नवा पर्यावरणवाद गेल्या काही दशकांत पर्यावरणीय जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या असून मानवी-सामाजिक जीवनाचा अधिक परिपूर्ण रीतीने विचार त्यातून पुढे आला आहे. शुद्ध हवा, पाण्याचे शुद्ध व निरंतर स्रोत, स्वच्छ सूर्यप्रकाश, नितळ आकाश वा चांदणे, या सृष्टीबद्दल वा इतर जीवांबद्दल प्रेम-कुतूहल, समृद्ध सांस्कृतिक- सामाजिक जीवन, जंगल-झाडे, प्राणी-पक्षी यांचे अस्तित्व या गोष्टी अधिक समृद्ध जीवनासाठी आवश्यक असतात. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठीतर अधिकच. त्यांच्या जीवनाचा तो सहज भाग असतो. जीवनाची गुणवत्ता व सौंदर्य हा सर्वांचाच अधिकार आहे. कष्टकरी वर्गाचा देखील. पर्यावरणीय व सांस्कृतिक उन्नयनाचा त्यांच्याशी संबंध नाही असे म्हणणे हे भांडवलशाही राजकारणाचा भाग आहे. लोकशाही, अहिंसा यांप्रमाणेच आपल्यासोबतचे अन्य जीव माणूस व वनस्पती, पक्षी व प्राणी यांच्याबद्दल सहानुभाव असणे, हा मानवी विकासाचा, प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. अन्यथा आपल्याहून वेगळ्या व शारीरिक-बौद्धिक बाबतीत कमतरता असलेल्या सर्वच प्राणिमात्रांच्या शोषण व दमनाला समर्थन प्राप्त होईल. पर्यावरणीय विचारांना असा राजकीय आशय लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे. जगातील भांडवली व मूलतत्त्ववादी शक्ती पर्यावरणीय विकासाच्या विचारांवर सर्वांत जास्त प्रहार करतात. त्यांच्या गृहीतकालाच पर्यावरणीय जाणिवांचे आव्हान असते. – संजय संगवई (‘नद्या आणि जनजीवन’ मधून )