कुटुंबसंस्था: काही प्रश्न

आजचा तरूण अस्वस्थ आहे, असंतुष्ट आहे. बेभान आहे, बेदरकार आहे, बेजबाबदार आहे हिसंक आहे, विध्वंसक आहे. त्याला कोणतीही बंधने नकोत. त्याला मुक्ती हवी आहे पण ही अराजकवादी मुक्ती आहे. हा बेबंदपणा आहे. हे आजच्या समाजशास्त्रज्ञांचे तरूणाचे विश्लेषण आणि हा राज्यकर्त्याच्या, त्याच बरोबर आईवडिलांच्या डोक्याच्या काळजीचा विषय. उपाय अनेक सुचविले जातात, तरूणांना विधायक कार्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. खेड्यात पाठविले पाहिजे. त्यांची उसळती युवाशक्ती सृजनासाठी वापरली पाहीजे. तरूणांने राजकारणात पडू नये सरकारी पातळीवर विद्यापीठातून ह्या युवाशक्तीला बांध घालण्याचे प्रयत्न होतात. आईवडिलाकंडून पैशाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न होतो. मुले आईवडिलांना जुमानत नाहीत. ‘ जनरेशन गॅप’ (पिढ्यामंधील अंतर) वाढते आहे का? अशा चिंतेच्या सुरांमध्ये परिसंवाद होतात. कुटुंबांचा पूर्वीचा सुरळीतपणे चालणारा गाडा आता कुरकुरू लागला आहे याची सर्वांना जाणीव होते. आणि आजचा तरूण असा अस्वस्थ का याच्या कारणांचा शोध घेता घेता दोन ठिकाणी त्याची मुळे रूजली असल्याची पक्की खात्री पटते. शिक्षणव्यवस्था बदलली पाहिजे, शिक्षणातून संस्कार चांगले झाले पाहिजेत. आणि कुटुंबजीवन सुधारले पाहिजे. माणसाच्या मनावर पहिले घाव बसतात ते येथेच.
कुटुंब व्यवस्था आदर्श असली पाहिजे. मुलांची मने तेथे घडविली जातात असे आमचे समाजशास्त्र टाहो फोडून सांगतात. प्रत्यक्ष कुंटुबात मात्र वेगळे चित्र दिसते. बाहेर लोकशाहीचा आदर्श सांगणारी समाज व्यवस्था कुटुंबात मात्र ‘वडिलांचे आज्ञापालन करावे’ असा उपदेश करून मुलांची मने वडिलांच्या भीतीने खुरटी ठेवण्याचा प्रयत्न करते. व्यक्तिस्वांतत्र्याचे नारे दिले जात असताना घरात मात्र ‘बाई ग तुझे स्थान चुलीजवळ!’ या मंत्राने स्त्रियांची गुलामी जोपासली जाते. ‘ सचोटिने वागावे’ या उपदेशाचा मंत्र जपत घरात मात्र वडिलांच्या मृत्यु मागे संपत्तीचा मोठ्यात मोठा हडप करण्यासाठी भावाभावात स्पर्धा लागते. पुरूष ब्रम्हचारी राहिला तर त्यांचे कौतुक होते. अविवाहित स्त्रीला समाज वाळीत टाकते. स्त्रीचा देवता म्हणून आम्ही सन्मान करतो असे अभिमानाने सांगत घरोघरी स्त्रीला दासीहूनही क्षुद्र पातळीवर वागविले जाते. एकीकडे प्रत्येकाने आवडीचा व्यवसाय निवडावा असे म्हणत वडिलांच्या आवडीचा व्यवसाय निवडावा अशी त्याची फलनिष्पत्ती होते. कारण आर्थिक ताबा त्यांचा असतो. पैसे या निकषावर सर्व काही तोलले जाते. तारूण्य हा जीवनाचा अतिरम्य, रोमॅंटिक काळ म्हणून कवितातून महती गायली जाते. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये मात्र तरूणतरूणींची स्वच्छ मोकळी मैत्री नाक मुरूडून पाहिली जाते. तरूणां-मध्ये धडाडी, पुढारीपंणा, औद्योगिक वृत्ती जोपासली पाहिजे म्हणता म्हणता घरात मात्र ‘तुला काय कळतय! आमचे अनूभवाचे बोल ऐक.’ या दडपणाखाली पुढे पाऊल टाकायला बंदी केली जाते. आत्मसन्मान ठेवावा, लाथ मारीन तेथे पाणी काढीन अशी वृत्ती बाळगावी हे सुभाषित पाठ करून घेता घेताच प्रत्यक्षात मात्र लाचारी, ढोंगीपणा याच गुणावर माणसे यशस्वी होताना दिसतात. ‘जाती व्यवस्था मोडली पाहिजे या उपदेशाचे ढोल ऐकता ऐकताच घरीदारी जातीबाहेर लग्न केलेल्या व्यक्तिला टोचे मारून रक्तबंबाळ करणारी वडिलधारी मंडळी दृष्टिस पडतात. आणि आजचा संवेदनाशील माणूस विषण्ण होतो. सुभाषिते आणि प्रत्यक्ष व्यवहार यांच्यामधील दरीचा अर्थ काय? माणूस असा का वागतो? असे अनेक प्रश्न त्याला पडतात. माणसाचे व्यक्तिमत्व घडते तरी कसे? एकीकडे या सगळ्या दाभिंकतेवरूध्द बंड करावे असा आकांन्त करणारी व्यक्ती पुन्हा या समाजात सामिल होऊन तेच दाभिंक जीवन कसे जगते? या प्रश्नांची उत्तरे पहाण्यासाठी सगळे जीवनच तपासून पाहायला पाहिजे, असा प्रयत्न क्वचितच होताना दिसतो. या दाभिंकतेने वैतागलेला तरूण पुष्कळदा हे सामाजिक जीवनच नाकारतो समाज म्हणजे बंधने ह्या बंधनांचा धिक्कार करताना तो समाज-संघटनाचाच धिक्कार करतो. प्रदूषित झालेल्या प्रकाशापेक्षा अंधाराला कवटाळतो. अशी नकारात्मक भूमिका घेऊन उत्तरे सापडत नसतात. आपण माणूस आहोत. इतर प्राणीमात्रापेक्षा श्रेष्ठ आहोत. माणसाचे जीवन हे केवळ निसर्गाने नियम केलेल्या चौकटीत न होता माणसाच्या जाणीवपूर्वक कृतीतून घडत जाते आणि म्हणूनच माणसाचे जीवन माणसाला बदलती येते. माणूस हा समाजातच राहू शकतो. सामाजिक श्रम हो त्याच्या अस्तित्वाची अट असते. आणि म्हणूनच सामाजिक बंधने ही सामाजिक सुखाचे कोंदण असते. ह्या सुखाच्या व स्वातंत्र्याच्या कक्षा रूंदावताना जुन्या बंधनाचे कोंदण गळून पडते आणि हे जाणिवपूर्वक करता येते. हे भान येणे म्हणजे मानवी सामर्थ्याची ओळख पटणे. याचीच पुढची पायरी अभ्यास.
जीवनाची तीन क्षेत्रे
व्यक्तीचे जीवन हे साधारण तीन ठिकाणी विभागलेले असते (1) कुटुंब जीवन, (2) कार्य जीवन, (3) आणि या दोघांच्याव्यतिरिक्त उरलेले मैत्री जीवन.
(1) कुटुंबातील माणसामाणसांचे संबंध हे रक्ताच्या नात्याने बांधले असतात. त्यामध्ये एकप्रकारची अपरिहार्यता असते. तशीच सास्कृंतिक सुरक्षितता असते. पूर्वीच्या टोळी जीवनाचा हा एक प्रगत प्रकार म्हणता येतो. कोणत्या कुटुंबात माणसाचा जन्म होतो या घटनेने माणसाच्या आयुष्यातील अनेक चाकोऱ्या जन्म जात ठरून जातात. कुटुंब हे पहिली लक्ष्मण रेषा आखते, पहिले कुपंण येथेच भेटते.
