मी गेल्या तीन दशकांपासून सेंद्रिय / नैसर्गिक शेती करीत आहे. माती, पाणी, वातावरणाचे जतन आणि विषमुक्त/सुरक्षित आहार हे प्रमुख उद्देश मनात ठेवून मी दीर्घकाळ काम केले. आरंभी देशात माझ्यासारखे मोजकेच लोक होते. नंतर हळूहळू सेंद्रिय शेतीपद्धती रुजत गेली. आज या क्षीण प्रवाहाचे मोठे पात्र होत असताना सेंद्रिय शेती तगेल की नष्ट होईल असा मला प्रश्न पडला आहे.
सेंद्रिय शेतीपद्धती नुसतीच पर्यावरणस्नेही नाही तर भूमी आणि जल ह्यांचे संवर्धन साधून जैवविविधतेत भर घालणारी आहे. याउलट जनुक-संस्कारित बियाण्यामुळे या सर्वांवर विपरीत परिणाम होऊन माणसांचे आणि पशूंचे भोजनसुद्धा प्रदूषित होत असल्याचे अनुभव आहेत.
माझ्या शेजाऱ्याने जनुक-संस्कारित बियाणे वापरल्यास तिकडचे परागकण माझ्या शेतात येऊन (Horizontal Gene Transter) माझे शेत नासू शकते आणि मी जपलेल्या पारंपरिक बियाण्याची कायमची वाट लागू शकते. मका, ज्वारी, भाजीपाला, पपई, आंबा इ. साऱ्या परस्पर-परागसिंचित (Cross Pollinated) पिकांच्या बाबतीत हा धोका फार अधिक आहे. मेक्सिकोमध्ये जनुक – संस्कारित मक्यामुळे मक्याच्या पारंपरिक जाती दूषित झाल्या आहेत. मका तेथील मुख्य पीक आहे.
इ.स. २००६ मध्ये आम्ही अमरावती जिल्ह्यात जनुक-संस्कारित कापसाच्या अभ्यासासाठी फिरलो. तेव्हा बडनेऱ्याजवळील अंजनगावबारी गावची सुनीताताई खंडार ही हातमजुरी करून जगणारी महिला आम्हाला भेटली. पोरीच्या लग्नासाठी पैसे मिळवण्याच्या आशेने तिने मक्तयाने जमीन घेऊन कर्ज काढून दोन डबे जनुक-संस्कारित बियाणे पेरले. एकरी फक्त १० किलो कापूस झाला. ‘आम्ही मजूर आहोत, दुसऱ्याच्या शेतावर काम करायला जाण्याची आम्हाला लाज वाटत नाही. माझ्या जागी दुसरा कोणी शेतकरी असता तर मात्र त्याच्यावर आत्महत्येचीच पाळी आली असती’ असे त्या महिलेचे उद्गार आहेत.
शेती जनजागरण यात्रा (अमरावती जिल्हा) १८ मे ते २० मे २००६ जनुक – संस्कारित कापूस उत्पादन : शेतकऱ्यांचे प्रातिनिधिक अनुभव (२००५-०६) अ) आर्थिक :-
१) सौ. सुनीताताई किशोरराव खंडार, अंजनगाव बारी, ता. अमरावती. एकरी १० किलो उत्पादन, हातमजुरी करून जगणारे कुटुंब. २ डबे बियाणे वापरले. अधिक उत्पन्नाच्या आशेने कर्ज काढून खर्च केला. त्यामुळे आत्महत्या करायची पाळी आली.
२) श्री. वासुदेवराव पुंडलिकराव कोठारे, शिवणी रसूलपूर, ता. नांदगाव खंडे ४५ किलो एकरी उत्पादन, इतर वाणांचे एकरी उत्पादन २.५ क्विंटल झाले. मशागत सर्व जातीची सारखीच केली होती.
३) श्री. मधुकरराव आत्मारामजी शेंडे, कापूस तळणी, ता. अंजनगाव सुर्जी, ७ क्विंटल एकरी उत्पादन, संपूर्ण उत्पन्न कृषि सेवा केंद्राची उधारी चुकती करण्यात खर्ची पडले. इतर खर्चासाठी काही उरले नाही.
४) श्री. सुखदेवराव पारे, वाठोडा (शुक्लेश्वर), ता. भातकुली, एकरी ९ क्विंटल उत्पादन, रु. १५३००० उत्पन्न, रु. १५३८० खर्च ( व्यवस्थापन खर्च हिशोबात धरला नाही.)
