‘भारत हा तरुणांचा देश आहे’, हे घिसंपिटं वाक्य ऐकून आपण पुरते कंटाळलो आहोत. इथं घरात चॅनल बदलण्याची सत्ता नाही, त्यासाठी बंड पुकारावं लागतं आणि या देशातली व्यवस्था, समाज, तरुण बदलतील अशी भाषणं केली जातात, असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. मात्र, ‘मार्केट’ या देशातल्या तारुण्याकडे असं पाहत नाही. बाजारपेठेचे अभ्यासक शोधतच असतात, या देशातल्या तारुण्याचं व्यक्तिमत्त्व. त्याचा बदलता स्वभाव आणि आशा-आकांक्षा.
असाच एक अभ्यास जेनेसिस बर्सन-मार्सेलर नावाच्या संस्थेनं अलीकडेच प्रसिद्ध केला. २0१५ मध्ये भारतीय तारुण्यात कुठले महत्त्वाचे ट्रेण्ड्स दिसतात, असं सांगणारा हा अभ्यास. भारतीय तारुण्य अनेक घटकांमध्ये विभागलं गेलेलं असलं, तरी त्यांच्यात काही ठळक महत्त्वाचे ट्रेण्ड्स स्पष्ट दिसतात असा या अभ्यासाचा दावा आहे. जागतिकीकरणाचं वारं देशात पुरेसं मुरलं असताना तरुण झालेली ही पिढी विचारच वेगळा करते आणि वेगळ्या नजरेनं आपल्या आयुष्याकडे पाहते, असं या अभ्यासाचं म्हणणं आहे.
त्यातून त्यांनी काही प्रमुख ट्रेण्ड्स अधोरेखित केले आहेत.
त्यांचं म्हणणं भारतातली ही पिढी चेंज चॅम्पियन आहे. पुर्वीच्या तरुण पिढय़ांसारखी कुठलीच ओझी या मुलांच्या खांद्यावर नाहीत, त्यामुळे मनात येईल तसं जगण्याची आणि जगण्यातली मौज शोधण्याची धमक या नवीन पिढीत आहे.
त्या धमक असलेल्या तारुण्यांचे त्यांनी अधोरेखित केलेले काही खास गुण वाचून मनाशी ताळा करायला हरकत नाही की, आपल्यातही ते प्रातिनिधिक गुण आहेत की नाहीत?
१) स्टेटमेण्टल
हा शब्दच मस्त आहे. हा अभ्यास म्हणतो, या तारुण्याचं सूत्र एकच आपलं मत ठामपणे मांडायचं. उत्तम दिसायचं आणि उत्तम कामगिरी करत चार पाऊलं सगळ्यांपेक्षा पुढं रहायचं. त्यांचं दिसणं, त्यांची कामगिरी, त्यांची मतं हे सारं एकप्रकारचं स्टेटमेण्टच आहे. मध्यमवर्गीय घरातलीही त्यांना जे जे म्हणून लेटे्स्ट आणि बेस्टे्स्ट आहे ते ट्राय करून पहायचंय. त्यासाठी ते आतूर आहेत. त्यांच्याकडे पर्यायही आता भरपूर आहे. त्यामुळे ते ज्या ज्या वस्तू वापरतात, जे जे अनुभव घेतात, जे जे स्वीकारतात ते सारं आपल्या जगण्याचा दर्जा उंचावला जावा म्हणून!
२) न्यूअर. बेटर
ही पिढी फक्त त्यांचे गॅजेट्स अपडेट करत नाही, तर ही पिढी सतत स्वत:लाही अपडेट करण्यासाठी, स्वत:चंच बेटर व्हर्जन घडवण्यासाठी धडपडते आहे. त्यांना तब्येत धडधाकट करायची आहे, स्वत:चं नॉलेज वाढवायचं आहे. स्वत:कडे असलेले स्किल सुधारून नवीन स्किल्स शिकायचे आहेत. जे जे ब्रॅण्ड ते वापरतात त्यांचा वापर आणि त्यांचा एक्सपिरीयन्स अधिक बेटर असावा म्हणून ते सतत प्रयत्न करत आहेत. आपण आज जे आहोत त्यापेक्षा ‘बेटर’ काहीतरी हवं हे त्यांचं सूत्र.
