आपल्या पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व म्हणजे मुळातच एक नवलाईची बाब आहे. त्यातही जास्त विस्मयकारक आहे ती या सजीवांची विविधता. अंदाजे ९०० कोटी प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव या पृथ्वीवर वास्तव्य करून आहेत. येथे जवळपास ७०० कोटी लोकसंख्या आहे माणसांची व त्यात सतत भर पडतेच आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या असंख्य प्रकारच्या गरजा पुरविण्यासाठी मात्र निसर्गातील जैवविविधतेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणेबळी दिला जात आहे. जैवविविधतेच्या -हासाला खरा वेग आला तो जगात औद्योगिक क्रांतीला सुरवात झाल्यानंतर. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात मानवी समाजाचा एकूण ऊर्जावापर वीस पटीने तर प्रति माणशी वापर शंभर पटीने वाढला आहे. या अति ऊर्जावापराच्या मुळाशी आहे अनावश्यक गरजांच्या चैनीच्या राहणीमानाची हाव. तिचेच प्रतिबिंब वाढत्या कारखानदारीत, जंगलांच्या हानीत, नैसर्गिक संसाधनांच्या लुटीत, नागरीकरणाच्या प्रसारात, रसायनांच्या प्रच्छन्न वापरात आणि जमीन, पाणी व हवा यांच्या प्रदूषणात दिसत आहे. आधुनिक मानवाच्या या सर्व क्रियाकलापांचा परिणाम अपरिहार्यपणे झाला आहे तो जैवविविधतेच्या अतोनात हानीवर. त्यात आता भर पडणार आहे ती जनुक-संस्कारित पिकांच्या (जेनेटिकली मॉडिफाईड-जीएम) वापराची. या संदर्भात अशा प्रकारच्या पिकांचा जैवविविधतेवर काय परिणाम होणार आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधता म्हणजे एखादे स्थान अथवा क्षेत्र यात असलेल्या जीवांच्या प्रकारांची (लाईफ फॉर्मस् ) म्हणजेच वनस्पती, प्राणी व सूक्ष्म जीव यांची विविधता; म्हणजेच या विशिष्ट क्षेत्रात वास्तव्याला असलेल्या अनेकविध प्रजातींची संख्या व विपुलता. एखाद्या क्षेत्रात एका प्रजातीची अनेक वाणे (Varieties/races) असू शकतात. ही सुद्धा एक प्रकारची जैवविविधताच होय. ज्या क्षेत्रात एखाद्या प्रजातीची. वाणे /रानटी वाणे (wild races) जगातील इतर क्षेत्राच्या तुलनेत बहुसंख्येने आढळून येतात ते क्षेत्र म्हणजे त्या प्रजातीच्या उत्पतीचे मूळस्थान असावे असे समजले जाते. उदारणार्थ, भारतात वांग्याची जवळपास २५०० च्या वाणे आढळतात व ही संख्या जगात इतरत्र आढळणाऱ्या वाणांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. म्हणून भारत (विशेषतः भारत-म्यानमार सीमेवरील प्रदेश) हे वांग्याचे उत्पत्तिस्थान समजले जाते. एखाद्या परिसंस्थेत जैवविविधतेची विपुलता जेवढी जास्त, तेवढी त्या परिसंस्थेतील प्रजातींमधील परस्परसंबंध जास्त गुंतागुंतीचे (complex) असतात. त्यामुळेच ती परिसंस्था सुदृढ राहते, तसेच मानवी हस्तक्षेपामुळे अथवा निसर्गातील अचानक बदलांच्या परिणामांमुळे होणाऱ्या स्थित्यंतराच्या काळातदेखील दीर्घकाळ टिकून राहू शकते.
