घराची बरीच दुर्दशा झालेली असताना दुरुस्ती व देखभालीचे काम काढायचे ठरले. ठेकेदार मिश्रीलाल ह्यांना ठेका देण्यात आला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी, दोन लेबर बाजूच्या सर्वंट क्वार्टरमध्ये आणून ठेवतो असे आम्हाला सांगितले व त्याबरोबरच हेही बजावले, की त्या लेबर लोकांना काहीही द्यावयाचे नाही. ते स्वतःची व्यवस्था करून घेतील. तुम्हाला कटकट नको म्हणून आधीच सांगतो.
किशोर, ललिता व त्यांचे एक वर्षाचे बाळ दुसऱ्या दिवशीच आले. झोपलेल्या बाळाला खाटेवर टाकून ललिताबाईने आपला संसार थाटण्यास सुरुवात केली. एका तासाच्या आतच त्या गचाळ सर्वेंट्स् क्वार्टरचा कायापालट झाला व तीन दगडांच्या चुलीवर भात मांडला गेला.
त्यादरम्यान ललिताने आमचा सगळा बायोडाटा विचारून घेतला. माझा मुलगा व मुलगी लग्न करू इच्छित नाही असे सांगितल्यावर ती विचारातच पडली. थोडा वेळ गप्प राहिल्यावर मग म्हणाली, ‘ये अच्छी बात नहीं’. खाटेवरचे बाळ जागे झाल्यावर माझी निशा त्याच्याशी खेळू लागली. बाळ चांगले हसतमुख व लोभस. त्यामुळे दोघांची गट्टी जमली. पण त्याच्या आईला हे सारे आवडत नव्हते. ती सारखी त्याला उचलून घरात नेई.
तीनच दिवसांनी ललिताने ठेकेदाराला सांगितले की ये जगह हमको ‘सुट’ नहीं करता. पाचव्या दिवशी बाळाला गोवराची लक्षणे दिसू लागली. तसे मी ललिताला सांगितले. तर श्शशू श. नहीं ऐसी बात मत बोलो असे ती घाबरून म्हणाली. दीदीने मिठाई खिलाई इसलिये बुखार आया।
डॉक्टरकडे नेण्याची आमची तयारी होती, तरी तिने ते नाकारले. आमची सगळीच मदत अव्हेरली आणि लगेच आपले बिऱ्हाड आवरून क्वार्टर सोडून गेली. ठेकेदाराला आम्ही सारी हकीकत सांगितली तेव्हा तो निर्विकारपणे म्हणाला, इन गाँव खेडे के लोगों का ऐसे ही होता है। उनके पेटमें नजर, झाड फूक का शक होता है । कल मैं दूसरा आदमी लोग का इंतजाम कर दूँगा।
घराचे रिपेयर तर छानच पार पडले. नवीन लेबरने झकास काम केले. पण ललिता व आमच्या विचारांतील अंतर काही रिपेयर झाले नाही, ही खंत राहिलीच. निशा काही काळ निःशब्द होती. नंतर एक लांब श्वास घेऊन म्हणाली, आई, जाऊ दे. ललिताला कुठे ग well informed choices करण्याची संधी मिळाली? बाळ मात्र सुखरूप असेल अशी आशा करू या. असेलच. गोवर हा काही इतका गंभीर आजार नाही. एक आई