अ. भा. प्रस्थापित मराठी साहित्य संमेलन घुमान येथे नामदेव नगरीत यथासांग पार पडले. घुमान (पंजाब) येथे एकही मराठी माणूस नसताना तेथे संमेलन घेण्याचा घाट का घातला गेला हे आम्हाला सुरवातीला कळलेच नव्हते. मराठी प्रकाशक खूपच नाराज झाले होते. कारण अशा संमेलनातच त्यांच्या पुस्तकांची विक्री मोठया प्रमाणावर होते. त्यांनी सुरूवातीला या संमेलनावर बहिष्कार घातला.
पुढे असे समजले की, कोणातरी बडया ठेकेदाराला घुमान हे तीर्थक्षेत्र बनवायचे आहे त्यासाठी मराठी साहित्य संमेलनाचा इव्हेंट गरजेचा होता. आजवरचा अनुभव पाहाता एकवेळ बडे साहित्यिक संमेलनाकडे फिरकले नाहीत तरी चालेल पण ठेकेदारांनी पाठ फिरविली तर मात्र मग सगळेच पानिपत होईल. तर `नाव नामदेवाचे आणि काम ठेकेदाराचे’ अशी एकंदरीत परिस्थिती आहे. नाहीतर आमच्या प्रस्थापित साहित्यिकांना आणि त्यांच्या संस्थांना अचानक हा नामदेव कसा आठवला असता, ज्यांच्या ओठी आणि पोटी कायम रामदास राहिलेला आहे, त्यांना आमच्या नाम्याची आठवण अशी अचानक कशी आली असती? एकदा आर्थिक पाया मिळाला की इमारत आपसुकच उभी राहाते. मग आनंद सोहळा उभारायला असा कितीसा वेळ लागतो? पेशवाईपासूनची ती परंपरा आहे. एकदा घुमान मान्य झाले की मग नामदेवांची न कळलेली महतीही कळू लागते.
संत नामदेव वारकरी पंथाचे संस्थापक, पंजाबमध्ये ते अठरा वर्षे राहीले, पंजाबी शिकले, पंजाबीत अभंग रचले, त्यांची ऐंशी पदे गुरू ग्रंथसाहिब या शिखांच्या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत अशी माहिती मिळू लागली. तर एकंदर संत नामदेवांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या घुमानमध्ये साहित्य संमेलन भरविणे म्हणजे मराठी अस्मितेचा जागर करणे वगेरे आलेच, शिवाय या संमेलनाला अध्यक्ष लाभले थेट संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज असलेले – डॉ. सदानंद मोरे. पण केवळ वंशज म्हणून त्यांची मातब्बरी नाही. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. शिवाय पुरोगामी विचारवंत वगेरेही आहेत, म्हणजे केवळ ह.भ.प.च नाहीत. आम्हाला खरेतर त्यांच्याच भाषणाची उत्सुकता होती की हा बुवा, आपला माणूस. तेव्हा, तो महाराष्ट्राची आणि एकंदरीतच देशाची आंधळ्या शतकाकडे चाललेली वाटचाल पाहाता काय मांडणी करेल? तुकारामाचे वंशज म्हणून, `मन केले सत्य असत्याशी ग्वाही मानियेले नाही बहुमता ‘ अशी परखड मांडणी करेल काय? अशी उत्सुकता होती. पण बार फुसकाच निघाला. एखादा फटाका पेटतो, पेटतो असे वाटते पण अचानक फुस्स होतो तसे त्यांचे भाषण झाले. बाराव्य-तेराव्या शतकातील महानुभावांपासून सुरूवात करून सोळाव्या शतकापर्यंत म्हणजे संतश्रेष्ठ तुकोबा आणि त्यांचे शिष्य निळोबा यांच्या पर्यंत ते नीट आले पण पुढे शेळपटले. त्यांच्या भाषणाची उपलब्धी इतकीच की संत साहित्य हे मराठीतील मुख्य प्रवाहातील साहित्य असून आणि त्याची नाळ त्यांनी नेमाडे, चित्रे, कोलटकर, बाबुराव बागूल, नामदेव ढसाळ यांच्या पर्यंत जोडली. बाकी सगळा आनंदी आनंदच. त्यात जाती व्यवस्था समर्थकांचे नवे ह. भ. प. भालचंद्र नेमाडे यांना त्यांनी वरील पंक्तीत कसे बसवले हे समजले नाही.