जैवविविधतेचे महत्त्व जैवविविधतेमुळे आपणास खालील महत्वाचे लाभ होतात. त्यामुळे ती टिकून राहणे किती गरजेचे आहे तेही समजेल.. १) सृष्टीतील सर्व प्रकारच्या हिरव्या वनस्पतींद्वारे सौर-प्रकाशऊर्जेचा वापर करून प्राथमिक अन्ननिर्मिती (primary production) केली जाते व ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीनुसार अन्नसाखळीतील सर्व जीवांना जगण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नाच्या स्वरुपात पुरविली जाते. २) मानवी वापरासाठी आवश्यक असा सर्व प्रकारचा कच्चा माल, औषध निर्मितीसाठी लागणारी संसाधने, ऊर्जा, जनुकीय संसाधने, इत्यादी आपणास विविध प्रकारच्या जैविक संसाधनातून प्राप्त होतात. ३) जैवविविधतेने समृद्ध अशा परिसंस्थेद्वारे अनेक प्रकारच्या सेवा (ecosystem services) आपणास प्राप्त करून दिल्या जातात. जसे, हवा व पाण्याचे शुद्धीकरण, कचऱ्याची नैसर्गिक विल्हेवाट व त्यातीलविषाक्त घटकांचा नाश, विविध संसाधनांचा पुरवठा, कीड व रोगांवर नियंत्रण, इत्यादी. ४) सजीवांच्या विविधतेमुळे परिसंस्थेला (ecosystem) आग, महापूर, दुष्काळ, रोगजंतूंची लाट /महामारी यासारख्या निसर्गदत्त आपत्तींमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करायला मदत होते. ५) जनुकीय विविधतेमुळे रोगांवर नियंत्रण साधता येते व वातावरणात होणाऱ्या बदलांशी जुळवून घ्यायला मदत होते.
६) यापुढील काळात हवामान बदलाचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. त्याचा सामना करण्यासाठी जैविक विविधतेची मदत होऊ शकते.
जनुक-संस्कारित पिकांचे स्वरूप निसर्गसृष्टीत वनस्पतींच्या अनेक प्रकारच्या प्रजाती व त्यांची वाणे दोन पद्धतीने निर्माण होतात. पहिली पद्धत म्हणजे एकाच प्रजातीच्या दोन जीवांमध्ये (individuals) किंवा क्वचित प्रसंगी वनस्पतींच्या एकाच कुलातील ( family) जवळच्या दोन प्रजातींमधील दोन जीवांमध्ये होणारे परस्परपरागीकरण (cross pollination ). दुसऱ्या पद्धतीत वनस्पतीच्या जनुकीय रचनेत (genome) काही बदल अचानक (mutations) निर्माण होतात व ते पुढील पिढीतही संक्रमित होतात. अशाच पद्धतीने पिकांचीही नवी वाणे अथवा नव्या प्रजाती निसर्गात तयार होत असतात. शेतीचा शोध लागल्यानंतर गेल्या शेकडो वर्षांच्या काळात जगभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या सजग निरिक्षणांतून निसर्गातील अशा असंख्य वाणांची निवड केली व कृत्रिम परस्पर परागीकरणाद्वारे स्वतःही पिकांच्या नव्या वाणांची व प्रजातींची निर्मिती केली. यातूनच विज्ञानाचे वनस्पती संकरीकरण (plant breeding) हे नवे शास्त्र उदयाला आले. यात पिकाच्या एखाद्या प्रजातीमधील काही निवडक वाणांमध्ये संकर घडवून जास्त चांगले गुणधर्म असलेले नवे सुधारित वाणनिर्माण करता येते. या संकरीकरण पद्धतीचा व्यापक प्रमाणावर उपयोग करूनच जगभर नावाजलेल्या हरितक्रांतीमध्ये पिकांची जास्त उत्पादन देणारी वाणे शोधली गेली आहेत.
जगातील वाढत्या लोकसंखेचा अन्नप्रश्न सोडविण्याच्या नावे जनुक-संस्कारित पिकांच्या प्रसाराचा मुद्दा सध्या जागतिक व राष्ट्रीय स्तरावर रेटला जातो आहे. या तंत्राच्या वापराद्वारे आवश्यक ती अन्ननिर्मिती कीटकनाशकांच्या वापराशिवाय कशी करता येईल, म्हणजेच हे तंत्र कसे पर्यावरणपूरक आहे, हेही सांगितले जात आहे. हे तर एक प्रकारे अणुऊर्जा ही इतर इंधनांच्या तुलनेत जागतिक तापमान वाढीस हातभार लावणारी नसल्यामुळे पर्यावरणस्नेही आहे असे सांगण्यासारखेच आहे. अर्थात जनुकीय संस्कारित पिकांच्या बियाणे व्यापारात जागतिक स्तरावर मोठीच आर्थिक लाभाची उलाढाल होण्याची शक्यता लक्षात घेता मॉन्सॅन्टो व सिन्जॅन्टोसारख्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध या आर्थिक व्यवहारात गुंतले असल्यामुळे त्यांनी या तंत्राची मखलाशी करणे समजू शकते. परंतु या नव्या जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे सर्व जीवसृष्टीवर व्यापक परिणाम होणार असल्यामुळे त्याचे स्वरूप नीट समजून घेणे आवश्यक आहे.