५) प्रवीण अजबराव पारे, दहेगाव रेचे, ता. अंजनगाव सुर्जी, एकरी २ क्विंटल उत्पादन रु. २०४०० उत्पन्न, रु.१९६५० खर्च
६) श्री. सुधीरराव आढाव, खिराळा, ता. अंजनगाव सुर्जी एकरी ८.३ क्विंटल उत्पादन, रु. ४५००० उत्पन्न, रु. ४५२५० खर्च
७) श्री मारोतीराम जी नारायणराव कपले, अडगाव (खाडे), ता. अंजनगाव सुर्जी एकरी १०.८ क्विंटल उत्पादन
आ) गुरांवर परिणाम :-
१) पुंडलिकराव हरिभाऊ ढोके, शिवणी रसुलापूर, ता. नांदगाव खंडे, गुरे चरण्यासाठी नेल्यावर ती जनुक संस्कारित कापसाच्या शेतात रमत नाहीत.
२) गुलाबराव भुस्कट, असदपूर, ता. अचलपूर गुरांनी बी.टी.च्या बोंड्या एक दिवस खाल्ल्या, नंतर तोंड नाही लावले.
३) बी.टी. कापसाच्या शेतात चरणाऱ्या बकऱ्यांना हगवण व तोंडाला फोड येण्याच्या घटना कानी पडल्या आहेत.
४) आंध्रप्रदेशात मेंढ्या मेल्याच्या बातम्या छापून आल्या आहेत.
इ) मनुष्यांवर परिणाम :- १) महादेवराव मारबदे, शेषराव बळी, शिवणी रसुलापूर, हे आपला अनुभव सांगताना म्हणाले की, बी.टी. कापसाच्या शेतात एकसारखा डवरा चालवला तर चक्कर येते. त्यांनी सतत महिनाभर बी.टी. कापसाच्या शेतात काम केले. नंतर नजर कमी झाल्यासारखे वाटल्याने त्यांनी त्या शेतातील कामच सोडले.
ई) जमिनीवर परिणाम १) श्री संतोषराव घुरडे, कसबेगव्हाण यांनी नातेवाईकांकडचा अनुभव सांगितला. पहिल्या वर्षी एकरी १७ क्विंटल कापूस झाला. दुसऱ्या वर्षी तेथे सोयाबीन पेरले. एकरी फक्त ५० किलो पीक आले.
२) श्री. सदाशिवराव नवरे, कसबेगव्हाण : पहिल्या वर्षी बी.टी. ने एकरी २ क्विंटल पीक दिले. दुसऱ्या वर्षी तेथे ए. के. ७ कापूस पेरला तर त्या पिकाची निम्मीच वाढ झाली.
३) श्री दादारावजी अण्णाजी ठाकरे, रत्नापूर, कापूस तळणी, ता. अंजनगाव सुर्जी : बी.टी. कापसानंतर कांदा पेरला. (या परिसरात शेतकरी नेहमीच असे करतात) मात्र यंदा माझा कांदा अपक्व असतानाच पात सुकली, जणू पिकाचा गर्भपात झाला. कांदा खूपच बारीक राहिला, वखरून काढावा लागला.
ए)अन्य परिणाम :- श्री. दीपक चराटे (असदपूर) म्हणाले की, त्यांच्या बी.टी. कापसाची बोंडी वरून चांगली दिसत होती, पण ती उमलतच नव्हती. दाबली तर आतून बोंड सडलेले दिसले. त्यात अळ्या झाल्या होत्या. हा आजार आसपासच्या शेतांतही पसरला. श्री. रामनरेश शिवनाथसिंह राजकुमार (अंजनगाव बारी ) म्हणाले की, चार- पाच वर्षांपूर्वी बी. टी. कपाशीवर मर रोग आला होता. तेव्हाही शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र तेव्हाच्या अनुभवातून मी शिकलो. आता मी भाजीपाल्याचे बियाणे स्वतःच तयार करतो. बी.टी. बियाण्यामुळे परिसरातील मधमाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचे सर्वत्र जाणवते. त्यामुळे साहजिकच परागसिंचनावर परिणाम झाला. शेतीत नैसर्गिक परागीकरणासाठी मधमाश्या अत्यंत जरुरी आहेत. भारतातल्याप्रमाणेच परदेशातील जनुक संस्कारित बियाणांचे अनुभवही असेच आहेत. स्टीव्ह मार्च हा ऑस्ट्रेलियातील सेंद्रिय शेतकरी आहे. तो आपल्या शेतात गहू पिकवतो. परंतु निव्वळ त्याच्या शेजाऱ्याने जनुक संस्कारित कॅनोला (तेलबिया) पेरले म्हणून त्याचे स्वतःचे सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. ह्यावर दाद मागण्यासाठी त्याने पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयात नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला, परंतु न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली. (Ecowatch 30 May 2014). या प्रकरणात शेतकऱ्याची काय चूक? कायदा शेतकऱ्याच्या हिताचे रक्षण का नाही करू शकला?
