कर्मकांड, बुवाबाजी, देवदेवस्कीच्या अंधश्रद्धांत सर्वाधिक बळी जाते ती स्त्री. मात्र समाज व्यवस्थेने-कुटुंबाने लादलेलं परंपरेचं जोखड स्त्रिया आता झुगारून देत आहेत. सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक पेचामध्ये अडकलेल्या अनेकजणी अंधश्रद्धेची ही पाचर मोकळी करू पाहत आहेत… बदलाची नांदी सुरू झालीय!
‘बयो हाती घे आता शब्दविचारांची पाटी,
सवाष्णेसंग आता भर एकल्या सखीचीबी ओटी…’
चंद्रपूरच्या ताराबाई आपल्या पहाडी आवाजात नवरा गेलेल्या बाईलाही मान द्यायला सांगतात. भाकरी थापणाऱ्या हातामध्ये पाटी-पुस्तक-अक्षर घ्या, असं मधाळपणे समजावतात. तेव्हा समोर जमलेल्या वस्त्यांमधल्या, पाड्यांमधल्या बायांमध्ये दबकी खुसफूस होते. पोरी-बाया एकमेकींना कोपरानं ढोसतात. ‘काय बी सांगते म्हातारी’, म्हणत पोरीबाळींच्या त्या गर्दीतून एकदोन फटकळ प्रश्न बाईंवर येऊन आदळतात. पण ताराबाई बधत नाहीत. गाणीगोष्टी सांगून माहौल थोडा हलका करतात, नेटाने पुढचा ‘डोस ‘गळी उतरवतात…
बयो, समजून घे की आता कावळा शिवायाची गोष्ट..
त्या दिवसांत नाही तु वंगाळ, ना तुवा देवराया कोपिष्ट…
गर्दीमध्ये आता थोडी चहलपहल… कुजबुज. बाईंनी विचारलेला ‘त्या’ दिवसातला हा प्रश्न तिथल्या प्रत्येकीच्या जिव्हाळ्याचा. आस्थेचा. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या डबक्यात हजारदा बुडवून काढणारा. त्या दिवसातही बाया पवित्र असतात, असं सांगतेय ताराबाई. गर्दीतल्या पोरीबाळी-बाया एकमेकींकडे सूचक पाहतात. हीच का ती ताराबाई सुनेला ‘त्या’ दिवसात वेगळं बसवणारी? पाचव्या दिवसानंतर अंगारे-धुपारे करून घर शुद्ध करून घेणारी! ‘होय तीच मी ताराबाई’, बाई तीरासारखं उत्तर देतात. ताराबाई साठीच्या. जळगावमध्ये जन्मलेल्या. आठ बहिणींमध्ये सगळ्यात थोरल्या. आई गेल्यानंतर या बहिणींची जबाबदारी पेलणाऱ्या ताराबाईने बाहेरच्या दिवसांत बाजूला बसण्याचा रिवाज घरादारातल्या प्रत्येक मुलीसुनांना अट्टहासाने, जाचाने पाळायला लावला. तिची चार बुकं शिकलेली सूनही ‘त्या’ दिवसांतल्या वेगळं राहण्याच्या, शिवाशिवीच्या जाचातून सुटली नाही. मात्र फारशी लिखापढी माहीत नसली, तरी व्यवहारचातुर्य असलेल्या ताराबाईला नव्या सुनेनं ‘त्या’ दिवसांतलं खरं शास्त्रकारण पटवून दिलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमामध्ये सुनेनं ताराबाईंना नेलं अन् साठीच्या ताराबाईने नाठी बुद्धी सोडून दिली. वयात आलेल्या, उमलणाऱ्या मुलींना ‘त्या’ पाच दिवसांतला डोळस उत्सव समजावून सांगण्यासाठी ताराबाई गावोगावी जाऊ लागली…सॅनेटरी नॅपकिन्स बनवण्याचा लघुउद्योग गावात यायला हवा, म्हणून बाईंनी गावागावात जाऊन जुने कपडे गोळा करण्याचं व्रत घेतलं. विवेकी बदलाची एक नवी झळाळी घेऊन ती तरुणींशी संवाद साधू लागली…