जनुकीय अभियांत्रिकी (genetic engineering) तंत्रज्ञानाचा उपयोग करून निर्माण करण्यात येणाऱ्या जनुकीय संस्कारित पिकांमध्ये सृष्टीतील कुठल्याही एखाद्या जीवाच्या एखाद्या पेशीमधील काही जनुके अथवा जनुकसमूह विशिष्ट पद्धतीने उचलून पाहिजे त्या पिकाच्या पेशीतील गुणसूत्रांवरील निश्चित केलेल्या जागी घालता येतात व अशा रीतीने पिकाच्या जनुकीय रचनेत अपेक्षित तो बदल घडवून आणता येतो. उदारणार्थ, बॅसिलस थुरिन्जिएनसीस (Bacillus thuringiensis) या जीवाणूमध्ये (bacterium) बोंडअळीचा नाश करणारे विष तयार करण्याची क्षमता आहे. म्हणून या जीवाणूमधील असे विष तयार करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण करणारे जनुक निवडून ते कापूस या पिकाच्या पेशीमध्ये संक्रमित केले जाते. त्यामुळे कापसाच्या पिकावर येणारी बोंडअळी जेव्हा कापसाची पाने किंवा बोंडे खाऊ लागते तेव्हा कापसाच्या रोपामध्ये तयार झालेले विष तिच्या शरीरात जाऊन तिचा निःपात होतो. संकरीकरण तंत्र व नवे जनुक संस्कारित तंत्र या दोन्हीमध्ये एक फार मोठा फरक आहे. संकरीकरण तंत्रात विविध वाणांमध्ये जनुकांची अदलाबदल व फेरजुळणी होत असली तरी ती वनस्पतींच्या एकाच प्रजातीमधील जनुकांपुरती मर्यादित असते. याउलट आता जनुकीय अभियांत्रिकी तंत्राद्वारे निर्मित पिकांमध्ये निसर्गातील कोणत्याही प्राणिमात्रांच्या जनुकांचे दुसऱ्या कोणत्याही प्रजातीमधील जीवांमध्ये स्थानांतरण करून आणि त्या जीवाच्या जनुकीय रचनेत बदल घडवून त्या प्रजातीची नवी वाणे घडविणे शक्य आहे. या नव्या तंत्राचे, इतर आनुषंगिक परिणामाव्यतिरिक्त, निसर्गातील जैवविविधतेवर काय घातक परिणाम होऊ शकतील हेही अभ्यासणे महत्वाचे आहे.
जनुकीय संस्कारित पिकांचे जैवविविधतेवरील संभाव्य परिणाम जनुकीय संस्कारित पिकांचे निसर्गातील जैवविविधतेवर खालील विघातक परिणाम संभवतात.
१) या नव्या तंत्राद्वारे सृष्टीतील सजीवांच्या एखाद्या प्रजातीच्या एका जीवातील जनुके दुसऱ्या कुठल्याही प्रजातीच्या जीवामध्ये संक्रमित करणे शक्य असले तरी या तंत्रज्ञानात अजूनही अचूकता आलेली नाही. विशिष्ट गुणधर्माचे एक जनुक एका जीवातून काढून दुसऱ्या प्रकारच्या जीवात घालताना त्या विशेष जनुकासोबत इतरही जनुके येऊ शकतात व ही अनावश्यक जनुके त्या दुसऱ्या जीवाच्या जनुकीय रचनेत बदल घडवून काय उत्पात घडवून आणतील हे सुनिश्चित करणे अवघड आहे. मुख्य म्हणजे हे जे काही बदल घडून येतील ते अपरिवर्तनीय आहेत. त्यामुळेच परिस्थितीकी विषयाच्या शास्त्रज्ञांना (ecologists) हे तंत्रज्ञान धोक्याचे वाटते.
