आजचं चंद्रपूर तेव्हा चांदा होतं. माझ्या बालपणी चांदा हे नाव रूढ होतं. नव्हे मनात तेच नाव घर करून होतं. चांद्याबद्दल अनेक आख्यायिका ऐकवल्या जात. चांदा फार मोठं आहे असं वाटायचं. बीएनआर या झुकझुक गाडीनं चांद्याला यायचो. गडिसुर्ला हे मूल तालुक्यातलं माझं गाव. गावच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरावर चढलं की दूरवर मूल दिसायचं. लहान लहान बंगले दिसायचे. डोंगराच्या पायथ्याशी आसोलामेंढाचा पाट वाहताना मनोवेधक वाटायचा. आंबराईत रांगेने उभी असलेली झाडी हिरवी गच्च वाटे. डोंगरावरून पूर्वेला नजर टाकली तर वाहणारी वैनगंगा नदी दिसायची. मार्कंड्याचं मंदिर दिसायचं. धानाच्या मोसमात संपूर्ण परिसर हिरवागच्च आच्छादन लेल्यासारखा दिसायचा. बालकवीच्या ‘औदुंबर ‘ कवितेची आठवण व्हावी असा हा परिसर. गावालगत दोन डोंगरं. एक लाल मातीचा. दुसरा सारवण करायच्या पांढऱ्या मातीचा. दोन डोंगरांच्यामध्ये कधीही न आटणारा बांध. बांधाच्यामध्ये इंग्रजांनी उभारलेला खांब. या खांबावर इंग्रज अपराध्यांना शिक्षा देत अशी कथा. खांबावर बसणारा पक्षी बालकवीच्या ‘पारवा ‘ कवितेची आठवण करून देई. बांधाच्या पारीवर मोठमोठी झाडे. झाडावर उलटी लटकलेली वटवाघुळं. निसर्गानं नटलेलं माझं गाव. डोंगराच्या पायथ्याशी रेस्ट हाऊस व मिशनऱ्यांनी बांधलेलं चर्च. माझं गाव म्हणजे जातिव्यवस्थेचं बोलकं प्रतीक. हे माझं गाव मी तिसऱ्या वर्गात असताना सोडलं. कायमचं सोडलं. चांद्याला आलो आणि चंद्रपूरचाच झालो. चंद्रपूर-गडचिरोली परिसराला झाडीपट्टी म्हणतात. आदिवासी पट्टा म्हणतात. मागासवर्गीय भाग म्हणतात. गोंडवन असंही म्हणतात.
चांदा गोंडराजानं वसवलं. या भागावर गोंडराजाचं साम्राज्य होतं. त्यांनी या भागावर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवला ऐतिहासिक वास्तू बांधल्या. गडकोट बांधले. आपल्या राज्याचा विस्तार केला. राणी हिराईने आपले पती बिरशहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंचलेश्वर गेटला समाधी बांधली. राणी हिराईने आपल्या पतीकरिता बांधलेली एकमेव समाधी. यातलं पुष्कळसं इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. दंडकारण्याच्या खरा इतिहास दुर्लक्षित होत आहे. निसर्गानं ओतप्रोत भरलेला हा परिसर. रानावनात वन्यजीव मनसोक्त जगत, वावरत, बागडत. आयुर्वेदाला उपयुक्त असा साठा असलेलं जंगल होतं. पूर्वी आठ-दहा दिवस झळ राहायची. आता झळ अभावानेच, अशी आई सांगायची. सर्वांना हेवा वाटावा असं नैसर्गिक जनजीवन होतं. हे वैभव औरच होतं. आपली बोली, भाषा, संस्कृती यात एकरूप झालेलं जनजीवन होतं. लोककलांचा प्रचंड साठा जतन केलेला होता. लोकजीवनात श्रद्धा होत्या. अंधश्रद्धाही होत्या. व्यवस्थेत लादलेली बंधनेही होती. या साऱ्यात मानव जगण्याचा अट्टाहास करीत होता. आपआपले रीतिरिवाज जोपासत निसर्गात जगत होता. मानवी जीवन कष्टाचं व संघर्षाचं होतं. आजच्या एवढं गुंतागुंतीचं आणि स्वार्थी नव्हतं.