३) देसी कूल
जागतिकीकरण आलं, नवीन वारं शिरलं. सगळ्या नव्या गोष्टी आल्या; पण म्हणून ‘देसी’ गोष्टींचं महत्त्व कमी झालेलं नाही. उलट ‘देसी’ गोष्टी, वस्तू वापरणं हे या मुलांना ‘कूल’ वाटतं. आपल्या देशी गोष्टींचा त्यांना अभिमान आहे. देसी वस्तू, सेवा, ज्ञान या सार्यांकडे ते आदरानं पाहतात, नाकारण्याआधी प्रत्येक गोष्ट तपासून पाहतात.
४) चिल् अँण्ड रिलॅक्स
या देशातल्या आजवरच्या तरुण पिढय़ा फक्त बरं आयुष्य घडवण्यासाठी धावल्या. भर तारुण्यात जगणं विसरल्या. ही पिढी थोडी वेगळी आहे. त्यांना भरपूर जगून घ्यायचं आहे. त्यासाठी मनोरंजन, तंत्रज्ञान, बाहेर खाणंपिणं, दोस्तांबरोबर मजा, भटकंती हे सारं ते करतात. त्यांना नकोय आपलं बोअर आयुष्य. जगणं सेलिब्रेट करत ‘एन्जायेबल’ करण्याची त्यांची धडपड सुरूच आहे.
५)राइट हिअर, राइट नाऊ
भारतातल्या आजच्या तरुण पिढीला सगळं आज हवं आहे. आज म्हणजेही आत्ता! त्यांना आत्ता सुंदर दिसायचंय, त्यासाठी आत्ता लगेच कौतुक पण करून हवंय. त्यांना जे मिळवायचं आहे ते लगेच, तातडीनं मिळवायचं आहे. त्यांना धीर नाहीये, अनुभव घेऊन काही करू, असं नकोय, जे हवंय ते आज, आत्ता, या क्षणी!
६) चेंज चॅम्पियन
ही तरुण पिढी अत्यंत बिझी आहे. कुणाकडे वेळच नाही; मात्र तरीही जे जसं आहे तसं ते स्वीकारायला तयार नाहीत. देशातल्या सत्ताकारणापासून स्वत:च्या आयुष्यापर्यंत अनेक जुनी समीकरणं त्यांनी मोडीत काढायला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी ते नवीन ज्ञान, माहिती, कौशल्य शिकत आहेत, झगडत आहेत.
७) कनेक्टिफाय
मुळात भारतीय हे समाजप्रिय माणसं. त्यात आता त्यांच्या हाती कनेक्टिव्हिटी आली. सोशल नेटवर्किंग, मोबाइल फोन्स हे जीव की प्राण. या मुलांच्या आयुष्यात कनेक्टिव्हिटीनं एक नवीन जगच आणून ठेवलं आहे.
८)टेकसॅव्ही
जे कनेक्टिव्हिटीचं तेच टेकसॅव्ही असण्याचं. ही पिढी अत्यंत टेकसॅव्ही आहे. ऑनलाइन गोष्टी त्यांना सोप्या वाटतात. आत्ता-लगेच अँटिट्यूडला हे तंत्रज्ञान मदत करतं. मुख्य म्हणजे या पिढीला असं वाटतं की, ही टेक्नॉलॉजी आपल्याला एक सुपरपॉवर देते. एक अशी शक्ती ज्यातून त्यांना अर्मयादित पर्याय मिळतात आणि व्यवहारात आजवर न दिसलेली पारदर्शकताही जाणवते.
९) इन्फो बर्स्ट
माहितीचा स्फोट हा शब्द आपण नेहमी ऐकतो. त्यामुळे तरुण पिढी गोंधळलेली आहे असा आरोपही केला जातो. मात्र, हा अभ्यास म्हणतो की, माहितीच्या समूद्रातून योग्य माहिती काढून तिचा उत्तम वापर करण्याची हातोटी ही पिढी शिकते आहे. योग्य वेळी, योग्य माहिती, योग्य समज आणि योग्य कृती हे या पिढीचं सूत्र दिसतं.
१0) पर्सनल
मात्र, हे असं सारं पसरट होत असताना या मुलांच्या व्यक्तिगत आवडीनिवडी, जगणं, हे सारं ते अत्यंत पर्सनल बनवत चालले आहेत. आणि त्या पर्सनल होण्यात एक सातत्य आहे आणि सोपेपणाही. या मुलांच्या आयुष्यात व्यक्ति केंद्रिततेची प्रक्रिया अत्यंत वेगानं घडते आहे
‘लोकमत’च्या सौजन्याने