वांगी आपल्याकडे देशभर सर्वत्र खूप लोकप्रिय असल्यामुळे मोठी बाजारपेठ मिळण्याची संभाव्यता लक्षात घेऊन जनुकीय संस्कारित वांग्यांचे वाणप्रसारित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला व तो खूप वादग्रस्त ठरल्यामुळे अजून तरी त्याच्या प्रसाराला आपल्या देशात परवानगी मिळाली नाही. कापसाप्रमाणेच यातही बॅसिलस थुरिन्जिएसिस या जीवाणूचे बोंडअळीला घातक असलेले विष तयार करणारे एक जनुक वांग्याच्या वाणात संक्रमित करून बीटी वाण तयार करण्यात आले. या नव्या जनुकामुळे तयार होणारे विष हे एका प्रथिन स्वरूपात असते आणि कुठल्याही सजीवामधील सर्व प्रकारच्या चयापचय क्रिया विविध प्रकारच्या प्रथिनांमुळे नियंत्रित होतात. वांगे हे सोलेनेसी (solanaceae) या वनस्पती कुलातील आहे आणि टोमॅटो, बटाटा यासारख्या खाण्यायोग्य वनस्पती तसेच बेलाडोना व तंबाखू यासारख्या वनस्पतीही याच कुलातील आहेत. बेलाडोना व तंबाखू या वनस्पतींमध्ये एक प्रकारचे विष तयार होते. असे समजले जाते की वांगे, टोमॅटो आणि बटाटा यासारख्या खाद्य वनस्पतींमध्येसुद्धा ही विष तयार करण्याची प्रवृत्ती त्यांच्या उत्पत्तीच्या सुरवातीच्या काळात होती, मात्र कालौघात ती सुप्तावस्थेत गेली असावी. परंतु जनुकीय संस्कारित पद्धतीने वांग्याच्या जनुकीय रचनेत बदल घडवून आणल्यास ही सुप्तावस्थेतील प्रवृत्ती पुन्हा जागृत होऊ शकेल अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते.
२) या तंत्राचा प्रसार करताना असे सांगितले जाते की या तंत्राद्वारे पिकाचे नुकसान करणाऱ्या मुख्य त्रासदायक किडीचे नियंत्रण होत असल्यामुळे कीटकनाशकाचा वापर टाळलाजाऊन यावरील खर्चात बचत होते. असे असले आले तरी पिकाला त्रासदायक ठरणाऱ्या व ज्यावर या विषाचा काहीही परिणाम होत नाही अशा इतर किडींची संख्या (secodary pests) वाढू शकते व त्यासाठी कीटकनाशक रसायनांचा वापर करणे अपरिहार्य ठरते. तसेच काही काळानंतर मुख्य हानिकारक किडीच्या पुढील पिढ्या पिकातील विषाला दाद देईनाशा होतात व पिकावर या किडीचा पुंन्हा प्रादुर्भाव होऊन तीवर नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करणे गरजेचे होऊन बसते. आपल्या देशात गेल्या काही वर्षांत बीटी कापूस या वाणाचा प्रसार झाल्यानंतर ज्या प्रांतात या वाणाची मोठ्या प्रमाणावर प्रथम लागवडीला सुरवात झाली त्या गुजरातमध्ये हा अनुभव आता येऊ लागला आहे.
३) याप्रमाणे वनस्पतीजन्य विषाला पचविणारीआणि जालीम कीटकनाशकालाही दाद नदेणारी किडीची नवी अनियंत्रित राक्षसी जात (super bug) निर्माण होणे शक्य आहे व तसे झाल्यास ते जीवसृष्टीला अतिशय हानिकारक ठरू शकते.
४) या तंत्राच्या सहाय्याने एखाद्या पिकाच्या वाणामध्ये एका विशिष्ट किडीविरुद्ध विष निर्मितीची योजना करता येत असली तरी हेच विष पाने, फुले व फळांवर जगणाऱ्या इतर जीवांना धोकादायक ठरू शकते. मधमाशासारख्या उपयुक्त किडींनाच नव्हे तर लेडी बर्ड सारख्या इतर उपद्रवकारक किडींना खाणाऱ्या मित्रकिडींनासुद्धा यामुळे हानी पोचू शकते. याप्रकारे शेतावरील अन्य किडींचा नाश झाल्यास त्यावर जगणाऱ्या पक्ष्यांसारख्या इतर जीवांचे आयुष्य देखील धोक्यात येऊ कते. प्रत्यक्ष शेतशिवारात हे अजून निदर्शनास आले नसले तरी याप्रकारचे धोके प्रयोगशाळेत केलेल्या अभ्यासातून सिद्ध झाले आहेत.
५) शेतात वाढणाऱ्या अनेक प्रकारच्या तणांवर वेगवेगळे जीव गुजराण करीत असतात. परंतु जनुक-संस्कारित पिकांसोबत या तंत्रज्ञानाचाच एक भाग म्हणून काही तणनाशकांचा देखील प्रसार केला जात आहे. या तणनाशकांमुळे शेतातील तणांचा संपूर्ण नायनाट होत असल्यामुळे तणांवर जगणारे जीव व त्यावर जगणारे अन्नसाखळीतील इतर जीव यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.