मुंबईत कुर्ल्याला पांढरीबाबाचा दरबार भरायचा. त्या दरबाराला शालिनीताई आणि त्यांची अठ्ठावीस वर्षाची लग्नाळू पोरगी जायची. बाबाने पोरीचं लग्न होईल, असं सांगून होमहवन करायला लावले, पशुबळी द्यायला लावले. सोन्याच्या काही गोष्टी भेट म्हणून मागितल्या. लग्नाळू पोरीसकट शालिनीने या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. दोन वर्षं झाली तरी स्थळ काही येत नव्हतं. मुलीला एक दिवस मठीवरच ठेवून जा, काम शंभर टक्के होईल, असं बाबाने सांगितल्यावर शालिनी सावध झाली. तिने पोलिसांची मदत घेऊन या बाबाची पोल खोलली. असलेलं नसलेलं गहाण टाकून विकून शालिनीने या बाबाकडे तीनेक लाख रुपये घालवले होते. आज हीच शालिनी पाटील शहरातल्या कष्टकरी वस्त्यांमधल्या स्त्रियांच्या, मुलींच्या मदतीला धावून जाते, बाबाबुवापासून दूर राहा, कष्टाची भाजीभाकरी कमावून खा, आयुष्याला निधडेपणाने भिडा, असं ठासून सांगते.
याच शहरात मुंबईतल्या रस्त्यावर राहणाऱ्या पारधी समाजातील कुटुंबामध्ये काम करणारी रजनी गोलानी. सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या सामाजिक संशोधन विभागामध्ये ही बाई काम करते. जेमतेम दहावी शिकलीय. मुलींनी शिकून काय करायचं, मुलगी जास्त शिकली की समाजाची प्रगती थांबलीच, या तिच्या समाजातल्या बुरसटलेल्या विचारामुळे तिच्या शिकण्याला पाचर बसली. पण शिक्षणानेच समाजाचा विकास होतो, हे सूत्र घेऊन ती आज मुंबईतल्या पारधी समाजातल्या कुटुंबामध्ये हिरीरिने काम करते. रस्त्यावर राहणाऱ्या या कुटुंबामध्ये प्रत्येकाला सातआठ मुलं. मुलं म्हणजे देवीची देन, ती नाकारायची नाही, असा प्रघातच. मुंबईतल्या पारधी समाजातल्या कुटुंबातल्या महिलांमधल्या आरोग्याशी निगडित असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ती आता हिरीरिने काम करते. खरंतर मूल होऊ देणं हा कुटुंब वाढवण्यासाठीचा स्त्री-पुरुषाने घेतलेला एकत्रित निर्णय. त्यात देवीची देन कशी भाऊ? असं रजनी गोलानी पारधी समाजातल्या कुटुंबाना विचारते. त्याच्या बदल्यात तिच्या तोंडावर कधी गटारातलं पाणी फेकलं जातं, तर कधी तिला मारही पडतो. तरीही पारधी समाजातल्या अनेकींना ती नायर हॅास्पिटलमध्ये घेऊन जाते. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचं महत्त्व समजावून देण्यासाठी क्टरांकडून समुपदेशनही करते. भटक्या विमुक्त समाजातल्या मुलींच्या शिक्षणासाठी धडपडतेही. या बेघर कुटुंबासोबत शिक्षणाचा वसा पुढे नेण्याचं विधायक काम करून रजनी शिक्षण सोडण्याची केलेली चूक दुरुस्त करतेय.
