(विदर्भातील तत्त्ववेत्ते व विचारवंत दि.य. देशपांडे ह्यांनी आपल्या विदुषी पत्नी मनू गंगाधर नातू ह्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजचा सुधारक ह्या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ह्या जगावेगळ्या दांपत्यावरील, लोकमत २०१४ च्या दिवाळी अंका पूर्वप्रकाशित झालेला हा लेख – का.सं.)
गोष्ट खूप जुनी आहे. पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची म्हणजे जवळजवळ गेल्या जन्माची वाटावी अशी. पण मला अद्यापही तो काळ विसरता येत नाही. लहानशा खेड्यातून मी विदर्भ महाविद्यालयात शिकायला आले होते. शहरात छोटीशी खोली घेऊ न राहात होते आणि सायकलने कॉलेजात येत होते. एक दिवस त्यावेळच्या जोशी- मार्केटसमोरून जात असताना ‘हिंदुस्थान’ दैनिकाचे संपादक श्री. बाळासाहेब मराठे यांनी मला हाक मारून बोलावले. त्यांच्या वर्तमानपत्रात ‘वाचक पाहिजे’ अशी जाहिरात दिलेली होती ती त्यांनी मला दाखवली आणि कुठे जायचे तो पत्ता समजावून सांगितला. नातूबाईंनी ती जाहिरात दिली होती. त्यावेळी त्या आणि डी. वाय. देशपांडे कॉटन मार्केटकडे जाणाऱ्या आडव्या रस्त्यावर असणाऱ्या सरकारी बंगल्यात राहत होते. फाटकातून मी आत गेले. बंगल्याचे दार नानांनी उघडले, माझे नाव विचारले, मी कशासाठी आले आहे ते कळल्यावर ते मला आतल्या खोलीत घेऊ न गेले. खोलीचे पडदे सरकवलेले असल्याने खोलीत काळोख होता, पंखा मंद फिरत होता, पलंगाजवळ असलेल्या लहान स्टुलावर डोके खाली केलेल्या टेबललॅम्पच्या उजेडात मी पलंगावर उश्यांना टेकून बसलेल्या बाईंना प्रथम पाहिले. शुभ्र साडी, शुभ्र पातळसर पोलके, कपाळावर अगदी बिंदुले काळे कुंकू, लख्ख गोरी कांती, काळेभोर केस मागे बांधलेले. त्यांनी मला जवळच्या खुर्चीवर बसायला सांगितले. माझी चौकशी केली आणि पुस्तक पुढ केले. त्यांचा तळवा मृदु आणि लालसर होता. हातात, गळ्यात एकही अलंकार नव्हता. चेहरा कमालीचा प्रसन्न, टवटवीत, हसरा होता. या होत्या नातूबाई.
माझे वाचन त्यांना आवडले. रोज कॉलेज संपल्यावर दुपारची मी त्यांच्याकडे वाचायला जाऊ लागले. सलग पाच वर्षे मी त्यांची वाचक होते. त्या काळात, मी पूर्वी कधीच वाचली नव्हती अशी अनेक पुस्तके वाचली. बहुतेक मराठी. अनेक कादंबऱ्या, कथा, वैचारिक गद्य. शिवाय ज्ञानेश्वरी आणि दासबोध. या वाचनाने मला अतिशय समृद्ध केलेच. पण त्याहीपेक्षा नातूबाई आणि नाना ही जणु दोन बृहद्ग्रंथच अशी व्यक्तिमत्त्वे माझ्या वाचनात आली. त्यांच्या जवळची, सहवासातली, नेहमी भेटणारी, क्वचित येऊ न भेटणारी असंख्य माणसे, त्यांचे बोलणे, चालणे, एकूण मानवी वर्तन, मानवी स्वभाव, यातली कूटे, अतर्क्यता, परस्पर संबंधांची अगम्य वीण मी अगदी जवळून अनुभवली. ही पहिली पाच वर्षे आणि नंतर १९६८ ते ७५ अशी पुढची सात वर्षे अशी बारा वर्षे रोज नवे पान मी वाचले. आज या लेखाच्या निमित्ताने पुन्हा ती पृष्ठे नजरेपुढून सरकताहेत. कदाचित तेव्हा लक्षात आल्या नसतील अशा नवनव्या अर्थच्छटाही कळून येत आहेत.