(2) कार्यजीवन हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे अंग. स्वत:च्या अंगच्या सामर्थ्याची क्लपना त्याला येथेच जाणवते. येथील पायरीवर पाय ठेवूनच त्याचा सामाजिक व्यवहारात प्रवेश होतो. शिडीच्या कितव्या पायरीवरुन सुरूवात होते याला उत्पादन व्यवहारात महत्व असते. त्याचे तर माणसांशी संबंध निश्चित होतात. तो कामगार असेल तर तो शोषित वर्गात जातो कारखानदार असेल तर शोषक वर्गात जातो. त्यांचे हितसंबध गोठले जातात. त्यानुसार जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन तयार होतो. तर्कपधदती, गृहितकृत्ये थोडक्यात कल्पना प्रणाली तयार होते. सुभाषितांचा काळ जाऊन व्यवहाराचा काळ येतो. आणि मन लवचिक बनू लागते.
(3) क्लबमध्ये जाऊन पत्ते खेळण्यापासून ते नाक्यावर उभे राहून वासूगिरी करणे किंवा मित्रांच्या घोळक्यात पानपट्टीवाल्याचा रेडिओ ऐकणे हे मैत्री जीवन. येथे कुंटुबजीवन व कार्यजीवन यामध्ये आढळणारी शिस्तशीर रचना नसते. त्यामुळे येथे पुष्कळसा सैलपणा असतो. दोन्ही ठिकाणी असणाऱ्या दमनाचा येथे अभाव असतो. येथील मानवाचे संबंध बऱ्याच प्रमाणात निवडलेले असतात. आणि कुटुंबजीवन व कार्यजीवन या दोन्ही ठिकाणी न मिळालेला जिव्हाळा येथे मिळू शकतो. स्पर्धेची भावना तीव्र नसते. बेछूटपणा, बेदरकारपणा यांना वाव मिळतो. व दोन्ही ठिकाणी जाचक वाटलेली पण टाळता न येणारी शिस्त व बंधने झुगारून देऊन काहीशा चिकित्सक दृष्टीकोनातून समाजाकडे पाहण्याचे धैर्य मिळू शकते. किंवा काही वेळा चक्क जीवनापासून पळण्याचा व दारूमध्ये दु:ख बुडविण्याचा प्रकारही घडू शकते अर्थात पुन्हा एकदा घोळके तयार होतातच व ह्या घोळक्यातील मानसिक वातावरणावरही समाजाची सावली पडलेली असतेच. ‘घोळक्याचे ‘अलिखित नियम तयार होतात. घोळक्यात कोण सामील होऊ शकते व कोण नाही हे पुन्हा त्याचे कुटुंब व कामाचे स्वरूप यावरूनच ठरविले जाते. येथेही माणसाच्या व्यक्तिमत्वाला आकार येत असतोच. कुटुंब व कार्यजीवन यामध्ये जी बंधने बाह्य वाटतात तीच बंधने या मैत्री जीवनात स्वत:हून स्वीकारली जातात. ती मताचा भाग बनतात. सगळ्यांना चहा पाजणे हा अलिखित नियम मी पाळला नाही तर मी एकटा पडण्याची भीती असते. एकटेपणा ही सर्वात मोठी शिक्षा असते. या तिन्ही ठिकाणी माणसाच्या मनावर संस्कार होत असतात. पण मूळ माणूस कोठे घडविला जातो असा कोणी प्रश्न विचारसा तर पटकन उत्तर मिळते, ‘अर्थात कुटुबांत‘ अगदी लोकप्रिय भाषेत बोलायचे झाले तर ‘बाळ आपल्या पायावर उभे राह्यला लागेतोवर ऊन, वारा, पाऊसपाणी यापासून संरक्षण देणारे उबदार घरटे म्हणजे कुटुंब.‘ येथे काऊचिऊची गोष्ट आठवते, पक्षी व प्राणी याच्याशी तुलना करण्याचा मोह होतो. या सोप्या पृष्ठभागीय साम्यामुळे मानवाचे वेगळेपण विसरले जाते व कुटुंब हा समाजाचाच एक भाग आहे, एक सामाजिक संस्था आहे याचे भान संपते. कुटुंब म्हणजे सुखाने संरक्षित बेट असा भ्रम तयार होतो. ते ‘नैसर्गिक’ वाटू लागते, जीवशास्त्रीय वाटू लागते. ही एक भूमिका झाली.
