आजच्या अनिश्चिततेच्या सामाजिक, आर्थिक परिस्थिती सामान्य माणसाला असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे त्याच्यात दैववादीपणा वाढत चालला आहे. आपले कोण? परके कोण? याबाबत संभ्रम वाढत चालला आहे. त्या भीतीतून सामान्य माणूस स्वतःभोवती वेगवेगळी कुंपणे तयार करायला लागला आहे. मग ती धार्मिक, जातिय, प्रादेशिक, भाषिक, आर्थिक कोणती का असेना. भीतीमुळे जे जुने, ओळखीचे आहे तेच धरून बसण्याची भावना व कृती नैसर्गिकच असते.
हे सांगायचे कारण की, नेमकी हीच अवस्था पुरोगामी, सामाजिक, विवेकी चळवळीतील लोकांची झालेली दिसत आहे. तोही अस्वस्थ होत आहे. ज्या कुंपणांमुळे माणूस माणसापासून दूर होत चालला आहे ती कुंपणे तितक्याच वेगाने तोडण्याचा प्रयत्न करत आहे. खरे तर त्याने लोकांतील असुरक्षिततेची, संभ्रमाची भावना कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वतःभोवतीची कुंपणेही तोडण्याची गरज आहे व परिस्थितीचा साकल्याने अभ्यास करण्याची गरज आहे.
केवळ प्रतिगामी लोकांवर टीका करणे, निषेध मोर्चे काढणे, असे त्यांच्या गाडीचा वेग नियंत्रित करण्याचे उपाय केले जात आहेत. त्यामुळे पुरोगामी गाडीच्या इंजिनाला इंधन पुरवणे, गती देणे यासाठी त्यांना उसंतच मिळेनाशी झाली आहे किंवा त्याबाबत मर्यादा जाणवत आहेत. आपले प्राधान्य कायम आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून मार्गक्रमण करण्याकडे पाहीजे. दुसरा पुढे जाईल म्हणून त्याच्या पायात पाय घालत बसले तर आपला प्रवास त्याच्या पायाशीच थांबतो. तुमची उर्जा तुमची क्षमता वाढवण्यावर केंद्रित करायला हवी. तुमची एक पुरोगामी, विवेकी, समाजाभिमूख विचारधारा आहे. तो तुमचा मार्ग आहे. त्यावरून ठामपणे चालत राहणे हा खरा उपाय आहे.
आपणही ज्या समाजसुधारकांचा वारसा सांगतो ते फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, कर्वे, आमटे यांनी आपल्यामागे किती लोक येतात, राहतात याची कधी चिंता केली होती? ते आपली क्षमता व निष्ठा वाढवत होते. प्रवाहाविरूद्ध पोहण्याची भूमिका आपण जाणीवपूर्वक घेतलेली आहे. त्यामुळे प्रवाहाने होण्याऱ्या विरोधाबद्दल सतत तक्रार करून काहीही साधणार नाही आणि असे बदल व्यक्तिगत पातळीवरच होत असतात त्यामुळे संवादही व्यक्तिगतच हवा. आपण लोकांना वेगवेगळ्या कप्प्यात न टाकता त्याचा व्यक्ती म्हणून विचार करायला हवा. किमान आपला चष्मातरी नितळ हवा.
बाबासाहेबांनी मनुसृती जाळली. का? आपल्याला दर वर्षी स्मृतीदिन साजरा करता यावा म्हणून, की मनुवाद्यांना टोमणे मारायला आपल्याला कारण मिळावे म्हणून. माझ्यामते त्यांनी मनुस्मृति जाळली याचा अर्थ त्यांच्यापूरता तो विषय संपला. त्यांची आपल्याकडूनही तशीच अपेक्षा असणार. ते काही २१ वेळा पृथ्वी मनुस्मृती विरहीत करीन असे म्हणाले नाहीत. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा त्यातील १/३ हिंदू देव, परंपरा नाकारणाऱ्या आहेत. चार पिढ्यांनतरही त्या का वाचाव्या लागतात? ज्यांचा गीता, मनुस्मृती यांना विरोध आहे तेच याविषयीचा जास्त अभ्यास करतात दिसत आहेत. गीता राष्ट्रीय ग्रंथ करणार म्हटल्यावर सगळे गीता उघडून त्यातील चुका शोधत बसले आहेत. आज ९० वर्षानंतरही आपल्या हातात, मनात, डोक्यात मनुस्मृती, गीता असेल तर आंबेडकरांची कृती वायाच गेली असे म्हणावे लागेल.