बाईंकडे ‘वाचक’ म्हणून मी आले पण वाचनाव्यतिरिक्त आणि लेखनाव्यतिरिक्त त्यांची किरकोळ कामे त्यांनी मला कधी सांगितली नाहीत. मी सेकंड इयरला गेले तेव्हा त्यांचे शिकवणेही मी अनुभवले. त्या वर्षी टिळक-आगरकरांचे निबंध, नंतरच्या वर्षात आज्ञापत्र, ज्ञानेश्वरीचे चार अध्याय, भारती-साहित्यशास्त्र, विल्सनची फिलॉलॉजीची व्याख्याने हे मी त्यांच्याकडून शिकले. त्यांची जाहीर व्याख्याने ऐकण्याचा योग आला नाही पण त्यांच्या शिकवण्याचा ठसा अजून मनावर आहे. दुसऱ्यांकडून वाचून घेतलेले असूनही त्यांचे पाठांतर चांगले होते, अनेक संदर्भ त्या व्याख्यानात सहज गुंफून घेत. त्या शिकवत असताना वर्ग अगदी शांत, स्तब्ध असे आणि त्यांना ते तसेच हवे असे.
आमचे नाते हळूहळू बदलत गेले, गाढ आणि आत्मीय होत गेले. पण त्यांनी त्यातले खाजगीपणही सांभाळले. त्या माझी इतर चौकशी कधी करीत नसत. माझे आई-वडील, बहीण-भाऊ , माझी आर्थिक परिस्थिती, यांच्यांसंबंधी विचारणा त्या करीत नसत. स्वत:विषयी बोलणे मलाही आवडत नसे. ज्याअर्थी मी ‘वाचक’ म्हणून काम करते, खोली घेऊ न राहते, सायकलने कॉलेजात जाते त्याअर्थी माझे गरजू असणे स्पष्टच होते. पण त्यांनी आर्थिक मदतीची भाषा कधी केली नाही. वास्तविक बाई आणि नाना अतिशय उदार होते आणि अनेकांना त्यांची मदत केल्याची ख्यातीही मी ऐकली होती. पण माझ्या बाबतीत माझे स्वावलंबी असणेच योग्य आहे असेच त्यांना वाटत असावे. माझी सख्खी आत्या विदर्भ महाविद्यालयातच गणित शिकवणारे आणि त्याच परिसरात वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून राहणारे प्राध्यापक क्षीरसागर यांची पत्नी होती. पण मी त्यांच्याकडे न राहता शहरात खोली भाड्याने घेऊन, स्वत: स्वयंपाक करून राहत असे. यातूनही माझे स्वतंत्र असणे त्यांना कळत असेल, त्याचे मनातून कौतुक असेल. बाईंचे माझ्यावर फार प्रेम होते. माझा बी.ए. चा मुख्य विषय संगीत हा होता. त्या मला नेहमी गाणे म्हणायला लावत, ज्ञानदेवांचे अभंग, जुनी भावगीते त्यांना आवडत. त्यांना झोप लागावी म्हणून मी गाणे सुरू करीत असे आणि नंतर हळूच त्यांच्या खोलीतून निघून हलक्या पावलांनी नानांच्या खोलीत जाऊन मी मानेने त्यांचा निरोप घेत असे.
बाईंच्या माझ्या इतर गप्पाही होत. त्या बोलत आणि मी ऐकत असे. बाईच्या जातीच्या सोसण्याबद्दल त्यांना कणव असे. आज विचार करताना वाटते, बाई कडव्या ‘स्त्रीवादी’ म्हणाव्या लागतील. बाईने स्वतंत्र असले पाहिजे, तिने पुरुषसापेक्ष असू नये असे त्यांना वाटत होते. स्वत: त्यांनी ‘बाई’पणाशी निगडित सर्व गोष्टी बाजूला सारल्या होत्या, त्या काही त्यांना आजारपणामुळे शक्य नव्हत्या म्हणून नसाव्यात. त्या समर्थ असल्या तरी त्यांनी स्वयंपाकपाणी, पतिसेवा, अपत्यसंगोपन यांत आयुष्य घालवले नसते. स्वातंत्र्य हे मूल्य त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते आणि स्त्रीने त्याचा आग्रह धरला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
बाईंनी त्या काळात आपले माहेरचे नाव कायम ठेवले होते. विदर्भात तश्या आणखी एक म्हणजे गीता साने. बाईंची तशी काहीच माहिती मला ठाऊक नव्हती. पुढे ‘श्रुतीं’ मधून ती कळत गेली. बाईंचे मूळचे नाव मनकर्णिका. वडील व्हेटर्नरी डॉक्टर होते. बाईंची आई त्या अगदी लहान असतानाच गेली. अक्का, ताई, माई आणि दोन भाऊ अशा भावंडांमध्ये बाई सर्वांत धाकट्या. आई वेगळ्या लहान मनूवर सर्वांनी प्रेमाचा वर्षाव केला. पुढे अक्कांचे, ताईंचे लग्न झाले, पण ताई वैधव्यानंतर सासरी स्वाभिमानाने जगता येईना म्हणून दोन लहान मुलांना घेऊन माहेरी आल्या. वडील आणि दोन भाऊ यांच्या मृत्यूचेही आघात झाले. तेव्हा बाईंना ताईंनी आपल्या तिसऱ्या अपत्याप्रमाणे सांभाळले. सर्वोदयी तपस्वी विनोबांचे सहकारी मामा क्षीरसागर, बाबा रेडीकर, दर्यापूरचे नाना गोखले, बापूसाहेब धर्माधिकारी या साऱ्यांनी बाईंचा प्रतिपाळ केला. बाईंना दु:खाचा वाराही लागू नये यासाठी ताईंनी कष्ट घेतले, बाईंची दृष्टी अधू होती, ताई त्यांना वाचून दाखवीत. या साऱ्यांचे श्रम आणि काळजी सार्थकी लागली, बाईंनी बी.