कुटुंब : एक शाळा
दुसरी भूमिका अशी, माणसाचा जन्म कुटुंबाच्या चौकटीत होतो. म्हणूनच माणसाचे व्यक्तिमत्व हे कुटुंबातील वातावरणातच मूलत: घडविले जाते आणि हे व्यक्तिमत्वाचे कंगोरे घेऊन तो सामाजिक व्यवहारात भाग घेतो. सामाजिक व्यवहाराला आकार देतो. रंग देतो. कौटुंबिक जीवन जितके उत्तम, आर्दश, निखळ तितके माणसाचे व्यक्तिमत्व शुध्द आणि असा माणूस जेव्हा सामाजिक व्यवहारात भाग घेईल तेव्हा तो सामाजिक व्यवहार अधिक सचोटीचा, सत्यम् , शिवं, मगंलम् होईल असा खोटा आशावादही सापडतो. काहीसा अशा प्रकारचा सूर श्री आशा मुंडले यांच्या मागील वर्षी (1975) स्त्री मासिकात आलेल्या लेखमालेमध्ये आढळतो. त्यांचा आरोप असा की आज भ्रष्टाचार, गैरप्रकार, ढोंगे, बुवाबाजी, स्त्रीपुरूष-नीत्तीमत्ता, लैगिंक स्वातंत्र्य या सामाजिक प्रश्नाबाबत आरडा ओरड केला जातो. पण ‘समाजजीवन फक्त उंबऱ्याच्या आत निरोगी व उंबऱ्याबाहेर भ्रष्ट कसे असू शकेल?’ थोडक्यात कुटुंबजीवन सुधारणे ही व्यक्ती सुधारण्याच्या मार्गातील व वैचारिक परिवर्तनातील आद्य गरज आहे. या दृष्टीकोनामध्ये कुटुंब हे केवळ सुरक्षित ऊबदार घरटे एवढीच भूमिका घेतलेली नसून कुटुंब ही एक प्रकारची शाळा आहे. तेथील संस्कार हे आयुष्यावर महत्वाचे असतात, या वास्तवाचे भान ठेवले गेले आहे. आणि तरीसुध्दा हा दृष्टिकोन अपुरा आहे. आईवडील, बहिण भाऊ, आजी आजोबा, मावश्या, काका ठराविक दृष्टिकोन घेऊन जन्माला आलेली असतात. प्रत्येकाकडे समाजाने एक मार्गदर्शक त्तत्वांची यादी दिलेली असते. त्यानुसार ही माणसे मुलांना वळण लावताना असे गृहीत धरले गेले आहे. ही मार्गदर्शक त्तत्वांची यादी बदलली की मुलांचे वळण सुधारेल असा भाबडेपणा या दृष्टिकोनाचा येतो. ही मार्गदर्शक तत्वे काही सनातनी विचारवंतानी मुद्दाम बनवून स्वत:च्या हुकुमतीखाली त्यांचे आचरण करण्यास भाग पाडले असाही भ्रम यात गृहिच धरलेले दिसतो. जुनी वर्तणूक चूक आहे, ती सुधारून नवी कशी आणावी याची पथ्ये देऊन हा दृष्टीकोन थांबतो. पण अजूनही जुन्याचीच चलती का आहे, लोकांना नव्यातील चांगलेपणा का दिसू शकत नाही याची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न येथे नाही. कारण कुटुबांचा जन्म कसा होतो, कुटुंब या संस्थेस सामाजिक कार्य नक्की काय आहे. समाज कसा चालतो. कुटुंबात दिली जाणारी शिकवण कोणत्या सामाजिक गरजांपायी तयार होतो याची छाननी केली जात नाही. आज आपल्याला नेमके तेच करण्याची आवश्यकता आहे.