राजा होता, राजा गेला. म्लेच्छ गेले. इंग्रज गेले. प्रजा आली. स्वातंत्र्य मिळाले. लोकशाही आली. काळाच्या प्रवाहात प्रचंड परिवर्तनं आली. मन्वंतरे घडली. काळ कुणाकरिता थांबला नाही. काळ पुढे पुढे सरकतच गेला. काही काळासोबत थांबले. थांबले ते थांबलेच. काही काळासोबत गेले. ते पुढेच गेले. काहींनी परिस्थितीवर स्वार होऊन प्रगतीच्या वाटा चोखाळल्या. औद्योगिकीकरण आलं. संगणक-नेट आलं. जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण आलं. जगण्याचे सारे संदर्भ बदलले. रोज नवीन काहीतरी येतं. जुनं अडगळीत जातं. वापरा आणि फेका असं काहीसं विस्कळीत व्यवस्थेनं रूप धारण केलं. या साऱ्यांचा केंद्रबिंदू माणूस आहे. माणसाला स्वतःला सांभाळणं अवघड झालेलं आहे. स्पर्धेचं झालेलं आहे. माणूस स्वतःच्या अस्तित्वासोबत सुख अधिक समीप आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. व्यवस्तेची तèहा संपूर्ण उफराटी झालेली जाणवते. आजच्या जीवनशैलीतून ते निदर्शनास येते.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची आदिवासीबहुल आणि मागास जिल्हा म्हणून नोंद झालेली. या पार्श्वभूमीवर अनेक विकासात्मक योजना राबविल्या जातात. त्याचाच भाग, झपाट्यानं औद्योगिकीकरण झालं. दुर्गापूरला महाऔष्णिक केंद्र आकाराला आलं. सिमेंट कारखाने उभे झाले. पोलाद कारखाना सुरू झाला. जागोजागी दगडी कोळशाच्या खाणी निघाल्या. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. चारी दिशातून चंद्रपुरात लोकांचा लोंढा वाढला. चंद्रपूरची लोकसंख्या झपाट्यानं वाढू लागली. मोठ्या प्रकल्पात जमिनी गेल्या. स्थापित विस्थापित झाले. जमिनीच्या मोबदल्यात पैसा मिळाला. नोकऱ्या मिळाल्या. शेतीचे प्लॉट पाडले जाऊ लागले. शेतीवर विपरीत परिणाम झाला. जीवनशैली बदलली. पैसा येऊ लागला. ज्याच्याकडे काहीच नाही ते उदरनिर्वाहासाठी मजुरी करू लागले. स्थानिक बाजूला पडले. बाहेरचे स्थायिक होऊ लागले. जमिनीच्या किमती आकाशाला टेकू लागल्या. यालाच शहरीकरण म्हणतात की काय?
