वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स ‘अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत” हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेले वाक्य; पण प्रगतीचे घोडे अजून पहिल्याच पायरीवर अडलेले आहे. अर्थात, अनेकांच्या मनात पुढचे वळण घेतले की आलेच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोहचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.
जगाची लोकसंख्या आज सात अब्ज आहे आणि त्यातले एक अब्ज लोक उपाशी आहेत. त्यातले बरेच भारतात आहेत. पण त्याचवेळी भारत अन्नधान्याचा निर्यातदारही आहे. एकूणच जगात आजच्या घडीला दहा-अकरा अब्ज लोकांना पुरेल इतके अन्न निर्माण होते. (जगाची लोकसंख्या दहा अब्जावर स्थिर होईल असा अंदाज आहे.)
जगात निर्माण होणाऱ्या अन्नापैकी ४०-५०% अन्न वाया जाते. हे वाया जाणारे अन्न काही शेतात वाया जात नाही. ते वाया जाईल याची काळजी घेतात आपली एफिशियंट मार्केट्स. उदाहरणार्थ, धान्यापासून इंधन तयार करणे, दारू तयार करणे किंवा गेला बाजार कत्तलखान्यातल्या गुरांना ते खाऊ घालणे जास्त फायदेशीर असल्याने ज्यांच्याकडून काहीही आर्थिक लाभ नाही अशा लोकांना अन्न देण्यात काय हशील? समजा अगदी निर्यात करता आले नाही, इंधनासाठी वापरता आले नाही, दारूसाठी वापरता आले नाही तरी ते फुकटात वाटण्याचा जास्तीचा खर्च कोण करणार? त्यापेक्षा ते तसेच पडून सडून गेलेले बरे असा थोर विचार त्यामागे असतो. पण मग लक्षावधी लोक भुकेले असताना आणि टनावारी अन्न वाया जात असताना करता येण्यासारखा सोपा सुटसुटीत उपाय काय असावा बरं?
करेक्ट! आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी अन्न निर्माण करणे! इतके अन्न-धान्य निर्माण झाले पाहिजे की पडून सडून जाणाऱ्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा खर्च ते फुकटात वाटण्यापेक्षा जास्त झाला पाहिजे असे अगदी सोप्पे गणित आहे; पण हे गणित प्रत्यक्ष यायला आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत अशा काही विशेष शेतकऱ्यांची मदत घेणे भाग आहे. आपल्या मदतीची इतकी गरज आहे हे पाहून आणि वॉर ऑन हंगरमधला फायदा पाहून मॉन्सॅन्टो, बेयर, सिन्जेन्टा सारखे अनेक नवे शेतकरी आता झपाट्याने या क्षेत्रात उगवून फोफावले आहेत.
आता वॉर म्हटले की रक्तपात, हिंसा आणि मृत्यू हे ठरलेलेच. भुकेविरुद्धच्या युद्धात अन्नधान्याचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत असलेल्या (आणि नसलेल्याही) कीडींचा, तणाचा आणि इतर जीवजंतूंचा नाश होणार हे ओघानेच आले आणि हा असा नाश करण्याचा जोरदार अनुभव ही या शेतकऱ्यांची जमेची बाजू आहे.
डीडीटी ते राऊंडअप अगदी दुसऱ्या महायुद्धापासून ते छोट्या-मोठ्या युद्धांपर्यंत अमेरिकन सरकारला मदत करणाऱ्या मॉन्सॅन्टोने १९४४ साली अशाच एका वॉर ऑन मलेरियामध्ये डीडीटीचा शोध लावला. अगदी काळजीपूर्वक त्याचे टेस्टिंग करून त्यापासून काहीही धोका नाही आणि फक्त डास, पिकांवरची कीड व मलेरियाचे जंतूच मरतील ही खात्री केल्याचे दावे करून त्यांनी ते विकायला आणले. लवकरच आपण रोगमुक्त होणार म्हणून समस्त जगाने आनंदाने त्याचा मुबलक वापर सुरु केला. १९७२ साली रेचेल कार्सन यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकानंतर केवळ लोकाग्रहास्तव त्यावर अमेरिकेत बंदी आणण्यात आली आणि ते युद्ध थांबवावे लागले. पण इतरत्र त्याचा वापर बराच काळ चालू राहिला.
अर्थात त्यापूर्वीच मॉन्सॅन्टोने दुसरी महत्त्वपूर्ण जबाबदारी शिरावर घेतली होती. व्हिएतनामच्या युद्धात व्हिएतनामी सैनिक लपून गनिमी कावा करतात, म्हणून तिथली दाट वृक्षराजी नष्ट करण्यासाठी एजंट ऑरेंज आणि त्या सैनिकांना अन्नपुरवठा करणारी त्यांची पीके नष्ट करण्यासाठी एजंट ब्लू अशी दोन अमोघ रासायनिक अस्त्रे मॉन्सॅन्टोने निर्माण केली. ती फवारल्यानंतर जवळजवळ सत्तर-ऐशी लाख व्हिएतनामी लोकांना उपासमार टाळण्यासाठी स्थलांतर करावे लागले. एजंट ऑरेंजच्या आणि त्यात मिसळल्या गेलेल्या डायॉक्सिनच्या विषारीपणामुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या. मॉन्सॅन्टोचा दबदबा वाढतच होता.
