‘‘या प्रकारच्या मासिकाला वर्गणीदार मिळतात तरी किती?’’ हा बहुधा ‘आजचा सुधारक’बद्दल सर्वांत जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न असावा. आपल्या आजवरच्या पंचवीस वर्षांत ‘आसु’ने एखाददोन वर्षे नऊशेचा आकडा ओलांडलाही, पण प्रातिनिधिक वर्गणीदारसंख्या मात्र सातशे ते आठशेच मानायला हवी. याशिवाय चाळीसेक अंक वृत्तपत्रे व समविचारी नियतकालिकांना पाठवले जातात, पंचवीसतीस अंक संपादकांमध्ये वाटले जातात आणि सत्तरेक ज्यादा प्रती बांधीव खंडांसाठी छापल्या जातात. म्हणजे ‘प्रिंट ऑर्डर’चा प्रातिनिधिक आकार आठशे अधिकउणे पन्नास असा असतो.
बहुतेक वेळा साताठशे हा आकडा ऐकल्यावरची प्रतिक्रिया डोळ्यांत तुच्छता, आणि एखादा अस्पष्ट हुंकार, अशी असायची. अपवादानेच कोणी, ‘‘अरे व्वा! वैचारिक मराठी मासिकाला आठेकशे वर्गणीदार! यू हॅव अराईव्हड!’’ असे मनापासून म्हणून जाई!
मासिक कसे असावे यावर संस्थापक संपादक दि.य.देशपांडे यांनी एप्रिल १९९८ मध्ये लिहिलेल्या काही सूचना नोंदतो. ह्या सूचना त्यांनी संपादकपद सोडताना केलेल्या आहेत. (अंक ९.१, पाने ३-४)
मासिकाचे स्वरूप व धोरण गेली आठ वर्ष राहिले तेच राहावे. उदा.त्यात जाहिराती घेऊ नयेत. देणग्या मिळविण्याचे प्रयत्न करू नयेत. विशेषतः ज्यामुळे आपल्याला किंचितही मिंधेपणा येईल अशा देणग्या अनाहूत आल्या तरी स्वीकारू नयेत.
मासिकाचे गेल्या आठ वर्षांत एक विशिष्ट रूप बनले आहे. त्याला एक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असून त्याला एक दर्जा आहे. या दोन्ही गोष्टी कायम राहाव्यात. मासिकाला वर्गणीदार फार नाहीत हे खरे आहे. पण केवळ वर्गणीदार वाढावेत म्हणून त्याचा दर्जा खाली आणू नये. तसेच ते रंजक करण्यकरिताही त्यात फारसा बदल करू नये.
मासिकाचे स्वरूप विवेकवादी आहे. केवळ विवेकवादाला वाहिलेले दुसरे मासिक महाराष्ट्रात नाही असे मला वाटते. ते त्याचे वैशिष्ट्ये टिकवून ठेवावे. त्याचा कटाक्ष श्रद्धेचा उच्छेद, विचार आणि जीवन यात विवेकावर भर देणे, जीवनाच्या विविध क्षेत्रांत समंजसपणा, विवेकीपणा अंगी बाणेल असे प्रयत्न यावर असावा. लोक पूर्ण इहवादी होतील अशी आशा करणे भाबडेपणाचे होईल. पण तरीही विवेकवाद जितका वाढेल तितका वाढविण्याचा प्रयत्न करावा.
मासिकाचे धोरण व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि समतावादी राहिले आहे. सर्व मानव समान आहेत, त्यात स्त्रियांचाही समावेश आहे. तसेच त्याचा विज्ञानावर भर असावा. वैज्ञानिक दृष्टी अंगी बाणेल असा प्रयत्न करावा. विज्ञानाच्या विकृतीपासून सावध राहावे.
आपले मासिक सामान्य नाही. ते एका हेतूने, एका ध्येयाने प्रेरित झालेले आहे. ते तसेच राहावे, त्यामुळे ते केवळ विद्वानांकरिताच, किंवा विवेकवाद्यांकरिताच आहे अशी टीका कोणी केली तरी हरकत नाही. विद्वानांकरिताही मासिक चालवणे महत्त्वाचे आहे.
राजकीय विषय आपल्याला वर्ज्य नाहीत. पण सर्व राजकीय घडामोडींचा समाचार आपण घेतला पाहिजे असे नाही. ज्याने बुद्धी सुसंस्कृत होईल असे काहीही वर्ज्य नाही.
