मी ललित किंवा तत्सम साहित्य क्वचितच वाचले आहे. श्री भालचंद्र नेमाडेंना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या लेखनाच्या साहित्यिक आणि सामाजिक मूल्यांची अधिक चर्चा होणार आहे. कला मूल्यांपेक्षा मी कलाकृतीच्या सामाजिक परिमाणाला अधिक (कदाचित अवास्तव) महत्त्व देतो. परंतु प्रत्यक्ष लिखाण न वाचता (आणि तसे परिश्रम न घेता) काही एक सर्वसाधारण स्वरुपाचे विचार व्यक्त करता येतात.
नेमांडेंचा स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट आहे – “मी परंपरेचे जे समर्थन करतो ते नीरक्षीरविवेकाने परंपरेचा अर्थ लावण्याच्या बाबतीत म्हणतो आहे. कुठल्याही माणसाला तो ज्या घरात जन्मतो, ज्या धर्मात जन्मतो, ज्या प्रदेशात जन्मतो, तिथली शेकडो वर्षांची परंपरा त्याला आपसूक वारशाने मिळते. ही परंपरा अनेक विद्वान, बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी वैचारिक मंथन करून आणि संघर्ष करून घडवलेली असते. त्यातले स्वत्व कोणते आणि फोलपटे कोणती, हे ज्याने त्याने ठरवायचे असते. त्यानुसार परंपरेचा धागा पुढे नेणे अपेक्षित असते. या अर्थाने मी परंपरेचे महत्त्व मानतो, याचा अर्थ परंपरेतल्या हीन गोष्टींना माझा पाठिंबा आहे, असे मानणे चुकीचे आहे”. (भालचंद्र नेमाडे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त अनौपचारिक गप्पा, लोकसत्ता 31 मे 2013)
‘ही परंपरा अनेक विद्वान, बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी वैचारिक मंथन करून आणि संघर्ष करून’ घडविली हे त्या काळाला सापेक्ष आहे. ‘त्यातले स्वत्व कोणते? यानुसार परंपरेचा धागा पुढे नेणे’ या विचारांमध्ये ‘जरुर तेथे आणि आवश्यक तर ती नाळ साफ तोडून टाकणे, वेगळीच किंवा विरुद्ध दिशा स्वीकारणे’ याला स्थानच नाही असेच सूचित होते.
“भाजपचा देशीवाद आणि मी मांडत असलेला देशीवाद यांच्यात कुणीही गल्लत करू नये” असे ते म्हणतात (कित्ता). ते विवेकापेक्षा प्रादेशिकतेलाच महत्त्व देतात, त्यामुळे भावनिकतेचे उदात्तीकरण संभवते.
‘हिंदू कादंबरी प्रसिद्ध झाल्यापासून घेतला जाणारा एक नवीन आणि महत्त्वाचा आरोप म्हणजे या कादंबरीत त्यांनी सरळसरळ प्रतिगामी भूमिका घेतली आहे. आधुनिकतेला विरोध ठीक आहे , पण त्यासाठी त्यांनी जातिव्यवस्थेचे उदात्तीकरण करून कालचक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न केला आहे’ असेसुद्धा त्यांच्याबाबत म्हटले गेले आहे. (-डॉ. आशुतोष दिवाण, महाराष्ट्र टाईम्स, 27 ऑक्टोबर 2013)
आज आपणाला काय हवे? हे महत्त्वाचे असते. जुन्या विचारात एखादी बाब चांगली आहे असे आज जाणवत असेल तर ती स्वीकारण्यात काहीच अडचण येऊ नये. पण जुन्या विचारांची ओढाताण करुन आज आवश्यक विचारांशी सुसंगत ते आहेत असे भासविण्याचा प्रयत्न नको.
आधाराचे खांब तंतोतंत लंबरुप असणे समजा झोपडीला किंवा एक मजली इमारतीला आवश्यक नसेल पण, जसजसे इमले चढत जातात तसतसे काटेकोरपणा आवश्यक होत जातो. समाज अधिकाधिक काळ निकोप ठेवावयाचा असेल तर काटेकोर, चिकित्सक आणि संशयात्मा असणे अपरिहार्य असते. तसेच ही सामाजिक व्यवस्था कोणत्या विचारांना आणि किती प्रमाणात प्रोत्साहन देते, उचलून धरते याची चिकित्सा जात, धर्म, प्रदेश, राष्ट्र अशा चौकटीबाहेर जाऊन करणे गरजेचे होते.