ए., एम.ए. च्या परीक्षेत प्रथम आल्यानंतर त्या विदर्भ महाविद्यालयात रुजू झाल्या. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची विदुषी म्हणून त्यांची ख्याती होऊ लागली. उत्कृष्ट वक्तृत्वानेही त्यांचे नाव गाजू लागले. स्त्रीस्वातंत्र्याची पुरस्कर्ती आणि धीटपणे तसे जगून दाखविणारी म्हणून त्या लहानशा गावात त्यांच्याविषी चर्चाही होत असत. डी.वाय.देशपांडे यांच्याशी त्यांनी विवाह केला त्यावेळी बाईंची तिशी उलटून गेली होती. डी.वाय. हे नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून बदलून अमरावतीला आले होते, ते तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र शिकवीत. त्यांची इंग्रजीत पुस्तकेही प्रकाशित झाली होती. डी.वाय. म्हणून ते ओळखले जात. जवळच्यांसाठी ‘नाना’. त्यांचा ‘एकांक’ मला पुष्कळ उशिरा कळला. त्यांच्या दिवंगत पत्नीची बहीण लीलाताई यांची माझी योगायोगाने भेट झाली आणि बोलघेवड्या स्वभावाने मैत्रीही. त्यांच्या बोलण्यातून नाना मला अधिक ओळखीचे झाले. नाना फार सुस्वभावी, अंतर्मुख आणि ‘रिझर्वड्’ होते. त्यांना वाङ्मयाची आवड होती. ते टेनिस खेळत, त्याकाळचे जगमोहन, पंकज मलिक हे गायक त्यांना फार आवडत. उत्कृष्ट सिनेमे पाहणे, समविचारी स्नेह्यांशी गप्पागोष्टींत रमणे त्यांना प्रिय होते. नाना आणि बाई यांना परस्परांविषयी ओढ वाटून त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला यात आश्चर्य नव्हते. बाईंचे हसरे, प्रसन्न, मोहक, आनंदी व्यक्तिमत्त्व, त्यांच्यातला गोडवा, एक प्रकारची निरागसता आणि मूलपणा, बुद्धिमत्ता, विनोदाची आवड हे सारे फार आकर्षक होते. दोघेही परस्परांना पूरक होते. विवाह करून ते विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील बंगल्यात राहू लागले. मी त्यांना पाहिले तेव्हा बाईंच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या होत्या आणि त्यांचे इतरांहून वेगळे, असे सहजीवन सुरू झाले होते. पति-पत्नी नात्यातल्या पारंपारिक भूमिकांची दोघांनाही अपेक्षा नसणारे, विलक्षण कोटीतले हे नाते होते. स्त्रीपुरुषद्वंद्वातल्या सत्तासंबंधांचा मागमूसही नव्हता. अंथरुणाला जवळजवळ खिळल्याने नाना हे बाईंचे सर्वस्व असणे कळू शकते पण बाई हे नानांचे एकमेव निधान होते. त्यांच्यासाठीच त्यांचे अस्तित्व होते. वास्तविक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात डी.वाय.देशपांडे या नावाला वजन होते, उत्कृष्ट प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती. १९५० पूर्वीच इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशनची स्थापना त्यांनी केली होती आणि त्या संस्थेचे जर्नल ते चालवीत असत. त्यातून त्यांची टिपणे प्रकाशित होत. मे. पुं. रेगे, रा. भा. पाटणकर, अशोक केळकर, य.दि.फडके, ग.प्र.प्रधान यांसारखी दिग्गज विचारवंत माणसे नानांना मानीत असत. परंतु नानांनी बाईंसमोर त्यांचे ‘करिअर’ दुय्यम ठरवले. स्वत:चे लेखन, वाचन, व्याख्यानांची निमंत्रणे या सर्व गोष्टी त्यांच्या लेखी नंतरच्या होत्या, अहोरात्र बाईंसाठी असणे हे त्यांचे प्रथम प्राधान्य होते. त्यांच्या गरजेनुसार नानांनी स्वत:चे आयुष्य आणि स्वत:चा दिनक्रम ठरवलेला होता. हे सारे मी अनेक वर्षे, रोज पाहिले आहे आणि त्यामुळे चकितही झाले आहे. असे नाते मी त्यापूर्वी आणि त्यानंतरही पाहिले नाही. ते जगावेगळे होते.