यांतील प्रत्येक सूचना पुढील संपादकांनाही पटलेली आहे, व ती पाळायचे प्रयत्नही केले गेले आहेत. कधीकधी अगदी मूलभूत पातळीवर संपादकांनाही प्रश्न पडत. स्वतःच्या भूमिकांबद्दल शंका वाटत. याचे सुंदर आणि विवेकी उदाहरण प्र.ब.कुळकर्णी यांच्या जानेवारी २००८ च्या संपादकीयात भेटते. खरे तर ते पूर्णच संपादकीय वाचनीय आहे, पण लांबण लावल्याचा आरोप टाळायला काही उतारेच फक्त देतो. (आ.सु. १८.१०, पृ.४३५-४३८,)
१. कधी कधी तुम्ही समजता तो विवेकवादच नाही असे उद्गारही कोणी काढतात. ‘‘तुमच्या विवेकवादात भलेही ते बसत असेल. हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग आहे.’’ म्हणूनही मतभेदांची वाट लावली जाते. ज्याला ग्यानबाचा विवेकवाद म्हणता येईल तो काय असेल बरे?
विवेकवाद ही नैतिक आचरणामागची विचारसरणी आहे, हे उघड आहे. आपण विवेकाने वागावे हे म्हणणे विवेकवाद आहे. विवेक म्हणजे भेद करण्याची शक्ती. सार-असार, सत्य-असत्य, सद्-असद् विवेक – करून वागले पाहिजे. म्हणजे जे रूढीने आले तेच भले असे मानू नये. परंपरेची चिकित्सा करावी.‘बाबावाक्यं प्रमाणम् असे करू नये. धर्म-शास्त्र म्हणून जे चालत आले त्याचीही शहानिशा करावी. बुद्धी वापरावी. आंधळेपणाने, आपली वडिलोपार्जित विहीर आहे म्हणून खारट असले तरी तिचेच पाणी प्यावे – असे बिनडोकपणे ठरवू नये.
२. लग्नकार्य ही घरगुती बाब आहे. ज्याची त्याने ती साधेपणाने पार पाडावी असे मत असणारा सुधारक ज्या लग्नात थाट-माट, उधळपट्टी आहे तेथे हजेरी लावतो. ती त्याने लावावी की नाही? सामाजिक शिष्टाचार म्हणून सामील व्हावे की बहिष्कार करावा? स्वतःच्या मुलाबाळांच्या लग्नकार्यात शेकडो हजारो आमंत्रितांच्या मेजवान्या उठवाव्यात हे विवेकात बसते का? सुधारकी साधेपणाच्या पुरस्कारात बसते का? ‘नाही’ हे सत्वर उत्तर उग्र विवेकवादी देईल. अनुग्र म्हणेल – ह्या सुधारकाचा उद्योग-व्यवसाय असा आहे. की त्याचा हजारो लहानमोठ्यांशी नित्यसंबंध येतो. त्यांच्या कार्यप्रसंगात ह्याला जावे लागते. त्यामुळे आपल्या घरच्या कार्यात त्याला इतरांना बोलवावेच लागते.म्हणून त्याचे वागणे क्षम्य समजावे. कारण त्याची वृत्ती पूर्णपणे विवेकवादी आहे.
३. निष्कर्ष हा की विवेकवाद हा एक मार्ग आहे. त्यावर वाटचाल करून काही पुष्कळ पुढे गेलेले असतील. काही चार पावले चालले असतील. मनोमन पटलेले तसेच जीवनात आणण्याचा, आचरण्याचा प्रयत्नही त्या त्या प्रमाणात प्रशंसनीय म्हणावा लागेल.
‘आपण विवेकाच्या वाटेवर एकतरी पाऊल टाकले आहे का?’ हा खरा प्रश्न आहे.
या संपादकीयात प्र.ब. कुळकर्णी उग्र विवेकवादी व अनुग्र विवेकवादी असा एक महत्त्वाचा भेद करतात. तो आणिकही पातळ्या पिंजून विस्तृत केला जाऊ शकतो. एखादी व्यक्ती निरीश्वरवादाबाबत उग्र आणि त्याचवेळी स्त्री-पुरुष समतेबाबत अनुग्र असू शकते. एखादी व्यक्ती जात्यंताबाबत उग्र आणि त्याचवेळी अर्थव्यवस्थेवर समाजाचे नियंत्रण असणे-नसणे याबाबत अनुग्र असू शकते. अखेर माझा निष्कर्ष असा निघतो, की विवेकवाद एकोत्तरी नाही. त्यात विविध छटांची मते सामावून घेता येतात, असा तो बहुआयामी रंगपट आहे.
