डेव्हिड कियॉस्क हे खून व बलात्कार ह्यांच्यासारख्या हिंसक गुन्ह्यांवरचे तज्ज्ञ समजले जातात. त्यांनी मॅसेच्युसेट्स विद्यापीठात ह्या विषयावरील अभ्यासक्रम बावीस वर्षे शिकवला. विद्यापीठात न्यायवैद्यक सल्लागार म्हणून काम करीत असताना त्यांनी अमेरिकन लष्करी व कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्यांबरोबरही काम केले. अमेरिकेत 2003 साली लैंगिक कांड झाल्यानंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांचे प्रबोधनही केले आहे.
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर ‘इंडिया इंक’ ने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा स्त्रियांवर हल्ला करण्याच्या मागे पुरुषांची नेमकी प्रेरणा काय असते. व सरकारी तसेच इतर अधिकाऱ्यांना हा प्रकारावर आळा कसा घालता येईल ह्यावर त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावर डॉ. कियास्क ह्यांनी, भारताबद्दल त्यांना माहिती नसल्याचे सांगत असतानाच, जगभरातील लैंगिक गुन्हे हे संघर्ष व आक्रमण ह्यांचे खेळ कसे असतात, त्याचे विवेचन केले आहे. बलात्कार, आणि विशेषतः सामूहिक बलात्कार हे कां घडतात ? मानवी संस्कृतीच्या, सभ्यतेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून, प्राचीन ऐतिहासिक व पौराणिक लिखाणामधून बलात्काराच्या घटनांच्या नोंदी आणि पुरावे भरपूर सापडतात.
आक्रमकता हा मानवी प्राण्याच्या, विशेषतः नरवर्गाच्या नेहमीच गुणविशेष राहिलेला आहे. नर आणि माद्यांमधील आक्रमकतेच्या पातळीत स्पष्ट फरक दिसून येतो. चिंपाझीचे उदाहरण घेतले तर त्यांच्यातील नरांमधील आक्रमकता ही माद्यांपेक्षा कितीतरी अधिक तीव्र असते.
उद्युक्त प्र. – म्हणजे बलात्कार ही कामवासनेने नव्हे तर आक्रमकतेने होऊन केलेली कृती आहे का ? उ.- ही प्रत्यक्ष कृती लैंगिकतेच्या क्षेत्रात घडत असली तरी बहुतांश घटनांच्या एकूण परीक्षणानंतर त्या त्या कृतीसाठी प्रवृत्त करणारे अत्यंत प्रबळ असे काही वेगळेच हेतूंचे संमिश्रण असल्याचे आढळून येते. या यादीतील सर्वांत प्रबळ असलेला हेतू म्हणजे शक्ती, अधिकार, आधिपत्य हा होय; दुसऱ्या मनुष्य प्राण्यावर सत्ता गाजवण्याचे, काबू मिळवण्याचे समाधान, त्याला त्याच्या मनाविरुद्ध व आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास भाग पाडण्याचे पाशवी समाधान.
या प्रबळ हेतूंच्या संमिश्रणातला आणखी एक घटक म्हणजे आत्यंतिक धुमसणारा पराकोटीचा राग. बरेचदा खूप तीव्र प्रकारची प्रतिक्रियाही असते- “मला अमुक गोष्ट हवी आहे, त्या गोष्टीवर माझा हक्क आहे. आणि ती मिळविण्यात तुम्ही अडथळे आणत असाल तर मला भयंकर संताप येणारच”. लैंगिक अत्याचाराच्या मागे प्रभुत्वाची लालसा आणि क्रोध हे दोन प्रबळ हेतू असल्याचे वारंवार ऐकायला येते.
अनेक पुरुषांसाठी लैंगिकता ही ते स्वतःकडे ज्या प्रकारे बघतात त्यावरून ठरते. त्यांच्या पौरुषाचा कल्पेनेवरून ठरते. जर त्यांच्या क्षमतेला नि सामर्थ्याला धक्का बसला असे त्यांना वाटते तर बलात्कार करणे हा त्यांच्यातील त्यांचे पौरुष सिद्ध करण्याचा मार्ग असतो म्हणून ही कृती लैंगिक क्षेत्रात घडते, ही केवळ यदृच्छा नव्हे.
जर एखादी संस्कृती पुरुषांसाठी संदेश देत असेल-“जर तुम्ही एक यशस्वी पुरुष असाल तर स्त्रिया तुमच्यावरून जीव ओवाळून टाकतील” आणि अशा संस्कृतीत वाढलेल्या पुरुषाच्या बाबतीत तसे घडले नाही तर त्याला षंढ असल्यासारखे वाटू शकते. तो रागाने वेडा होऊ शकतो.
