पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक माणसाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन म्हणजे इहजीवन. एकेका माणसाचं जीवन इथं संपतं, पण अशा संपण्यानं मानवी जीवनाचा प्रवाह संपत नाही. जीवनाची शृंखला कोणत्याच कडीला शेवटची कडी मानत नाही. सतत नवनव्या कड्या उगवत राहतात. त्यामुळं ऐहिक मानवी जीवन कधी विझून जात नाही. जीवनाची वाहिनी कधी आटूनही जात नाही.
माणसाचं इहजीवन हाच इहवादाचा एकमेव विषय आहे. इहजीवनाची उज्ज्वलता हाच त्याचा ध्यास आहे. माणूस हाच जीवनाचा नायक आहे. भोवतीचं मानवी जीवन त्यानंच निर्माण केलं आणि ही अधिकाधिक उज्ज्वल मानवी जीवन निर्माण करण्याची प्रक्रियाही खंडित होणं त्यानं मान्य केलं नाही. त्यामुळं सतत पुढंपुढं जाणाऱ्या आणि गतीनं बोट न सोडणाऱ्या या जीवनाचा महानायकही तोच आहे. सर्वच माणसांच्या जीवनाचा सर्वार्थांनी कर्ता करविता माणूसच आहे. इहवाद हा निरपवादपणानं माणसाला संपूर्ण मानवी प्रतिष्ठा देऊ इच्छिणारा महाप्रकल्प आहे. या संपूर्ण प्रतिष्ठेच्या मार्गात येणाऱ्यांविरुद्धची ती लढाई आहे. माणसाच्या पूर्ण प्रकाशनाला कोणतंही ग्रहण लागू नये हा निर्धार या महाप्रकल्पाचा आहे.
इहवाद हा वैश्विक प्रकल्पच आहे. जगातला प्रत्येक माणूसच त्याचा विषय आहे. जगातल्या प्रत्येक माणसाच्या मेंदूवर किंवा प्रत्येक माणसाच्या आयुष्यावर इहवादाची इच्छा कोरलेली आहे. इहवादाचं भाषांतर सेक्युलॅरिझम असं केलं जातं. पण सेक्युलॅरिझमला सर्वधर्मसमभाव वा धर्मनिरपेक्षतावाद म्हणणं इहवादाला मान्य नाही. कोणत्याही एका धर्माचा मुद्दाच नाही. इहवादाला धर्मसंस्थाच मान्य नाही. त्यामुळं इहवादाला वा सेक्युलॅरिझमला सर्वधर्मसमभाव म्हणणं म्हणजे इहवादाच्या गळ्यात आपल्या मर्यादांचा आणि आपल्या सोयीचा पुष्पहार घालण्यासारखंच ठरतं. धर्मांमध्ये खूप भेद असले आणि त्या भेदांचा परिणाम म्हणून अनंत प्रकारच्या मारामाऱ्या असल्या आणि त्यामुळं प्रत्येकच धर्म दुसऱ्या धर्माला शत्रू मानत असला तरी या सर्वच धर्मांमध्ये एक साम्य मात्र असतंच. माणसाच्या जगण्याचा संकोच करण्याच्या बाबतीत त्यांच्यात समभाव असतो. माणसाच्या अमर्याद माणूसपणाचे छोटे-छोटे तुकडे करण्याच्या संदर्भात, माणसांना छोट्या-छोट्या चौकटींमध्ये डांबण्यात आणि त्या चौकटींचा अहंकार पढवण्यात या धर्मांमध्ये समभाव असतो. माणसाचं माणूसपण पुसून त्याला धर्माची काटेरी अस्मिता देण्याच्या संदर्भात मात्र धर्मांमध्ये समभाव असतो. हा धर्मांमधला समभाव माणसांमध्ये जवळजवळ अभेद्य असा विषमभाव निर्माण करतो आणि इमानेइतबारे त्याचं पोषण करतो.