६) ज्या शेतात बीटी पिकांचा वापर झाला अशा शेतात पिकाची कापणी करून नांगरणी झाल्यानंतर बीटी विष जमिनीत संकलित होऊन जमिनीतील मातीचे सूक्ष्म कण तसेच ह्युमिक आम्ल यामध्ये गोळा होऊन जमिनीतील कीटकांवर अकल्पित (unanticipated) परिणाम करू शकते..
७) परस्परपरागीकरण हे निसर्गात एकतर एकाच प्रजातीमधल्या दोन जीवांमध्ये (individuals) किंवा त्याच प्रजातीच्या विभिन्न वाणांमधील जीवांमध्येही होते. क्वचित प्रसंगी ते दोन वेगवेगळ्या प्रजातींमध्येदेखील घडू शकते. अशा परस्परपरागीकरणातून एका जीवातील काही जनुके दुसऱ्या जीवात संक्रमित होतात. याला आडवे जनुकीय संक्रमण (horizontal gene transfer) असे म्हणतात. याचा एक धोका असा की ज्या जनुक संक्रमित वाणाची आपण लागवड केली, त्या वाणामधील रोपांमधून अशी जनुके परस्परपरागीकरणाद्वारे परिसरातील त्याच पिकाच्या इतर वाणांमध्ये संक्रमित होऊ शकतात. प्रत्यक्षात हे घडलेले निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे जनुकीय संक्रमण जर त्या पिकांच्या रानटी वाणांमध्ये किंवा तणांमध्ये घडून आले तर ती वाणे अथवा ते तण मुख्य पिकाशी स्पर्धा करून त्यावर मात करू शकतात.
८) काही देशांमध्ये मॉन्सॅन्टो या बहुराष्ट्रीय कंपनीच्या बीटी सोयाबीन वाणासोबत राउंडअप रेडी या तणनाशक रसायनाचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या राउंडअपरेडीमध्ये ग्लायकोफोसेट (glycophosate) या नावाचे एक अति जालीम विषारी रसायन वापरण्यात येते. या तणनाशकाच्या सततच्या वापरामुळे काही काळानंतर तणांची अशी अनियंत्रित राक्षसी जात (super weed) निर्माण होते की जिच्यावर त्यांनतर कुठल्याच तणनाशकाची मात्रा चालत नाही. असे झाल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. एका अंदाजानुसार तणाची अशी अनियंत्रित जात सर्वत्र पसरून अमेरिकेतील जवळपास कोटी एकर एवढ्या क्षेत्रावरील जमिनीवर पीक घेणे आता अडचणीचे झाले आहे.
९) इ.स. १९९४ ते २००५ या काळात सोयाबीन, मका व कापूस या पिकांच्या बीटी वाणांसोबत अनिवार्य म्हणून राउंडअप रेडी या तणनाशकाच्या वापरात १५ पटीने वाढ झाली आहे. २००५ सालापर्यंत अमेरिकेतील सोयाबीनखालील एकूण क्षेत्रापैकी ८७% क्षेत्र राउंडअप रेडी – बीटी सोयाबीन खाली आले. बील फ्रीज या अभ्यासकानुसार जगात दरवर्षी जवळपास १ लाख टन एवढ्या राउंडअप रेडीचा वापर केला जातो. या तणनाशकातील ग्लायकोफोसेट या घातक रसायनामुळे जमिनीचे व पाण्याचे प्रदूषण होते आणि त्याचा अपरिहार्य परिणाम मानव व इतर प्राण्यांच्या आरोग्यावर होतो. डॉ. डॉन ह्युबेर या शास्त्रज्ञांनी जनुक – संस्कं मित पिके व त्यासोबतचा ग्लायकोफोसेटचा वापर यांचा वनस्पतींवरील रोग तसेच डुकरे, घोडे व गाईगुरे यामध्ये येणारे वंध्यत्व आणि अचानक होणारा गर्भपात यांचा संबंध तपासला. या अभ्यासातून त्यांनी जनुकीय संक्रमित पिकांचा कृषी-परिस्थितीकी (agro-ecology), भोवतालच्या परिसरातील माती, वनस्पती आणि या वनस्पतींवर पोषण करणारे प्राणी यावर ऋणात्मक परिणाम होतो असा निष्कर्ष काढला. २००० सालापासून अर्जेन्टिना या देशात राउंडअप रेडी बीटी सोयाबीनच्या लागवडीस सुरवात झाली व आज तो या वाणाच्या लागवड क्षेत्राच्या बाबतीत जगातला अमेरिकेखालोखाल दुसरा देश झाला आहे. तिथे मोठ्या क्षेत्रावर राउंडअप रेडीची फवारणी करण्यासाठी विमानांचा वापर होऊ लागला. २००२ सालापासून अर्जेन्टिनाच्या