मनुष्यप्राणी जंगलातील झाडावरून खाली उतरला तेव्हापासून त्याला प्रत्येक पावलागणिक जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या सर्व अडचणींवर मात करीत करीत तो आजच्या स्थितीपर्यंत पोहोचला. हे साध्य करण्यासाठी त्याला बऱ्याच उपाययोजना कराव्या लागल्या. परंतु आजही जगातल्या सर्वांत श्रीमंत राष्ट्रात पसरलेल्या गरिबी, भेदाभेद, उच्चनीचता यावरून असे अनुमान काढावे लागते की हे उपाय अनेकदा तोकडे पडले.
अनेक संकटातून माणूस सुखरूप बाहेर पडू शकला कारण तो कायम समूहामध्ये सुरक्षित राहिला. परंतु इतर प्राणी उदा. मुंगी, मधमाशी यांसारखा तो समूहातील अनेकविध कामांपैकी विशिष्ट काम करण्याची नैसर्गिक प्रेरणा घेऊन काही जन्माला नव्हता आला. त्यामुळे जरी त्याला जगण्यासाठी समूहाची आवश्यकता होती तरीही समूहामध्ये त्याचे योगदान काय असेल हे ठरलेले नव्हते. तो जेवढा समूहावर निर्भर होता तेवढाच आत्मनिर्भरसुद्धा होता. आणि त्याच्या मी आणि आम्ही याच्यात कायम संघर्ष सुरू राहायचा. यातूनच समाजाची घडी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असायची. यावर उपाय म्हणून या प्रश्नाला कधी धर्मसंस्थेने कामाची वर्गवार वाटणी करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कधी राजसंस्थेने हुकूमशाही पद्धतीने किंवा काळ-स्थळसापेक्ष कायद्यांनी मनुष्य ह्या अडचणींना सामोरा गेला.
जोपर्यंत याचे उत्तर रूढी-परंपरा किंवा राजाज्ञेचे पालन हे होते तोपर्यंत सर्व काही ठीक असल्याचे भासाविले जात होते. आणि या प्रश्नाचे वेगळ्या पद्धतीने उत्तर देणाऱ्या अर्थशास्त्र या विषयाची कधीही गरज भासली नव्हती. या आधीच्या काळात तत्त्ववेत्ते होते, राजनीतिज्ञ होते, इतिहासकार होते. परंतु एखाद्या अर्थशास्त्र- तज्ज्ञाची जगाला कधी गरजच वाटली नव्हती. मग अचानक असे काय झाले ? कोण असे अर्थशास्त्राची नवपताका घेऊन संपूर्ण जगासमोर एक पूर्णतः नवे दृष्टिकोण घेऊन उदयास आले ?
याला उत्तर म्हणून एक नाव आपल्याला परिचित आहे. ते म्हणजे अॅडम स्मिथ, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक.
आदम स्मिथ चा जन्म आणि शिक्षण
आदम स्मिथ चा जन्म 5 जुलै 1723 ला Kirkcaldy, फिफे परगणा, स्कॉटलँड येथे झाला. ते जन्माला यायच्या अगोदरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. चार वर्षांचे असताना त्यांचे जिप्सी लोकांकडून अपहरण करण्यात आले. परंतु त्यांच्या काकांच्या प्रयत्नांमुळे त्यांचा शोध लागला.