विसाव्या शतकाच्या शेवटी आपल्या रासायनिक ज्ञानाचा उपयोग या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ जीनटेक नावाच्या कंपनीने बोव्हाईन सोमॅटोट्रॉपिन नावाचा एक हार्मोन कृत्रिमरीत्या तयार करायचे प्रयत्न चालवले होते. मॉन्सॅन्टोने या कंपनीशी हात मिळवणी केली आणि तीस कोटी डॉलर्स खर्चून रिकॉम्बिनन्ट डीएनए वापरून एकदाचा हा हार्मोन तयार केला. डीडीटीप्रमाणेच याच्याही काटेकोर तपासण्या करण्यास मॉन्सॅन्टो विसरली नव्हती. त्यांनी या हार्मोनच्या काटेकोर फील्ड ट्रायल्स घेतल्यावरच ते बाजारात आणले. त्यांनीच केलेल्या या तपासण्यांमध्ये थोडा जरी धोका आढळला असता तरी त्यांनी तीस कोटी डॉलर्सवर हसत-हसत पाणी सोडले असते यात काय संशय? हा हार्मोन गायींच्या दूध निर्मितीसाठी कारणीभूत असतो, त्यामुळे बाहेरून हा हार्मोन टोचल्यावर गायींचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढते आणि शेतकऱ्याचा अमाप फायदा होतो. सध्या हा हार्मोन भारतासह अनेक देशांमध्ये वापरला जातो. असे असूनही काही लोकांनी याविरुद्ध ओरड सुरु केली. अतिदुग्धोत्पादनाने गायींच्या सडा-आचळांमध्ये जंतूसंसर्ग होऊन पू होतो आणि असा पू दुधात मिसळला जाऊ शकतो असा प्रचार काही लोकांनी चालू केला. मॉन्सॅन्टोच्या चाचण्यांमध्ये, असा पू दुधात जाऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते असे नमूद केलेले असूनही काही लोकांनी त्यावर विश्वास दाखवला नाही. शिवाय या जंतुसंसर्गावर औषध म्हणून वापरली जाणारी प्रतिजैविकेही दुधात मिसळतात असाही आरोप केला.
काही डेअरीचालकांनी आमच्या दुधात असा हार्मोन नसतो असे लेबल त्यांच्या दूधपिशव्यांवर लावायला सुरुवात केली. पण नैसर्गिक हार्मोन आणि मॉन्सॅन्टोच्या हार्मोनमध्ये काहीही फरक नाही असा दावा करून मॉन्सॅन्टोने त्यांच्यावर खटले ठोकले आणि ती लेबल्स बाद ठरवली. काही लोकांनी असा हार्मोन टोचणे गायींच्या आरोग्याला धोकादायक आहे असा आरोप केला. इन्शुलिन माणसाच्या शरीरातले नैसर्गिक द्रव्य असले तरी ते बाहेरून टोचत राहिल्यास माणूस आजारी पडेल तसेच गायींचेही आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्याच दरम्यान जेन अँक्रे आणि स्टीव्ह विल्सन या फॉक्स टीव्हीसाठी काम करणाऱ्या पत्रकारांच्या जोडगोळीने मॉन्सॅन्टोच्या चाचण्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास करून व मॉन्सॅन्टोच्या संशोधकांच्या मुलाखती घेऊन या बोव्हाईन ग्रोथ हार्मोनवर एक चार भागांची मालिका बनवली. या मालिकेत या हार्मोनचा गायींच्या व माणसांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात असे सांगणारे अनेक दावे होते आणि मॉन्सॅन्टोच्या दाव्यांचे खंडन होते. जेफ्री स्मिथ या सीड्स् ऑफ डिसेप्शन पुस्तकाच्या लेखकाने लिहिलेल्या लेखात त्याबद्दल विस्तृत माहिती आहे. मॉन्सॅन्टो हे फॉक्स टीव्हीचे मोठे गिऱ्हाईक असल्याने त्यांनी फॉक्स टीव्हीने खाल्ल्या मिठाला जागून या मालिकेत काही बदल करावे असे सुचवले; पण या पत्रकारांनी ते ऐकले नाही. फॉक्स टीव्हीला नाईलाजाने त्यांना नोकरीवरून काढावे लागले, तर त्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने सुरुवातीला पत्रकारांची बाजू घेतली पण मॉन्सॅन्टोने अपील केल्यावर कोर्टाच्या लक्षात आले की एखाद्या बातमीत टीव्ही चॅनलने फेरफार करू नयेत असा फक्त संकेत आहे, कायदा नाही. अशा रीतीने मॉन्सॅन्टोने आणखी एक लढाई जिंकली.
जैवतंत्रज्ञानातल्या या सुरुवातीच्या यशानंतर मॉन्सॅन्टोने जनुकांतरित (जेनेटिकली मॉडिफाईड) पीके निर्माण करायला सुरुवात केली. बेयर कंपनीने निर्माण केलेले बीटी तंत्रज्ञान वापरून बीटी मका, बीटी वांगे, बीटी कापूस अशा अनेक कीटकनाशक क्षमता असलेल्या वनस्पती त्यांनी निर्माण केल्या. अमेरिकेत उगवणाऱ्या मक्यापैकी बराचसा मका आता जनुकांतरित मका आहे. भारतातही बीटी कापूस शेतकरीप्रिय झाला आहे आणि अनेक शेतकऱ्याचा बीटी कापसाने बराच फायदा झाला आहे. बीटी तंत्रज्ञानाने वनस्पतींमध्येच कीडनाशक प्रथिने टाकल्याने कीटकनाशकांचा खर्च वाचतो, शिवाय कीटकनाशक फवारावे न लागल्याने जमिनीत व पाण्यात प्रदूषण होत नाही. असा दुहेरी फायदा होत असला तरी त्याविरुद्धही काही लोकांनी ओरड सुरू केलीच. या जनुकांतरित पिकांची पूर्ण चाचणी घेतली गेलेली नाही असा काहींचा आक्षेप होता. मध्यंतरी एका शास्त्रज्ञाने जनुकांतरित अन्न खाऊन उंदरांमध्ये गंभीर आजार निर्माण होतात असा निष्कर्ष काढणारे संशोधन प्रसिद्ध केले. सुदैवाने त्या संशोधनातल्या महत्त्वाच्या त्रुटी लगेच लक्षात आल्याने त्या शास्त्रज्ञाला लगेच कामावरून काढून टाकण्यात आले आणि मॉन्सॅन्टोला लढायची वेळ आली नाही.