मॉन्सॅन्टो (किंवा अन्य कोणत्याही) कंपनीने विकसित केलेल्या जनुक संस्कारित बियाण्यातील परागकण, हवा, पक्षी, किडे इ. माध्यमातून उडत शेजारच्या शेतात जाणारच. ह्या परागकणांद्वारे, कंपनीने शोधलेल्या विशिष्ट जनुकाचा प्रवेश उभ्या शेतातील पिकात होईल आणि अशा रीतीने तो जनुक पुढील वर्षीच्या बियाण्यातही राहील. या प्रकाराला चोरी असे संबोधून मॉन्सॅन्टो कंपनी शेतकऱ्यांवर खटले भरत आहे. तुम्ही आमच्या जनुकाचा विनापरवाना वापर केला असा त्यांचा आरोप आहे. इसवी सन १९९७ ते २०१० च्या दरम्यान अशा प्रकारचे १४४ खटले मॉन्सॅन्टोने भरले आहेत. (Ecowatch 30 May 2014)
मॉन्सॅन्टो ही कृषिक्षेत्रातील दादा कंपनी आहे. बियाणे आणि रसायने ह्यांचा त्यांचा कारभार प्रचंड आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात आणि वॉशिंग्टनमध्ये २००३ साली जनुक-संस्कारित खाद्यान्नाच्या पाकिटांवर त्याचा उल्लेख असावा किंवा कसे ह्याचा निर्णय घेण्यासाठी सार्वमत घेण्यात आले. या प्रसंगी मॉन्सॅन्टोने १० कोटी डॉलर इतकी प्रचंड रक्कम लॉबिंग, जाहिराती व देणग्या ह्यांसाठी खर्च केली. इतके करून त्यांना ह्यात निसटता विजय मिळाला. म्हणजे जनुक संस्कारित खाद्यान्नाच्या पाकिटावर जी एम फूड अशी चिठ्ठी असणार नाही असा निर्णय झाला. (Ecowatch 30 May 2014) साध्या लेबलिंगसाठी खुद्द अमेरिकेत मॉन्सॅन्टो या थराला जाऊ शकते. मी काय खात आहे हे जाणून घेण्याचा माझा हक्कही नाकारला जातो, त्यासाठी कंपनी प्रचंड रक्कम खर्च करते तर भारतासारख्या देशात ती काय नाही करू शकणार? बिगर बी.टी. कापूस बियाणे त्यांनी बाजारातून हद्दपार केले आहेच. गतवर्षी २०१३ च्या पेरणी हंगामात परवानगी नसलेले कापसाचे (रेडी राउंडअप फ्लेक्स आरआरएफ) हे तणनाशक सहिष्णु जनुक-संस्कारित वाण मागील दाराने गावोगावी विकले. यंदा ते या बियाण्याच्या रीतसर चाचण्या घेऊ इच्छितात. शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन गतवर्षी त्यांनी फुकटाफाकटी बियाण्यांचे पैसे घेऊन चाचण्या केल्या. कृषी सेवा केंद्रामार्फत काम करणारी त्यांची निष्ठावंत साखळी आहे; त्यात निष्ठावंत शेतकरी नेते आघाडीवर आहेत. इ.स. २०१० मध्ये नागपूरला बी.टी. वांग्याच्या जनसुनावणीच्या प्रसंगी पर्यावरण मंत्री श्री. जयराम रमेश यांच्या समक्ष एका शेतकरी नेत्याने जाहीर केले. होते की सरकार बी. टी. वांग्याला परवानगी देणार नसेल तर आम्ही बी.टी. कापसाच्या बाबतीत केले होते तसेच याही वेळी करू. यातून ह्या शेतकरी नेत्यांना कोणाचे हित साधावयाचे आहे हे स्पष्ट आहे. बिचाऱ्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचा आणि अनभिज्ञ ग्राहकांचा यात बळी जात नाही काय?