बाईंसाठी जसे एक नाना होते तश्या ताईही होत्या. ताई म्हणजे कमलाताई वैद्य. ताई शहरात कॅम्पच्या रस्त्यावरच्या महाजनांच्या घरात राहात. बाईंनी आठवण काढली, त्यांचे दुखले खुपले की नाना कार घेऊन ताईंना आणायला जात. आमचे वाचन बाजूला ठेवून बाई अगदी अधीरपणे ताईंची वाट पाहात, गाणे गुणगुणत, दर सेकंदाला चाहूल घेत. त्या आल्या की बाई एकदम उल्हसित होत. नानाही निश्चिंत होत. बाईंचा गोतावळा मोठा होता. थोरल्या बहिणी, मेव्हणे, भाचे, भाच्या, बहिणींची नातवंडे, ओळखीपाळखीचे, स्नेही यांचे जाणे-येणे असे. ताई साऱ्यांची काळजी घेत. स्वयंपाकाकडे बघत. बाई, नाना आणि त्यांच्या पाठोपाठ सायकलने मी, कॉलेजातून आलो की चहा, ताजा, गरम बाईंच्या आवडीचा पदार्थ तयार असे. ताई उंचपुऱ्या, जाड काचांचा चष्मा, प्रकृतीने दणकट, नीटनेटक्या. त्यांची स्वच्छता, टापटीपही खास असे. बाईंचे त्या नानांसारखेच काळजीने सर्व करीत. त्यांचे केस विंचरून देत. हवे नको पाहात. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गप्पांमध्ये त्याही भाग घेत. कित्येकदा कही लोक गेल्यानंतर, बाई ताईंना त्यांची नक्कल करायला लावत आणि ताई त्या इतकी हुबेहूब, हातवारे, आवाज, लकबींसह करीत की आमची हसून पुरेवाट होई. त्यावेळी नाना त्यांच्या खोलीत काम करीत बसलेले असत. आमच्या हसण्या – खिदळ्याचा कसलाही विक्षेप न येता त्यांचा टाइपरायटर वाजत राही. ताईंच्या मुलीची मुलगी ‘मृदुल’ ही याला अपवाद होती. ती मुक्कामाला आली की नाना स्वत:चे काम बाजूला ठेवून तिचे लाड करीत. मृदुल हा त्या दोघांचा रम्य विसावा होता. नाना आणि बाई दोघेही मृदुलवर प्रेमाचा, वात्सल्याचा वर्षाव करीत. नानांचे अगदी वेगळे रूप त्यावेळी मी पाहात असे.
बाईंची राहणी साधीच होती. अलंकार पूर्णपणे आणि तत्त्वनिष्ठेने वर्ज्य. कित्येक वर्षे शुभ्र साडी आणि शुभ्र पोलके असा पोशाख असे. केसांची वेणी घालून चक्करडे मागे बांधलेले असे. त्या सँडलसारखे बंद पादत्राण वापरीत. सुरुवातीच्या काळात, एकदा त्यांचे पाय/लाल टाचा बघून मी त्यांना ‘तुम्ही अळता लावता का पायांना’ असे विचारले होते. तेव्हा त्यांना हसू आले होते. पुढे त्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास होऊ लागला, हात मागे येईनात तेव्हा त्यांनी केस कापून मानेसरसे केले. गळ्याला कॉलर बांधू लागल्या. प्रकृतीच्या तक्रारींनी गांजल्याने त्यांना डिप्रेशन येऊ लागले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना रंगीत साड्या नेसण्याचे सुचविले. त्या अगदी वेगळ्या दिसू लागल्या. पण त्यांनी स्वत:ची प्रसन्नता कधीही मालवू दिली नाही. त्या फार हळव्या