मॉन्सॅन्टोने कीटकनाशक वनस्पतींप्रमाणेच तणनाशकरोधी वनस्पतीही निर्माण केल्या आहेत. शेतात शेतकऱ्याला हव्या असणाऱ्या पिकांबरोबरच नको असलेले तण आणि मातीतले इतर जीवजंतू त्या पिकांशी स्पर्धा करत असतात. या स्पर्धकांमुळे पिकांची वाढ हवी तशी होत नाही आणि शेतकऱ्याला कमी उत्पादन मिळते. या स्पर्धकांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर जहरी तणनाशक औषध फवारणे आवश्यक असते. परंतु, असे जहरी औषध फवारल्यास सामान्य पिकांनाही त्याचा त्रास होतो. म्हणून मॉन्सॅन्टोने संशोधन करून एक जहरी तणनाशक आणि त्या तणनाशकाच्या फवाऱ्यातही जिवंत राहील असे पीक अशी जोडगोळी तयार केली. त्या तणनाशकाला अतिशय समर्पक असे नाव देण्यात आले: राऊंडअप. आणि अशा पिकांना राऊंडअपरेडी पीक असे म्हटले जाऊ लागले. राऊंडअपरेडी सोयाबीन आणि करडई ही दोन पीके बघता बघता लोकप्रिय झाली आहेत.
या राऊंडअपविरोधातही काही लोकांनी लगेच ओरडा सुरु केला. काहींच्या मते ते इतके जहरी आहे की राऊंडअपरेडी पीके मातीत उगवणाऱ्या कोणत्याही वनस्पतीसह सूक्ष्मजंतूंनाही ते नष्ट करते आणि यात पिकांना पोषक अशा जीवजंतूंचाही समावेश होतो. काहींच्या मते या राऊंडअपरेडी पिकांची मातीतून खनिजे शोषण्याची शक्ती कमी असते त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य नेहमीच्या पिकांपेक्षा फारच कमी असते. बऱ्याच लोकांचा तर मुळात जनुकांतरित पिकांनाच विरोध आहे आणि त्यांना असे अन्न खायचे नसते. म्हणून अनेक देशांमध्ये अशा अन्नाच्या पिशव्यांवर ते जनुकांतरित असल्याचा इशारा छापणे बंधनकारक केले आहे. याविरुद्ध मॉन्सॅन्टोची लढाई चालू आहे. अमेरिकेतही अशी मागणी जोर धरू लागली आहे; पण मॉन्सॅन्टोने एफडीएकडे असे प्रतिज्ञापत्र दिले आहे की जनुकांतरित पिकांमध्ये आणि सामान्य पारंपारिक पीकांमध्ये काहीही फरक नाही त्यामुळे अशा अन्नधान्यावर वेगळा इशारा छापायची गरज नाही. कोणत्याही कंपनीला आपल्या उत्पादनावर स्वतःचे नाव छापून स्वतःची जाहिरात करायचीच असते; पण याबाबतीत आपल्या उत्पादनांवर स्वत:चे नाव न छापण्याचे मॉन्सॅन्टोचे औदार्य वाखाणण्यासारखे आहे. अर्थात स्वत:चे व्यावसायिक हितसंबंध सांभाळण्यासाठी मॉन्सॅन्टोला पेटंट ऑफिसात मात्र नाईलाजाने जनुकांतरित पीके सामान्य पीकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत आणि ती मॉन्सॅन्टोच्या परवानगीशिवाय कोणालाही वापरता येणार नाहीत असे ठामपणे सांगावे लागतेच.
इतकेच नाही, तर चोरून जनुकांतरित पीके वापरणाऱ्या भामट्या शेतकऱ्यां विरुद्ध सतत लढावेही लागते. हे शेतकरी वाऱ्याने जनुकांतरित बियाणे आमच्या शेतात आली असा बहाणा करतात. अशा अनेक शेतकऱ्यांना मॉन्सॅन्टोने कोर्टात खेचून धडा शिकवला आहे, शिवाय वाऱ्याने जनुकांतरित बियाणे येऊन रुजू नये म्हणून आपापल्या शेतांमध्ये कडेचा काही भाग बफर म्हणून पडीक ठेवण्याचा सज्जड दमही भरला आहे. पण मॉन्सॅन्टोची लढाई अद्याप संपलेली नाही.
शेतकऱ्यांना पूर्वापार तयार झालेल्या धान्यातून बियाणं वाचवून ठेवायची, वेगवेगळे संकर करायची खोड आहे आणि भारतासारख्या देशात असल्या उद्योगांमधून प्रत्येक धान्याच्या अक्षरश: शेकडो जाती त्यांनी तयार करून ठेवल्या आहेत. ही सवय मॉन्सॅन्टोच्या व्यवसायास अतिशय मारक आहे. उद्या कोणी मॉन्सॅन्टोची जनुकांतरित बीजे घेतली आणि त्यातून भरघोस पीक घेऊन नंतर त्यातलीच बीजं वापरून फुकटात स्वत:चा फायदा करून घेतला तर मॉन्सॅन्टोचे दिवाळे वाजेल. म्हणून मॉन्सॅन्टोने टर्मिनेटर टेक्नॉलॉजी नावाचे अतिशय चतुर तंत्रज्ञान निर्माण केले आहे. हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेली पीके एका पिढीनंतर स्वतःला नष्ट करतात. म्हणजे फुकटात वर्षानुवर्षे बीजे वापरणे किंवा त्यांचा दुसऱ्यांशी संकर करून पेटंट नसलेल्या प्रजाती निर्माण करणे शक्यच होणार नाही. आता स्वतःचा व्यवसाय सांभाळण्यासाठी हे आवश्यक असतानाही काही लोक जैवविविधता धोक्यात येईल म्हणून त्याविरुद्ध बोंबाबोंब करू लागले आहेत.
मॉन्सॅन्टोच्या अशा प्रत्येक कृतीला विरोध करणे हा स्वतःला मानवतावादी आणि पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या काही लोकांचा धंदाच झाला आहे. ज्या देशांमध्ये राज्यकर्त्यांनी जनुकांतरित पिकांना पाठिंबा दिला आहे त्या देशातले ते राज्यकर्ते व उच्चभ्रू लोक स्वतः मात्र जनुकांतरित अन्न खात नाहीत; किंबहुना खुद्द मॉन्सॅन्टोच्या कॅन्टीनमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना जनुकांतरित अन्न न दिले जाण्याची ग्वाही दिली जाते असा प्रचार करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे.