कराडला राहणारी बाली. लांबसडक केसांची. कामाच्या रेट्यामध्ये केसांना तेलपाणी विसरून गेलेली. केसांमधल्या गुंत्याचा गठ्ठा झाला, त्यात बुरशी वाढत गेली. बालीच्या केसांमधल्या या धुळ-कचऱ्याच्या गठ्ठ्यांमध्ये तिच्या सासूलाच कधीतरी जट सापडली. तिनेच गावात बोंब ठोकली- बाली जटावाली देवी झाली. तो सतराएक किलोचा केसांचा गठ्ठा पाठीवर वाहून बालीची मान ओझ्याने दबून गेली. ती डुगडुगत राहायची. डोळे गरगर फिरत राहायचे. काटकुळ्या बालीला डोक्यावरचं हे ओझं कसं उतरवायचं ठाऊक नव्हतं. पुढे लोकांची गर्दी वाढली, दर्शनाला लोक आले की बाली घुमायला लागायची, भलत्याच भाषेत बोलायची, पुन्हा शुद्धीवर आली की गपगार पडून राहायची. लोक म्हणायचे, बालीमध्ये देवीचं अधिष्ठान आहे. बालीलाही ते खरं वाटायचं, ती लोकांना उपदेश करायची, अंगारे धुपारे द्यायची. पुढं कराडच्या एन. एम. रॅाय औपचारिक शिक्षणसंस्थेच्या व संशोधनकेंद्रातल्या लोकांच्या मदतीने बालीच्या जटा खाली उतरवण्यात आल्या. ती माणसात आली. आता जटेच्या ओझ्याखाली गुदमरून दबून गेलेल्या तिच्यासारख्याच अनेकींना ती आज समजावून सांगते- ‘केसांचा गुंता काढा, मनाचा गुंता काढा. जट काढली म्हंजे ना देवीचा कोप होत, ना कुणाचे हात झडत. झालंच तर परत एकदा स्वतःच्या नजरेला नजर भिडवून उभं राहता येतं.’
अंधश्रद्धेच्या गुंत्यातून मोकळ्या होणाऱ्या ताराबाई, शालनाताई, बालीसारख्या अनेकजणी आता पुढे येऊ लागल्या आहेत. मोकळेपणाने व्यक्त होऊ लागल्या आहेत. कधी ‘अंनिस’सारख्या चळवळीचा हात धरून त्या पुढे येतात, मोकळेपणाने व्यक्त होतात. तर कधी, कौमार्याची परीक्षा द्यायला लावणाऱ्या कंजारभाट समाजातल्या तरुण मुली ‘सखी’च्या माध्यमातून अकरा रुपयांत लग्न करण्याची योजना यशस्वी व्हावी म्हणून धडपडत आहेत. वैदु विकास समाज समितीमधल्या मुलीही मुंबईतल्या प्रत्येक वस्त्यांमध्ये, अंधश्रद्धा तोडून समाजाला विकासाकडे नेणारे कार्यकर्ते तयार करण्याच्या कामाला जुंपल्या आहेत. वर्षोनुवर्ष अंधश्रद्धेच्या वाहक म्हणून काम करणाऱ्या या स्त्रियांना यापूर्वी या अंधश्रद्धा म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असेलल्या श्रद्धाच वाटत होत्या! अंधश्रद्धेला उत्तेजन देणारी ही व्यवस्था आपलं शोषण करतेय हे अनेकींना कधी जाणवलंही नाही.
लग्न होऊन सासरी गेल्यानंतर घरात एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याचं खापर पांढऱ्या पायाची मानून नव्या नवरीवर फोडलं गेलं, तेही त्यांनी गुमान स्वीकारलं. मात्र पांढऱ्या पायांच्या पुरुषाचा शोध घेण्याची सोय तिला व्यवस्थेने ठेवली नव्हती. आयुष्यावर लादलेलं अंधश्रद्धेचं हे जोखड मुळात निर्माण कुठून झालं, याचा शोध घेण्याइतकी उसंतही स्त्रियांना व्यवस्थेने दिली नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या झगड्यामध्ये अडकलेल्यांना विचारांचा कौल मान्य असतो, पण आचारांमध्ये तो उमटत नाही. अंधश्रद्धाळू बनलेल्या स्त्रियांमधील अगतिकता ही कुटुंबाने, समाजाने लादलेल्या वर्चस्ववादामध्येच असते. परिणामी कित्येक जणी आपलं शोषण म्हणजे जनरीतच असल्याचं धरुन चालतात.