होत्या. लहरीही त्यांची स्वत:ची काही मते अगदी टोकाची असत. स्त्रीपुरुष संबंधांची त्यांना आतून तीव्र नावड, जवळजवळ ‘रिपल्शन’ होते असा मला संशय आहे. ‘पुरुष’ या प्राण्याबद्दल त्यांचे मत चांगले नव्हते. नाना, मामा, बाबा हे अपवाद होते पण पुरुषाची बाईकडे पाहण्याची ‘नजर’ चांगली नसते आणि बाईने त्यांच्यापासून स्वत:ला दूरच ठेवले पाहिजे असे त्यांना वाटे. मी तेव्हा ते ऐकून घेत असे पण आता मला ते अगदी पटायला लागले आहे. बाई फार हळव्या, भावनाप्रधान होत्या. नानांच्या स्वभावाच्या जवळजवळ उलट टोकाचा स्वभाव. लोकांबद्दल त्या एकदम चांगले वाईट मत बनवीत आणि खाजगीत बोलूनही दाखवीत. त्यांच्या आवडीनिवडीदेखील टोकाच्या असत. त्या कधी कश्या ‘रिअॅक्ट’ होतील, सांगता येत नसे. त्या चटकन दुखावल्या जात. लोकांच्या बोलण्याचा, कदाचित त्यांना अभिप्रेत नसलेला अर्थ त्या काढीत. त्यांचा मूड जाई. काहींच्या बाबतीत तर त्यांचा राग का आहे आणि तो कसा दूर करावा हे मला कळत नसे. त्यांच्या मनात निर्माण झालेला ग्रह दूर करणे अशक्यच असे. बाई अगदी कडवट होत. स्वत:ला त्रास करून घेत. ताई आणि नाना बाईंच्या कलाने घेत. तो विषयच बंद करून टाकत. बाईंना स्वत:चे रूप, कांती, स्वत:ची बुद्धिमत्ता याबद्दल एखाद्या सर्वसामान्य बाईसारखा अभिमान होता आणि दुसरी कोणीही स्त्री त्यांच्या तुलनेत डावी आहे हे ऐकायला त्यांना आवडत असे. त्यांच्यात असणाऱ्या अंतर्विरोधांचे मला कधी कधी आश्चर्य वाटे. नानांनाही ते कळत असणारच. कधी, काही ठिकाणी त्यांचा निरुपाय होई. कदाचित ते हताशही होत असतील पण त्यांच्याकडून बाईंचे काही कमी झाले नाही. त्यांचे बाईंवरचे प्रेम या साऱ्या गोष्टी बाजूला करून घेत असे. त्यांच्या अखंड, निरलस सेवाव्रतात एक क्षणभरही खंड पडला नाही. नानांच्या बाईंवरच्या प्रेमाचे कोडे मला कधी उलगडले नाही. मला नानांबद्दल आदरयुक्त दरारा वाटत असे, अगदी भीतीच वाटत असे. त्यांच्याशी मी फारशी बोलतही नसे. नानांना बागकामाची आवड होती आणि फुले तोडलेली आवडत नसे. मला हे एका प्रसंगाने कळले. त्यांनी अंगणात मोगरा लावला होता आणि आतल्या अंगणातही बरीच झाडे होती. एकदा मागच्या व्हरांड्यात एका कुंडीत गुलाबाचे सुंदर फूल उमललेले मला दिसले. ते मी तोडून घेतले. नानांच्या लक्षात आले नि ते गर्जना करीतच बाईंच्या खोलीत आले. तिथे मी स्टुलावर काचेच्या ग्लासात पाणी घालून ते ठेवलेले त्यांनी पाहिजे आणि क्षणार्धात निवळून तिथून निघून गेले. काही दिवसांनी दुसऱ्या कुंडीत फूल उमलले तेव्हा मी आणि नानांनी ती कुंडीच उचलून बाईंच्या खोलीतल्या कोपऱ्यात ठेवली, बाईंनी ते उमललेले सुंदर फूल पाहावे यासाठी.
