घराची बरीच दुर्दशा झालेली असताना दुरुस्ती व देखभालीचे काम काढायचे ठरले. ठेकेदार मिश्रीलाल ह्यांना ठेका देण्यात आला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी, दोन लेबर बाजूच्या सर्वंट क्वार्टरमध्ये आणून ठेवतो असे आम्हाला सांगितले व त्याबरोबरच हेही बजावले, की त्या लेबर लोकांना काहीही द्यावयाचे नाही. ते स्वतःची व्यवस्था करून घेतील. तुम्हाला कटकट नको म्हणून आधीच सांगतो.
किशोर, ललिता व त्यांचे एक वर्षाचे बाळ दुसऱ्या दिवशीच आले. झोपलेल्या बाळाला खाटेवर टाकून ललिताबाईने आपला संसार थाटण्यास सुरुवात केली. एका तासाच्या आतच त्या गचाळ सर्वेंट्स् क्वार्टरचा कायापालट झाला व तीन दगडांच्या चुलीवर भात मांडला गेला.