अनेक अज्ञानपीठांनी बऱ्याच लोकांची मनं गोठवूनच ठेवलेली आहेत. त्यामुळं ज्या चुका उकिरड्यावर शोभल्या असत्या त्या चुकांची आरास अशा लोकांनी आपल्या डोक्यांमध्ये मांडलेली आहे. अनेक अज्ञानपरंपरांनी बऱ्याच लोकांना आपल्या खुंटांना बांधूनच ठेवलेलं आहे. या सर्वच अज्ञानपरंपरा आणि ही सर्व अज्ञानपीठं दुनियेच्या परिवर्तप्रक्रियेच्या मार्गात कायम खलनायकाच्या भूमिका करीत आहेत. या खलनायकांनी नद्यांना धरणांमध्ये अडवावं, त्याप्रमाणं लोकांची मनं धर्म आणि धार्मिक अंधश्रद्धांच्या धरणात बंदिस्त केली आहेत. हे लोक मग परिवर्तनाला गुंगारा देत राहतात. परिवर्तनाला फसवल्याच्या उन्मादात जगण्याची सवय त्यांना लागते. सवयींमुळं चुकाही चिरंतन ठरतात. आधी बौद्धिक अंधता निर्माण करायची आणि असत्याला सत्य म्हणून लोकप्रियता प्राप्त करून द्यायची हेच वर्चस्वमनस्कांचं वा सत्तांधांचं पद्धतीशास्त्र असतं. देवाशिवाय, धर्मांशिवाय, प्रार्थनांशिवाय, स्वर्गाशिवाय, दैववादाशिवाय वा परलोकाशिवाय माणूस जगू शकत नाही काय? या सर्व अंधश्रद्धांच्या यात्रेशिवाय माणूस जीवन व्यतीत करू शकत नाही काय? या सर्व गोष्टी खरं म्हणजे अनंत शक्यतांची सदाफुली असणाऱ्या माणसाचा आणि त्याच्या सदाफुलीपणाचाच संकोच करतात. ही सर्व सामग्री माणसाचं खुरट्या वनस्पतीत रूपांतर करण्याची वा त्याचं बोन्साय करण्याचीच सामग्री आहे.
इहवाद माणसाच्या शक्तीचा, त्याच्या असीम शक्यतांचा वा त्याच्यातील उदंड अशा नैसर्गिक सृजनप्रेरणांचा संकोच मान्य आणि या वाऱ्याला थांबवणारी भिंत इहवादाला अजिबात मान्य नाही. माणूस हा गतीनं मोहोरणारं झाड आहे आणि या मोहोराची अडवणूक करणाऱ्या देव, धर्म, परंपरा, साहित्य, संस्कृती, परलोक, दैववाद अशा सर्वच गोष्टी माणूसद्रोही आहेत आणि संपूर्ण, स्वयंप्रभ, स्वयंशासित आणि स्वयंसर्जक असू इच्छिणाऱ्या माणसानं त्याला त्याचं अनन्य असं माणूसपण हे सुंदर वैशिष्ट्य नाकारणाऱ्या वरीलपैकी कोणतीही गोष्ट जवळपासही फिरकू देऊ नये. या गोष्टी खरं म्हणजे काल्पनिक आहेत, पण माणसाच्या माणूस असण्याचं वास्तवच त्या उद्ध्वस्त करतात. त्याचं उद्ध्वस्तीकरण टाळण्यासाठी माणसानं वरील सर्वच विघातक कल्पनांचं समूळ उद्ध्वस्तीकरण केलं पाहिजे असं इहवादाला वाटतं.
स्वर्ग, परलोक, पूर्वजन्म-पुनर्जन्म, देव, दैववाद या सर्वच गोष्टी काल्पनिक आहेत, पण या काल्पनिक गोष्टी सरंजामशाहीच्या, भांडवलशाहीच्या वा अशा कोणत्याही नावानं वावरणाऱ्या शोषणशाहीच्या पूर्ण हिताच्या असतात. या गोष्टींच्या आधारानंच सर्व शोषणशाह्या गरिबांना गुलाम करीत असतात. आणि वरील सर्वच गोष्टींच्या मदतीनं ते शोषणाचे परमनंट परवाने मिळवीत असतात. इहवाद या सर्व शोषणशाह्या उद्ध्वस्त करू इच्छितो याचं कारण या शोषणशाह्या गरिबांचं शोषण करतात. या शोषणशाह्या गरिबांच्या लक्षात येणार नाही या पद्धतीनं हे शोषण करतात आणि स्वर्ग, परलोक, पूर्व-पुनर्जन्म, देवदैववाद ही या पद्धतीची कलमे-उपकलमे असतात. या शोषणशाह्या म्हणजे त्यांच्या नाड्या ज्यांच्या हातात असतात, ती वर्चस्वमनस्क माणसंच हे शोषण करतात, पण नाव मात्र देव-दैववादाचं पुढं करतात. ते फक्त देव-दैववादाचा त्यांच्या फायद्यासाठी आणि भाबड्या गरिब मंडळींना बिनदिक्कत लुटण्यासाठी धडधडीत उपयोग करून घेत आहेत हे देवाला वा दैवाला कळतच नाही. याचं कारण देव वा दैव कुठं अस्तित्वातच नाही हे आहे. देव-दैव, परलोक या सर्वच गोष्टी आपल्याला लुटण्याची साधनं आहेत हे सर्वच या सज्जन गरिबांना कळावं असं इहवादाला वाटतं.