बाई आणि नानांनी माझ्या बाबतीत दैवी क्षमाशीलता दाखवलेली मी अनुभवली आहे. एम.ए. होईपर्यंतची पाच वर्षे मी त्यांच्याकडे रोज वाचायला जात असे. एम.ए. झाल्यावर मी त्यांच्या मायेच्या सावलीपासून दूर गेले, जगण्याच्या स्थैर्याच्या विवंचनेत, उन्हात वणवणले, भरकटले, इतकी हरले, अपयशी ठरले, थकले की बाईंना तोंड दाखविण्याची मला हिंमत होईना. मी अगदी विपरीत जगत होते आणि बाईंना ते कुणाकुणाकडून नक्कीच कळत असणार. लोकांना बोलायचे असतेच. मी १९६८ च्या जून मध्ये दूर, भुसावळच्या कॉलेजमध्ये नोकरी घेतली. तिथे घरबीर शोधते न् शोधते तेवढ्यात मला बाईंची, म.गं.नातू अशी नेहमीची सही असणारे दोन ओळींचे कार्ड मिळाले. विदर्भ महाविद्यालयात प्राध्यापकाची जागा निघाली होती आणि बाईंना माझी आठवण होती. मी अमरावतीला येऊन बाईंना भेटले. त्यांच्यापुढे सारे अपयश गळ्यात घेऊन उभे राहणे हा माझ्या धैर्याच्या कसोटीचा क्षण होता. पण त्यांनी काही विचारले नाही. मी सांगितले ते ऐकून घेतले आणि मला बाहेर थांबायला सांगून त्यांनी नानांना बोलावले. त्यांचे मत विचारले आणि मला आत बोलावून प्राचार्यांकडे अर्ज करायला सांगितले. त्या दोघांनी सारे प्रवाह बाजूला सारून मला संधी दिली होती. १९६० साली दार उघडून एका पंधरा वर्षाच्या ज्या मुलीला त्यांनी घरात प्रवेश दिला होता तिच्यासाठी त्यांनी पुन्हा दार उघडले आणि आत घेतले. पुन्हा एकदा बाईंना वाचून दाखवणे, गप्पा मारणे, त्यांना गाणे गाऊन दाखवणे असा कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला. हळूहळू माझे कुटुंब तयार झाले. जबाबदाऱ्या वाढू लागल्या. बाईंचे नि माझे नाते विभागप्रमुख आणि सहकारी प्राध्यापक असे होत गेले, तसे गैरसमज निर्माण झाले, अंतराय वाढू लागला, आमचे बोलणे तुटले, दुरावा इतका वाढला की, त्या निवृत्त झाल्या तेव्हा त्यांचा निरोप घ्यायलाही मी गेले नाही. पण माझ्याच बाबतीत असे घडले होते असे नाही. बाईंच्या अगदी जवळची झालेली माणसे कायमची दुरावण्याची उदाहरणे मला ठाऊक आहेत. हा दुर्दैवी प्रकार होता. बाईंनी केलेली माया मनातल्या एका कोपऱ्यात ठेवून मी त्यांचा मनोमन निरोप घेतला. मला तो घ्यावा लागला. निरोपाच्या दिवशी घरी त्यांनी माझी वाट पाहिली असेल पण मी नाही म्हणजे नाहीच जाणार असे स्वत:शी भांडण करून नाहीच गेले. पश्चात्तापाच्या माझ्या आयुष्यातल्या अनेक क्षणांपैकी हा एक जिव्हारी दडलेला आहे.
बाईंमध्ये खूपच क्षमता होती. चिकित्सक वृत्ती, बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, संवेदनक्षमता आणि वायाची उपजत उत्तम जाण हे त्यांचे विशेष त्यांच्या शिकवण्यातून जसे प्रकटत असत तसेच त्यांना लेखनातही ते दिसतात. पण वाचनलेखनासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांना मर्यादा पडत. एकेका विषयावर पुष्कळ काळ चिंतन करीत, नानांशी चर्चा करीत त्या लेखनाची बैठक जमवीत. आगरकरांचा बुद्धिवाद, व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह आणि भक्कम, ठाम विवेकवादी मांडणी यांचा बाईंवर प्रभाव होता. ‘नवभारत’मध्ये आगरकरांवर लेख लिहिला होता. १९६१ साली ‘नवभारत’ मध्ये दोन अंकात त्यांचा ‘सुधारक चुकले काय’ हा प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला. महाराष्ट्रातील स्त्रीविषयकसुधारणा हा बाईंच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्या सुधारणांना विरोध करणाऱ्या प्रतिपक्षाचे खंडन या लेखात अगदी तर्कशुद्ध रीतीने केलेले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या समग्र साहित्याची ‘सुधारणावादी’ या दृष्टिकोनातून सांगोपांग चर्चा जशी त्यांनी केली, तशीच आपल्या सर्व कादंबऱ्यांतून स्त्रियांची पुरोगामी व्यक्तिमत्त्वे रंगवणाऱ्या वामन मल्हारांनी ‘इंदू काळे’ या कादंबरीत मात्र विचारांमध्ये माघार घेतली आहे. अशी चिकित्सा करणारा दीर्घ लेख लिहिला. त्यांचे सात दीर्घ लेख ‘विवेकाची गोठी’ या संग्रहात एकत्रित केलेले आहेत. हा लेखसंग्रह त्यांनी ‘ज्योतिबा आणि सावित्रीबाई या महामानवांस’ अर्पण केला आहे. त्यांचा वामन मल्हारांवरचा लेख म्हणजे ‘स्त्रीवादी’ समीक्षेचे पहिले महत्त्वाचे उदाहरण आहे असे माझे मत आहे.