ग्रामीण भागातून जिथे अशा सोयाबीनच्या लागवडीचे प्रमाण व राउंडअप रेडी या तणनाशकाच्या फवारणीचे प्रमाणही जास्त आहे अशा क्षेत्रातून नवजात अर्भकांमध्ये जन्मतः काही व्यंग आढळत असल्याचे अहवाल येऊ लागले. २०१० साली अर्जेन्टिनाच्या बुर्नोस विद्यापीठातील मॉलिक्युलर बायॉलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुख प्रोफेसर आंद्रे केस्कोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंग्लंड, ब्राझील, अमेरिका व अर्जेन्टिना येथील संशोधकांच्या सहकार्याने राउंडअप रेडी या तणनाशकाचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्लायकोफोसेट या रसायनाचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यात आला. शेतात प्रत्यक्ष वापरण्यात येणाऱ्या राउंडअपरेडीमधील ग्लायकोफोसेटच्या प्रमाणापेक्षा खूप कमी अंश वापरून प्रयोगशाळेत बेडूक व कोंबडीच्या गर्भावरील परिणाम तपासण्यात आलेत व त्यात या रसायनामुळे गर्भव्यंगत्व निर्माण होते हे सिध्द झाले. तसेच प्रयोगातील या प्राण्यांच्या गर्भात आढळणारी व्यंगे आणि प्रत्यक्ष मानवी गर्भात आढळणारी व्यंगे यांचे स्वरूपही सारखेच असल्याचे दिसून आले.
१०) आधुनिक शेतीच्या नावे जेव्हापासून पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या काही विशिष्ट वाणांचाच वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला व शेती लागवड बहुविध पीकपद्धतीकडून (multiple cropping sysem) एकल पीकपद्धतीकडे (mono- cropping system) वळली तेव्हापासूनच शेतातील जैवविविधततेचा -हास होऊ लागला. जनुक संक्रमित पिकांमुळे मोठ्या प्रमाणावर एकल पिकांच्या व त्यातही पिकाच्या एकाच प्रकारच्या वाणाचा वापर वाढणार असल्यामुळे जैवविविधततेच्या हासात आणखी भर पडणार आहे. शेतातील विविध वाणांची लागवड कमी झाल्यास पिकांवरील रोग व किडींचा प्रादुर्भाव अधूनमधून अचानक मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा (epidemic) धोका असतो.
११) जे लहान शेतकरी आपल्या परिसरातल्या संसाधनांचा उपयोग करून मिश्रपीक पद्धतीची व पर्यावरणाशी सुसंगत अशी शेती करतात त्यांच्या शेती पद्धतीवर या तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम संभवतात. जनुक-संस्कारित पिकांना पाठिंबा देणाऱ्या शास्त्रज्ञांची मते जनुक-संस्कारित पिकांना विरोध करणारे जसे काही शास्त्रज्ञ आहेत, तसेच, काही या तंत्रज्ञानाला पाठिंबा देणारे देखील आहेत. पहिल्या प्रकारचे शास्त्रज्ञ परिस्थिकीशास्त्राशी, आरोग्य व पोषणशास्त्राशी तसेच मॉलीक्युलर जेनेटिक्स या शास्त्राशी संबधित आहेत, तर दुसऱ्या प्रकाराची फळी बहुधा कृषिशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकीशास्त्र या विषयांच्या शास्त्रज्ञांची आहे. ज्यांचा या तंत्रज्ञानाला पाठिंबा आहे त्यांचा या बाबतीतील युक्तिवाद साधारणतः खालीलप्रमाणे आहे.
१) आतापर्यंत आधुनिक एकल पीकपद्धत कित्येक दशके अंमलात आणल्या गेली आहे. त्यात जैवविविधतेचे व्हायचे ते नुकसान होऊन गेलेच आहे. हे नवे तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे परिस्थितीत विशेष काय फरक पडणार आहे? २) या तंत्रज्ञानाचे जैवविविधतेवर खूप हानिकारक परिणाम आतापर्यंत केल्या गेलेल्या प्रयोगांमध्ये तरीविशेषत्वाने दिसून आलेले नाहीत. ३) परिणामांचा खूप बाऊ न करता नवीन तंत्रज्ञान वापरून पाहण्यास काय हरकत आहे?