स्मिथ हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. परंतु ते बऱ्याचदा स्वतःमध्येच गुंग असायचे. वयाच्या 17 व्या वर्षी एका शिष्यवृत्तीद्वारे त्यांना ऑक्सफोर्ड येथे शिकण्याची संधी मिळाली. पुढची 6 वर्षे तेथेच राहिले. तेव्हाचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ हे शिक्षणाच्या बाबतीत अगदी मागासलेले होते. स्मिथ यांना स्वयं अध्ययनावरच निर्भर राहावे लागले. इतकेच नव्हे तर ऑक्सफोर्डमध्ये काय वाचावे याचेसुद्धा प्रचलित नियम होते आणि डेविड ह्यूम यांचे विचार वाचल्यामुळे आणि त्यांचे Treatise of Human Nature हे पुस्तक सोबत बाळगल्यामुळे स्मिथवर विद्यापीठातून काढून टाकण्याचीच वेळ आली होती. 1751 मध्ये त्यांना Glasgow येथे Logic (तर्कशास्त्र) आणि लगेच त्यानंतर Moral Philosophy (मूल्याधिष्ठित तत्त्वज्ञान) या विषयात काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली. येथेच त्यांना त्यांचे गुरु Hutchenson भेटले. Hutchenson स्वत: Glasgow विद्यापीठात विवादास्पद व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी पहिल्यांदाच वर्गात लॅटिन माध्यमातून शिकविण्यास नकार देऊन खळबळ उडवून दिली होती. स्मिथसुद्धा त्यांचे सच्चे अनुयायी निघाले. शिकवण्यामध्ये त्यांची रुची, उत्साह हा त्या काळासाठी नवा होता. स्मिथवर डेविड ह्यूमचा मित्र असण्याचा, धार्मिक संमेलनात कधी कधी हसण्याचा, रविवारी येशूची प्रार्थना न करण्याचा, आणि निसर्गरूपी नव्या परमेश्वराची प्रार्थना म्हणण्याचा अशा अनेक पद्धतींनी आरोप झाले !!
तत्कालीन युरोपीय परिस्थिती
त्या काळात युरोपीय समाज हा दोन स्पष्ट विभागांत वाटला गेला होता. एक म्हणजे उच्चभ्रू जमीनदार किंवा कारखानदार वर्ग आणि दुसरा म्हणजे शेतमजूर व कामगार ह्यांचा वर्ग. यांपैकी उच्चभ्रू वर्ग त्याचे शाही रीतीरिवाज, सम्मेलने, मेजवान्या, आलिशान बंगले, श्रीमंती खेळ ह्यातच मश्गुल होता. यापलीकडे एक अत्यंत शोषित असा समाज त्याच्या शेतावर, कारखान्यावर वा घरांत अत्यल्प अशा मजुरीवर काम करत होता ह्याचे त्याला भानही नव्हते. हे वातावरण अत्यंत उबग आणणारे होते. थोड्या पैशांसाठी मारामाऱ्या, खून, दरोडे नित्यनेमाने होत असत. महिला, बाल कामगारांचे शोषण सगळीकडे दिसत होते. आठदहा वर्षीची
बालकेसुद्धा अमानवी काम करण्यास बाध्य केली जात. मनुष्याचे सर्व आयुष्य केवळ आणि केवळ स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी खर्च होत असे. गरिबांच्या गरिबीला त्यांचे नशीबच कारण आहे, गरीब गरीबच राहिले तर श्रीमंत हे श्रीमंत राहू शकतील अशा तत्त्वज्ञानाने तो काळ भारलेला होता. धार्मिक रूढी- परंपरा आणि मालकाचे चाबूक या दोनच गोष्टी लोकांना सर्व काही करायला लावीत असत.