प्रस्थापित मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांच्या भविष्याची काही चिंता व्यक्त होईल अशी परिस्थिती आजवर कधीच नव्हती. त्यामुळे या संमेलनात ती असेल अशी अपेक्षा बाळगण्यात काहीच अर्थ नव्हता. शिवाय खुद्द अध्यक्षांनीच आपल्या अध्यक्षीय भाषणात हा मराठी साहित्याचा `आनंद उत्सवच’ आहे असे म्हटल्यावर `खाओ, पिओ, पर्यटन करो’ अशा आनंदाला उधाण येणारच. तसे ते आलेच. या संमेलनात काय काय पदार्थ खायला मिळणार याची वार्ता वर्तमान पत्रांनी चवीने छापली होती. म्हणजे मराठी साहित्याबद्दल चर्चा काय होणार याला काहीही महत्व नव्हते. तर काय काय खायला मिळणार याची मात्र जंत्री दिली होती. यावरून या साहित्य संमेलनाचे गांभीर्य कळून येते. संत नामदेवांबद्दल जर एव्हढा कळवळा असेल तर त्यांचे कार्य तरी गंभीरपणे पुढे आणले पाहिजे पण तिथेही आनंदी आनंदच. संत नामदेव हे वारकरी पंथाचे संस्थापक होते आणि गुरूनानक यांच्या प्रमाणेच जे सनातन वैदीक धर्माच्या कर्मकांडांच्या, जाती व्यवस्था समर्थनाच्या विरोधात होते. म्हणूनच त्यांची पदे गुरू ग्रंथसाहिबा या शीख धर्मग्रंथात समाविष्ट केली आहेत. एका विठ्ठल भक्ती खेरीज ते बाकी सर्व गोष्टी झूठ मानीत होते. पुढे त्यांच्या परम शिष्याने म्हणजे संत श्रेष्ठ तुकारामांनी, `तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ असे जे म्हंटले ते संत नामदेवांच्याच उपदेशाचे सार आहे. वारकरी पंथात वेद वैगेरे वैदीक धर्माचे लचांड घुसवण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले. तर ते असो. आपला मुख्य मुद्दा हा की नामदेव हे जातीभेद विरोधी, सामाजिक समतेचा आग्रह धरणारे होते, त्यामुळेच त्यांची पदे गुरू ग्रंथसाहिबा मध्ये समाविष्ट केली आहेत. नामदेवांचा तोच वारसा आहे. याकडे दुर्लक्ष करून केवळ संत नामदेवांचे वरपांगी भजन करण्यात काय अर्थ आहे. अर्थात प्रत्येक गोष्ट आपल्या सोयीप्रमाणे, फायद्याप्रमाणे वापरण्याची प्रस्थापित संस्कृतीची परंपराच आहे. अगदी देव न मानणाऱ्या बुध्दालाही नववा अवतार करून बुध्दाचे कार्य विकृत करण्याचा प्रयत्न सनातन प्रस्थापित संस्कृतीने केलाच आहे. आणि जे पचवता येत नाहीत त्यांचे सरळ खून पाडणे, जी परंपरा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरेंपर्यंत पोहोचली आहे.