आधी नमूद केल्याप्रमाणे एकलपीकपद्धत जरी बऱ्याच काळापासून अंमलात आणल्या गेली आहे तरी आतापर्यंत एखाद्या पिकाच्या विविध वाणांचा उपयोग परिसरातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात व्हायचा. मात्र जनुक संस्कारित पिकांच्या वाणांचा उपयोग सुरू झाल्यापासून अनेकानेक शेतकऱ्यांच्या शेतावर व एकूण खूप विस्तृत क्षेत्रावर अशा एकाच वाणाचा वापर वाढत चालला आहे. उदारणार्थ, १० वर्षांपूर्वी विदर्भात कापसाच्या अनेक प्रकारच्या सरळ वाणांची तसेच संकरित (hybrid) वाणांची लागवड केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षात सर्वदूर कापसाचे बीटी वाणच शेतात लावले जात आहे. भारत सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार भारतात २०१३ साली कापसाच्या लागवडीखालील ९०% क्षेत्र बीटी वाणाखाली आलेले होते. त्यामुळे अशा वाणाच्या सार्वत्रिक प्रसाराचे परिणाम भविष्याचा विचार करता जास्त धोकादायक राहतील.
जनुक संस्कारित पिकांच्या जैवविविधतेवरील आणि परिसंस्थेवरील परिणामांच्या ज्या अभ्यासातून हे तंत्रज्ञान धोकादायक नाही असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते अभ्यास कमी काळापुरते मर्यादित होते. परिसंस्थेतील प्रजातींमधील परस्परसंबंधांचे विलक्षण गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात घेता अशा तऱ्हेचे परिणाम तपासण्यासाठी सर्वंकष व दीर्घकालीन अभ्यासाशिवाय निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
कालौघात नष्ट झालेल्या डायनोसर्सना त्यांच्या जीवाष्मातील ‘डीएनएचा’ वापर करून पुनर्जीवित करण्याच्या कल्पनेवर आधारीत ज्युरासिक पार्क हा चित्रपट आपण पाहिला असेलच. त्यात या नवनिर्मित डायनोसर्सनी घडविलेला उत्पात व त्याचे भयावह स्वरूप याचे दर्शन होते. हा चित्रपट जरी काल्पनिक संकल्पनेवर आधारीत असला आणि वास्तवात असे घडणे सध्या जरी शक्य नसले तरी यातून एका धोकादायक व परिणामांच्या दृष्टीने अपरिवर्तनीय अशा तंत्रज्ञानाच्या वापरातून काय घडू शकते याची झलक आपल्याला त्या चित्रपटातून मिळते. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा, त्यात अनुस्यूत असलेल्या अनेक धोक्यांकडे दुर्लक्ष करून, केवळ उपयोग करून पाहायला काय हरकत आहे असे म्हणणे हे नैतिकदृष्ट्याही कितपत योग्य आहे? महत्वाचे म्हणजे तंत्रज्ञान हे विवेकाला पर्याय होऊ शकत नाही.
आतापर्यतच्या विवेचनावरून मी आधुनिक तंत्रज्ञाच्या संपूर्णपणे विरोधात आहे असा अर्थ कोणी काढू नये. मानवी जीवनात भौतिक सुधारणा घडवून आणण्यामध्ये, त्यातील अनावश्यक कष्ट कमी करून ते जास्त सुखमय करण्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे हे मला मान्यच आहे. अगदी जनुक-संस्कारित जीवांचा विचार केला तरी या तंत्रज्ञानाच्या औषधशास्त्रातील उपयोगामुळेस्वस्त व जास्त सुरक्षित अशी हेपॅटीस बी (hepatitis B ) व शरीरात सरळ टोचता येईल अशी इन्शुलीनसारखी औषधे तयार करता आलीत हे महत्त्वाचेच आहे. परंतु या तंत्रज्ञानाचे कृषिशास्त्राच्या संदर्भात उपयोजन करताना त्याचे एकूणच जीवसृष्टीवर होणारे व्यापक व दूरगामी परिणाम विचारात घेता त्याचा घिसाडघाईने वापर करणे चुकीचे आहे असे मला वाटते. त्याऐवजी उपलब्ध असलेल्या परिस्थिकीय शेतीसारख्या (ecological agriculture) निसर्ग सुसंगत आणि जीवसृष्टीचा सर्वंकष व शाश्वत दृष्टीने विचार करणाऱ्या शास्त्रीय शेती पर्यायाचा विचार व्हावा असे माझे मत आहे.