पण असे असूनही असे गुन्हे करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण फार कमी आहे. हे प्रमाण किती आहे? संपूर्ण मानवी समाजाबद्दल मी खात्रीने सांगू शकणार नाही. पण अमेरिकेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण 5 टक्के असू शकेल आणि त्यांपैकी हा गुन्हा पुन्हापुन्हा करणारे पुरुष केवळ 3 टक्के असावेत.
सैन्यामध्ये बलात्काराचे प्रमाण अधिक असावे असे मानण्यासाठी सबळ कारणे आहेत. कारण नौदलात भरती झालेल्यांवर याबाबतीत संशोधन झालेले आहे, पण तरी याबद्दल सरसकट विधान करता येणार नाही. प्र. पुरुष घोळक्यामध्ये एकत्रित होतात तेव्हा नेमके काय घडते?
उ. जमावाच्या मानसशास्त्रानुसार, ते अधिक सकारात्मक राहू शकतात किंवा अत्यधिक नकारात्मकही. उदाहरणार्थ, आपण बरेच लोक एका रस्त्यावरून जात असताना काहीतरी वाईट घडत असल्याचे समोर पाहिले व आपल्यापैकी एकाने आपण त्याबाबतीत काहीतरी करायला पाहिजे असे सुचविले. मग त्याने बाकीच्यांना, “तुम्ही मला मदत कराल ना” म्हणून विचारले तर अशा वेळी तो संपूर्ण जमाव सकारात्मक कृती करायला पुढे सरसावू शकतो. पण बहुतेकदा असे होते की त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण, अपघाताने म्हणा किंवा त्याच्या मनातील दुष्ट, नकारात्मक हेतूमुळे म्हणा, इतर जमावाला नकारात्मक मानसिकतेत लोटतो.
समाज व जमाव असा असेल की त्यांपैकी प्रत्येकाच्या मनात वैयक्तिक कारणामुळे वेगवेगळ्या पातळीवरचे वैफल्य असेल आणि त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे सुरळीत होत नसल्यामुळे ते असहाय्यता नि संताप ह्यांनी ग्रासलेले असतील – अशा वेळी जमावातील कोणाही व्यक्तीने इतरांच्या धुमसत्या संतापाला वाट फोडण्यासाठी कुणी बळीचा बकरा दाखवून दिला उदाहणार्थ – “बघा… त्या स्त्रियांना उत्तम नोकऱ्या मिळताहेत आणि आपल्याला नाही? का म्हणून… त्यांनाच का म्हणून?” असे म्हणून चिथावले तर याची परिणती हिंसेत होऊ शकते.
पुरुषांना काही विशेष अधिकार बहाल करणाऱ्या संस्कृतीत जर त्यांची वाढ झाली असेल त्याहूनही अधिक लैंगिक हिंसेला सहज चालना मिळू शकेल.
प्राचीन काळापासून जगभरात स्त्रियांना पुरुषांची मालमत्ता मानून त्यांच्याकडे हीन भावनेने बघण्याचाच प्रघात चालत आला आहे. केवळ मागील काही दशकांपासूनच अमेरिकेतील कायदा व्यवस्थेने एका मानवी दृष्टीकोनातून स्त्रियांकडे बघायला सुरुवात केली आहे. पण जगातील अनेक देशांतील समाजांमध्ये अजूनही स्थिती पूर्ववतच आहे. आणि स्त्रियांकडे हीन, अपमान कारक दृष्टीने बघण्याचे हे प्रमाण जेवढे अधिक, तेवढा तेथील पुरुषांना आपल्या रागाचा व नैराश्याचा उद्रेक त्याच्या विरोधात करण्यास अधिक वाव मिळतो.
प्र. सामूहिक बलात्कार हा बहुशः पूर्वनियोजित असतो का ? उ. होय. अर्थात कधी-कधी तो ऐनवेळी संधीचा फायदा घेऊनच घडतो. म्हणजे दरवेळी तो पूर्वनियोजित असतोच असे नाही. समजा एखादा पार्टीत एक नवखी स्त्री आहे, जिने मद्यही पहिल्यांदाच घेतले आहे व ती बेशुद्ध पडली आहे, अशा वेळी असे पुरुष संधीचा फायदा घेतात. योग्य संधीही सामूहिक बलात्कारासाठी शेवटचा अनिवार्य घटक असतो.
प्र. कोणताही माणूस संपूर्ण गटाला एका व्यक्तीवर शारीरिक व लैंगिक अत्याचार करण्यास कसा भाग पाडू शकतो हे समजून घेणे फार कठीण आहे. कसे घडते ते?