इहवाद या सज्जन गरिबांना कोणी लुटू नये यासाठी वरील सर्वच शोषणशाह्यांविरुद्ध लढाई करतो आणि या शोषणशाह्या धर्म, देव, दैव या ज्या काल्पनिक साधनांचा उपयोग करतो, त्या सर्व साधनांच्या निर्मूलनाचा निर्धार करतो. वरील सर्वच साधनांचं निर्मूलन करण्याचं ध्येय हे केवळ बौद्धिक खाज खाजविण्यासाठी नाही. हे ध्येय वास्तवांतरासाठी, स्थित्यंतरासाठी वा नव्या शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आहे.
देव-धर्म यांच्याशिवाय माणूस केवळच जगू शकतो असं नाही तर तो अधिकच अर्थपूर्ण पद्धतीनं जगू शकतो. देवविषयक वा परलोकविषयक कल्पनांनी माणसाला कुंडीत बसवलं आहे. त्याच्या संपूर्ण माणूसपणाच्या वाटा त्याच्यासाठी बंद केल्या आहेत. या कल्पनांनी मोहल्ल्या-मोहल्ल्यात भांडणाचे कारखाने काढले ते वेगळेच. या सर्व कल्पनांनी माणसाला जगणंही कठीण केलं आणि स्वतःला निर्माण करण्याचं जे सुख असतं, मानवी प्रतिष्ठेच्या सामग्य्राशी बोलण्यात, त्या सामग्य्राचा सूर्य व्यक्तिमत्त्वात स्थापन करण्यात जे अनिर्वचनीय सुख असतं, त्या सुखाशीही माणसाची गाठ पडू दिली नाही. या सर्व कल्पनांनी साकल्याच्या सागराला पोचण्याआधीच माणसाची नदी मध्येच आटवली.
या कल्पनांनी माणसाला परावलंबी केलं. दुबळं केलं. आणि असं परावलंबन हेच मानवी जीवनाचं सत्य आहे, या खोट्या समजुतीच्या तुरुंगात त्याला कायम कोंडलं. या परावलंबनानं त्याला पुनःपुन्हा उगवण्यासाठी क्षितिजंच ठेवली नाहीत. या क्षितिजविहीनतेनं माणसाला झाडाप्रमाणं सतत तोडलं. या सर्वच कल्पनांनी माणसाला पोपट केलं आणि पिंचऱ्यात डांबलं. या कल्पना सांगतील वा शिकवितील तेव्हढंच माणसानं बोलावं. माणसानं स्वतःचा विचार करू नये. स्वतःच्या अस्तित्व तत्त्वाच्या रचनेचा, पुनर्रचनेचा विचार माणसानं करू नये. स्वतःच्या निखळ मनुष्यमयतेच्या मांडणीचा, फेरमांडणीचा विचार माणसानं करू नये. माणसानं त्याला मारणाऱ्या आणि शोषकांना जगवणाऱ्या कल्पनांना जगवण्याचा विचार तेवढा करावा. माणसानं आणि सज्जन गरिबानं स्वतःच्या उभारणीचा विचार करू नये. त्यानं शोषण जगवावं. अविचार जगवावेत. त्याला लोळवणाऱ्या, त्याला तुडवणाऱ्या वा त्याला मोडीत काढणाऱ्या सर्व गोष्टी त्यानं जगवाव्यात यासाठी वर्चस्वमनस्कांनी अध्यात्माचा, परलोकाचा चकवा निर्माण केला. या गोष्टी त्याला माणूस म्हणून जीवनातून उठवणाऱ्या किंवा जीवनाच्या परिघाबाहेर ढकलणाऱ्या अशा गोष्टी आहेत. परलोकाच्या कल्पनेनं इहलोकाच्या अस्तित्वाला याप्रकारे आग लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न धुमाकूळ घालत राहिला, काही प्रमाणात त्याला यशही मिळत राहिलं, पण त्याला संपूर्ण वा निरपवाद यश कधीच मिळालं नाही. त्याला कारण आहे, जगभरचं इहवादी चिंतन. माणसाचं ऐहिक जीवन, त्याचं इहवादी माणूसपण, त्याची इहवादी ध्येयं, त्याची इहवादी नीती, त्याचं इहवादी साहित्य, त्याचा इहवादी समाज आणि या समाजाचं इहवादी साहित्य या एवढ्याच गोष्टी खऱ्या आहेत. माणसांमधील संबंधाची इहवादी रचना, या संबंधांचं इहवादी व्यवस्थापन तेवढं खरं आहे, अशी इहवादाची भूमिका आहे. सामान्य आणि सज्जन माणसांना वर्चस्वमनस्कांनी भ्रमांच्या महापुरात ढकललं आहे. त्यातून ही माणसं बाहेर येणार नाहीत अशा यंत्रणा हे वर्चस्वमनस्क राबवित असतात. अशा स्थितीत इहवादानं इतिहासभर इहजीवनाच्या विजयाचा, सर्वच माणसांच्या साकल्याचा आणि सर्वच माणसांच्या समान प्रतिष्ठेचा महाप्रकल्प राबवला आहे. त्या प्रकल्पाचं नाव इहवाद आहे. इहवाद ऊर्फ सेक्युलॅरिझम असं या स्वप्नाचं नाव आहे
इहवाद किंवा सेक्युलॅरिझम या महाप्रकल्पाची रचना पूर्णतः विज्ञाननिष्ठेच्या पायावर आणि बुद्धिवादाच्या बेठकीवर झालेली आहे. देव-दैव, परलोक अशा माणसाला विकलांग आणि विकलमन करणाऱ्या गोष्टी माणसाच्या जीवनात शिरणार नाहीत याची योजना इहवाद देतो. कोणत्याही पातळीवर ईश्वर या कल्पनेची गरज उरणार नाही, असं स्वयंप्रभू मानवी मन निर्माण करणारं हे तत्त्वज्ञान आहे. स्वर्गाच्या आणि परलोकाच्या फंदात पडणार नाही असं अभेद्य बुद्धिवादी मानवी मन निर्माण करणारं हे तत्त्वज्ञान आहे.