मध्यंतरी अमेरिकेत शेतकऱ्यांच्या हिताचे एक विधेयक पारित करण्यात आले. फार्मर्स अॅश्युरन्स प्रोव्हिजन ह्या अधिनियमानुसार एखाद्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाविरुद्ध एखाद्याने कोर्टात तक्रार केली आणि ती ग्राह्य मानून कोर्टाने त्या उत्पादनावर बंदी आणली, तरी त्या शेतकऱ्याचे हित पाहून सरकारला ती बंदी अंमलात न आणण्याची मुभा दिली आहे. या कायद्यामुळे उठसूट कोणीही मॉन्सॅन्टोच्या जनुकांतरित पीकांविरुद्ध तक्रार केली आणि कोर्टाने त्यावर बंदी घातली तरी मॉन्सॅन्टोचे नुकसान होण्यापासून संरक्षण होणार आहे. अर्थातच या कायद्यामुळे मॉन्सॅन्टोच्या हितशत्रूंना पोटशूळ उठला आणि त्यांनी या कायद्याला मॉन्सॅन्टो प्रोटेक्शन अॅक्ट असे नाव देऊन त्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे. पण तरीही अशा गोष्टींना भीक न घालता जगातून भूक कायमची नष्ट करण्यासाठी या सर्वांविरुद्ध मॉन्सॅन्टोची अथक लढाई चालू आहे.
भारत आणि मॉन्सॅन्टो भारतात मॉन्सॅन्टोचा चंचुप्रवेश आधीच झालेला आहे आणि भारतीय शेतकऱ्यांनी बीटी कॉटनच्या वापराने स्वतःच्या समृद्धीत वाढही करून घेतलेली आहे. अर्थात भारतातही मॉन्सॅन्टोचे हितशत्रू आहेतच. या हितशत्रूंमुळे जनुकांतरित अन्नधान्याला अजून भारतात परवानगी मिळू शकलेली नाही. मॉन्सॅन्टोने काही वर्षांपूर्वी कारगिल नामक बियाण्यांची कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या राजस्थानमधील अधिकाऱ्याने राजस्थानातल्या एका कृषी विद्यापीठाने शोधलेले एक बियाणे चोरले असा आरोप वंदना शिवा यांनी आपल्या सॉईल, नॉट ऑईल या पुस्तकात उघडपणे केला आहे. शिवाय जे एमच्या विरोधकांनी विदर्भात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा संबंध बीटी कॉटनशी जोडण्याचाही प्रयत्न केला आहे.
त्यामुळे भारतात जनुकांतरित अन्नधान्यांच्या वापराला परवानगी मिळावी म्हणून मॉन्सॅन्टोने केलेल्या प्रयत्नांना वारंवार खीळ बसली आहे. बीटी वांग्याच्या वापरावर कोर्टाने बंदी आणली आहे.
इ.स. २०१२ मध्ये बासुदेब आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक संसदीय समिती स्थापन करून भारतात जनुकांतरित धान्यांच्या क्षेत्रचाचण्यांसाठी परवानगी देण्याबाबत विचार करण्यात आला. या समितीने बराच अभ्यास करून शेवटी एकमुखाने जनुकांतरित धान्याला भारतात परवानगी देऊ नये असा निष्कर्ष काढला. या समितीच्या अहवालात लिहिलेला हा उतारा पाहाः
आमच्या अभ्यासभेटींमध्ये शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर समितीला असे आढळले की बीटी कापसामुळे शेतकऱ्यांचा विशेष लाभ झालेला नाही. उलटपक्षी भरपूर भांडवल लागणाऱ्याह्या कृषिपद्धतीमुळे त्यांची वित्तीय गरज अनेकपटीने वाढली आहे, ज्यामुळे त्यांना न परवडणाऱ्या कर्जबाजारीपणाच्या विळख्यात बहुसंख्य शेतकरी सापडले आहेत. विशेषतः सुरुवातीच्या काही वर्षातील हर्षोल्लास मावळल्यावर देशातील ७० टक्क्यांवर असणाऱ्या छोट्या व सीमांत शेतकऱ्याच्या वाट्याला बीटी कापसामुळे अधिक दुःखेच आली आहेत.
भविष्यात भुकेचा प्रश्न सोडवणारी शाश्वत (सस्टेनेबल) शेती देण्याचा दावा करणाऱ्या मॉन्सॅन्टोला हा एक मोठा धक्का होता. पण मॉन्सॅन्टोने आशा सोडलेली नाही.
नुकतीच भारताचे कृषीमंत्री श्री. शरद पवार व भारताचे पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांनी जनुकांतरित धान्यांच्या क्षेत्रचाचण्यांसाठी अनुकुलता दर्शवली आहे. शिवाय भारताच्या मनुष्यबळ खात्याचे मंत्री श्री. शशी थरूर यांनी जैवतंत्रज्ञानक्षेत्रात कितीतरी रोजगार निर्माण होतील अशा स्वरुपाचे वक्तव्य केले आहे. दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले स्वामिनॉमिक्सवाले स्वामीनाथन यांनीही जनुकांतरित पिकांची भलामण केली आहे.
लढवय्या मॉन्सॅन्टोच्या लढाईला यश येईल का हा प्रश्न नसून, कधी येईल हा प्रश्न फक्त उरला आहे. मतमतांतरे
अ) (लेखक: अपरिमेय) मॉन्सॅन्टो किंवा एकंदरीत मोठ्या कंपन्या आपल्या फायद्यासाठी कायदे राबवणारी यंत्रणा वाकवतात किंवा सरळसरळ आपल्याला हवे तसे कायदे बनवून घेतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याहून दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की लोकांचे, लोकांसाठी, लोकांद्वारे असणाऱ्या अशा या लोकशाहीत हे अगदी सहज होऊ शकते. हा लेख जरी मॉन्सॅन्टोविषयी असला तरी हे इतरही बऱ्याच ठिकाणी घडताना दिसते. या विषयाच्या सामाजिक पैलूंविषयी काही भाष्य करण्याइतपत माझा अभ्यास नाही, पण एकंदरीत जनुकीय बदल केलेले धान्य किंवा प्राणी यांच्या वापराचे मी समर्थन करतो. कारणमीमांसा खालीलप्रमाणे.