उ. ह्यावर मला एवढेच म्हणता येईल की कोणत्याही लोकांनी कमजोर गटांचा बळी घेणे काहीच कठीण नाही. नाझी जर्मनीकडे पहा. उदाहरणार्थ एका सभागृहात बरेचसे नाझी बसलेले आहेत. आपल्याला नोकऱ्या मिळत नाही त्याचे कारण हे ‘ज्यू’ आहेत वगैरे विधाने त्यांच्या कानावर पडली आहेत. मग अभावितपणे कोणीतरी उद्गारतो, चला, धरून आणा त्यांच्यापैकी एकाला” आणि मग एकत्रिपणे ते खरोखरच एखाद्याला धरून आणतात आणि त्याच्यावर हल्ला चढवतात. हे असेच सगळीकडे चाललेले असते. ‘नाझी’ आणि ‘ज्यू’ ह्यांच्याऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही नावे घातली. तरी फारसा फरक पडत नाही.
बलात्कार हा हिंसकतेचा एक प्रकार आहे, पण तेवढे सोडले बलात्कार व इतर हिंसक प्रकारांमध्ये विशेष फरक नाही. पुरुषांचे जथ्येच्या जथ्ये बाहेर पडले व त्यांना कमजोर, त्यांच्यापासून दूर पळणाऱ्या स्त्रिया दिसल्या, तर तेथे ते होतेच. पण तरीही मला एक गोष्ट कळत नाही, की हे लोक महिलांकडे अशा रीतीने का आकर्षिले जातात आणि आपण त्यांना बळीचा बकरा बनवू शकतो असे त्यांना का वाटते?
उ. मला वाटते काही वेळा आपण बलात्काराबाबतचे आपले आकलन उगीचच संकुचित करून घेतो. खरे तर बलात्कार म्हणजे, तिरस्काराचे प्रतीक असलेल्या एखाद्या गटाला बकरा बनविणे, हेच होय. प्र. म्हणजे हे पुरुष स्त्रियांचा द्वेष करतात का ? उ. हो. लैंगिक गुन्ह्यांकडे तिरस्काराने बघितले जाते असे म्हणणारे बरेच लोक आहेत. प्र. अशा प्रकारे गुन्हे नियंत्रणाखाली आणण्यासाठी तुम्ही भारत सरकारला किंवा कायदे अधिकाऱ्यांना काय सल्ला द्याल? उ. राष्ट्रातील लष्करापुढे असाच काहीसा प्रश्न आहे. ह्याला अनेक पातळ्यांवरून प्रतिसाद द्यावा लागेल. पहिला मुद्दा लोकांच्या सुरक्षेचा. सर्वप्रथम गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कारवाई होणे महत्त्वाचे आहे; जेणेकरून हा संदेश जाईल – “ही अशी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे किंवा हा असा गुन्हा आहे ज्याला अशी शिक्षा होते.
नंतर दुसरे म्हणजे माणसांचे समूह असे का वागतात याचा अभ्यास व्हायला पाहिजे. जर दिल्ली सरकारने मला, “आम्ही काय करायला पाहिजे ?” असे विचारले तर मी म्हणेन, “ज्या गुन्हा केलेल्या समूहातील कोणा माणसांशी किंवा त्यांच्या सारख्या माणसांशी बोलायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे की ते स्त्रियांना आपले टारगेट्स का मानतात. त्यांच्या या द्वेषाच्या मुळाशी काय आहे? स्त्रीला कुस्करून टाकणे ते आपला हक्क कसा काय मानतात ?
हे आणखी कठीण असे आह्वान आहे. लष्कर ज्याप्रमाणे आता आपल्याच संस्कृतीचे अनेक पैलू समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे तेव्हाच वाईट रूढींच्या मुळाशी असलेले सांस्कृतिक घटक काढणे शक्यही आहे. त्याच्यावर एकदा प्रकाश पडला, की पुढे आणखी चर्चा करता येईल. जगभरात सर्वत्र स्त्रिया ह्या दुबळ्या आणि तिरस्कार करण्याच्या व सत्ता गाजवण्याच्या वैध प्रतीक अशाच मानल्या गेल्या आहेत. ही अगदी उघड गोष्ट आहे. परंतु हे का घडते, कसे घडते आणि ह्यात बदल कसा घडवून आणता येईल ह्याचा शोध घेणे हे संस्कृतीचे काम आहे.
(न्यूयॉर्क टाइम्स, डिसेंबर 12, 2012 वरून संपादित, अनुवादित, साभार)