प्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्या वारंवार आजारी पडत. सभोवतालचे वातावरण बदलत होते. नवी पिढी कॉलेजात दाखल होत होती, या ना त्या माणसांच्या व्यवहारात, वागण्या-बोलण्यात बाई अडकून पडत. मनाला लावून घेत, त्यातच व्यग्र राहात. शिवाय त्या ‘करिअरिस्ट’ मुळी नव्हत्याच. त्यांचे वाचनलेखन त्यांच्या स्वत:च्या आनंदासाठी होई. त्यांच्याकडे पीएच.डी. करणारे विद्यार्थीही होतेच. स्वत:ला समाधान वाटावे असे लेखन तब्येतीने करण्याचा त्यांचा स्वभाव होता. खानोलकरांच्या कथा आणि कादंबऱ्या मी त्यांच्याबरोबरच वाचू लागले होते. खानोलकरांच्या साहित्यातल्या स्त्रियांची चित्रणे फार अस्वस्थ करणारी असत आणि एकीकडे खानोलकरांवर टीकाही सुरू होती. मी एकदा काव्यस्पर्धेत बक्षीस मिळवले तेव्हा मी बाईंना विचारून खानोलकरांचा कवितासंग्रह कॉलेजकडून मिळवला होता. त्यांच्या बरोबरच्या या वाचनातूनच पुढे मी पीएच.डी. साठी खानोलकरांचे साहित्य निवडले. खानोलकरांच्या कादंबऱ्यांतील स्त्रियांच्या दु:खांची कारणे, त्यातले प्रत्येकीचे वेगळेपण शोधणारे खानोलकरांसंबंधीचे बाईंचे चिंतन हळूहळू आकार घेऊ लागले. त्यातून त्यांचे ‘वेदनेचा वेध’ हे पुस्तक निर्माण झाले. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार मिळाला.
विदर्भ महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर नागपूरला स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अमरावतीला त्यांचे तसे काही खास वर्तुळ नव्हते. मुख्य म्हणजे ताईंचा मुलगा नागपूरला होता, त्याच्याकडे ताई राहात होत्या. त्यांचा मोठा आधार होता. नागपूरला गेल्यानंतर नानांच्या सहकार्याने बाईंनी आगरकरांच्या समग्र लेखनाच्या संपादनाचे जे काम केले ते बाईंच्या आयुष्याचेच जणु सार्थक होते. मला तो एक काव्यात्म न्याय वाटतो. बाई आगरकरांच्या अनुयायी होत्या. सुधारणावाद आणि विवेकवाद ही मूल्ये त्यांनी निष्ठेने अनुसरली होती. निवृत्तीनंतर प्रकृती आणि त्यांच्या लेखन वाचनाला नेहमीच पडलेल्या मर्यादा यावर मात करीत सुमारे १५०० पृष्ठांचा मजकूर बारकाईने वाचून आगरकरांच्या लेखनाचे तीन खंड त्यांनी तयार केले आणि त्याला प्रस्तावना लिहिल्या. पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत आगरकरांचे चरित्र आणि कार्य यांची थोरवी व्यक्त झालेली आहे. पहिल्या व दुसऱ्या खंडात आगरकरांचे सुधारणाविषयक विचार मांडणारे निबंध संगृहित केलेले आहेत. तिसऱ्या खंडात आगरकरांचे इतर वाङ्मय समाविष्ट आहे त्याची ‘ग्रंथकार आगरकर’ ही प्रस्तावना महत्त्वाची आहे. आगरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे, सुधारणाविषयक कार्याचे, विवेकवादावरील निष्ठेचे विश्लेषण करीत आगरकरांचे विचार कालबाह्य झालेले नाहीत, ते द्रष्टे होते, दूरदृष्टीने त्यांना महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय समाजाच्या सुधारणेचा समग्र विचार केला होता त्याची आजही गरज आहे. यासाठी नाना आणि बाईंनी कळकळीने समाजहितासाठी हे काम हाती घेतले आणि पुरे केले. आगरकरांवर त्यांच्या काळात आणि पुढे किती अन्याय झाला या विचारांनी बाई व्यथित होत. त्यांचे काळीज तुटे आणि आगरकरांच्या विरोधकांवर कोरडे ओढीत. आगरकरांनी सुचवलेल्या सुधारणांचे आता प्रयोजन नाही. त्यांचे विषय जुने झाले आहेत. त्यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा पाया डळमळीत झाला आहे असे म्हणणाऱ्यांनी कोणत्याही लेखनाची मोल त्याच्या विषयात नसून त्यामागच्या विचारसरणीत असते याकडे तर लक्ष दिलेच नाही आणि त्याहून पलिकडचे तत्त्वज्ञानही मांडले नाही. धार्मिक पुनरुज्जीवनाकडे कड्यावरून कोसळणाऱ्या दगडाच्या गतीने समाज वाटचाल करीत आहे हे तथाकथित विचारवंत उघड्या डोळ्यांनी पाहात होते. पण ते अरिष्ट थांबवण्याचे प्रयत्नही केले नाहीत. फुले आणि आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना आगारकरांचे कार्य ब्राह्मणी आणि मर्यादित कक्षेतले मानून त्यांना अनुल्लेखनाने मारण्याचा प्रयत्न पुढच्या काळात हेतुत: केला गेला.