चुकीचे प्रश्न माणसाला सुचू नयेत. अप्रस्तुताच्या अरण्यात माणसांनी शिरू आणि भरकटू नये. चुकीच्या प्रश्नांचे आजार माणसांनी जीवनावर लादू नयेत. इहजीवनातले प्रश्न आपल्यामुळेच निर्माण होतात. ते प्रश्न परलोकाच्या नादानं सुटणार नाहीत. ईश्वराच्या शोधानं सुटणार नाहीत. या सर्व कल्पना आहेत आणि त्या माणसाच्याच दुबळेपणानं, आळशी वृत्तीनं आणि त्याच्या आयतेपणाच्या लालसेनं निर्माण केलेल्या आहेत. या कल्पनांनी मग माणसालाच दुबळं, विकृत आणि आळशी केलं. आपल्यावरची जबाबदारी एखाद्या कल्पनेवरती ढकलण्याची तरतूद माणसानं केली, पण या तरतुदीनं त्याच्या साहसाभोवती कुंपणं निर्माण केली. माणसांमध्ये स्वतःला अपूर्णांक करण्याची स्पर्धा लागली. एवढे अनर्थ स्वतःचा विचार स्वतःच करण्याची जबाबदारी टाळल्याच्या चुकीमुळे झाले. माणूस स्वतः लुळा झाला आणि त्यानं ईश्वर समर्थ केला. त्यानं दैवाला शक्ती दिली आणि स्वतः शक्तिहीन झाला. आणि या संदर्भांनी निर्माण केलेल्या भांडणांनी माणूस स्वतःलाच पारखा झाला. मग एक सुंदर स्वतंत्रता एक अंकितता झाली. एका प्रवाहाचं आटलेपणात रूपांतर झालं. एक अशरणता शरणागत झाली. एका साहसाचा भुसा झाला. एक बौद्धिक गर्जना मुकी झाली. माणूस नावाचं एक साहस पांगळं झालं.
अप्रस्तुताच्या नादी लागून माणसानं आपल्या शक्तीचा आणि वेळेचा अपार अपव्यय केला. त्यामुळं त्याचं खुद्द स्वतःकडंच दुर्लक्ष झालं. तोच त्याचा विषय असायला हवा होता. त्याचे इहजीवनातले प्रश्नच त्याला खरे प्रश्न वाटायला हवे होते. पण ते प्रश्न त्यानं बाजूला सारले. देव, ईश्वर असं कोणीतरी ते प्रश्न सोडवील या भ्रमात तो राहिला. त्याचे हे प्रश्न सोडवायला कोणी आलं नाही. कोणी येऊच शकत नव्हतं. कारण असं कोणी कुठं अस्तित्वातच नव्हतं आणि प्रश्नांची गर्दी वाढत गेली. एकेक माणूस अनेक प्रश्नांची विधानसभा झाला. त्यामुळं जीवनात माणसांपेक्षा प्रश्नांची संख्या अधिक झाली. कधीतरी ही प्रश्नांची भयावह गर्दी पाहून माणूस भांबावला. खूपदा जीवन म्हणजे भांबावलेल्या माणसांची गर्दी वाटते. कधी त्याच्या चुकीनं निर्माण केलेल्या चुकीच्या प्रश्नांची गर्दी वाटते. या गर्दीत आता माणूस पार दयनीय झालेला आहे. ही इहलोकाकडं पाठ फिरवण्याची शिक्षा आहे.