वेगवेगळ्या प्रांतांतले आणि जिल्ह्यातले लोक चंद्रपुरात आले. चंद्रपूरची संस्कृती संमिश्र झाली. चंद्रपूरच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, आर्थिक बाबींवर चांगला-वाईट परिणाम झाला. चंद्रपूरचे समग्र पर्यावरण बदलू लागले. ‘जेथं भरला नरा, तो गाव बरा ‘ असं झालं. चंद्रपूर उद्योगधंद्यामुळे प्रदूषित शहर झालं. चंद्रपूरनं प्रदूषणात अव्वल स्थान निर्माण केलं आणि साऱ्यांना चक्रावून टाकलं. चांद्याचं चंद्रपूर झालं. होत्याचं नोहतं झालं. चंद्रपूरला लाखोली वाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. चंद्रपूरच्या चांगल्या बाबींवर भाष्य करण्याऐजी त्रुटीवर निरर्थक बोलणारे अनेक आहेत. शोषणातून पैसा कमवण्याकरिता चंद्रपूरचा वापर करणारे यात आहेत. चंद्रपूरला शिव्या देणारे चंद्रपूरच्याच वास्तव्याला आहेत. चंद्रपूरला अस्थायी म्हणून आलेले चंद्रपूरलाच पैशाच्या लोभापाई स्थायी होतात. गिधाडानं लचके तोडावे तसे चंद्रपूरचे लचके तोडत स्वःच्या उंच उंच इमारती आकाराला आणतात. धार्मिकतेचा बडेजाव माजवत सामान्यांना आपल्या कळपात प्रलोभने दाखवून सामावून घेतात. मुखवटे धारण करून फसगत करीत आहेत. संगणकामुळे सारं जग एक खेडं झालं, असं म्हणतात. सारं क्षणात कळतं. जगातला कुठलाही माणूस कुठेही जाऊ शकतो. अर्थात त्या त्या भागाचे नियम लक्षात घेऊनच. याचा अर्थ असा नव्हे की, मूळ निवाशांना डावलून त्यांच्यावर अन्याय करणे. वेगवेगळ्या शैक्षणिक व इतर प्रतिष्ठानांमध्ये पैशाच्या बळावर इतराना नोकरीमध्ये घेतले जाते. पैशाअभावी स्थानिक लोकांना डावलले जाते. स्थानिकांना न्याय दिला पाहिजे, असे तासन् तास बोलणारेच स्थानिकांच्या इच्छा-आकांक्षा पायदळी तुडवताना आढळतात. गावातल्या जमिनी फार्म हाऊसच्या नावाने भांडवलदार पादाक्रांत करीत आहेत. परिवर्तन आणि अभिसरण अडवता येत नाही. जागतिकीकरणामुळे पुष्कळसं अडगळीत पडत आहे. बोलीभाषा संपतात की काय, असे प्रश्न चर्चिले जात आहेत. इंग्रजीसारखी व्यावहारिक भाषा जगावर अधिराज्य गाजवीत आहे. मोठं व्हायचं तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही. सारं ज्ञानभांडार इंग्रजीत असल्यासारखं वाटतं. इंग्रजी बरोबर येत नसल्यामुळे अनेक मुलं पुढे जाऊ शकत नाही. शिकवण्या लावाव्या लागतात. ग्रामीण भागात या सोयी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक पिढ्याच्या पिढ्या बरबाद होत आहेत. अनेक राजहंस नष्ट होत आहेत. ज्याचं फावलं ते मजेत आहेत. सारा पैशांचा लपंडाव सुरू आहे. ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देतात. काही संघर्ष करत उच्च शिक्षण घेतात. काही सरकारी योजनांचा लाभ घेत उच्च शिक्षण घेतात. ज्याच्याजवळ काहीच नाही ते भरकटत जातात. ही या भागाची फार मोठी शोकांतिका आहे. काबाडकष्ट करून शिकणार चपराशाची नोकरी लागावी म्हणून आशेवर शिकतात. पण मनात शिणलेले हेतू शेण होतात. परिस्थितीवर मात करून उच्च पदावर जाणाऱ्याचं स्वागतच करायला हवं. औद्योगिकीकरणामुळे चंद्रपूरची प्रगती होऊ लागली. नवीन प्रश्न आमि समस्या रौद्ररूप धारण करू लागल्या. पश्चिम महाराष्ट्रात नाकारलेले उद्योगधंदे विदर्भात आणण्याचा घाट शिजू लागला. यातून विदर्भाकडे बघण्याची दृष्टी लक्षात येते. इथल्या पर्यावरणाला डावलले जाते. खेड्यातून रोजगार शोधत शहरात आले. अपृश्यता नष्ट होण्याच्या मोबदल्यात झोपडपट्ट्या वाट्याला आल्या. नवीन समस्येची भर पडली.
