सिग्मंड फ्रॉइड हे एक थोर मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी केलेल्या मनोविश्लेषण नावाच्या मांडणीला ह्या शास्त्रात विशेष महत्त्व आहे. परंतु त्यांनी केलेल्या राज्यशास्त्रावरील लिखाणाहीकडेही आता भारतातच नव्हे तर जगभरात गांभीर्याने पाहिले जात आहे. राजकीय प्रक्रिया ह्या विषयांवरील त्यांचे निबंध आता फ्रॉइड आणि मूलतत्त्ववाद ह्या नावाने पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. आपला काळ अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी ती चांगली सुरुवात आहे. हे पुस्तक सर्व प्रकारच्या सनातनी रीतीभातींना हात घालते – मग त्या धार्मिक असोत की निधर्मीवादी. त्यामध्ये मनोविश्लेषणातील मूलतत्त्ववादी घटक प्रश्नांकित केले आहेत एवढेच नव्हे तर मनोविश्लेषणात्मक विचार किंवा कृती हीदेखील मूलतत्त्ववादी प्रवृत्ती उलगडून दाखविणारे ज्ञानाचे रूप म्हणून मांडले आहे. खालील लेखात फॅसिझमची काही वैशिष्ट्ये नमूद करण्यात आली आहेत. सनातनवाद, साक्षरतावाद, असहिष्णुता व पोथीनिष्ठा ह्यांच्यावरील विमर्शाला किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर चिरेबंदी (एकभाषिक, एकतार्किक, एकपाक्षिक, एकमिथकीय आणि अर्थातच एकदैवतीय) बंदिस्तपणाने घेरलेल्या जगाला प्रश्नांकित करणे हा प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे.
एखादे तुलनेने स्वतंत्र असे राष्ट्र जेव्हा दहशतवादी आणि हुकूमशाहीच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या दहशतवादाने भयग्रस्त होते, तेव्हा त्याच्याकडे, एकजूट करून ह्या ना त्या मार्गाने त्यांचा बीमोड करण्याची ऊर्मी दाटून येते. परंतु असे करण्यात एक धोका आहे तो असा, की अशा रीतीने लढताना आपणही तितकेच हिंस्र, क्रूर, चिरेबंदी ( बंदिस्त) आणि सर्वात वाईट अर्थाने, आपल्या शत्रूइतकेच एकसंध बनू शकतो. म्हणजे शेवटी आपलेही तेच होते. आपण एखाद्या थोर माणसाला आपला नेता म्हणतो, त्याच्या उणीवांकडे दुर्लक्ष करतो, आपण प्रश्न विचारणे, युक्तिवाद करणे बंद करतो. एवढे झाले, की सनातनत्वाची लढाई सुरू झाली असे समजावे. ती अशी लढाई असते, की जिच्यात कोणीच जिंकत नाही.
1. दणदणीत, सातत्यपूर्ण राष्ट्रवादी फॅसिस्ट कारकिर्दीमध्ये देशभक्तिपर नारेबाजी, घोषणा, प्रतीके, गीते आणि इतर बाबींचा सुळसुळाट असतो. राष्ट्रध्वज जिकडेतिकडे दिसतात. कारण ते कापडावरील प्रतीक असतात (टिकाऊ) आणि सार्वजनिक ठिकाणी लावावयाचे असतात.
2. मानवी हक्कांबाबत तुच्छताभाव – सुरक्षिततेची गरज आणि शत्रूची भीती दाखवून, मानवी हक्क काही वेळा दुर्लक्षणीय आहेत कारण तशी काळाची गरज आहे असे त्यांच्या मनावर ठसविले जाते. परिणामी लोक खरोखरीच मानवी हक्कांच्या मान्यतेकडे पाठ फिरवतात. छळ, एकत्रित हत्या, खून, कैद्यांना दीर्घकाळ कारावास ह्या गोष्टींचे समर्थन करू लागतात.
3. शत्रू, बळीचे बकरे निश्चित करण्यामधून एकजूट – देशभक्तीचा ज्वर चढलेले लोक त्यांना जाणवलेले सामाईक भय किंवा शत्रू ह्यांचा नायनाट करण्यासाठी एकत्र जमतात. मग ते भय वांशिक, जनजातीय किंवा धार्मिक अल्पसंख्यांकांचे असो वा उदारमतवादी, मार्क्सवादी, समाजवादी वा दहशतवादी अशा कोणत्याही गटाचे असो.
4.लष्कराचे आधिपत्य – देशांतर्गत समस्या कितीही व्यापक व गंभीर असल्या तरी त्यांचा विचार न करता सरकारी कोषागारातील अवाच्या सवा रक्कम लष्करावर खर्च केली जाते. सैनिक व लष्कर ह्यांचे उदात्तीकरण केले जाते.
