एकनाथांचे तत्त्वज्ञान हे धर्माधर्मांमधील सामंजस्य वाढून त्यांच्यात संवाद प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या संवाद सामंजस्यासाठी ते या दोन्ही धर्मांची गुळमुळीत तरफदारी करीत नाहीत. त्यांच्यातील मूलतत्त्ववादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देत नाहीत. आपल्या संविधानातील सेक्युलॅरिझम या तत्त्वाची ओढाताण करीत बुद्धिवाद्यांनी त्याचा धर्मउच्छेदक अर्थ लावला तर सर्वधर्मसमभाववाद्यांनी त्याचा अर्थ शासनाने धर्मांत साक्षेप न करता सर्व धर्मांचे सारखे कौतुक व सारखे चोचले असा घेतला. त्यामुळे सर्वच धर्मांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या. एकीकडे शहाबानो प्रकरणात घटनादुरुस्ती करायची व दुसरीकडे बाबरी मशिदीचे कुलूप उघडायचे अशी दुहेरी कसरत सुरू झाली. नमाजही हवा तर मग महाआरती का नको असे प्रश्न पुढे आले. दोन्ही नकोत असे ठणकावून सांगणारे विचारवंत आणि शासक यांची वानवा या काळी प्रकर्षाने जाणवली. उच्छेदवादी विचारवंत दोन्ही धर्मांपासून दुरावले तर समभावी मंडळींची दोघांचे लाड करता करता दमछाक होऊन शेवटी त्यांनी दोघांचाही विश्वास गमावला. परिणाम म्हणून दोन्ही धर्मांतल्या मूलतत्त्ववादी शक्ती बळावल्या व चेकाळल्यात्यांना काबूत आणायला कोणीच नाही.
सदानंद मोरे
(ह्याच नावाच्या निबंधातून)