याच दृष्टिकोनातून कुटुंबजीवनाचा व्यक्तिमत्व घडणीवर परिणाम याबाबत निश्चित भूमिका घेता येईल. याबाबत एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे की कुटुंब हे सुरक्षित बंदर असले तरी त्या बंदरातील पाणी व बाहेरील अथांग समुद्र हे एकाच समाजजीवनाचे भाग आहेत. समुद्रातील अंतप्रवाह या बंदराला येऊन भिडतात. आईवडील, बहीण भावंडे ही या समुद्रावर संचार करूनच पुन्हा बंदरात येतात. या संचारातूनच त्यांच्या मनावर परिणाम होत असतो. ते परिणाम त्या जाणीवा बंदरात उभ्या असलेल्या छोट्या मुलावर संस्कारित होत असतात. म्हणूनच उंबऱ्याबाहेरील समाजजीवनाचाही मुलाला व कुटुंबातील वातावरणाला सतत स्पर्श होत असतो. आणि या वातावरणात वाढलेले बाळच उंबऱ्याबाहेरच्या भ्रष्ट समाजजीवनात पाय रोवून उभे राहू शकते. कारण भ्रष्ट समाजजीवनामध्ये आपण लाथा कधी खायच्या आणि दुस-याला कधी द्यायचा याबद्दलचे कसब त्याच्या अंगी बाणलेले असते. याचाच अर्थ आपण माणसाचे जीवन जरी तीन विभागामध्ये वाटून टाकले तरी ह्या तिन्ही विभागांचा एकमेकांशी अविभाज्य संबंध असतो. वडिलांच्या कार्यजीवनाचा मुलाच्या कुटुंबजीवनावर परिणाम होतो. कार्यजीवन व कुटुंबजीवन यांना पूरक असेच मैत्रीजीवन रहाते झोपडपट्टीत राहणाऱ्या कामगाराच्या मुलाला कोपऱ्यावरच्या पानपट्टीवाल्याच्या दुकानासमोरुन उभे राहून मैत्री जीवन जगता येते. कारण तुमचे अस्तित्व सामाजिक असते. आणि कुटुंबजीवन कार्यजीवन, मैत्रीजीवन येथे होणारे संस्कार व तयार होणारे भावजीवन मनोवृत्ती या व्यक्तिच्या सामाजिक अस्तित्वाने ठरविल्या जातात. सामाजिक अस्तित्व सामाजिक संबंधाच्या चौकटीत फुलत राहते. हे सामाजिक संबंध उत्पादन-संबंधाच्या पायावर आधारीत असतात. उत्पादनसंबंधाची मुळे उत्पादन व्यवस्थेमध्ये रुजलेली असतात. उत्पादनाशिवाय माणूस जगू शकत नाही. उत्पादन ही मानवी अस्तित्वाची प्राथमिक गरज आहे. सध्या मानवी मनाची होणारी घडण – कुटुंबसंस्थेचे कार्य – कुटुंबव्यवस्थेचे समाज-संघटनेमधील स्थान एवढी सुसूत्र साखळी लक्षात आली तरी पुरे. यातूनच कुटुंब म्हणजे नक्की काय यासंबधी एक निश्चित पण सर्वसामान्य स्वरूपाचे आकलन होऊ शकेल.
कुटुंब म्हणजे नक्की काय? मानवाचा जन्मापासूनचा बराचसा काळ कुटुंबात जातो माणसामाणसातील पहिले नाते कुटुंबात सापडते. आपण माणूस नावाच्या प्राणीजातीचा सभासद आहोत याची जाणीव कशी करावी याते पहिले धडे तेथे मिळतात. बाहेरील सामाजिक व्यवहाराचे वादळी वारे या सुरक्षित घरट्याला लागत नसले तरी त्या व्यवहाराची चुणुक पाहयला मिळते. थोडक्यात कुटुंब हे बाहेरच्या भव्य समाजाची छोटीशी प्रतिकृती असते. व्यक्तिव्यक्तितील सामाजिक संबंधाचे प्रतिबिंब येथे पहायला मिळते. लुटुपुटुच्या लढाया लढण्याचे शिक्षण येथेच मिळते. म्हणूनच माणूस सामाजिक जीवनातील आपापली भूमिका व्यव्स्थितपणे स्वीकारतो व पार पाडतो. हे सर्व कशा तऱ्हेने होते ते आपण पुढे बघणार आहोत.