दुर्गापूर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर माझ्या परिचयाचा आहे. दुर्गापूरच्या समीप लहान लहान खेडे वसलेले. भोवताल जमिनीच्या जमिनी पसरलेल्या. गावाला जंगल लागलेलं. दुर्गापूर महाऔष्णिक केंद्र आकाराला आलं. या भागाचा संपूर्ण कायापालट झाला. त्याचा विपरीत परिणामही झाला. प्रदूषणात आणि उष्णतेत वाढ झाली. अनेक आरोग्यविषयक समस्यांना निमंत्रणं मिळाली. अनेकांना असाध्य रोगांनी पछाडलं. श्वासोच्छ्वासात व्यत्यय येऊ लागला. गावाला लागलेलं जंगल दूरदूर जाऊ लागलं. आधीचं दुर्गापूर ओळखणं अवघड झालं. परिवर्तन झपाट्यानं झालं. रोजगार वाढले. बेकारीही वाढली. चंद्रपुरात रस्त्यानं गर्दी वाढली. वाहतुकीचे प्रश्न छळू लागले. पावसाळ्यात रस्ते आणि नाल्या आपलं असली रूप दाखवतात. हे चंद्रपूरकर चांगल्या प्रकारे जाणतात. चंद्रपूर नव्या रूपानं साकार होताना रस्ते मात्र तेवढेच आहेत. इथल्या धुळीनं श्वेतवर्णीय कृष्णवर्णीय होतात. चंद्रपूर हे काळ्या हिऱ्याचं शहर. इथल्या भूगर्भात दगडी कोळसा तुडुंब साठलेला. दगडी कोळशाच्या खाणी हा साठा रिक्त करायला जागोजागी उभ्या. आता चंद्रपूर पोखरलं गेलं आहे. मातीनं इथला रंग बदलवलेला आहे. मोठाले ढिगारे आकाराला आले. ढिगाऱ्याचं डोंगरात रूपांतर झालं. झरपट नदी व इरई नदीचं पात्र बुजण्याच्या मार्गावर आहे. लहानसा जरी पाऊस आला तर सारं पाणी साचतं. चंद्रपूर पाण्याखाली येतं. चंद्रपुरात पूर म्हटला की दहशत निर्माण होते. चंद्रपूरचं प्रदूषण आणि उष्णता म्हटलं की, बाहेरचे चंद्रपूरला यायला बिचकतात. चंद्रपूर म्हणजे काळ्या पाण्याची सजाच समजली जाते. मात्र सहलीचं बिल सावंतवाडी ते सिरोंचा असं सादर केलं जातं. भामरागड वगैरे त्यांच्या हिशेबातच नसतं. चंद्रपूरचा काळा हिरा संपण्याच्या मार्गावर आहे. झरपट नदी झटपट बुजण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूरला महाऔष्णिक केंद्र आहे पण चंद्रपूर अंधाऱ्या झुडपात लपते.
झाडीपट्टीतलं पूर्वीचं वैभव लोपत असून, जंगल नष्ट होत आहे. जंगल छाटले, तोडले जात आहे. पाण्याची पातळी सतत खाली जात आहे. घनदाट जंगलामळे चंद्रपूर-गडचिरोली परिसरातील पाण्याची पातळी टिकून होती. पर्यावरणात आता अनियमितपणा जाणवतो.आता ताडोबासारख्या अभारण्यावर वक्रदृष्टी टाकली जात आहे. ताडोबातून वाघाला हद्दपार करण्याचा डाव दिसतो. अदाणीसारखे अधेमधे डोकं वर काढतात. ताडोबा वाचवण्याकरिता आंदोलन उभं करावं लागतं. हा गंभीर विषय आहे.