अखिल भारतीय प्रस्थापित मराठी साहित्य संमेलने ही कधीच अखिल मराठी भाषिकांची आणि मराठी भाषेची प्रतिनिधीत्व करणारी संमेलने नव्हती. न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकाराने भरवलेल्या पहिल्या ग्रंथकार सभेपासून ही परंपरा राहिली आहे. म. फुले यांनी ग्रंथकार सभेला पत्र लिहून आमच्या शुद्रातीशुद्राना अशा संमेलनात काहीच फायदा नाही असे सांगून मूलभूत प्रश्न उपस्थित केले होते ते आजही कायम आहेत. अखिल भारतीय प्रस्थापित मराठी साहित्य संमेलनात काही फूटाणे, वाटाणे दिसत असले तरी त्यांचे स्वरूप चवीला उपयोगी पडणाऱ्या लोणच्या सारखे आहे. म्हणूनच या संमेलनाच्या विरोधात आजवर दलित साहित्य संमेलने, ग्रामीण, आदिवासी, दलित संमेलने आणि अलीकडे विद्रोही साहित्य संमेलने भरविली गेली, काही आजही भरविली जातात. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने भरविली जाणारी सुरूवातीची विद्रोही साहित्य संमेलने हा एक चांगला प्रयत्न होता. पण त्यात सामील असणाऱ्या गटांनी हळूहळू त्याला ब्राम्हणेतर चळवळीचे स्वरूप द्यायला सुरूवात केली. त्यामुळे विद्रोहीचा मूळ जाती धर्म निरपेक्ष पुरोगामी दृष्टी असणारा मुख्य दृष्टीकोनच बाजूला पडला. शिवाय त्यांच्या अंगी विद्रोह इतका भिनला की पुढे पुढे त्यांनी आपआपसात विद्रोहाचे झेंडे उभारून या संमेलनाची गटबाजी करून टाकली. त्यामुळे त्यांचा प्रभाव पुरता ओसरला.
या बाबतीत अ. भा. मराठी साहित्य संमेलनवाल्यांना मानले पाहिजे. त्यांनी अगदी शांतपणे वर म्हंटल्याप्रमाणे फुटाणे , वाटाणे, कटारे, सटारे बरोबर घेऊन आम्हीच कसे प्रातिनिधीक आहोत हे सांगायला सुरूवात केली. शिवाय विश्व संमेलन भरवून या वाटाण्या, फुटाण्यांसमोर परदेशवारीची आमिषे उभी केली. अर्थात या जाळ्यात वाटाण्या फुटाण्यांबरोबर आमचे काही मातब्बर पुरोगामी साहित्यिकही अडकले आणि बळी ठरले. विद्रोहींनी कायम स्वरूपी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. जो आम्हाला मान्य नाही. कारण यात आम्हीच डावे पुरोगामी कमी पडलो आहोत. आम्हाला सांस्कृतिक पातळीवरचे राजकारण या काळात जमलेले नाही. आम्हाला आजही डावे – पुरोगामी – लोकशाहीवादी सांस्कृतिक पातळीवर व्यासपीठ उभारता आलेले नाही. कुठे अण्णा भाऊंच्या नावाने तर कुठे विद्रोहीच्या नावाने आपआपले ढोल बडविण्याचे काम आम्ही करत राहिलो. आपलीच राजकीय भूमिका (लाईन) साहित्यिकांवर कशी लादता येईल याचा प्रयत्न करीत राहीलो. विद्रोही सांस्कृतीक चळवळीत कार्यरत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच सर्व डाव्या, पुरोगामी, लोकशाहीवादी घटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशकतेची भूमिका घेतली होती. पण त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या गटांच्या दृष्टीने प्रस्थापित आणि ब्राम्हो कम्युनिस्ट होता. त्यांना माकपबद्दल असूया होती. असो. तो आता इतिहास झालेला आहे. हे छोटेखानी गटही आता बरेच शहाणे आणि मवाळ झालेले आहेत. इतिहासापासून धडा घेणे हे सच्च्या मार्क्सवादी लोकांचे वैशिष्टय राहिले आहे. आपल्यासाठी वेळ कधीच गेलेली नसते. उलट आपण असेच दुभंग राहीलो तर अधिक बिकट वेळ आपल्यावर येऊन ठेपेल. नव्हे आज ती आलेलीच आहे. आता शहाणे होऊन वेगवेगळ्या राहुट्या सोडून किमान सांस्कृतिक पातळीवर तरी एक राहुटी उभारायला हवी. ती काळाची गरज आहे.
‘जीवन मार्ग’च्या सौजन्याने
kiranm.subhasht@gmail.com