आज आपण खात असलेले सर्व धान्य हे सिलेक्टिव्ह ब्रीडींगमधूनच बनलेले आहे. ज्या काळात शेतीची उत्क्रांती होत गेली, तेव्हा काही गवतांचे गुणधर्म मानवाला फायद्याचे होते. उदाहरणार्थ, वजनाने जड आणि कणसापासून वेगळे न होणारे बी इत्यादी. ही गवते आपल्या बिया खूप लांबवर पसरवू न शकल्याने कधीच नैसर्गिक निवडीत टिकाव धरू शकली नसती. हलक्या बिया वाऱ्याने लांबवर जाणे जास्त सोपे असल्यामुळे हलक्या बिया असणाऱ्या गवतांना होता. ज्यावेळेला माणसाने शेती करायला सुरुवात केली तेव्हा मात्र कणसापासून वेगळे न होणारे, जड असणारे बी गोळा करण्याच्या आणि पोट भरण्याच्या दृष्टीने फायद्याचे होते. आज आपल्या वापरात असलेल्या टपोरे दाणे असणाऱ्या गहू बगैरे धान्यांच्या जाती याच सिलेक्टिव्ह ब्रिडींगमधून गेल्या काही हजार वर्षांत तयार झाल्या आहेत. हे प्राण्यांच्या बाबतीत पण तेव्हढेच खरे आहे.
हे सर्व जनुकीय बदल, जनुके म्हणजे काय हे माहित नसताना झाले आहेत. आज आपल्याला हे सर्व बदल का होतात ते माहीत आहे, आणि ते बदल (एका मर्यादेपर्यंत) घडवून आणण्याची क्षमता जर आपल्याकडे आहे तर ते का करू नये? त्यामुळे नक्की काय नुकसान होणार आहे? कॉर्पोरेट्सची हाव हा खूप वेगळा मुद्दा आहे, माझा प्रश्न फक्त आपण गेली काही हजार वर्षे तंत्र न समजता जे काही हळुहळू बदल घडवून आणले त्याच स्वरूपाचे बदल तंत्र समजून घेऊन जास्त डोळसपणे जर फक्त १० वर्षांत घडवून आणले, तर त्याने नक्की काय फरक पडतो? इतकाच मर्यादित आहे.
एक समांतर उदाहरण देतो. सामुराई तलवारी त्यांच्या गुणवत्तेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आज ज्या प्रतीच्या सामुराई तलवारी आपल्याला दिसतात, त्यांची सुरुवात आठव्या-नवव्या शतकात झाली. त्यात सुधारणा होत बाराव्या-तेराव्या शतकात त्या आज आहेत त्या पातळीपर्यंत पोहोचल्या. त्या सुधारणेच्या प्रक्रियेमागील धातुशास्त्रविषयक कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
१) एका विशिष्ट खाणीतून काढलेले लोहखनिज (खूप जास्त शुद्ध, गंधकाचे प्रमाण कमी) आणि एका विशिष्ट ठिकाणी सापडणारा कोळसा ह्यांच्या वापरामुळे भट्टीतून चांगल्या दर्जाचे पोलाद मिळते. २) फोर्जिंगची एक विशिष्ट पद्धत : यामुळे हवे तसे पोत मिळते, तलवार लवचिक असते आणि तिची धारही जास्त काळ टिकते. ३) हीट ट्रीटमेंटची पद्धत : तलवारीची धार आणि बाकीचे पाते हे वेगवेगळ्या वेगाने तापवून थंड केले जाते, त्यामुळे पाते लवचिक होते, धार कडक होते.
हे सर्व बदल हळुहळू होत गेले, ज्या काळात हे झाले तेव्हा धातुशास्त्र बाल्यावस्थेत होते. काय केल्यावर काय गुणधर्म असलेले पोलाद मिळेल हे समजले होते, पण ते का होते हे मात्र माहित नव्हते. आज मला बऱ्याच गोष्टी माहित आहेत. विविध प्रक्रिया व त्यामागील विज्ञान म्हणजे काय ते माहित आहे. लोखंड हे अॅल्युमिनियमपेक्षा जास्त कठीण का ते माहित आहे. उद्या जर मला एका विशिष्ट कामासाठी नविन मिश्रधातू बनवायचा असेल, तर मी आठव्या शतकात ज्या प्रकारे लोकांनी चुका करत ट्रायल अँड एरर पद्धतीने गोष्टी शोधून काढल्या, तसे न करता आधी तो मिश्रधातू कागदावर तयार करेन व नंतर तो प्रत्यक्ष भट्टीत बनवेन. जनुकीय बदल केलेले धान्य किंवा प्राणी यांच्या वापराचे समर्थन मी नेमक्या याच कारणामुळे करतो.
बऱ्याच लोकांचा तर मुळात जनुकांतरित पिकांनाच विरोध आहे आणि त्यांना असे अन्न खायचे नसते. हा माझ्या मते ‘मला हे ज्ञात नाही, म्हणजे हे वाईटच असणार’ असा प्रकार आहे, याला फारसे महत्व देऊ नये.
आ) (लेखक: हारून शेख ) बीटीबियाणांपासून उत्पादित धान्यात निर्माण होणारी प्रथिने ही साधारण धान्यामध्ये निसर्गतः तयार होणाऱ्या प्रथिनांहूनवेगळी असतात. बियाण्याच्या जनुकीय आराखड्यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घुसवलेले तथाकथित सुधारित जनुक उत्पादित धान्यात विकृत प्रथिने निर्माण होण्यास कारण ठरते. या धान्यातील प्रथिने ही विषारी आणि अॅलर्जीकारक असू शकतात असे वैज्ञानिक प्रयोगातून ठोसरीत्या आढळून आले आहे. मुळात जनुकीय अभियांत्रिकी ही ज्ञानशाखा फक्त ४० वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. ‘अजून बाल्यावस्थेत असलेली’ अशी तिची संभावना करता येईल. ‘जनुक आराखड्यात एक जनुक फक्त एकाच प्रथिनाच्या निर्मितीकरीता कारणीभूत असतो’ या सत्तर वर्षे जुन्या गृहितकावर आधारीत ही ज्ञानशाखा. पण हे गृहीतक २०१२ साली पूर्ण झालेल्या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ह्या अभ्यासांती चुकीचे ठरले आहे. एक जनुक एकापेक्षा अधिक प्रथिने बनवू शकते हे सिद्ध झाले आहे. आणि एक वैज्ञानिक सत्य म्हणून ते आता अभ्यासक्रमात शिकवले जाते. त्यामुळे केवळ एक जनुक बदलून आपल्याला बियाण्यात नियंत्रित बदल करता येतील ही समजूत बऱ्याच अंशी भ्रामक आहे. जनुकीय अभियांत्रिकीमुळे आपल्याला नको असलेले बदलही घडू शकतात आणि त्यातील काही तर केवळ दीर्घ मुदतीच्या अभ्यासांतूनच दृश्यरूप होऊ शकतात.