5. अतिरेकी लिंगभाव – फॅसिस्ट राज्यांची सरकारे अनिवार्यपणे पुरुषांचे वर्चस्व असलेली असतात. अशा राज्यांमध्ये पारंपरिक लिंगभेद अधिक तीव्र, गहन केले जातात. गर्भपाताला प्रखर विरोध असतो, तसाच समलिंगी संबंधांनाही असतो.
6. नियंत्रित प्रसारमाध्यमे काही वेळा प्रसारमाध्यमे सरकारच्या थेट नियंत्रणाखाली असतात, परंतु इतर वेळी ते अप्रत्यक्षपणे शासनाकडून किंवा त्याला सहानुभूती दाखविणाऱ्या प्रवक्त्याकडून विनियमित केले जातात. सेन्सॉरशिप विशेषत: युद्धकाळात – असतेच असते.
7. राष्ट्रीय सुरक्षेचे वेड जनतेवर दबाव टाकण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे भय दाखवले जाते.
8. धर्म व शासन हे परस्परांत गुंतलेले असणे फॅसिस्ट सरकार जनमत वळवण्यासाठी सर्वाधिक लोकसंख्येच्या धर्माचा वापर करतात. त्या धर्माची मुख्य तत्त्वे जरी सरकारी धोरणाच्या वा कृतींच्याही पूर्णपणे विरुद्ध असली तरी धर्माची परिभाषा व त्यावरील काव्य सर्व सरकारी पुढाऱ्यांच्या तोंडातून ओसंडून वाहत असते.
9. कॉर्पोरेट सत्तेला संरक्षण – फॅसिस्ट राजवटीतील औद्योगिक व व्यापारी सरंजामशाहीच पुढाऱ्यांना राजकीय सत्ता मिळवून देत असते. त्यांच्या हातमिळवणीतूनच उद्योगधंदा- सरकार ह्यांचे साटेलोटे आणि राजकीय दृष्ट्या उच्चभ्रू वर्ग ह्यांचा उदय होतो.
10. कामगार सत्तेची दडपशाही सुसंघटित कामगार ही फॅसिझमला शह देणारी एकमेव शक्ती असते. म्हणून कामगार संघटना ह्या सरळपणे नष्ट केल्या जातात किंवा निर्घृणपणे दडपून टाकल्या जातात.
11. विचारवंत आणि कलावंत ह्यांविषयी तुच्छताभाव उच्च शिक्षण व विद्याव्यासंग ह्यांना चालना देण्यामध्ये फॅसिस्ट सरकारे उघडपणे अनिच्छा दर्शवितात. अशा राजवटींमध्ये प्राध्यापक किंवा इतर विद्वानांवर बंधने आणणे किंवा त्यांना अटक करणेही सहजतेने घडते. कलेच्या मुक्त अभिव्यक्तीला उघड विरोध केला जातो आणि कलांना आर्थिक पाठबळ मिळत नाही.
12. गुन्हे आणि गुन्हेगारी ह्यांचे वेड – फॅसिस्ट राजवटीमध्ये कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अनिर्बंध अधिकार पोलिसांना दिले जातात. पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्यास किंवा नागरी हक्कांवर गदा आल्यास नागरिक देशभक्तीच्या नावाखाली त्याकडे दुर्लक्ष करण्यास आनंदाने तयार असतात.
13. भ्रष्टाचार व बगलबच्चेगिरी ह्यांना ऊत – फॅसिस्ट राजवटी मित्र व सहकारी ह्यांच्या गटाकडून चालविल्या जातात, जे सरकारी पदांवर एकमेकांची नियुक्ती करतात आणि सरकारी सत्तेचा वापर करून एकमेकांना उत्तरदायित्वापासून वाचवतात. सरकारी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसाधने आणि खजिने ह्यांचा अपहार करणे किंवा ते चोरून नेणेही नेहमीच घडते.
14. कपटपूर्ण निवडणुका – फॅसिस्ट राजवटीतील निवडणुका म्हणजे काही वेळा नुसता बनावच असतो. इतर वेळी विरोधी उमेदवाराचा अपप्रचार करून, नाहीतर त्याचा खून पाडून, मतदारांची संख्या वा जिल्ह्याची सीमा ह्यांच्याविषयीच्या कायद्यांचा गैरवापर करून आणि प्रसारमाध्यमांना हाताशी धरून निवडणुका खेळल्या जातात. फॅसिस्ट राजवटी आपल्या न्याययंत्रणांचा उपयोग बहुतेक वेळा निवडणुकांवर कब्जा करण्यासाठी करतात.