आपल्या नोव्हेंबर २०१४ च्या अंकात अरुण फाळके ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे पत्र वाचून असे वाटले की, त्यांनी माझे धर्म-धर्मनिरपेक्षता वगैरे विषयावरील तीन लेख वाचले नाहीत; त्यांनी केवळ शेवटचा लेख वाचला आहे.
त्यांचा लेखकाच्या शीर्षकावर आहे. धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यातील ‘धर्म’ ह्या शब्दाच्या ऐवजी ‘हिन्दुधर्म’ म्हणायला हवे होते असे ते म्हणतात. त्याबद्दल माझा खुलासा असा की, हे शीर्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एके काळचे बौद्धिकप्रमुख श्री. मा.गो. वैद्य ह्यांच्या एका पुस्तकाच्या वाचनानंतर मी घेतले आहे. त्यांनी हिन्दु-धर्माची व्याख्या करताना ती कशा प्रकारे केली आहे की ‘ह्या जगात धर्म ह्या संज्ञेला पात्र अशी एकच विचारप्रणाली आहे आणि ती हिन्दुधर्माची होय आणि त्यामुळे धर्म आणि हिन्दुधर्म ह्यांत काही फरक नाही. हे लेख मी सुमारे २२ वर्षांपूर्वी बाबरीमशिदीचा विध्वंस होण्यापूर्वी लिहिलेले आहेत. पण त्यांचे औचित्य अजून कमी झालेले नाही असे वाटल्यामुळे संपादकांनी ते पुन:प्रकाशित केले आहेत.
अगदी अलिकडे सुमारे २ महिन्यांपूर्वी डॉ. मोहनजी भागवत सरसंघचालक, ह्यांनी असे विधान केले की भारतात राहणारे सगळेच हिन्दु आहेत. तेव्हा धर्म आणि हिन्दुधर्म ह्यात फरक नाही असे आजही त्यांचे मत आहे. त्यामुळे हे शीर्षक फार चुकले आहे असे मला वाटत नाही.
फाळके म्हणतात की ते ‘हिन्दु’ म्हणून जन्मले पण त्यांना भारताच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान वाटत नाही. ते कुठल्याही देवळात जात नाहीत, कुठल्याही देवाचे स्तवन करीत नाहीत, कुठलाही सण पाळत नाही, कुठलाही देव मानत नाहीत (ह्यात अल्ला व आकाशातील बापही आले) असे असूनही ते हिन्दूच आहेत आणि त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही.
पुढच्या परिच्छेदात ते म्हणतात की तथाकथित पुरोगाम्यांना ते हिन्दु आहेत ह्याची लाज वाटते. (त्यांनी अजूनही हिन्दुधर्माचा त्याग कसा केला नाही.)
माझ्या सप्टेंबर १४ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात मी हिन्दूंचे पाच वर्ग केले आहेत. त्यातल्या पाचव्या वर्गातले ते हिन्दु आहेत असे आम्ही समजायचे का?, मी तसा आहे. त्यांच्या ठिकाणी हिंदुत्वाची जर कुठलीच लक्षणे नसली तर त्यांनी स्वत:ला हिन्दु का म्हणवून घ्यावे आणि ते जर हिन्दु नसतील तर हिन्दु, मुसलमान, ख्रिस्ती, शीख हे सगळेच भारतीय म्हणजे हिन्दूच आहेत म्हणजे हिन्दूंचे सगळे दोष त्यांच्यातही असतील. मग मुसलमान ख्रिश्चन हे वेगळे कसे? सर्मसमावेशक अशी हिन्दूंची व्याख्या केल्यावर ते वेगळे कसे? आणि त्यांच्यातील दोष म्हणजे आपल्यातील दोष नव्हेत का?
जर हिन्दु आणि मुसलमान वेगळे असतील तर आपल्यांतील दोष काढून टाकल्यावरच आपल्याला त्यांचे दोष दाखवण्याचा अधिकार पोहोचेल. आधी आपल्या नाकाचा शेंबूड पुसावा आणि नंतर लोकांना हसावे. असो.
धर्म हा शब्द मी का वापरला ह्याविषयी एवढे पुरे. एवढ्या धार्मिक दंगली झाल्या त्या प्रामुख्याने मुसलमानांनी सुरू केल्या ही वस्तुस्थिती आहे असे ते म्हणतात. पण वस्तुस्थिती वेगळी आहे असे ह्या विषयाच्या अभ्यासकांचे मत आहे. हिन्दुनी मुसलमानांच्या प्रार्थनेच्या वेळी त्यांच्या मशिदीवरून सवाद्य मिरवणुकी नेणे, मशिदीवर रंग टाकणे अशा त्यांच्या कुरापती वेळोवेळी केल्या आहेत आणि वेळोवेळी त्यांना असुरक्षित वाटेल किंबहुना दहशत वाटले असे कार्यक्रम हिन्दूंनी केले आहेत. ह्याचेही पुष्कळ पुरावे आहेत. मुसलमानांना चिथावणे, त्यांचा प्रक्षोभ करणे व हिंसा करण्यास भाग पाडणे व दंगे सुरू झाले की त्यांच्यावर तुटून पडणे हेही हिन्दूंनी निश्चितच केले आहे. फाळके म्हणतात ती वस्तुस्थिती आम्हाला दिसत नाही. दंगली कोणी सुरू केल्या हे ठरवण्यासाठी दंगलीच्या आधी शक्तिप्रदर्शनाचे प्रयोग कोणी केले हेही तपासणे आवश्यक आहे असे मला वाटते.