आणि बहुतेक जण आपला भूमिकांचा संचच कसा नेमका विवेकी आणि विवेकवादी आहे ते ठसवू पाहत असतात. त्यामुळे उग्रमताचे लोक अनुग्रांवर बोटचेपेपणाचा आरोप करत असतात, आणि उलट दिशेने अनुग्र ते उग्रमतवाद्यांवर सनातनीपणाचा आरोप करत असतात. ‘आजचा सुधारक’चा वाचकवर्ग बहुशः विवेकी आणि विवेकवादीच होता/आहे. त्यामुळे त्यात उपजणारे आणि लढले जाणारे वादही बहुशः यादवी युद्धांसारखेच तीव्र असत! नागपूरकडे भावाभावांमधल्या भांडणांबद्दल म्हणतात, ‘‘माही भीत (भिंत) पडली तरी चालंल, त्याआची मेंढी मेली पायजे!’’. तर पूर्ण ताकदीनिशी घातले, खेळले, लढले जाणारे वाद, हा ‘आसु’चा लक्षणगुण होत गेला.
मीही इतर संपादकांप्रमाणेच अशा वादांमध्ये चार दिले, चार घेतले आहेत. सध्याचे कार्यकारी संपादक प्रभाकर नानावटी यांना अशा वादांवरही एक लेख हवा होता, परंतु मला तो लिहवत नाही. वाद झडले तेव्हा अर्थाच ते दुखले होते; पण आज मात्र मनातल्या मनात मिष्किल हसूनच ते आठवले जातात. थोडक्यात काय, तर विवेकवादी जसे हसतात, रडतात, तसेच ते आपसात भांडतातही; आणि तेही विवेक व युक्तिवादाची सर्व उपकरणे व आयुधे वापरून!
आज मात्र विवेकवाद्यांमधली आपसातली घरगुती भांडणे, वाद, मतभेद; ही इतक्या सोज्वळ, सुस्वभावी तऱहेने स्वीकारावी अशी बाब उरलेली नाही.
गेल्या पंचवीस वर्षांत अविवेक सातत्याने समाजाचे जास्तजास्त भाग व्यापू लागलेला आहे. आपले ‘विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मासिक’ परिणामशून्य ठरले आहे. पर्यायी पद्धतींची गरज सातत्याने आणि निकडीने जाणवते आहे. काही जुनेच मुद्दे पुन्हा नोंदतो.
हा राष्ट्रवाद नव्हे!
सर्वंकष सत्तावादाचा, totalitarianism चा, कट्टर द्वेष्टा आणि विश्लेषक जॉर्ज ऑर्वेल याने ऑक्टोबर १९४५ मध्ये ‘पॉलेमिक’ या नियकालिकासाठी ‘नोट्स ऑन नॅशनॅलिझम’ नावाचा एक लेख लिहिला. त्याचे संक्षिप्त भाषांतर ‘आसु’ने जुलै ‘०४ व ऑगस्ट ‘०४ च्या अंकांमध्ये प्रकाशित केले (अंक १५.४ व १५.५). त्यातील महत्त्वाचा अंश असा –
मुळात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इंग्रज बुद्धिजीवी-विचारवंत वर्गाचे पूर्वग्रह दाखवणारा हा लेख जे ‘गुणधर्म’ नोंदतो, ते आजच्या भारतीय स्थितीत अनेकानेक वर्गांना लागू पडतात. ब्राह्मण्यवादी/मनुवादी, ब्राह्मणेतरवादी/दलितवादी, हिंदुत्ववादी, इस्लामवादी, विज्ञानवादी, अध्यात्मवादी, स्त्रीवादी, पितृसत्तावादी, स्थितिवादी, परिवर्तनवादी, गांधीवादी, लोहियावादी – सर्व, सर्व विचारधारांच्या पाईकांमध्ये ‘नॅशनॅलिझम’चे दोष आढळतात.
ही ऑर्वेलच्या लेखावर संपादकीय टिप्पणी आहे.