इ) मॉन्सॅन्टो बियाणी, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि इतर काही निरीक्षणे (लेखक : रुची ) १) मॉन्सॅन्टोविरोधातले मला सर्वात महत्वाचे वाटलेले आणि गांभीर्याने तपासून पहाण्यासारखे कारण आहे ते ‘पुनरुत्पादन’ करू न शकणाऱ्या बियाण्यांचे’ किंवा शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून राखलेली बियाणी त्यांना पुढील वर्षी न वापरू न देणाऱ्या करारांचे. भीती अशी आहे की या मार्गाने मॉन्सॅन्टोला जगाच्या अन्नधान्यव्यवस्थेवर निर्विवाद वर्चस्व तर प्रस्थापित करता येईलच; पण त्यामुळे माणूस शेती करायला लागल्यापासूनच्या नैसर्गिक शेतीच्या पद्धतीवरच हल्ला होईल. वेठबिगारी, कर्जबाजारी शेतकऱ्यांची नवीन पिढी तयार होईल, ज्यामुळे काही काळाने त्यांच्या जमिनी हिरावल्या जातील. सर्वात अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या नावाखाली जगातल्या हजारो जातींच्या बी-बियाण्यांतलं वैविध्य संपेल. ह्या बाबतीत मॉन्सॅन्टोचा गेम-प्लॅन तसा सोपा दिसतो.
जगातल्या सर्व महत्वाच्या सरकारांशी संगनमत करून त्या देशातील बाजारपेठांत चंचूप्रवेश करायचा. ‘अधिक उत्पादन देणारे बियाणे’ अशा जाहिरातीखाली आपली जनुकांतरित बियाणी (जी पुन्हा रुजविणे अशक्य असू शकतील) खपवायची. बियाणे पुन्हा रुजण्यासारखे असेल तरीही शेतकऱ्याबरोबर केलेल्या कराराप्रमाणे त्यांना मागील वर्षीच्या उत्पादनातून राखलेले बियाणे पुन्हा रुजवायला बंदी घालायची. एकदा शेतकरी करार करून बसला की त्याला प्रत्येक वर्षी मॉन्सॅन्टोला पैसे दिल्याखेरीज बियाणे मिळणे अशक्य बनवायचे. या पद्धतीने शेतकरी एकदा कर्जाच्या जाळ्यात सापडला की मग त्याचे शोषण करणे फारच सोपे होईल आणि कालांतराने त्याच्याकडे विकण्यासारखी असलेली एकच गोष्ट, ‘जमीन’ विकण्यासाठी तो तयार होईल. या पद्धतीने जगातला सर्वात मोठा ‘जमीनदार’, ‘सावकार’ मॉन्सॅन्टो, सगळ्या जगावर आपल्या अन्नधान्याच्या वर्चस्वाने साम्राज्य करेल.
‘धोक्याची घंटा’? शक्य आहे, पण शक्यता पडताळून न पाहिल्यास आणि योग्य पावले वेळीच न उचलल्यास नेहेमीप्रमाणे उशीर झालेला असेल. मॉन्सॅन्टोचा शेतकऱ्यांशी होणारा हा तथाकथित करार शेतकऱ्याने स्वाक्षरीही न करता, त्याने बियाण्यांचे पोते फोडल्याबरोबर आपोआप आंमलात येतो. त्या करारांविषयी आणि त्यातल्या सावकारी कलामांविषयी अधिक माहिती आंतरजालावरील जोडणीवर सापडेल.
२) जनुकांतरित बियाणी काही ठराविक परिस्थितीत बरेच जास्त उत्पादन देऊ शकत असली तरी जेंव्हा हवामानात लक्षणीय बदल घडतो (उदा. दुष्काळ, अतिवृष्टी वगैरे) तेंव्हा त्यातून इतर सामान्य बियाण्यांहून अतिशय कमी उत्पादन मिळते असे निष्कर्ष आहेत. त्यामुळेच कापसाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांत झालेली वाढ आणि त्याचा मॉन्सॅन्टोच्या बियाण्यांशी असलेला संबंध तपासून पहाणेही गरजेचे ठरते. त्यात मोठा परस्पर संबंध आहे असा दावा वंदना शिवासारख्यांनी केला आहे, पण त्यातले तथ्य तपासण्यासाठी सरकारांना आधी मॉन्सॅन्टोकडे संशयाने पहावे लागेल. ते सध्या शक्य आहे असे दिसत नाही. ईस्ट इंडीया कंपनी सुरवातीला फक्त व्यापाराच्या उद्देशाने भारतात आली होती. पण पुढे काय झाले हे पाहता दूरदृष्टीने विचार केला नाही तर यावेळेसही नवीन वसाहतवाद निर्माण होऊ शकतो हे लक्षात येते.
३) मॉन्सॅन्टोला सातत्याने फायद्यात राहण्यासाठी प्रत्येक धान्याच्या काहीच जातीच विकसित करून विकणे शक्य आहे आणि तसे झाल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या धान्याच्या अनेक जाती हळूहळू नामशेष होतील आणि आपले वैयक्तिक निवडीचे अधिकार संपतील हा एक मुद्दा झाला. एक ग्राहक म्हणून मला माझ्या अन्नधान्यात जे वैविध्य हवे आहे, ते मॉन्सॅन्टो संपविण्याच्या मार्गावर आहे. मी काय खाते, माझ्या पुढच्या पिढ्या काय खातील याचे सर्वाधिकार मला मॉन्सॅन्टोच्या स्वाधीन करायचे नाहीत. म्हणून या कारणासाठी माझा मॉन्सॅन्टोला वैयक्तिक विरोध आहे.
