे यांनी म्हटले आहे, मी समाजवादी किंवा डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता नाही, पण जी नाटके केली त्यामागे निश्चितच काही हेतू होते आणि ती नाटकं करताना अनेक विचारधारा समजून घेतल्या. घाशीराम कोतवाल, महानिर्वाण करताना ब्राम्हण्य, हिंदू धर्म, हुकूमशाही या विषयांबाबत जाण निर्माण झाली. सूर्य पाहिलेला माणूस आणि आनंदओवरी करताना सत्य, सदाचरण, सविनय कायदेभंग यावर विचार केला. इतर काही नाटकं करताना गुंतागुंतीची सामाजिक परिस्थिती मनात होती. यातच त्यांनी एक सुंदर भाष्य केले आहे, जग उमजणे म्हणजे आपल्यालाच आपण किती मूर्ख व अडाणी आहोत ते कळत जाणे. पेठेंनी सुरवातीच्या काळात गोदो केले. चेस नावाची रॅगिंगवरची एकांकिका केली. क्षितिज नावाची एकांकिका त्यांनी लिहिली आणि केली त्याविषयी ते लिहितात, हे नाटक व्यक्तिगत अनुभवांवर होते, त्यात रागाचे, भितीचे, न्यूनगंडाचे आणि दु:खाचे भयप्रद दर्शन होते. ते नाटक मध्यमवर्गीय संकुचित मूल्यव्यस्थेत होणार्या: घुसमटीविषयी होते. श्याम मनोहर यांच्या शीतयुध्द सदानंद या कादंबरीचे पेठेंनी नाट्यरुपांतर केले. त्याचे त्यांनी प्रथम १९८९ साली प्रयोग केले नंतर पुन्हा १९९२ साली केले. दरम्यान या तीन वर्षात राजकीय, सामाजिक परिस्थिती बदललेली होती. बाबरी मशीद पाडली गेली, राजकारणात दादागिरी वाढली. पेठे लिहितात, मध्यमवर्ग आणि गुंडगिरी असले भयानक मिश्रण होण्याची ती सुरवात होती. त्यामुळे १९८९चा प्रयोग हा मध्यमवर्गीय इनोसन्स दाखवणारा होता तर १९९२चा व्हॉयोलन्स दाखवणारा. प्रायोगिक नाटक म्हणजे काय यावर अधूनमधून चर्चा होत असते. त्याबाबत पेठे लिहितात, जगण्यातले अत्यंत गुंतागुंतीचे, व्यामिश्र आणि मूलभूत प्रश्न समजावून घेणे म्हणजे प्रायोगिक नाटक होय.
पुस्तकाचे सहा विभाग आहेत. त्यातील पहिल्याच विभागात मी केलेले प्रयोग हा लेख आहे. त्यात त्यांनी जी नाटके केली, माहितीपट बनवले, कोसलाचे आकाशवाणीवर वाचन केले या सर्वांचा उहापोह केला आहे. उजळल्या दिशा हे डॉ.सदानंद मोरेंचे दलित चळवळीचा वेध घेणारे नाटक त्यांनी केले. या व त्याआधी ‘प्रेमाची गोष्ट? ’ या नाटकाचे प्रयोगही ते करु शकले. दिग्दर्शकाचे ‘जॉब प्रोफाईल’ काय असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतो. पेठेंनी त्याचे सविस्तर उत्तर दिले आहे. त्यांनी खुलेपणाने म्हटले आहे की, नाटक करताना अनेक बाजूनी व सखोल विचार केलेला असला तरी न कळलेल्या काही बाजू उरतातच आणि प्रयोगानंतर नाटकावर जी चर्चा होते त्यातून स्वत:ला न कळलेले राजकारण समोर येते. चेस, क्षितिज अशी व्यक्तिगत अनुभवावरंची नाटके त्यांनी सुरवातीला केली, तेच तीस वर्षात बदल होत नंतर त्यांनी दलपतसिंग येती गावा, सत्यशोधक अशी सामाजिक विषयांवरची नाटके केली. व्यक्तीकडून समष्टीकडे असा त्यांचा प्रवास झाला. त्यातही समाजाला पुढे नेणारे विचार देणारी आणि शोषितवर्गांची नाटके त्यांनी केली. इतकेच नाही तर नेहमीचे कलाकार न घेता सफाई कामगार, शेतकरी या वर्गातील व्यक्तींना बरोबर घेऊन, त्यांच्या कार्यशाळा घेऊन ही नाटके केली.