नॅशनॅलिझमची देशभक्तीशी गल्लत करू नये. या दोन कल्पना इतक्या सैलपणे वापरल्या जातात की कोणतीही व्याख्या चुकीची ठरवता येते. पण या कल्पनांमध्ये फरक करायलाच हवा, कारण त्या कधीकधी एकमेकांविरुद्ध भावभावनांनाही जन्म देतात. एखादे भौगोलिक क्षेत्र किंवा एखादी जीवनपद्धती सर्वोत्कृष्ट आहे असे मानूनही इतरांना त्या क्षेत्राखाली आणण्याची किंवा इतरांवर ती जीवनपद्धती लादण्याची इच्छा नसणे, ही झाली देशभक्ती. सांस्कृतिक किंवा सैनिकी दृष्टीने ही बचावात्मक भावना आहे. नॅशनॅलिझमला मात्र सत्तेच्या आकांक्षेपासून वेगळे काढता येत नाही. प्रत्येक नॅशनॅलिस्ट आपल्या निष्ठास्थळाशी समर्पित भावाने जोडलेला असतो. त्या निष्ठास्थळाचे महत्त्व वाढवणे आणि प्रसार करणे यातच त्याच्या जीवनाचा हेतू असतो.
जेव्हा हा शब्द जर्मनी-जपानसारख्या देशांतील बदनाम चळवळींना लावला जातो तेव्हा हे सारे उघड असते. नाझीवादासारख्या प्रकाराबद्दल आपण ‘बाहेरचे’ लोक साधारणपणे सारख्याच गोष्टी पाहून एकसारखीच मते घडवतो. पण मी नॅशनॅलिझम हा शब्द एका वेगळ्या, विस्तारित अर्थाने वापरतो. त्यात कम्यूनिझम, राजकीय कॅथलिसिझम, झिअनिझम (ज्यू-वाद), अँटिसेमिटिझम (ज्यू-द्वेष), ट्रॉट्स्कीइझम, युद्धविरोधवाद, हे सारेच बसते. त्यात एखाद्या सरकाराला किंवा देशाला – विशेषतः स्वतःच्या देशाला – निष्ठा वाहिल्या जात नाहीत. कधीकधी तर ज्याला निष्ठा वाहिली जाते तो घटकच अस्तित्वात नसतो- जसे, ज्यूअरी, इस्लाम, ख्रिश्चनडम, प्रोलेटारियट (कामगारवर्ग), श्वेत वंश, या कल्पना पहा. त्या तीव्र भावना जागवतात, पण मुळात तसे काही आहे यावरच गंभीर प्रश्नचिन्हे आहेत. त्यांच्या सर्वमान्य व्याख्याही नाहीत.
हेही जाणायला हवे की नॅशनॅलिझम ही वृत्ती फक्त कशाच्या तरी विरोधातही असू शकते. जसे, ट्रॉट्स्कीवादी कशाच्याही पक्षाचे नसून फक्त सोव्हिएत रशियाविरोधी असतात. नॅशनॅलिझमचा माझा वापर समजायला हे अंग समजून घेणे आवश्यक आहे. नॅशनॅलिस्ट फक्त स्पर्धात्मक विचार करतात, कशाचा तरी किंवा कशाच्या विरोधाचा तरी. आपल्या निष्ठास्थळाच्या स्तुतीसाठी किंवा आपल्या द्वेषस्थळाच्या हानीसाठी ते आपली मानसिक क्षमता वापरतात. त्यांचे विचार नेहमी जय, पराजय, मान, मानहानी यांभोवतीच फिरतात. त्यांना इतिहास, विशेषतः समकालीन इतिहास, वेगवेगळ्या शक्तिस्रोतांच्या चढउतारांमधूनच दिसतो. जगातली प्रत्येक घटना आपल्या निष्ठास्थळ/द्वेषस्थळाला पूरक-मारक रूपातच दिसते.
तर या नमुन्याची नॅशनॅलिझम जगभर वाढत आहे, आणि भारतात तर ती सरासरीच्या जास्त वेगाने वाढत आहे, नुकताच इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये झालेला खऱ्याखोट्या स्मरणरमणाचा तमाशा याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक पुनरुज्जीवनवादी नॅशनॅलिझम आपल्या ‘उज्ज्वल भूतकाळा’वर गुलाबी किरण फेकतच सुरू होतो. नंतर मात्र झपाट्याने ती ऑर्वेलच्या शब्दांत, ‘‘त्यांचे विचार नेहमी जय, पराजय, मान, मानहानी यांभोवतीच फिरत राहतात.’’ या पातळीला पोचते.