तुमच्या देशातील कायदे, नियम सारे काही गुंडाळून आम्हो हवे ते करू शकतो. हा संदेश मॉन्सॅन्टो आणि मंडळींनी यातून आपल्याला दिलेला आहे. २०१३- १४ सालच्या अवैध चाचण्यांबाबत मॉन्सॅन्टो कंपनीवर काय कार्यवाही झाली हा संशोधनाचा विषय आहे. ‘प्रोटेक्शन ऑफ फार्मर्स राइट्स २००१’ हा बियाण्यासंदर्भातील कायदा सुद्धा कोणाच्या हितासाठी आहे? जागतिकीकरणातून उगवलेले हे फायदे अभ्यासकांनी बारकाईने तपासून शेतकऱ्यापर्यंत पोहचविले पाहिजेत. या कायद्यातील शेतकरी- हक्कांसंबंधीची तरतूद अशी आहे .
शेतकरी आपले बियाणे विकू शकतो, मात्र त्यावर तो लेबल लावू शकणार नाही. शेतकऱ्याने सांभाळलेले परंपरागत बियाणे अथवा स्वतः विकसित केलेले एचएमटी, अश्विनीधानासारखे वाण इतर शेतकऱ्यांना पुरविताना त्याच्यावर लेबल न लावण्याचे बंधन कशासाठी? आणि लेबल लावूनच विकायचे असेल तर कंपन्यांसाठी बनविलेले प्रमाणीकरणाचे नियम शेतकऱ्याला लावणे योग्य आहे काय? याउलट कंपन्यांनी प्रचलित कोणत्याही वाणामध्ये एका जरी जनुकाची भर घातली तरी त्याला स्वतंत्र वाण संबोधले जाईल; हा कोणता न्याय ?
नवनव्या पीकवाणांचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना मुळात कच्चा माल लागतो तो परंपरागत बियाण्यांचाच. हा ठेवा खरे तर दऱ्याखोऱ्यांतील आदिवासींनी सांभाळला आहे. ‘शेतकऱ्यांच्या वाणांची नोंदणी’ ह्या गोंडस नावाने हे सिद्ध बियाणे आपल्या हातात घेऊन हळूच कंपन्यांच्या हवाली करण्याचे काम ह्या देशात सुरू झाल्याचे जाणवते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गतवर्षी अशा प्रकारचे एक विधान केल्याचे जाहीर झाले होते. आपल्या देशात काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला, शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेला हा परंपरागत बियाण्यांचा ठेवा कंपन्यांच्या हवाली करण्याचे काम प्रसंगी शेतकऱ्यांचे सत्कार करून, त्यांना पुरस्कृत करून केले जात असल्याचे अनुभव येत आहेत. कंपन्यांच्या हितार्थ आमची सार्वजनिक संसाधने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या नावाने वापरली जात आहेत. माझे म्हणणे खोटे असेल तर जनुक संस्कारित बियाण्यांच्या चाचण्यांसाठी कृषी विद्यापीठांची जमीन का वापरली जाते ह्याचे उत्तर द्या. ह्या बियाण्यांशिवाय आमचे एवढे काय घोडे अडले आहे? बियाण्यांवर नियंत्रण म्हणजे संपूर्ण कृषिव्यवस्थेवर नियंत्रण. ग्राहक आणि शेतकरी दोघेही यात परावलंबी होणार. तुम्ही काय पेरावे आणि काय खावे हे आम्ही ठरवणार. आम्हाला ज्यात जास्त नफा सुटेल तेच बियाणे आम्ही तुम्हाला देणार, असा कारभार येऊ घातला आहे. ही गुलामी आपल्याला परवडणार आहे काय?
युरोपियन देशात आधीपासून जनुक संस्कारित खाद्यान्नाबाबत जागृती आहे. सेंद्रिय शेती चळवळ सुध्दा तेथे बळकट आहे. ऑस्ट्रेलियात सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणप्रक्रियेत जनुक संस्कारित प्रदूषणाला मुळीच थारा नाही. (झिरो टॉलरन्स). दक्षिण आफ्रिकेतील जाहिरात मानक प्राधिकरणाने रेडिओ (७०२) वरील जनुक संस्कारित बियाण्यांच्या जाहिरातीवर बंदी आणली. आफ्रिकन जैव सुरक्षा (बायोसेफ्टी) केंद्राच्या तक्रारीची दखल घेत ही कार्यवाही केली गेली. मॉन्सॅन्टो जनुक संस्कारित बियाण्यांबाबत जे दावे करत होती, त्यांच्या समर्थनार्थ ती स्वतःच्या वेबसाईटशिवाय दुसरे कोणतेच स्वतंत्र पुरावे सादर करू शकली नाही.