राजकुमार तांगडे व संभाजी तांगडे हे जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ या गावाचे नाट्यकर्मी. त्यांच्या आग्रहावरुन अतुल पेठे हे नवे नाटक करण्याकरिता जांबसमर्थला गेले. तिथलेच नाट्यप्रेमी लोक घ्यायचे, त्यांच्या समवेत कार्यशाळा घ्यायची व नाटक करायचे अशी कल्पना होती. ग्रामीण दारिद्र्य याची सर्वानाच थोडीफार कल्पना असते, तशी पेठेंनाही होती, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर परिस्थिती किती भीषण आहे ते त्यांना कळले. वाचतानाही आपली तीच स्थिती असते. रोजच्या जेवणाची गोष्ट घ्या. पूर्ण जेवण बहुसंख्य घरात नसतेच. भाकरी आणि चटणी किंवा भाजी इतकाच आहार. बाहेरचा एक माणूस येऊन जेवणार म्हणजे त्या घरावर ताण. घरातील चुली आणि त्यांचा धूर पाहून पेठेंना या बायका किती धूर फुफुस्सात शोषत असतील या विचाराने खूप त्रास झाला. संडासासारखी प्राथमिक आणि आवश्यक गोष्टही गावात नाही. प्यायला पाणी मिळतं ते जड आणि वाईट. रात्री कधीतरी वीज आल्यावर पहाटे पाचपर्यंत शेतावर पाणी द्यायला जायचं. शहरातील माणसाची राजकारण आणि राजकीय व्यक्ती यांच्याशी संपूर्ण फारकत असते. गावात मात्र दैंनदिन जगण्यात राजकारण मिसळलेले असते. ऊस विकला जावा असे वाटत असेल तर गाव पुढार्यांेच्या सभांना जावचं लागतं, परिसरातल्या नव्या सरंजामदाराला शरण जावंच लागतं. नाटकात काम करण्यासाठी ते गावातीलच मुलींचा शोध घेत होते. मुलींबाबत तर शंभर वर्षांपूर्वीची परिस्थिती आहे असं त्यांच्या लक्षात आलं. हुंडा द्यावा लागतो, त्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. गावात बुवाबाजी आहे, जातीपातीचे प्रश्न आहेत. जगण्याचे प्रश्न असे भीषण आणि काय नाटक करणार? या सगळ्याचा पेठेंना भयंकर भावनिक – मानसिक त्रास झाला. इतकी हलाखीची स्थिती बघून त्यांना कळेना आपण तिथे कशासाठी गेलो आहोत, नाटक करण्यासाठी की समाज बदलण्यासाठी? या त्रासातून मार्ग काढत, कार्यशाळा घेत त्यातून दलपतसिंग येती गावा हे नाटक आकाराला आलं. एलकुंचवारांच्या पार्टी नाटकातील एक पात्र म्हणते, चांगले लिहिण्यासाठी लेखकाच्या मनात करुणा हवी म्हटले जाते, पण ही करुणा जर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाली तर तो कलावंत केवळ कलाकृतीपुरता मर्यादीत कसा राहील? पेठेंचा त्रास बघून त्याचे प्रत्यंतर येते.
सत्यशोधक हे नाटककार गो.पू.देशपांडे यांचे जोतिबांच्या जीवनावरील नाटक. पुणे मनपांच्या कामगारांना – सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन अतुल पेठे यांनी हे केले. ते बघणे हा एक सुंदर अनुभव आहे. त्याआधी त्यांनी त्यांच्याबरोबरच कचरा-कोंडी हा माहितीपट केला होता, त्यातून नाटक करण्याची कल्पना पुढे आली. इथेही कामगारांना घेऊन जेव्हा ते नाटक बसवायला लागले तेव्हाही अस्वस्थ करणारा अनुभव त्यांना आला. ते लिहितात, गरिबीचे अनेक स्तर असतात याची जाणीव झाली, एका जागी बसणं, काही वेळ नीटपणे ऐकणं, त्यावर विचार करणं, ते लक्षात ठेवणं हे या कामगारांना शक्यच होत नाही. ‘आत्ता आणि इथं’ एवढ्यापुरतंच जगणं होऊन जातं. पेठे म्हणतात, दारिद्र्य म्हणजे आर्थिक कमतरता यावरच लक्ष असतं, पण पैशाच्या अभावी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक या सगळ्याबाबतीच दारिद्र्य असते हे आपण लक्षात घेत नाही. या सगळ्यांशी मुकाबला करत हे इतके प्रभावी नाटक तयार झाले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अतुल पेठे यांचे जवळचे संबंध होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर पेठेंनी अंनिसच्या कार्यकर्त्यांबरोबर कार्यशाळा घेतल्या आणि रिंगण हे पथनाटक सादर केले, त्याचा वृत्तांत पुस्तकात सविस्तर आलेला आहे.
अतुल पेठेंना ही नाटके आणि त्याचे प्रयोग करताना आर्थिक बाजूही बारकाईने लक्ष देऊन सांभाळावी लागली. काही वाईट अनुभव आले तसेच चांगले अनुभवही आले. अनेकांनी स्वत:हून मदत केली. तरिही आर्थिक जमवाजमव करण्याचा ताणही त्यांना सोसावा लागलाच, केवळ नाटक ऊभे करताना नाही तर प्रत्येक प्रयोगाच्यावेळी आर्थिक प्रश्न असायचाच. कलाकार नसलेल्या लोकांना घेऊन, जीवतोड मेहनत करुन ते चांगली नाटके देतात. निदान त्यांना आर्थिक बाबतीत तरी ताण येणार नाही यसाठी समाजानेच पुढे यावे ही अपेक्षा.
नाटकवाल्याचे प्रयोग
अतुल पेठे ,
मनोविकास प्रकाशन,
पृष्ठे २१६, मूल्य रू.२२०/-
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सौजन्याने
kuluday@rediffmail.com