संविधान राष्ट्रीय ग्रंथ असावा असे जर तुमचे म्हणणे असेल तर त्याचा प्रचार करणे हे खरे काम आहे. तुमची स्वतःची पुस्तके, अभ्यासक्रम, कार्यक्रम असा काही नाही का? समाजशास्त्र, मानसशास्त्र, आर्थिक हितसंबध यांचा अभ्यासकरून तो लोकांना समजेल अशा शब्दात सांगितला पाहिजे. जे केवळ पोटाला देतात म्हणून, त्यांची ‘जय’ म्हणाणारे, कोट्यावधी लोक आज या देशात आहेत. मग ते कोणत्याही देवा-धर्माची ‘जय’ म्हणणारे असोत किंवा राजकारण्यांची ‘जय’ म्हणणारे असोत, त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे? त्यांच्याबद्दल राज्यघटनेची काय भूमिका आहे? आणि ती तुम्हाला मान्य आहे का? संविधानातील सर्व गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का? त्या संदर्भात स्वतःची चिकित्सा तुम्ही केलीत का? अजूनही लोकांचे तुमच्याबद्दल काही प्रश्न, शंका आहेत ते त्यांना विचारायला हवेत, त्यांची उत्तरे द्यायला हवीत. माहीत नसतील तर शोधायला हवीत.
तुम्ही घटना मानता, त्या घटनेने सर्व नागरिकांना धर्मपालनाचे व धर्म प्रचाराचे स्वातंत्र दिले आहे. त्याच प्रमाणे तुमचा जो काही विवेकी, मानवता, समता, बंधुता मानणारा सार्वजनिक सत्य धर्म असेल त्याचे तुम्ही पालन करा. त्याचा प्रचार करा. त्याचे स्वातंत्र घटनेने तुम्हालाही दिलेले आहे. मग दुसऱ्यांना विरोध करण्यात तुमची शक्ती का वाया घालवता? समाज बदलावा असे वाटत असेल तर तुमच्या धर्माची मुल्ये, तत्वे तुमच्या जीवनात ठळकपणे दिसायला हवीत. केवळ तुम्ही म्हणता म्हणून, त्यांचा धर्म वाईट, तुमचा धर्म चांगला, हे लोक कसे मान्य करतील.
“जाती अंत झालाच पाहिजे” अशा घोषणा आपण देतो, तेव्हा आधी आपण ती सोडली पाहीजे. जाती-अंताच्या प्रक्रियेतही सवर्णांनीच पुढारीपण करावे अशी अपेक्षा का आहे ? सगळ्यांनाच नास्तिक होणे शक्य नाही हे मान्य, पण मग किमान सरकारी नोंदीत तरी आपण निधर्मी आहोत हो नोंदवले पाहिजे. सरकारला जर आकड्यांची भाषा कळत असेल तर त्यांच्या दफ्तरी निधर्मी लोकांचा आकडा वाढताना दिसायला हवा. जर तुमचा तुमच्या देवावर खरंच विश्वास असेल, तर स्वर्गाच्या दारात जात-धर्माचे सरकारी प्रमाणपत्र मागणार नाहीत, या बाबत तरी तुम्हाला नक्कीच खात्री असायला हवी. धर्म ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे, हे पुरोगामी, विवेकी आस्तिकानेच दाखवून द्यायला हवे.
पुरोगामी लेखक, विचारवंतही, ‘दुसरे कोणीतरी परिस्थितीस जबाबदार आहेत’ अशी विधाने करताना दिसत आहेत. एखादी टेस्टट्युब बेबी अवतार घेऊन भारत जात-धर्ममुक्त करेल अशी आशा करत आहेत. कोणीही समाज बदलासाठी एक सामान्य माणूस म्हणून वाचकाने काय-काय करणे शक्य आहे, हेही स्पष्टपणे सांगत नाही. राजकारणी हे समाजातील वाऱ्याप्रमाणे दिशा बदलणारे असतात. त्यांच्याकडून दिशादर्शनाची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे. राजकारण्यांवर टीका करून वाचकांची फक्त करमणूक होते व लेखकाचे कौतुक. यात आपलीही काही भूमिका आहे असे कोणालाच वाटताना दिसत नाही. वाचकाला द्यायच्या कडू गोळीला गोड मुलामा म्हणून राजकारण्यांवरील टीका ठीक आहे पण त्याचे प्रमाण तेवढेच हवे.
माफ करा…!
मी कडू गोळी तशीच दिली. गोड मुलामा न देता, हे खंरतर आधीच सांगायला हवे होते. पण गोड गोळ्या देणारे तुम्हाला बरेच भेटतील. तुम्ही त्या खालही आणि हा कडवटपणा विसरूनही जाल.