कुटुंबसंस्था नष्ट होते आहे काय?
शास्त्रीय अभ्यासाच्या पूर्वी थोडीशी एका प्रचलित गैरसमजाची दखल घायला हवी. कुटुंबसंस्था जन्माला येऊन आज शेकडो वर्षे झाली. त्यामुळेच समाज म्हटला की कुटुंबव्यवस्था आलीच. हे सर्वसामान्य माणसाच्या मनावर इतके पक्के बिंबले आहे की पुढे कुटुंबव्यवस्था रहाणार नाही असे कोणी भाकीत केले की लोक त्याला वेड्यात काढतील किंवा तो स्वैराचारी आहे. अशी त्याची संभावना करतील. पण गंमतीची गोष्ट म्हणजे आजही काही पाश्चात्य देशात कुटुंबव्यवस्था डळमळू लागलेली आढळते. घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण, व्यवसाय महत्वाचा. मग मुलांकडे लक्ष कोण देणार असे म्हणून मूल नको म्हणणाऱ्या युवती, किंवा पुरूषी वर्चस्व नको म्हणून अविवाहित रहाणाऱ्या तरूणी यांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्याचप्रमाणे कुटुंबामधून ज्या सोयी माणसाला मिळत असतात त्यांचे बऱ्याच प्रमाणात सामाजिकरण झाले आहे. मुलांवरील संस्काराचे काम वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शाळांनी उचलेले आहे. आजाऱ्यांची, म्हाताऱ्यांची सेवाशुश्रुषा करण्याचे काम रूग्णालये, वृध्दाश्रम येथे केले जाते. धुलाई, स्वयंपाक वगैरे सेवा बाहेर सहज मिळतात. वेश्यामुळे शरीरसुखाची गरज भागू शकते. अशा स्थितीत कुटुंबाची गरज काय हे मुख्य म्हणजे पूर्वी संपत्तीला वारसा म्हणून तरी मुंलाची गरज भासे. आजकाल सामान्य माणसाकडे ना जमीन, ना घर, ना कारखाना. तेव्हा संपत्तीच्या वारशासाठी मुलांची गरज उरली नाही. थोडक्यात कुटुंबसंख्येचे कार्य संपलेले आहे. हे झाले वरवरचे चित्र.
आपल्याकडे जेव्हा कोणी ही भीती व्यक्त करतात तेव्हा मात्र कीव कराविशी वाटते. आपल्याकडे अविभक्त कुटुंबपध्दतीतून विभक्त कुटुंबपध्दतीमध्ये होणाऱ्या बदलाला अजूनही पुरेशी गती आलेली नाही. हिंदू अविभक्त कुटुंब कायद्यासारखे कायदे करून संपत्तीमालकाच्या संपत्तीवर कर कमी बसविण्याचे प्रयत्न चालू आहेत. व अविभक्त कुटुंबपध्दत मोडण्याची गरज त्यांना भासत नाही. तसेच कुटुंबातील सेवांचे सामाजीकरण पुरेसे झालेले नाही. औद्योगिकरण झपाट्याने होत नसल्याने स्त्रीला नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडावे लागले नाही. गृहिणीला पोट भरण्यासाठी अजूनही नवऱ्यावर अवलंबून रहावे लागते. शहरातील कामगाराकडे खेड्यात रहाणाऱ्या भावाची मुले शिकायला, नोकरी करायला असतात. बेकारांना सामावून घेण्यासाठी कुटुंबे ही आवश्यक संस्था आहे. कुटुंबातील घट्ट ऋणानुबंधामुळे ले ऑफ दिलेल्या कारखान्यातील कामगार भावाकडे बहिणीकडे दोन वेळचे जेवण घेऊ शकतो. तेव्हा कुटुंबसंस्थेने येथील जीवितकार्य संपलेले नाही.