असं दिसतं, की माणूस जेव्हापासून आपल्या चुकांवर प्रेम करायला लागला तेव्हापासूनच तो स्वतःची हेळसांड करू लागला. तो त्याच्याच विरुद्ध वागायला लागला. तो त्याच्याच विरुद्ध बोलायला लागला आणि स्वतःलाच नाकारायला लागला. माणूस तेव्हापासून मग स्वतःला नाकारण्याची शिक्षा भोगतो आहे. या माणसाला कधीतरी स्वतःतील सूर्य विझविण्याची सवय लागली. या सवयीनंच मग त्याला स्वतःत अंधार निर्माण करण्याची विद्याही शिकविली. मग तो सहजच सूर्यद्रोह करीत राहिला. तो मग सहज स्वतःशीच द्रोह करीत राहिला. जीवनात, निसर्गात आणि खुद्द त्याच्याही मनात त्याच्याविरुद्ध जाणाऱ्या काही नकारशील गोष्टी होत्या. पण त्याच्या विचारानं जेव्हा त्याला बाजूला सारलं त्या क्षणापासून माणूस स्वतःच्याच विरोधात गेला. त्याच्याविरुद्ध तोच अशी लढाई त्यानंच निर्माण केलेल्या कल्पनांनी त्याच्या जीवनात सुरू केली. पुढं तो शरणागत म्हणून, अंकित म्हणून वा अपूर्णांक म्हणून यशस्वी झाला असेल कदाचित, पण माणूस म्हणून मात्र तो पराभूतच झाला. त्यानंच निर्माण केलेल्या काल्पनिक कथांनी त्याच्या वास्तवाचं महाकाव्य लुळपांगळं केलं.
इहवाद हे असं तत्त्वज्ञान आहे. ज्याला माणसाच्या वास्तवाचं महाकाव्य लुळपांगळं होणं अजिबात मान्य नाही. माणूस पराभूत कल्पनांचा बळी ठरू नये असं इहवादाला वाटतं.
इहवादाचा विषय माणूस आहे. त्याचा एकमेव विषय माणूसच आहे. म्हणून इहलोकाच्या विरुद्ध माणसानंच कल्पिलेला परलोक इहवादाला माणसाचा विरोधक वाटतो. इहलोकाची माणसाला उपकारक अशी निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये परलोक खलनायकाचं काम करतो. म्हणून इहवाद माणसाला या परलोकाच्या विघातक मोहापासून मुक्त करण्याचं आंदोलन होतो.
इहवाद किंवा सेक्युलॅरिझम हे बुद्धिवादाचंच दुसरं नाव आहे. इहवाद माणसाला विज्ञाननिष्ठेचे पंख देतो. आणि उजेडाच्या गगनात भराऱ्या घ्यायला लावतो. माणसांमधील समतोल संबंधांची लागवड करायला लावतो. जडवादाची भावभूमी ही इहवादाची कर्मभूमी आहे. माणसाला स्वयंप्रकाशित, स्वयंशासित आणि स्वावलंबी करणं हा इहवादाचा वैश्विक जाहीरनामा आहे. इहवादाचं कळकळीचं सांगणं माणसाला असं आहे, की हे माणसा तू अत्तप्रभ हो. अत्तसूर्य हो. तू मुक्तमनस्क हो. तू कोणाचीही अधीनता पत्करू नकोस. असं झालं तर तुला माणूस या मर्यादेत राहण्याची गरज पडणार नाही. आणि तूच स्वतःभोवती तयार केलेल्या मर्यादा तुला अमर्याद होऊ देणार नाहीत. तुझ्याच अर्थपूर्णतेची विहीर तुला कायम उपसत राह्यला हवी आहे, तेव्हा निरर्थकाचे उकिरडे पुनःपुन्हा कशाला चाळून पाहण्यात स्वतःला बरबाद करतो आहेस किंवा कुठलंही सत्त्व असण्याची अजिबात शक्यता नसलेली फोलं पुनःपुन्हा आणि हजारो वर्षे कशाला पाखडतो आहेस? या सर्व पोकळ उद्योगात पडून स्वतःला कशाला पोकळ करून घेतो आहेस? माणूस एकदा स्वयंप्रभ झाला, की त्याच्या या प्रभेचा गुणाकार होतो किंवा बेरीज तर होतेच होते. म्हणून तू स्वयंनिर्भर हो. तू स्वयंनिर्भर झाला, की तुझ्या प्रभेला सगळं अंतराळ कवेत घेणाऱ्या फांद्या येतील. अजून अंधारानं लपवून ठेवलेले अवकाशाचे अनेक कानेकोपरे तुझ्या या उजेडाच्या फांद्यांच्या प्रतीक्षेत आहेत. देव, परलोक, दैव अशी अनेक आभासगृहं तू स्वतःला लपवण्यासाठी निर्माण केलीस, पण या आभासगृहांनी तुझ्या जीवनात तुरुंगांचीच भूमिका केली. या सर्वांनी तुझा शक्तिसंकोचच केला.