४) सर्वच शेतकऱ्यांनी एकाच जातीच्या पिकांची लागवड केल्याने उद्या काही परिस्थितीत त्या जातीचे पीक अपयशी ठरले, तर केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर सामान्य ग्राहकांसाठीदेखील तुटवड्यासारखे मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुमची सारी अंडी एकाच टोपल्यात ठेवणे हिताचे नाही असा तो मुद्दा आहे. साऊथ आफ्रिकेतल्या कणसे उगविणाऱ्या शेतकऱ्यांना जनुकांतरीत बियाण्यांतल्या चुकांचा तडाखा बसलाच आहे ज्यामुळे रोपांवर आत दाणेच न धरलेली कणसे आली. एखाद्या वर्षी अशा घटना मोठ्या आणि सार्वत्रिक प्रमाणात घडल्या तर त्यामुळे केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही त्याची किंमत चुकवावी लागेल.
५) मॉन्सॅन्टोच्या जनुकांतरित बियाण्यात एक मुख्य जनुकीय बदल असा केला जातो की त्याद्वारे हे बियाणे ‘राउंड अप’ आणि मॉन्सॅन्टोनेच बनविलेल्या इतर ग्लायाफोसेट असलेल्या कीटकनाशकांना दाद देत नाही. म्हणजेच ह्या कंपनीचे जी. एम. बियाणे आणि त्यांची कीटकनाशके हातात हात घालून जातात. इटलीमध्ये या ग्लायफोसेट असलेल्या कीटकनाशकांचा एक अभ्यास केला गेला ज्यामध्ये या कीटकनाशकांचा संबंध गर्भात निर्माण होणाऱ्या विकृतींशी जोडला गेला. त्याविषयी
६) फ्रान्समध्ये एक अभ्यास केला गेला, ज्यामध्ये काही उंदरांना दोन वर्षे जी.एम. अन्न खायला घालून काही चाचण्या केल्या गेल्या ज्याचे निकाल फार प्रतिकूल होते त्याबद्दल बी.बी.सी. बातमी होती.
७) भारतात समजा मॉन्सॅन्टोला मोकळं रान मिळालं, (जे अमेरिकेत आत्ताही आहेच) तर शेतकऱ्यांवर हे बियाणं लादलं जाईल, का तरीही त्यांच्याकडे, निदान दाखवण्यापुरता का असेना, निवडीचा अधिकार असेल (अमेरिकेत असतो)? ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास माझे उत्तर असे आहे की भारतीय शेतकऱ्याला आज असणारा पर्याय हा ज्याला ‘सोफीज चॉईस’ म्हणतात तसा आहे. त्याला जे हवे ते बियाणे पेरायचा अधिकार तत्वत: आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की मॉन्सॅन्टोने शिरकाव केलेल्या बाजारपेठेत दुसरे बियाणे विकू शकणाऱ्या कंपन्या टिकूच शकलेल्या नाहीत. मॉन्सॅन्टोने केवळ ‘जनुकांतरीत’ बियाणीच नव्हे, तर अनेक नैसर्गिक बियाणी विकणाऱ्या कंपन्याही विकत घेतल्या आहेत त्यामुळे तुम्ही कोणतेही बीज पेरा, मॉन्सॅन्टोच जिंकते !
८) ‘जोल सलातीन’ सारखे मूठभर शेतकरी ह्या जगड्व्याळ व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कंपनीने अमेरिकेतली न्यायव्यवस्था आपल्या बाजूने वळवून घेतल्याने अशा शेतकऱ्यांना नफा मिळवणारी शेती करण्यात मोठी आडकाठी येते आहे. म्हणजे समजा एका छोट्या शेतकऱ्याला आपल्या गाईचे ताजे, अनपाश्चराईज्ड, अनहोमोजनाईज्ड दूध ग्राहकांना विकायचेआहे आणि तसे दूध विकत घ्यायला इच्छुक ग्राहकही आहेत. तर अन्न व औषध प्राधिकरणाने (एफ.डी.ए.ने) अनपाश्चराईज्ड दूध विकणेच बेकायदेशीर ठरवल्यावर तो शेतकरी व ग्राहक काय करू शकतील? ऑरगॅनिक म्हणून विकली जाणारी उत्पादने ‘जनुकांतरीत’ असू शकतातच आणि अगदी ‘हेल्थ फूड्स’ वगैरे म्हणून विकली जाणारी उत्पादनेही ‘जनुकांतरीत ‘ असू शकतात. सर्व ‘जनुकांतरीत’ उत्पादनांवर तसे स्पष्ट छापले जावे ही मागणी त्याकरिताच आहे की जेणेकरून ग्राहकांना अंधारात ठेवले जाऊ नये.
ई) (लेखक: नितीन थत्ते) एक ग्राहक म्हणून मला माझ्या अन्नधान्यात जे वैविध्य हवे आहे ते मॉन्सॅन्टो संपविण्याच्या मार्गावर आहे. मी काय खाते, माझ्या पुढच्या पिढ्या काय खातील याचे सर्वाधिकार मला मोन्सांटोच्या स्वाधीन करायचे नाहीत म्हणून या कारणासाठी माझा मोन्साटोला वैयक्तिक विरोध आहे. ह्याविषयी विथ ऑर विदाउट मॉन्सॅण्टो, एक ग्राहक म्हणून मला माझ्या अन्नधान्यात जे वैविध्य हवे आहे ते मिळण्याची काय खात्री आहे? समांतर उदाहरण म्हणून मला कम्युनिकेशनचा ऑप्शन म्हणून पेजर हवा आहे. तो मला मिळत रहावा म्हणून कुणीतरी पेजर बनवत राहिलेच पाहिजे असा आग्रह मला धरता येत नाही. तद्वतच मला अमुक जातीचा तांदूळ हवा म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन केलेच पाहिजे असा आग्रह धरता येत नाही. त्या शेतकऱ्यांनी समजा (मॉन्सॅन्टोचा कुठलाही संबंध नसलेला) जाडा तांदूळच पिकवायचा ठरवले असेल (कोणत्याही कारणाने) तर माझे तथाकथित जैववैविध्य आणि आहारवैविध्य बोंबलतच जाते. हरित क्रांतीच्या काळातसुद्धा (हाय टाइम ऑफ समाजवाद) अनेक हायब्रिड जातींच्या बियाण्यांनी पारंपरिक पिकांना दूर सारले होतेच. आज मला (बाजारात) गावठी गायीचे दूध कुठे मिळते? फरक असलाच तर पुनरुत्पादन करू न शकणारी पिके वगैरे गोष्टींचा आहे. बाकी जीएमफूड मुळे जे काय दुष्परिणाम होतात त्याबद्दलच्या मूळ प्रश्नाचे उत्तर मॉन्सॅन्टो विरोधक देतात का? हे जनुकीय बदल एव्हाना आपोआप घडले असते तर काय झाले असते? की मॉन्सॅन्टो ज्या प्रकारचे बदल करते आहे ते आपोआप होऊच शकणार नाहीत असा दावा आहे?