पुढचे आयुष्य
Glasgow विद्यापीठात असतानाच स्मिथ यांनी The Theory of Moral Sentiments हे पुस्तक लिहिले. आणि अल्पावधीतच हे पुस्तक विचारवंतांमध्ये प्रचलित झाले. स्मिथ एक अतिशय हुशार, चांगले शिक्षक तर होतेच पण सोबतच ते एक निष्णात वक्तेसुद्धा होते. हे पुस्तक लिहिल्यावर त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. युरोपातल्या नामवंत विद्वानांमध्ये त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. पुढे हे पुस्तक अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले. त्या काळाचे विद्वान, विद्यार्थी मंडळी बऱ्याच लांबून आदम स्मिथचे वर्त्तृत्व ऐकण्यासाठी, वाद-विवाद करण्यासाठी Glasgow ला यायची. पुढे Charles Townshend यांच्या मुलाचे खासगी शिक्षक म्हणून आदम स्मिथची नियुक्ती झाली. Charles Townshend हे त्याकाळचे प्रख्यात व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांचा विवाह हा Dalkeith च्या विधवा राणी सोबत झाला. ते आदम स्मिथ च्या विचारांचे चाहते होते. त्यावेळेस राजपुत्राच्या खाजगी शिक्षकाला चांगले वेतन, निवृत्तिवेतन व राजघराण्यासोबत युरोपातील अनेक ठिकाणांचा दौरा असे सर्व काही मिळायचे. आदम स्मिथ ला या कामासाठी वार्षिक 300 पौंड आणि त्यानंतर वार्षिक 300 पौंड निवृत्तिवेतन देण्यात आले. युरोपात इतर विद्वानांना भेटण्याची संधी आणि यापुढील आयुष्यात त्यांना हवे त्या विषयावर विचार, लेखन करण्याचे मिळणारे आर्थिक स्वातंत्र्य यामुळे आदम स्मिथने हे काम स्वीकारले.
पुढच्या 2 वर्षांत त्यांनी जेनेवा, पॅरिस, एडिनबर्ग येथे अनेक विद्वानांना भेटी देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यात प्रामुख्याने डेविड ह्यूम व एडिनबर्ग Mr. fobo च्या सोसायट्या, M. Quesnay ह्यांचा समावेश होता. एरवी मात्र राजघराण्याच्या प्रथा व लोक यांच्यात त्याचे मन रमत नव्हते. मग आपला एकाकीपणा कमी करण्यासाठी Treatise of Political Economy. या विषयवार त्यांनी लिखाण सुरू केले. डेविड ह्यूमसोबत त्याची विशेष गट्टी होती. M . Quesnay हे फ्रेंच राजाच्या दरबारी वैद्य होते. त्यांनी Physiocracy नावाच्या अर्थशास्त्राच्या एका शाखेवर काम सुरू केले होते. त्यांनी Tableau Economique नावाचा अर्थशास्त्राबद्दल एक तक्ता बनविला होता. त्यांच्या मतानुसार राष्ट्राची संपत्ती ही फक्त सोने, चांदी याच्यात नसून ती वाढलेल्या उत्पन्नातून संपूर्ण राष्ट्रात एका हातातून दुसऱ्या हातात वाहते, जसे शरीरात रक्त वाहते. M. Quesnay यांच्या विचारांचा आदम स्मिथ वर फार परिणाम झाला.
1766 मध्ये राजपुत्राच्या भावाची हत्या झाल्यामुळे स्मिथ यांना हा प्रवास अर्धवट सोडून स्वगृही परतावे लागले. त्याआधी ते लंडनला जाऊन आले. लंडनहून परतल्यावर ते थेट Kirkcaldy ला आले. आणि येथेच त्यांनी आपल्या आयुष्याची पुढची दहा वर्षे खर्च करून त्यांचे अर्थशास्त्रावर जगप्रसिद्ध असे Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations हा ग्रंथ लिहिला. या दहा वर्षांच्या काळात ते आपल्या कामाबद्दल चर्चा करण्यासाठी अनेकदा लंडनला गेले, Dalkeith ला गेले, आणि त्या त्या घडीच्या आघाडीच्या विद्वानाबरोबर त्यांच्या मतांची परीक्षा केली. या विद्वानांमध्ये. समुएल जॉन्सन, बेन्जामिन फ्रेंक्लिन आदी विचारवंत स्मिथ च्या बैठकीला असत.