वैद्यकीय संशोधन सांगतं की, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगतात. कुठल्याही वयात गंभीर आजारानं मरण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. मात्र गंभीर नसणारे परंतु सतत आजारी पाडणारे घटक स्त्रियांना सतत कुठल्या ना कुठल्या शारीरिक आणि मानसिक तक्रारींमध्ये अडकवत असतात. याचं कारण म्हणजे त्यांच्या मेंदूतल्या आणि शरीरातल्या हॉर्मोन्समध्ये सतत होणारे चढ-उतार. मासिक पाळी येताना, ती आल्यानंतर प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी, गरोदरपणात, प्रसूतीत, गर्भपात करण्याची वेळ आल्यास, कुटुंबनियोजनाच्या किंवा गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर आणि पाळी जाताना स्त्रियांमध्ये शारीरिक तक्रारींबरोबरच मानसिक तक्रारी निर्माण होत असतात. पर्यायाने अस्वस्थता, बेचैनी, उदासपणा, चिडचिडेपणा येतो; गैरसमजाची किंवा संशयाची भावना निर्माण होऊ शकते. अशा वेळी तीव्र नैराश्य, आत्महत्येच्या प्रवृत्तीदेखील स्त्रियांमध्ये असतात, त्यातून सुटण्यासाठी अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटल्या जाणाऱ्या स्त्रियांची संख्या वेगाने वाढते आहे. सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेने लादलेली असहाय्यता सहन करणाऱ्या अनेक स्त्रिया पूर्वी या मानसिक आजारपणामध्ये अंगारे-धुपाऱ्यांचा इलाज करत संसार रेटत होत्या. स्वतःच्या मानसिक, शारीरिक आणि कौंटुबिक समस्या कर्मकांड, अंधश्रद्धा जोपासून सोडवू पाहत होत्या. मात्र देव-धुपारे, अंगात येणं हे थोतांड नसून ही मानसिक तणावाचा निचरा करण्यासाठीची स्वसंमोहन अवस्था असते, हे शास्त्रकारण आता स्वीकारलं जात आहे. तासन् तास घुमणं, शारीरिक वेदना न जाणवणं, अनोळखी भाषा बोलणं, याचा संबध मेंदूतील रासायनिक स्रावाची कमतरता, असह्य मानसिक ताणामधून निर्माण झालेल्या आजाराशी असतो, हे स्वीकारण्याचं धाडस आता ग्रामीण स्त्रियांमध्येही येऊ लागलं आहे. जातपंचायतीमध्ये स्त्रीच्या लैंगिक वर्तनावर ठेवलेले कडक निर्बंध झुगारून पंचांची मक्तेदारी मोडणाऱ्या स्त्रिया आता कुटुंब, संसाराच्या उद्धारासाठी जोपासलेल्या कर्मकांडांना, अंधश्रद्धांनाही फाटा देत असल्याचं निरीक्षण प्रबोधन चळवळीमधील कार्यकर्ते आता आवर्जून नोंदवतात.
आपल्या मानसिक-शारीरिक समस्यांविषयी व्यक्त व्हायला हवं, बोलायला हवं, त्यातून मार्ग काढायला हवा, म्हणणारी स्त्री आज या झगड्यात स्वतःला शोधू पाहतेय. व्यवस्था, जातींतून निर्माण झालेल्या अंधश्रद्धांची ओझी स्वतःच्या मुलीवर लादली जाऊ नयेत, यासाठी दक्ष राहणाऱ्या महिलांची संख्याही वाढते आहे. गावागावांमध्ये होणाऱ्या सोप्या विज्ञानवादी कार्यक्रमांमधून ग्रामीण भागातील स्त्रियांसह वयात येणाऱ्या मुलींचा सहभागही आश्वासक आहे. हा संघर्ष तितका सोपा नाहीये. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये असुरक्षित वातावरणातल्या, सामाजिक आर्थिक विवंचनेमध्ये असलेल्या स्त्रिया ही तारेवरची कसरत पार पाडत आहेत. स्त्रियांना नवं आत्मभान देणारा हा संघर्ष आहे. अर्थात त्याला असलेली विरोधाची धारही तितकीच तीव्र आहे. त्यातून पुढे जात अंधश्रद्धमुक्त स्त्री कोणती समाजव्यवस्था आणते, याकडेही हजार नजरा रोखलेल्या आहेत, हेही आपण ध्यानात ठेवायलाच हवं!
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सौजन्याने