इस्लामी संस्कृतीच्या क्षेत्रातही अशीच ईश्वरनिष्ठ आणि कालचक्र निष्ठ इतिहासमीमांसा आढळते. तथापि इस्लामी विचार मुख्यतः किंवा जवळजवळ सर्वस्वीच सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी ईश्वराच्या अल्लाच्या अनुरोधानेच मांडलेला आहे. चौदाव्या शतकातील इब्न खाल्दुनने निरनिराळ्या राज्ये नि सत्ता ह्यांचे उदय, वृद्धी व अस्त ह्यासंबंधी काही ठोकळ नियम सांगितले. पण तोही कुराणप्रणीत अल्लाच्या सामर्थ्याविषयी शंका उपस्थित करू शकत नव्हता. हा एक लहानसा प्रयत्न सोडला, तर कुराण व इतर प्राचीन इस्लामी साहित्य ह्यांतून प्रसंगवशात जे इतिहासभाष्य आलेले दिसते ते सगळे ईश्वरी इच्छेच्या पायावर आधारलेले आहे. मानवी जीवनात, समाजांच्या, राष्ट्रांच्या जीवनात बदल घडतात, स्थित्यंतरे होतात. पण ह्या घडामोडी बौद्ध किंवा जैन तत्त्वज्ञानाप्रमाणे किंवा ग्रीसमधील पायथागोरस वगैरेंच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ईश्वराचा संबंध न आणता कोणत्या तरी वैश्विक नियमांचे अपरिहार्य परिणाम असतात अशा तऱ्हेचा विचार इस्लाममध्ये केव्हाही कुठेही मांडला गेला नाही. ईश्वर वगळून कशाचाच अर्थ लागणार नाही, लावताच येणार नाही. जगातील सर्व घडामोडींच्या मागचे एकमेव कारण म्हणजे अल्ला. त्या अल्लाला काही कृती करावयाची असेल, तर तो त्यासाठी कारणे शोधीत बसत नाही, तो ती करतोच. आणि म्हणून त्या ईश्वरी कृतींच्या करणांचा शोध घेणे हेच मुळी पाप आहे. -सदाशिव आठवले (इतिहासाचे तत्त्वज्ञान ह्या पुस्तकातून)