ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची मुलाखत. प्रश्न : सध्या अनेक कंपन्या जी. एम. वाण बाजारात आणत आहेत. या वाणांमुळे पर्यावरणदृष्ट्या काय फायदे तोटे होत आहेत?
उत्तर : जी.एम. वाण पर्यावरणीयदृष्ट्या हानिकारक आहेत. त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. सरकार पर्यावरणीय आणि शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्यात मश्गुल आहे. बीटी कॉटनमुळे फायदा झाला असे म्हणतात, मात्र हे खरे नाही. बीटी कॉटनवर बोंड अळी येणार नाही असा दावा करण्यात येतो; मात्र आता बीटी कॉटनच्या बोंडातील विषाचे शोषण करणाऱ्या अळ्या निर्माण होत आहे. सरकारने मध्यंतरी बीटी वांगे आणण्याचा प्रयत्न केला होता. बॅक्टेरियामधून विष आणले जातेय हे शास्त्रोक्त संशोधनातून सिद्ध झाले आहे. बीटीमधील विषाचे जनुक परागीभवनातून रानटी वांग्यात जाऊ शकते. त्यातून प्रभावी विषारी तण तयार होऊन ते मोकाटपणे फोफावण्याची शक्यता आहे. याबाबत नुकतेच एक संशोधन नेचर या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकेमध्ये जी. एम. मोहरीमुळे अनेक ठिकाणी महाभयंकर तण निर्माण होऊन वनस्पतीसृष्टीत हाहाःकार होण्याची भीती व्यक्त. होत आहे. बीटी आणि जी. एम. बद्दल आपण निष्काळजी आहोत. ऑस्ट्रेलियामध्ये जी.एम. पिकांच्या बाबतीत अतिशय दक्षता घेण्यात येत आहे. जी.एम. वाणांचे बियाणे वाहतूक करताना ते इतरत्र पडून, वाढून त्याच्या परागीभवनातून वेगळे तण निर्माण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. यावर शास्त्रज्ञ काम करीत आहेत. आपल्याकडे बीटी कॉटनच्या परागीभवनापासून रानटी कपाशीच्या जातींवर काय परिणाम झाले आहेत. यावर संशोधन झालेले नाही. ते होणे गरजेचे आहे. तसा प्रयत्न बंगळूरच्या युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्सेसच्या डॉ. उमाशंकर आणि गणेशय्या या शास्त्रज्ञांनी केला. त्यांनी तसा प्रस्तावही दिला होता मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे नाकारण्यात आला.
प्रश्न : बीटी आणि जी.एम. वाणांना देशी वाण पर्याय ठरू शकतात का? उत्तर : नक्कीच, गावरान वाणांमध्ये वैविध्य भरपूर आहे. शेतकऱ्यांना त्या वाणांबद्दल आस्था आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे त्या वाणांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले नाहीत. या वाणांच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांची इच्छा आहे. मात्र त्यांना प्रोत्साहन दिले जात नाही. कोल्हापूर जिल्ह्यात घनसाळ ही भाताची जात प्रसिद्ध आहे. या जातीचा तांदूळ शिजायला टाकला तर त्याचा घमघमाट परिसरात सर्वत्र पसरतो. मात्र सध्या आपण खातो त्या भाताचा घास तोंडात टाकला तरी त्याचा वास नाकात जात नाही. शेतकऱ्यांच्या पारंपरिक देशी वाणाच्या संवर्धनासाठी प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटी ऍण्ड फार्मर राइट ऍक्टय’ केला आहे; मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने हा कायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचला नाही. यामुळे अनेक देशी वाणांचे संवर्धन झालेले नाही. यासाठी शेतकऱ्यांना उत्तेजन देणे गरजेचे आहे. देशी वाणांमध्ये वैजापूरची बाजरी, विदर्भातील जवस हे चांगले वाण आहेत. जवसाच्या औषधी गुणधर्मांमुळे त्याला चांगली मागणी आहे. या वाणांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.