अर्थात येथे कुटुंबव्यवस्था चांगली की वाईट हा प्रश्न नसून तिचे कार्य समजून घेण्याचा हा प्रश्न आहे. पुष्कळसे विचारवंत जेव्हा भारतीय संस्कृतीचे व आदर्श कुटुंबव्यवस्थेचे गोडवे गातात व पाश्चात्य देशांच्या आत्यतिंक व्यक्तिवादाला व उपभोगी प्रवृत्तीला नावे ठेवताता त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की समाजाच्या विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. टप्पे असतात त्या त्या अवस्थेची सामाजिक गरज म्हणून काही संस्था निर्माण होतात. कल्पनाव्यूह तयार होतो. त्या अवस्थेचा भौतिक पाया बदलला की हळू हळू समाज संघटनाचे स्वरूप बदलते. संस्थाचे स्वरूप बदलते. कुटुंबसंस्था ही त्रिकालाबाधित तत्व तर नव्हेच नव्हे किंबहूना मानवाची नैसर्गिक गरजही नाही. तो विशिष्ठ समाज संघटनेतील माणसाची सामाजिक गरज आहे. आज केवळ नवी पिढी जुन्या पिढीच्या आज्ञांचे बिनचूक पालन करायला तयार नाही. त्यांच्या आवडीनिवडी, नीतीकल्पना यांमध्ये थोडासा बदल दिसू लागला आहे. मुलांच्या मनावरही चित्रपट, साहित्य, शिक्षण यांतून होणाऱ्या संस्कारांचे प्रमाण वाढले आहे. तेही शहरातून. आणि त्यामुळेच विचारवंत घाबरून जाऊन प्रश्न विचारू लागले आहेत. ‘कुटुंबसंस्था नष्ट होते आहे काय?’
मध्यमवर्गीय सुरक्षित चिरेबंदी कुटुंबव्यवस्थेला किंचित धक्के बसायला लागले आहेत. पण कामगार वर्गाची अवस्था त्याहून कठीण आहे. उत्तर प्रदेशातून येणारे भैय्ये आपण बघतो. आणि त्यांच्यावर विनोदही करतो. दोन वर्षे गावी न गेलेल्या भैय्या जेव्हा हातावर पेढे ठेवून ‘मुझे बच्चा हो गया’ असे कौतुकाने सांगतो तेव्हा आपणा दुष्टपणे हसतो. मध्यमवर्गीय बायका तावातावाने वेश्याव्यवसायाचे समर्थन करतात. ‘तसल्य बायका आहेत म्हणून बरे हो, नाहीतर या मेल्या पुरूषांची नजर आमच्यासारख्या कुलवान स्त्रियांकडे वळायची’ असा युक्तिवाद ऐकता ऐकता कुठेतरी खोलवर जाणीव होत रहाते. की कुटुंबसंस्था कोसळत आहे. ही मध्यमर्गीय भीती कामगारासांठी आजच वास्तव आहे. मुबंईच्या रामा गड्याची बायको तिकडे कोकणात भातखाचर सांभाळत असते. मुबंईच्या औद्योगिक चुबंकीय क्षेत्रात पुरूष जोडले जातात. कुटुंब ठेवायला जागा मिळत नाही. दहाबाय दहाच्या खोलीत पाळीपाळीने झोपावे लागते. आणि घरधनीण तिकडे सुपारीच्या झाडांना पाणी देत वर्षातून एकदा माघारी येणाऱ्या चाकरमान्याकडे डोळे लावून आसते. हे कुटुंबव्यवस्थेचे कोसळणे म्हणायचे की लवचिकता म्हणायची? म्हणूनच आज संक्रमण काळातील कुटुंबव्यवस्थेचे स्वरूप पहाणे आवश्यक आहे.

– मागोवा, एप्रिल 1976 मधून साभार

chhaya.datar1944@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.