आपण एका राष्ट्राचे, समाजाचे, एका समूहाचे एक घटक या दृष्टीने स्वत:कडे पाहावे हा संस्कार आमच्या मनावर नाही. या दृष्टीने आम्ही स्वत:कडे पाहात नाही. एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण व्यक्ती अशा दृष्टीने आपण स्वत:चा विचार करतो. आपली स्वत:ची उन्नती, परिणती, पूर्णता, मोक्ष ही गोष्ट सर्वस्वी समाजनिरपेक्ष आहे, अशी आमची बाल्यापासून वार्धक्यापर्यंत भावना असते व तद्नुसार आपले वर्तन असते.. आज शेकडो वर्षे आमच्या जीविताचे वळणच असे आहे; त्याची घडणच तशी झालेली आहे. आम्ही स्वकेंद्रित आहो. समाज हा आमच्या अवलोकनाचे केंद्र नाही. त्यामुळे समाज म्हणून जगण्याची विद्या आम्हांला हस्तगत करता येत नाही. स्वार्थ, लोभ, दुष्टपणा, मत्सर यांमुळे माणूस स्वकेंद्रित होतो ते निराळे; त्यामुळे समाजाची हानी होतच असते. पण आम्ही वरच्या पायरीवर गेलो, निर्लोभ झालो तरी आमची दृष्टी अशी स्वकेंद्रित असते. आणि त्यामुळे वैयक्तिक सद्गुणांची संपादणी उत्तम करूनही श्रेष्ठ समाजधर्म व ते सद्गुण यांचा समन्वय घालण्याची दृष्टी नसल्यामुळे आमच्या सद्गुणांतूनही विपरीत अनर्थ निर्माण होतात.
”दुर्गुणांमुळे समाज विघटित होणे हे नेहमीचेच आहे; पण आपण सद्गुण म्हणून ज्यांची जोपासना करतो त्यांतूनच आपल्या समाजविमुख, आत्मकेंद्रित दृष्टीमुळे अशी चमत्कारिक मूल्य निर्माण होतात, की त्यांचा परिणाम विघातक व्हावा!.. कोणतेही कृत्य करताना, कोणतेही धोरण ठरविताना आपल्या अखिल समाजाचे चित्र डोळ्यांपुढे ठेवावे, अखिल समाजाच्या जीवनाचे आपण अंशभागी आहो ही जाणीव मनात ठेवावी, असा संस्कार भारतीय मनावर गेल्या सातशे-आठशे वर्षांत झालेलाच नाही.. वैयक्तिक जीवनात परमोच्च बिंदू गाठण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असताना सांघिक जीवनात आम्ही सर्वत्र नामोहरम होतो ही दु:खद स्थिती म्हणजे आपल्या पूर्वीच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक आहे.. आपण एकमेकांच्या सान्निध्यात आलो की अपूर्णाकाचा गुणाकार तयार होतो.’
पु. ग. सहस्त्रबुद्धे