इहवाद माणसाला हे कळकळीनं सांगतो आहे आणि त्याच्या पूर्णप्रभतेची हमीही त्याला देतो आहे. आणि इहवादाची नीती ही माणसाच्या पूर्णांकाची नीती आहे. तीच त्याच्या पूर्णप्रभतेची आणि संपूर्ण मानवी प्रतिष्ठेची अजिंक्य नीती आहे. तिला स्वतःची ताकद आहे. ती सौहार्दपूर्ण मानवी संबंधांच्या सतत रचनेची आणि पुनर्रचनेची नीती आहे. धर्मांच्या मूलतत्त्ववादी नीतीला म्हणजे धर्माला बलदंड करणाऱ्या आणि माणसाला दुर्बल करणाऱ्या नीतीला इहवादात कुठंही थारा नाही. इहवाद ही स्वतःच श्रेष्ठ मानवी नीती आहे. बुद्धिवादाची नीती कोणती वा विज्ञाननिष्ठेची नीती कोणती, असे अज्ञानाची जाहिरात करणारे प्रश्न मूलतत्त्ववादी विचारतात. त्यांना हे सांगितलं पाहिजे, की विज्ञाननिष्ठा हीच खुद्द अत्यंत सर्जनशील आणि नवनव्या उजेडाची सतत नवनवी पालवी येणारी नीती आहे. गवसलं ते अंतिम नाही. त्याची सतत तपासणी करा. त्यातील उणिवा लक्षात घ्या. आणि समर्थ होऊन पुढे समर्थ पावलं टाकत राहा. या प्रक्रियेशी एकनिष्ठ राहा. ही जीवनाच्या नवनिर्मितीचीच नीती आहे. ही जीवनाला स्वयंप्रकाशित करणारीच नीती आहे. माणसांच्या जीवनातील अंधाराच्या जागा उजळत जाणारीच ही नीती आहे आणि बुद्धिवाद ही सुद्धा स्वतःच एक उच्चकोटीची नीती आहे. बुद्धिवाद ईश्वर, धर्म वा परलोक मानीत नाही, याचा अर्थ या सर्वांशी संबंधित विषमतेची समाजरचना त्याला अमान्यच आहे असा आहे. बुद्धिवादाला ईश्वर वा धर्म मान्य नसतो याचा अर्थ त्यांच्या अनुषंगाने निर्मिलेला परलोकधार्जिणा समाज वा त्यातील माणसांमधील असमतोल संबंधही त्याला मान्य नसतात. जात, धर्म, परलोक आणि त्यांच्याशी संबंधित सर्वच अंधश्रद्धा बुद्धिवादाला मान्यच नसतात. बुद्धिवाद म्हणजे विवेक किंवा विवेकदृष्टी. या विवेकदृष्टीला कधीही चुकीची गोष्ट बरोबर वाटणार नाही. ही दृष्टी दुर्गंधीला सुगंध म्हणणार नाही. आणि तिला विघातकता कधीही विधायकता वाटणार नाही. अन्याय कधी न्याय वाटणार नाही, ही दृष्टी पारतंत्र्याला स्वातंत्र्य मानणार नाही. द्वेषाला करुणा आणि शोषणाला समाजवाद मानणार नाही.
विज्ञाननिष्ठ होणं वा बुद्धिवादी होणं म्हणजे इहवादी होणंच असतं. विज्ञाननिष्ठा हे इहवादाचंच मार्गदर्शक तत्त्व असतं. खरं म्हणजे विज्ञाननिष्ठेची प्रक्रिया ही बुद्धिवादाचीच प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा परिपाक इहवादात झालेला आहे. धर्म वा ईश्वर या गोष्टी सत्ताधारी वर्गांची बाजू घेऊन सामान्यांची मती सपाट करतात. समाजात निराशा, पुरुषवर्चस्वाची व्यवस्था, एखाद्या भांडवलशाहीच्या वा सरंजामशाहीच्या वर्चस्वाची व्यवस्था आकाशातून पावसासारखी पडत नाही. भोगवाद, बलात्कारी वृत्ती, भ्रष्टाचारी वृत्ती, शोषकवृत्ती वा अंधश्रद्धा या गोष्टी विकृत आणि हिंस्र समाजरचनेतूनच जन्माला येतात. त्या वरून पडणाऱ्या उल्का नसतात. वर्चस्वाच्या तृष्णेतून उफाळून येणारे हे आगीचे प्रवाहच समाजाला जाळत समाजभर पसरतात. तेव्हा या अनीतीचा ईश्वर, धर्म या सर्व गोष्टी असताना कसा होतो? हे सर्व अनीतीचे खेळ असतात आणि या खेळांना परलोकाचे हवाले मान्य करून नीती म्हणा एवढीच ईश्वरवाद्यांची वा अध्यात्मवाद्यांची भूमिका असते.