यातून उपजतात ‘अॅलर्जीज’ (allergies). मुळात फारशा धोकादायक नसलेल्या खऱ्याखोट्या अतिक्रमणांवर शरीराची प्रतिरक्षाव्यवस्था (immune system) तुटून पडणे म्हणजे अॅलर्जी कार्यान्वित होणे. तर सगोत्री व आंतरजातीय विवाहांविरुद्ध फतवे काढणाऱ्या जातपंचायती व खापपंचायती, लव्ह जिहाद प्रकरण, ही सारी अॅलर्जीची उदाहरणे आहेत.
यांतूनच उपजतो रक्ताचा कॅन्सर, ऊर्फ ल्यूकेमिया (leukemia), ज्या रोगात अपक्व पांढऱ्या रोगनिवारक पेशींचे बेसुमार उत्पादन होऊन शरीरातले रक्ताचे चलनवलनच बंद पडते. कोठल्यातरी काही शतके जुन्या काल्पनिक अपमानाचा सूड घेण्याचे बाबरी मशीद प्रकरण, हे माझ्या मते असे उदाहरण आहे. अपक्व, अशिक्षित करसेवकांनी आपल्या वृत्तीने समाजशरीरात प्राणवायू खेळवण्याचे समाजरक्ताचे व्यवहारच त्या घटनेने धोक्यात आणले.
अशा अॅलर्जीज व रक्त-कर्करोग कार्यान्वित करणे हा संधिसाधू तुच्छतावाद आहे. हा राष्ट्रवाद नव्हे!
मूल्यऱ्हास
आजच्या (२५ जाने.२०१५) वृत्तपत्रांमध्ये एक बातमी आहे, ‘‘राज्यात नऊ नवी शहरे व सहा नवे विमानतळ उभारणार!’’ सध्या भारतात विकासपर्व सुरू आहे. सकल राष्ट्रीय उत्पाद (GDP) झपाट्याने वाढणार आहे. ‘मेक इन इडिया’ योजनेमुळे प्रचंड प्रमाणात थेट परकी गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यात भारताला चीनपेक्षा जास्त यश मिळणार आहे. नव्या पर्यावरण धोरणांमुळे पर्यावरणवादी विकासात खीळ घालू शकणार नाहीत. नव्या भूसंपादन कायद्यांमुळे शेतकरी उद्योगांना जमीन देण्यात खोडे घालू शकणार नाहीत. नव्या औद्योगिक श्रमविवाद कायद्यांमुळे बेताल यूनियनबाजीला लगाम घातला जाईल. इत्यादी, इत्यादी.
GDP वाढायला हवा, त्यासाठी तात्पुरती तरी FDI ची गरज पडेल, हे कोणीच नाकारू शकत नाही. पण सोबतच धनदांडग्या, हावरट उद्योजकांना पर्यावरण-विध्वंसापासून दूर ठेवणे, शेतकऱ्यांची जमीन जोर-जबरीने कोणालाही घेऊ न देणे, कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवणे, ह्यांची आवश्यकताही कोणी नाकारू शकत नाही. आणि या व्यवहारांमध्ये सरकारची भूमिका ठामपणे दुर्बलांच्या पक्षाकडूनच असायला हवी.
जेम्स मिल् आपल्या ‘ऑन गव्हर्नमेंट’ या निबंधात म्हणतो, ‘‘माणसांचा आपल्या आकांक्षापूर्तीसाठी दुसऱ्याचे हिरावून घेण्याकडे कल असतो. यामुळे काही थोडे लोक व त्यांचे प्रतिनिधी वगळता सर्वांची लूट केली जाणे अपरिहार्य क्रमाने घडते. ज्यांचे हिरावून घेतले जाते त्यांना जेमतेम जगणे शक्य होईल अशा स्थितीत लोटले जाते, येवढेच नव्हे तर त्यांना तीव्रतम भीतीला सामोरे जावे लागेल असे क्रौर्य दाखवले जाते. हे माणसांच्या स्वभावातले तत्त्व हा राज्यशासनाच्या आवश्यकतेचा पाया आहे.’’
आणि आज प्रचलित केले जात असेलेले विकासाचे प्रतिमान राज्यशासनाची पायाभूत आवश्यक तत्त्वे न पाळता ‘काही थोडे लोक व त्यांचे प्रतिनिधी’ यांचीच धन करणारे आहे, असे माझे मत आहे. ही भूमिका स्पष्ट करणारे ‘आसु’तील लेख संख्येने खूप आहेत; इतके, की त्यांचा केवळ उल्लेख करणेही इथे अशक्य आहे. आता ही भूमिका डावी, मार्क्सिस्ट आहे का? बहुधा हो. आजच्या सर्व प्रस्थापितेतर मतांना ‘मार्क्सिस्ट’ म्हणण्याच्या काळात तर नक्कीच हो!