२०१२ साली जेव्हा भारतीय जनुकीय अभियांत्रिकी मान्यता समितीने (Indian Genetic Engineering Aproval Committee) ज्यांचा सरळ खाद्यान्न म्हणून उपयोग होणार आहे अशा बीटी वांग्यासारख्याच इतर पिकांच्या जनुकीय संस्कारित पिकांच्या शेतातील खुल्या चाचण्यांना (field trials) मान्यता दिली तेव्हा देशात या निर्णयाविरुद्ध वादंग माजले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात या विरोधात खटला दाखल झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात खोलवर विचार करून सल्ला देण्यासाठी काही मान्यवर शास्त्रज्ञांची एक तांत्रिक तज्ञ समिती स्थापन केली. जैवअभियांत्रिकी, वनस्पती अनुवांशिकीशास्त्र, कृषिशास्त्र, पोषणशास्त्र, विषचिकित्साशास्त्र, अन्नसुरक्षा, पर्यावरणशास्त्र व जैवविविधता अशा विषयांशी संबंधीत देशातील नामवंत शास्त्रज्ञांचा या समितीत समावेश होता. जुलै २०१३ मध्ये या समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केला. त्यात ज्या ११ महत्वाच्या शिफारशी त्यांनी केल्यात त्या मुळातच वाचण्यासारख्या आहेत व त्यातून या विवाद्य विषयावरील शास्त्रीय भूमिका स्पष्ट होते. या शिफारशींमध्ये त्यांनी कुठेही या तंत्रज्ञानावर कायमची बंदी आणावी असे म्हटले नाही तर यासंदर्भात तंत्र निर्मितीसाठी, करावयाच्या सखोल अभ्यासासाठी, शास्त्रीय चाचण्यांसाठी योग्य मानके (standards) तयार करण्याची व अशा रीतीने तयार झालेले तंत्रज्ञान जैवविविधतेच्या व मानवी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी अत्यंत विश्वसनीय व निष्पक्ष व्यवस्था उभारण्याची प्रथम गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कारण अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था सध्या देशात अस्तित्वात नसल्याचे व जे असे तंत्रज्ञान निर्माण करतात केवळ त्यांच्याच अहवालावर सरकार सध्या अवलंबून असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. अशा अभ्यासाची दिशा काय असावी यावरही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. मात्र जोपर्यंत अशी व्यवस्था देशात उभी होत नाही तोपर्यंत खाद्यान्नासंदर्भित जनुकीय संस्कारित पिकांचे संभावित परिणाम लक्षात घेता अशा पिकांच्या शेतातील खुल्या चाचण्यांवर पुढील किमान १० वर्षे बंदी आणावी अशी महत्वाची शिफारस त्यांनी केली आहे. बँक ऑफ इंडिया कॉलनी, नालवाडी, वर्धा- ईमेल: vernal tarak@gmail.com चलभाष : 09850341112 अमेरिकेतील प्रमुख पिके, त्यातील जीएमचे स्थान व अमेरिकन शेतकऱ्याला देण्यात आलेली सबसिडी: २०११ पीक जीएम लागवडीचे क्षेत्र सबसिडी (कोटी डॉलर्स) सोयाबीन ९४% २१० कापूस ९०% १३० मका ८८% ४६०
एक लेख व मतमतांतरे (ऐसी अक्षरे डॉट कॉम ह्या मराठी संकेतस्थळावर २०१३ मध्ये जनुक संस्कारित अन्न ह्या विषयावर एक लेख प्रकाशित झाला व त्यानंतर त्यावर बरीच साधकबाधक चर्चा झाली. आ. सु.च्या ह्या विशेषांकातील लेख वाचल्यावर बऱ्याच वाचकांच्या मनात जे प्रश्न निर्माण होतील, त्यापैकी काहींना तरी प्रस्तुत लेखातून किंवा त्यावरील चर्चेतून उत्तरे सापडतील किंवा योग्य प्रश्न मनात उभे राहण्यासाठी त्यांची मदत होईल ह्या अपेक्षेने मूळ लेख व त्यावरील महत्वाच्या प्रतिक्रिया आ.सु.च्या वाचकांसाठी संपादित स्वरूपात देत आहोत.- अतिथी संपादक)