जनुक संस्कारित बियाणे तंत्रज्ञानबाबत आज सुशिक्षित-अशिक्षित, गरीब- श्रीमंत, ग्रामीण-शहरी लोकांमध्ये सर्वत्र अज्ञान आहे. विद्यापीठातील रसायन, भौतिक, अभियांत्रिकी इ. शाखांच्या तज्ज्ञांनाही जनुक संस्कारित खाद्यान्नाबाबत माहिती असणे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत अक्षरशत्रू, अल्पशिक्षित शेतकऱ्याचा तारणहार तर देवच असतो. जाहिराती त्याला खऱ्या वाटतात, गावातला कृषी सेवा केंद्राचा मालक त्याचा अडल्या नडल्या वेळी आधार असतो; त्याचा सल्ला डावलणे अनेकदा त्याला परवडणारे नसते. अशा परिस्थितीत जनुक संस्कारित बियाण्यांच्या क्षेत्र चाचण्यांना परवानगी देणे अत्यंत चिंताजनक आहे. १०० पेक्षा अधिक स्वतंत्र वैज्ञानिकांनी आणि सर्वोच्च न्यायालयाद्वारे नामनिर्देशित तज्ज्ञ समितीने अशा चाचण्यांना विरोध दर्शविलेला आहे. जनुक संस्कारित खाद्यान्नाच्या उंदरावरील परिणामांचा अभ्यास डॉ. सेरालीनीनी प्रकाशित केला आहे. उंदरांच्या शरीरात अनेक विकृती निर्माण होत असल्याचे त्यांचे निष्कर्ष आहेत. त्यांचे फोटो पाहून धडकी भरते. अशा परिस्थितीत जनुक संस्कारित पिके भारतात आणण्याचा खटाटोप कशासाठी?
पर्यावरणमंत्री श्री. वीरप्पा मोईली ह्यांनी पदावरून जाताजाता या चाचण्यांना परवानगी दिली, पण महाराष्ट्र शासनाने त्यापूर्वीच त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. आता महाराष्ट्रात येत्या हंगामात धान, कापूस, वांगी ह्या पिकांच्या चाचण्या होऊ शकतात. ह्याबाबत जनतेला मुळीच विश्वासात न घेता घोडे पुढे दामटणे सुरू आहे. जैव सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या संदर्भात विचारात घ्यायला हवा आहे. हजारो वर्षांपासून विकसित होत असलेल्या परिस्थितिकीची (इकोसिस्टीम) यामुळे वाट लागू शकते. हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेतच पूर्णपणे सिद्ध झालेले नसताना क्षेत्र-चाचण्या कशासाठी? भारतीय जनता म्हणजे काय प्रयोगाचे उंदीर आहे?
जनुक संस्कारित तंत्रज्ञान बाटलीतले भूत ठरू नये. ते अपरावर्तनीय (नॉन रिव्हर्सिबल) आहे. जनुक संस्कारित सजीव हे प्रकरण भावी पिढ्यांना अंधाऱ्या दरीत लोटण्यासारखे ठरू शकते. जनुक संस्कारित बियाणे ‘सब रोग की एक दवा’ नाही. बी.टी. जनुकांना न जुमानणाऱ्या किडी (सुपरबग) आणि तणनाशकांना प्रतिरोधक तणे (सुपरविडस्) अस्तित्वात आली आहेतच.
पर्यावरणस्नेही, शाश्वत सेंद्रिय शेती हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. संपूर्ण जग त्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारतीयांनी ‘जनुक संस्कारित सजीव’ तंत्रज्ञानातील धोके समजून घ्यावे. सुशिक्षितांनी आम जनतेला याबाबत साक्षर करावे, आणि धोरणकर्त्यांपर्यंत आपली मते ठामपणे मांडून कंपन्यांचे राक्षसी बेत हाणून पाडावेत. अन्यथा वेळ निघून गेली असेल. अभी नहीं तो कभी नहीं.
पत्ता – मु. रवाळा, पो. सातनूर, ता. वरूड, जि. अमरावती – ४४४९०७
जगात वापरत असलेल्या शेतजमिनीपैकी जीएम पिकांच्या लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र: ३.४% जीएम पिकांच्या लागवडीखालील जमिनीत विविध देशांचा वाटा १) अमेरिका: ४०.८०% २) ब्राझील २१.४०% ३) अर्जेन्टिना: १४.०३% ४) कॅनडा : ६.८०% ६) भारत: ६.३०% ६) चीनः २.३४% ७) अन्यः ८.३३%