आजचे जग अशा वळणावर उभे आहे की, जिथून पुढे परस्परविरुद्ध दिशांनी जाणारे दोन रस्ते आहेत. एक रस्ता प्रचंड संपत्तीच्या निर्मितीचा, अमाप उपभोगाचा, परस्परांशी स्पर्धेचा आणि वैराच्या दिशेने जाणारा आहे; दुसरा रस्ता कार्ल मार्क्स म्हणतात तसा अशा ठिकाणी पोहोचणारा आहे की, जिथे मानवी विकासप्रक्रियेतील आनंददायी घटना घडणार आहेत. निसर्गातील सर्व उत्पादकस्रोत माणूस अशा रीतीने विकसित करेल की, माणूस आणि निसर्ग ह्यातील द्वंद्व पूर्ण मिटून जाईल आणि त्याच्या इतिहासाचे नवे युग, ore of खऱ्या मानवी इतिहासाचे युग सुरू होईल. या युगातील अर्थशास्त्रावर भगवान बुद्धांच्या मध्यममार्गाचा प्रभाव असेल आणि त्यातील माणसे त्यांच्या जगण्याच्या प्रक्रियेत बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग अनुसरतील. त्यातील ‘सम्यक आजीव’ हे या युगाच्या अर्थशास्त्रासहित सर्व ज्ञानशाखांचा पाया असेल. त्यामुळे त्या युगात इतकेच उत्पादन होईल, ज्यातून प्रत्येक व्यक्तीला इष्टतम उपभोग घेता येईल आणि उच्चतम मानवी विकासाचे ध्येयही साधता येईल. उद्याच्या कार्यकर्त्यांना यापैकी कोणत्या मार्गाने जायचे हे ठरवावे लागेल. रावसाहेब कसबे (‘महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी तत्त्व, व्यवहार आणि आह्वाने मोहन गुंजाळ स्मृतिग्रंथ’ मधून ).