काल्पनिक ईश्वरासाठी, स्वर्गासाठी नीती म्हटलं, की इहलोकासाठी तिचा उपयोग नसतो. तिचं प्रयोजनच वेगळं असतं. ती भीतीपोटीही वावरते. दबावाखाली राहते. अशा नीतीचा उपयोग ऐहिक वास्तवाला होत नसतो. नीती माणसांतील सौहार्दाशीच संबंधित असायला हवी. इहवादाची नीती अशी असते. मीही आणि पुढला माणूसही सतत उगवत राहणं, सतत प्रकाशित होत राहणं हे या नीतीचं महत्त्वाचं लक्षण आहे. ही नीती माणसासाठी आहे. स्वयंप्रभ माणसांची, स्वयंप्रभ माणसांसाठी, स्वयंप्रभ माणसांच्या बौद्धिक चारित्र्यातून उगवलेली ही नीती आहे. ती इहवादी नीती आहे. असं म्हणा, की ती नास्तिकांचीही नीती आहे. सतत उज्ज्वल माणूस असणारांची ही साधी सौहार्दाची नीती आहे.
ही इहवादाची नीती ईश्वरच मानीत नाही म्हणून प्रार्थनेच्या, शरणागतीच्या, चमत्कारांच्या, चिरंतनत्वाच्या, अंतिमत्वाच्या पावित्र्याच्या वा भक्तीच्या रंजक आणि भ्रांत पसाऱ्याला या नीतीत कुठंही स्थान नाही. इहवादाला अभिप्रेत जीवनाची रचना ही निखळ मनुष्यत्वाचीच वा तर्कशुद्धतेचीच वा विवेकाचीच रचना असते. जीवनाचा गुरुत्वमध्य ईश्वर आहे. परलोक नव्हे. नियती वा दैव नव्हे. जीवनाचा गुरुत्वमध्य माणूसच आहे, निखळ माणूस. दैववादामुळं, भ्रमामुळं, अगतिकतेमुळं त्याच्यावर थापले गेलेले शेंदराचे थर तेवढे खरवडून काढायला हवे आहेत. तो मूळ एकसंध, नितळ आणि चौकटींनी न गिळलेला माणूस इहवादाच्या नजरेत आहे.
जीवनाची बाकीची आणि चुकीची केंद्रं विचलित, उद्ध्वस्त वा हास्यास्पद करून माणसाचं महानायकत्व, त्याचं गुरुत्वमध्यत्व इहवादाला जबाबदार जीवनासाठी, सर्जनशील जीवनाच्या भल्यासाठी प्रस्थापित करायचं आहे. माणसाच्या पूर्ण प्रकाशनासाठी, त्याला स्वयंप्रभ वा स्वयंशासित करण्याच्या मुद्द्यावर इहवादाला कोणतीही तडजोड अजिबात मान्य नाही. अशी तडजोड मान्य नसलेल्या इहवादाच्या बुलंद पावलांनी जीवनाला इथपर्यंत आणलं. जीवनाचा आजचा पिसारा हा इहवादी प्रज्ञाप्रतिभांचाच पिसारा आहे. ही बाब सर्वांनीच काळजीपूर्वक लक्षात घ्यावयाची आहे.
सेक्युलॅरिझम हा शब्द पाश्चात्त्य असला तरी त्याच्यातील आशयाची लढावू परंपरा भारतात सिंधू संस्कृतीपासूनची आहे. मध्ययुगाच्या समाप्तीनंतर युरोपात धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील संघर्षाचा परिणाम म्हणून सेक्युलॅरिझमची चळवळ जन्माला आली आणि या दोन्ही सत्तांनी आपल्या अधिकारकक्षा आखून घेतल्या. भारतात सिंधू संस्कृतीच्या काळापासून श्रमण-संस्कृती होती. ती इहवादी होती. लोकायत आणि बुद्ध यांची तत्त्वज्ञानं इहवादीच होती. यापैकी कोणीही धर्माची स्थापना केली नाही. उलट त्यांनी त्या काळच्या धर्माच्या विरोधात आणि त्यानं पुरस्कारलेल्या समाजसंस्थेच्या विरोधात बंडच पुकारलं. ही भारताची निधर्मी परंपराच होती. शिवाय या परंपरेची समतेची नीती आहे. सेक्युलॅरिझम किंवा इहवाद आपण भारतीयांनी पाश्चात्त्यांकडून घेण्याची काहीही गरज नाही. पाश्चात्त्यांच्याही आधी भारतानं इहवादी तत्त्वज्ञानाला, इहवादी जीवनशैलीला जन्म दिला. सॉक्रेटिस वगैरे तर बुद्धाच्या नंतरच्या काळात झाले. पण सॉक्रेटिसपूर्व काळातील तत्त्वज्ञांनाही श्रमणसंस्कृतीसारखे, बुद्धासारखे वा लोकायत यांच्यासारखे इहवादी तत्त्वज्ञान आणि चैतन्यवादाचा तात्त्वज्ञानिक संघर्ष पाश्चात्त्यांपूर्वी भारतातच झाला. आपण पाश्चात्त्यांच्या संसर्गानं सर्वच गोष्टींचे प्रारंभ पाश्चात्त्य जगात झाले असं मानतो. ही गोष्ट इकडील मूलतत्त्ववाद्यांना अतोनात मदत करणारीच ठरते. मग हे पाश्चात्त्य आहे म्हणून आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे हे फक्त समाजरचना बदलू नये यासाठी म्हटलं जातं.