सर्वधर्मभावाची वरवर भाषा बोलणाऱ्या छुप्या जातीयवाद्यांचा नवा वर्ग हळूहळू वाळवीसारखा समाज पोखरून टाकीत राहिला आणि दुसरीकडे ‘धर्मां’चे पुरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम जोमात सुरू राहिला. या सर्वांचे दुष्ट परिणाम आज धडधडीत दिसताहेत. संपूर्ण समाज भरकटलेला आहे. विवेकाचा भर तर उरलेला नाहीच, वैचारिकतेचे अधिष्ठानही नष्ट झालेले आहे. अंधश्रद्धांची विद्रूप रूपे सर्वत्र दिसताहेत. मध्यमवर्ग बुवाबाजीच्या मागे डोळे मिटून धावतो आहे. अशावेळी कुठेतरी ‘आजचा सुधारक’ चा दिवा हाती घेऊन जाणारेही आहेत या गोष्टीने धीर येतो. नानांनी बाई गेल्यानंतर विवेकवादाला वाहिलेले ‘आजचा सुधारक’ सुरू केले. त्यातून होणारे विचारमंथन आणि चर्चा प्रेरक ठरणाऱ्या आहेत. बाई आणि नानांची ही अपूर्व देणगी आहे.
बाई ‘आगरकरवादी’ होत्या एवढे म्हणणे पुरेसे नाही. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर आगरकरांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि शैलीचा प्रभाव होता. शिवाय त्यांच्या स्वत:च्या खडतर, आह्वान देणाऱ्या, जिद्दीने उभे राहायला लावणाऱ्या जगण्यातून आलेले काही खास गुणधर्मही होते. संवेदनशीलतेबरोबर करुणा, ममता आणि क्षमाशीलता होती. कित्येकांवर त्यांनी अपत्यवत प्रेम केले. त्यांच्या आयुष्यांना आकार दिला, कित्येकदा आपले मन समजावून न घेता माणसे गैरसमज करून घेतात या अनुभवाने त्या उन्मळून जात. पण नानांमुळे त्या सावरू शकत. पुन्हा जीवनाकडे आशावादी दृष्टीने बघू शकत. बाईंच्या सहवासात मी काही अविस्मरणीय क्षण अनुभवले. बाहेर रणरण ऊन असताना वाळ्याच्या ताट्या लावलेल्या त्यांच्या गार खोलीत मंद प्रकाशात मी त्यांच्याबरोबर पुस्तके वाचली, चर्चा केल्या. संध्याकाळी अंगणात पाणी शिंपडून खुर्च्या टाकल्या जात. तेव्हा मोगऱ्याचा आणि मातीचा गंध अनुभवीत जी.ए. कथांनी अधिकच हळवे होत. काही स्तब्ध होऊन बसून राहत असू. त्यांनी शिकवलेली ज्ञानेश्वरी तर विसरणे शक्यच नाही. पण बाई आणि नानांनी केलेल्या संस्कारांमधले मी काय सांभाळले या प्रश्नाने मी अस्वस्थही आहे. त्यांची पुन्हा एकदा आठवण काढीत मला त्यांच्याकडे एक कबुलीही द्यावीशी वाटते. मी विवेकवादी बनले नाही. धार्मिक विधींमध्ये सहभागी होते, उपवासादी आचार सुरूच असतात, ईश्वर मानते आणि या भवाच्या कटकटींनी थकल्यावर ईश्वराला शरण जाते. तत्त्वनिष्ठा दूरच कित्येकदा आत्मविसंगत वागते. फक्त एक समाधान आहे, हे माझे मला कळते, नाना-बाईंसारखे कोणीतरी मला समजूनही घेते, क्षमा करते. नाना बाईंसारखे दुसरे मात्र मला नंतर भेटले नाही. ही दोन पण परस्परांशी प्रेम आणि तत्त्वनिष्ठा या सूत्रांनी एकरूप झालेली, जगावेगळी माणसे, निरपेक्ष, भावनेने इतरांवर मायेचा, स्नेहाचा वर्षाव करणारी माणसे माझ्या आयुष्यात आली होती याची मी पुन्हा एकदा स्वत:ला आठवण करून देते आहे. जगण्याच्या या मुक्कामावर, स्वत:ला अशी आठवण देणे आवश्यकही आहे.
(हा लेख लिहिताना सुनीती देव, विवेक गोखले आणि श्रीधर वैद्य यांचे सहकार्य लाभले. त्यांचे मन:पूर्वक आभार मानते.)
‘लोकमत २०१४ च्या दिवाळी अंक’ च्या सौजन्याने