उ) (लेखक: राजेश घासकडबी ) चर्चेत अनेक महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत. चूक किंवा बरोबर अशी काळीपांढरी लेबले न लावता प्रश्नाच्या सर्व बाजू समजून घ्यायला त्याने मदत होते. त्यातल्या काही मुद्द्यांबाबत माझे विचार.
१) मॉन्सॅन्टो ही कंपनी शेतकऱ्यांना त्यांची बियाणे पुन्हा लावू देत नाही. दरवेळी नवीन विकत घ्यायला लावते. यात आणि म्युझिक कंपन्यांच्या ‘आमची गाणी कॉपी करून वाटू नयेत’ या मागणीत साम्य आहे. जर व्हिडिओ, ऑडियो पायरसी बेकायदेशीर आणि ती पायरसी होऊ नये म्हणून उत्पादकांनी प्रयत्न करणं सर्वमान्य आहे तर बियाणांबाबतीत वेगळा न्याय का असावा? शेवटी इलेक्ट्रॉनिक कॉपी करणं, आणि जमिनीतून पीक काढून कॉपी करणे यात नक्की फरक काय आहे?
२) मॉन्सॅन्टोची उत्पादने शेतकऱ्यांचे मार्केट काबीज करू पहात आहेत. त्यामुळे त्यांची एकाधिकारशाही होईल. – सध्या तरी तशी परिस्थिती वाटत नाही. औषधांप्रमाणेच बियाणांनाही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स मिळतात. कालांतराने ते नष्ट होतात. त्यानंतर प्रत्येक जण ती बियाणे वापरू शकतो. म्हणजे ही परिस्थिती तात्पुरती आहे. ही बियाणे जवळपास फुकट मिळतील. त्यावेळीही मॉन्सॅन्टोचे नवीन उत्पादन घ्यावेसे वाटण्यासाठी शेतकऱ्याला फायदा व्हायला हवा. तेव्हाही जर शेतकऱ्यांनी नवीन बियाणे घेतली तर याचा अर्थ त्यांनी डोळस निवड केली आहे. मग एकाधिकारशाही कसली?
३) मी जे खाणार त्यावर माझे नियंत्रण हवे. – हे नियंत्रण आपण गेली शेकडो वर्षं हळूहळू सोडत आलेलो आहोत, आणि हे सोडणे नाईलाजाने नव्हे, प्रत्येक वेळी त्यातून होणाऱ्या फायद्यापोटी झालेलेआहे. जर शेजारच्या दुकानांत दूध मिळत असेल तर कॉलनीतल्या प्रत्येकाने गाय पाळण्याची गरज रहात नाही. इथे आपण नियंत्रण सोडतो. इतर कोणीतरी ते करेल यांची व्यवस्था करतो. आणि या व्यवस्थेतून होणारे फायदे इतके प्रचंड आहेत की त्यासाठी नियंत्रण सोडण्यातून होणारे तोटे नगण्य ठरतात. त्यामुळे स्वतःचे नियंत्रण हे तत्वासाठी तत्व म्हणून पटत नाही.
४) मॉन्सॅन्टोने कायद्यातच बदल घडवून आणला. – हे निश्चितच घृणास्पद आहे. कारण आपण नियंत्रण ठेवणारी व्यवस्था तयार केली, ती कुचकामी ठरते असा अर्थ त्यातून निघतो. मात्र या विशिष्ट कायद्याबाबत जरा जास्त बाऊ केला जात आहे असे वाटते. कोर्टाने घातलेली बंदी तात्पुरती रद्दबातल ठरवण्याचा अधिकार आजही अमेरिकेच्या कृषिमंत्र्यांना (ॲग्रिकल्चरल सेक्रेटरीला) आहे. एफडीएने सुरक्षित म्हणून जाहीर केलेल्या बियाणांनाच हे लागू आहे. ती बियाणे पुरेशी धोकादायक ठरली तर ती बंदी लागू ठेवण्याची निवडही त्यांना करता येते. तसेच हा कायदा सप्टेंबर २०१३मध्ये संपुष्टात येणार आहे. नियम वळवून घेण्याचे प्रकार जागोजागी दिसतात आणि ते बंद झाले पाहिजेतच. पण याचा अर्थ न्यायव्यवस्था, कायदेमंडळ हे सर्वच जण मॉन्सॅन्टोच्या खिशात आहेत असा होत नाही. जिवंत लोकशाहीत तीव्र चुकीचे निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्यांना जनता शिक्षा देते याची अनेक उदाहरणे आहेत.
५) पुरेसे संशोधन न होता बियाणे बाजारात आणू नये. – पुन्हा, हे तत्व म्हणून मान्य आहेच. पण किती पुरेसे हे पुरेसे ? ते बाजारात न आणण्याची अपॉर्चुनिटी कॉस्ट काय? किती कोटी माणसे जगवण्यासाठी कितीशे माणसांचं आयुष्य कदाचित किंचित कमी होण्याची शक्यता ही पुरेशी आहे? ही उत्तरे सोपी नसतात. पण कुठेतरी रेषा आखून म्हणावे लागते, की हो, हे पुरेसे आहे.