वास्तव मात्र वेगळं आहे. ज्या मूल्यांना आधुनिक मूल्यं म्हटलं जातं आणि जी पाश्चात्त्य आहेत असं म्हटलं जातं आणि अभारतीय म्हणून ज्यांना नकार दिला जातो ती मूल्यं पाश्चात्त्यांपूर्वी हजारो वर्ष भारतात होती, श्रमणसंस्कृती, लोकायत आणि बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानात होती याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. इहवाद आणि आधुनिक मूल्यं यांच्यात तफावत नाही. किंबहुना आधुनिक मूल्यं हेच इहवादाचं तत्त्वज्ञानरूप आहे. याचा अर्थ आधुनिक मूल्यांची बैठक असलेला इहवाद भारतातील श्रमण, लोकायत आणि बुद्ध यांनी जगाला दिला असंच म्हणायला हवं. पण या भारतीय इहवादाला पुरुषवर्चस्ववाद्यांना, वंशश्रेष्ठत्ववाद्यांना, अध्यात्मवाद्यांना आणि अलौकिकाचं नाव सांगत लौकिकात साधनवंचित गोरगरिबांचं शोषण करणारांना नकार द्यायचा असतो तेव्हा ते या गोष्टी पाश्चात्त्य असल्याचा खोटा प्रचार करतात. असा प्रचार करून ते आपलं वर्चस्व सुरक्षित करण्याचा अपयशी प्रयत्न करतात. याचं कारण भारतात जन्माला आलेला इहवाद मूलतत्त्ववादी नाही; तो गतिमान आणि परिवर्तनशील आहे. या इहवादाला सर्वधर्मसमभावात कोंबता येत नाही. आणि त्याला धर्मनिरपेक्षाताही म्हणता येत नाही. लोकांनी आपापल्या व्यक्तिगत जीवनात आपापले धर्म पाळावेत; शासन मात्र कोणत्याच धर्माचं नसतं, एवढाच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. हा अर्थ स्वीकारल्यामुळंही खूप मोठा गोंधळ माजतो. कारण व्यक्तिगत पातळीवर धर्म पाळणारी माणसंच शासन चालवायला जातात. कितीही म्हटलं तरी शासनाला धर्मनिरपेक्ष होणं अवघड होऊन बसतं, पण तरीही धर्मनिरपेक्षता ही पायरी आहे आणि पायरी ही ओलांडण्यासाठीच असते. निधर्मीपणाकडं जाण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची पायरी ओलांडली जाण्याची गरज असतेच. असा इहवाद जगात खूप ठिकाणी आहेच; पण त्या इहवादाची, या निधर्मीपणाची सुरवात वैदिक, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या शेंकडो-हजारो वर्ष आधी भारतात या इहवादाचा मूळ जन्मदाता भारत आहे. संपूर्ण मानवी प्रतिष्ठेच्या या महाप्रकल्पाचा जन्म भारतात झालेला आहे. इहवाद हे माणसाच्या संपूर्ण सौंदर्याचं, माणसाच्या संपूर्ण शक्यतांच्या संपूर्ण प्रकाशनाचं सौंदर्यशास्त्र आहे. हे तत्त्वज्ञान ‘माणूस’ या शब्दाला जगातला सर्वात सुंदर शब्द मानतं. ‘माणूस’ नावाचा हा सुंदर शब्द अधिकाधिक सुंदर करण्यासाठी इतर सर्वच शब्द प्रयत्न करतात. असं करून हे शब्दही स्वतःला अर्थपूर्ण, कृतार्थ आणि सुंदर करून घेतात.
इहवाद ही जागतिक संपत्ती आहे. सूर्यासारखा तो जगातल्या सर्वांसाठी आहे. ही सर्वांसाठी मुक्त असलेली, सर्वांचीच समान मालकी असलेली मानवी सौहार्दाच्या उजेडाची वैश्विक बॅंक आहे. या सौहार्दाच्या उजेडाच्या महोत्सवाकडं कुणीही पाठ फिरवू नये. जगातील प्रत्येकाच्याच जीवनात मनोरमता फुलवणारं हे झाड कोणी तोडून तर नयेच; पण त्याकडं पाठही फिरवू नये. विश्वाच्या मनुष्यमयतेचाच तो अपमान ठरेल आणि मनुष्यमयतेचा असा अपमान कोणीही करू नये.
‘सकाळ, सप्तरंग’च्या सौजन्याने