उत्खननात दगडी कोळसा गवसला. विजासन टेकडीचा शोध लागला. भद्रनगरीचं प्राचीन रूप कळलं. गडचांदूर, गडिसुर्ला, मूल, रामदेगी यातील उत्खननात प्राचीन इतिहासाची आणि उज्ज्वल संस्कृतीची ओळख पटली. ताडोबा, महाऔष्णिक केंद्र व दीक्षाभूमी चंद्रपूर यातून निसर्ग, मानवता व आधुनिकता यांचा संदेश मिळू लागला. आनंदवननं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. ही चंद्रपूरची आधुनिक बलस्थानं आहेत. महाकाली, मार्कण्डा, अंचलेश्वर मंदिर हा ऐतिहासिक ठेवा आहे. चंद्रपूरला गोंडराजाने बांधलेला किल्ला चंद्रपूरची ओळख असून चार दरवाजे व चार खिडक्या शाबूत आहेत. चंद्रपूर शहराला वेढलेला संपूर्ण किल्ला लक्षवेधक आहे. हा किल्ला, दरवाजे व खिडक्या वाहतुकीला व्यत्यय आणतात, अशी ओरड करण्यात येते. काळाच्या प्रवाहात हे सारं नष्ट होणार की काय, हा प्रश्न निर्माण होतो. चंद्रपूरशहरात प्रवेश करायचा म्हणजे कोणत्या ना कोणत्या दरवाजातून आणि कोणत्या ना कोणत्या खिडकीतून प्रवेश करावा लागतो.काहींनी तर किल्ला फोडून तांगळ-qतगळ वाहतुकीचा मार्ग सोयीकरिता केलेला आहे.
माझ्या घरासमोरून वळण घेत किल्ला गेला. घरासमोर उद्ध्वस्त बुरूज आहे. थोड्या अंतरावर चोरखिडकी आहे. किल्ल्याला लागून घरं बांधण्यात आली. किल्ल्याचा दगड काढून काहींनी स्वतःच्या घरांची पायाभरणी केलेली आहे. त्यामुळे किल्ल्याची भिंत पावसाळ्यात ओलसरपणामुळे थोडीथोडी कोसळत जाते. घरासमोरील बुरूज कधी ढासळेल याचा नेम नाही. बुरूज ढासळण्याची कल्पना मनात असंख्य विचाराचं मोहोळ निर्माण करते. किल्ल्याच्या शेजारी वाढलेली झाडझुडपं अनैकितेचं दर्शन घडवतात. व्यसनाधीन अशा झुडपांचा आश्रय घेतात. लैला-मजनू किल्ल्याच्या आडोशाने आपले चाळे साधत असतात. काळाच्या ओघात सारं नष्ट होत नाही. जुन्याच्या आधारावर नवं उभं राहतं. जुन्यातलं कुचकामी निकामी होतं. नवीन रूप धारण करतं. मानवी शाश्वत मूल्यं जिवंत राहतात. व्वस्था आपली रूप बदलवत असते. मुखवटा धारण करीत असते. नवीन माध्यमं सर्वांना आकृष्ट करीत आहेत. नवीन योजना राबविल्या जात आहेत. त्या सामान्य लोकांपर्यंत पोहचविल्या जातात काय? याचे फायदे कोण लाटतात, याची उत्तरं आपल्याकडे आहेत. बालपणात बोलीचे संस्कार आपल्यावर होतात. त्याच छत्राखाली आपण लहानाचे मोठे होतो. तेच संस्कार स्पर्धेच्या युगात पुसले जात आहेत. स्पर्धेची भाषा अवगत करणे काळाची गरजआहे. आपला सांस्कृतिक ठेवा इच्छा नसतानाही विसरतो. याचं भान ठेवणं काळाची गरज आहे.
जंगल आपलं, दगडी कोळसा आपला, ऊर्जानिर्मिती आपली, निसर्ग आपला. आपण निसर्गाचे. सारं आपलं असूनही आपलं काहीच नाही अशी अवस्था. चंद्रपूर साऱ्यांना आश्रय देत आहे. आपल्यात सामावून घेत आहे. लोकपूर, इंद्रपूर, चांदा, चंद्रपूरचा प्रवास सुरू आहे. मात्र इथले बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत.
(महाराष्ट्र टाइम्स विदर्भ विशेष – वार्षिक २०१४ मधून साभार)