पण या ‘मार्क्सिझम’ला पर्याय आहे तो GDP-FDI वाढवण्याला केंद्रस्थान देण्याचा, ज्याने सर्व मानवतावादी आणि मानवी मूल्ये वाऱ्यावर सोडली जातात. आणि तसे करणे विवेकी वागण्यात बसवता येते, असे मला वाटत नाही.
परंतु आज केवळ GDP-FDI ना केंद्रस्थान देऊ नये, तर इतर मूल्यकल्पनांसोबतच, त्यांच्या मर्यादांतच या बाबी वाढवायचा प्रयत्न करावा, असे म्हणण्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटतात. ‘‘मग काय तुम्हाला राहुल गांधी पंतप्रधान होऊन हवा आहे?’’, किंवा ‘‘मग मेधा पाटकरला पंतप्रधान करा, म्हणजे तुमच्या आत्म्याला शांती मिळेल!’’, अशा ठार अविवेकी प्रतिक्रिया येतात.
थोडक्यात म्हणजे विकास, तोही GDP केंद्रित विकास, याला पर्याय शोधणेही आज अमान्य केले जात आहे. आणि अर्थातच नऊ नवी शहरे व सहा नवे विमानतळ ह्यांना विकास न मानणे, हा वेडेपणाच आहे!
सर्वाधिकांचे सर्वाधिक भले चाहणे, हा उपयोगितावाद. त्या धूसर हिशोबांत सर्व माणसांना सारखेच मानणेही आलेच. ‘‘काय आहे?’’ या प्रश्नासाठी विज्ञान वापरावे, आणि ‘‘काय घडणे चांगले?’’ हे तपासायला उपयोगितावाद वापरावा, ही दि.य.देशपांड्यांची भूमिका.
‘माझ्या जीवनाचे तात्त्विक अधिष्ठान’ या लेखात बाबासाहेब आंबेडकरांचे मत ‘आसु’ने पुन्हा एकदा मांडले (अंक १८.७).
माझ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचे आहे. पण त्याबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरते. माझ्या तत्त्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे. तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मात्र मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे.
माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणूनच फक्त कायदेकानूंचे स्थान गृहीत धरलेले आहे. पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य व समतेचा भंग (होण्या)बाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही. मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो; कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव अथवा मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा वा सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो; याउलट सहभाव अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते.
आज वेगळेच तात्त्विक अधिष्ठान असणाऱ्यांचे बहुमत आहे. परंतु याने ‘आजचा सुधारक’चे तात्त्विक अधिष्ठान डळमळीत होण्याचे कारणही नाही व तशी शक्यताही नाही.
गेल्या तीन अंकांमधून मला माझ्या अनुभवांतून, निरीक्षणांतून, वाचनातून जाणवलेले सत्य मांडले. तो होता तुकारामांच्या एका प्रसिद्ध वचनाचा पूर्वार्ध.
सत्य असत्याला मन केले ग्वाही.
मन केले ग्वाही : (भाग एक) खिळखिळी लोकशाही
मन केले ग्वाही: (भाग दोन) प्रजा अडाणीच ठेवावी!
मन केले ग्वाहीः (भाग तीन) पिठामिठाचे दिवस
आता या लेखातून उत्तरार्ध मांडतो आहे.
नाही मानियले बहुमता.
vidya_nand@hotmail.com
आ. सु. – देशपांडे – आणि मंडळींचे हे काम थोर आहे याबाबत वादच नाही. फारच महत्त्वाचे काम. मी एके काळी वर्गणीदार होते; माझ्या आयुष्यात, घडणीत मोलाचे योगदान. दि. य. यांचे मुंबईत एक व्याख्यान ->’युक्तिवादाची उपकरणे’ आणि नंतर आ.सु.
प्रा रा भा पाटणकर तुमच्या भूमिकेस ‘यथार्थतावादी’ म्हणाले होते – मुंबई विद्यापीठ, एम्. ए.’चा तास. तुमच्या कामाचे महत्त्व त्यांना कमी करायचे नव्हते; मलाही ते कमी करायचे नाही. विवेकवाद आणि यथार्थतावाद यांत भेद करण्यास राभापा यांनी शिकवले, असे मला वाटते.
नमस्कार.