मुसलमानांचे प्रबोधन करणारे जे प्रयत्न मुसलमान करतात ते मला माहीत आहेत. महाराष्ट्रात मुस्लिम सत्यशोधक मंडळ ह्या नावाची संस्था असून तिचे नेतृत्व शमसुद्दिन तांबोळी करीत आहे. हमीद दलवाई ह्यांनी ह्या क्षेत्रात केलेले काम सर्वश्रुत आहे. त्याशिवाय वर्ध्याहून नवनिर्मिती ह्या नावाचे एक मासिक श्री. अजाणी चालवतात. ह्याशिवाय जे माझ्या परिचयाचे नाहीत असे आणखी कार्यकर्ते असणारच.
हिन्दु भेकड असल्यामुळे त्यांनी आपला पळपुटेपणा लपवण्यासाठी अहिंसेचा आश्रय घेतला आहे असेही त्यांचे मत फाळके ह्यांनी नोंदवले आहे. त्यांचा रोख महात्मा गांधींच्या अहिंसातत्त्वावर आहे असे दिसते. त्याबद्दल मला असे सांगायचे आहे. फाळकेंचा ह्याबाबतीत गैरसमज झाला आहे. गांधीजींची अ हिंसा ही त्यांच्या असाधारण धैर्याची प्रतीक होती. प्रतिपक्षाने कितीही प्रक्षुब्ध करायचा प्रयत्न केला तरी आपण प्रक्षुब्ध व्हावयाचे नाही असे ठरवून त्यांच्या हिंसेला रोखण्यासाठी त्यांनी अ हिंसेचा आश्रय घेतला. मार्टिन ल्युथर किंग ह्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी अ हिंसेचे धोरण का स्वीकारले हे त्यांच्या शब्दांत पुढे देत आहे.
‘तीन शतकांहून अधिक काळ अमेरिकेतील नीग्रोंना जुलमाच्या लोखंडी सोट्याने झोडपून काढले आहे. दिवसभर निराशेचे आणि रात्रीच्या वेळी सहन न होण्याजोग्या अन्यायाने ते गोंधळून गेले आहेत. अशा लाजिरवाण्या परिस्थितीत राहणे भाग पडल्याने मनात कडवटपणा भरून घेऊ न त्याच प्रकारच्या द्वेषाने त्या हिंसेचा आणि जुलमाचा प्रतिकार करण्याचा मोह आम्हाला होणे स्वाभाविक आहे. पण तसे झाले तर त्यातून जन्माला येणारी नवी व्यवस्था ही जुन्या पद्धतीची प्रतिकृतीच ठरेल. म्हणून नम्रपणे पण निर्धाराने नवी व्यवस्था प्रेमावर आधारलेली असावयास हवी. भेदभाव नाकारताना भेदभाव करणाèयावर आपण प्रेमच करायला हवे. आमच्या अत्यंत कडव्या विरोधकांना आम्ही म्हणतो – तुम्ही जेवढी म्हणून छळणूक करू शकता ती सर्व सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. तुमच्या शारीरिक ताकदीला आम्ही आमच्या आत्म्याच्या ताकदीने तोंड देऊ .
‘तुम्ही आमच्याशी कसेही वागलात तरी आम्ही तुमच्यावर प्रेम करू…. दुष्टपणाशी असहकार करणे हे चांगुलपणाशी सहकार करण्याप्रमाणेच आमचे नैतिक कर्तव्य आहे…… आम्ही तुमच्या मनाला आणि सदसद्विवेकबुद्धीला असे आवाहन करू की ह्या प्रक्रियेत आम्ही तुम्हाला जिंकू आणि विजय दुहेरी असेल.’
हा उतारा ‘गांधीजींचे असामान्य नेतृत्व’ ह्या (पास्कल अॅलन नाझरेथ पृष्ठ ११४) पुस्तकातून घेतला आहे. हिंसेचे प्रत्युत्तर हिंसेने दिल्यास व त्यात विजय प्राप्त केल्यास तात्पुरते समाधान मिळते. त्यामागे जायचे की हिंसेचे मूळ नाहीसे करायचे हे केव्हातरी ठरवणे भागच आहे.
हिंसेचा प्रतिकार वा प्रत्युत्तर हिंसेने असे केल्यास हिंसेची एक अखंड साखळी निर्माण होते; ती कोणाचेच भले करीत नाही. म्हणून हिंसेचा प्रतिकार अहिंसेने करणे विवेकाचे लक्षण आहे.
dpmohoni@gmail.com