पुढे पुढे त्यांच्यावर सन्मानांचा वर्षाव होऊ लागला. त्यांना ग्लास्गोव विद्यापीठात सन्माननीय रेक्टर नियुक्त करण्यात आले. त्यांच्या हयातीतच Wealth of Nations चे डच, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, लॅटिन या भाषेत अनुवाद झाले. Wealth of Nations या पुस्तकात मांडलेल्या काही महत्त्वाच्या बाबी
या पुस्तकाची पहिली मांडणी अशी आहे की व्यापारावर शासनाने जी बंधने लादली आहेत ती गैरसोयीची आणि अनुत्पादकतेकडे नेणारी आहेत. त्याकाळी सोने आणि चांदी यांनाच फक्त संपत्ती मानले जात होते आणि सोबतच देशांनी निर्यात वाढवावी पण आयात कमी करावी (अन्यथा सोने-चांदी देशाबाहेर जाईल) असा समज होता. स्मिथने सांगितले की राष्ट्राची खरी संपत्ती ही तिथे तयार होणारा माल आणि त्यावर आधारित सेवा ही आहे. यालाच आज आपण सकल राष्ट्रीय उत्पाद असे म्हणतो आणि त्याला वाढवण्याचा उपाय यावर निर्बंध लादणे हा नसून, अनुचित निर्बंधांपासून याला मुक्त करणे हा होय.
या पुस्तकामधला दुसरा मध्यवर्ती मुद्दा म्हणजे ही उत्पादक शक्ती ही कामाची योग्य विभागणी आणि नियोजन व सोबतच जमा पुंजीचे वृद्धिंगत होणे यांच्यावर आधारित आहे. अतिशय सूत्रबद्ध नियोजनाद्वारे अगदी लहान लहान कामांचे नियोजन करूनसुद्धा आपण अभूतपूर्व असा नफा मिळवू शकतो. याद्वारे अधिक जमापुंजी ही शेवटी शिल्लक राहते आणि त्याचा वापर हा इतर वस्तू घेण्याकरिता किंवा नवीन ठिकाणी गुंतवणूक करण्याकरिता करता येतो.
स्मिथ द्वारा मांडलेला तिसरा मुद्दा हा होता की कोणत्याही राष्ट्राचे भविष्याचे उत्पन्न हे त्याच्या जमापुंजीच्या राशीवर अवलंबून आहे. अधिकाधिक पुंजी जर चांगल्या ठिकाणी गुंतवून ठेवली गेली तर त्यातून जास्तीत जास्त समृद्धी निर्माण होऊ शकते. परंतु जर लोक संपत्ती खरोखरच वाढवण्याच्या उद्देशात असतील तर ती संपत्ती चोरीला जाऊ नये यासाठी पुरेसा प्रबंध करणे आवश्यक आहे. जी राष्ट्रे समृद्ध असतील ती राष्ट्रे स्वतःची पुंजी वाढवतात आणि त्याचे योग्य प्रकारे नियोजन व संरक्षणही करतात.
चौथा मुद्दा असा आहे की ही कार्यप्रणाली स्वयंचलित असली पाहिजे. जिथे एखादी वस्तू कमी प्रमाणात उपलब्ध असते तिथे लोक त्यासाठी जास्त किंमत मोजायला तयार असतात. अश्या वस्तूचा पुरवठा करण्यामध्ये जास्त नफा असतो. त्यामुळे गुंतवणूकदार त्यामध्ये जास्त गुंतवणूक करतात. मंदीमध्ये किंमत आणि नफा कमी मिळत असल्यामुळे निर्माणकर्ता आपली पुंजी दुसरीकडे वळवतो. त्यामुळे उद्योग हे कोणत्याही दिशासूचकाशिवाय राष्ट्राच्या सर्वांत प्रमुख गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नरत राहतात. परंतु ही प्रणाली मुक्त बाजारपेठ आणि स्पर्धा असतानाच कार्यप्रवण होते. शासनाने व्यापारात एकाधिकारशाही दिली, किवा वस्तुनिर्मितीसाठी जास्त कर लावले तर त्यामागे वस्तू निर्मित करणारा जास्त किंमत वसूल करू शकतो. आणि ही किंमत गरिबांकडूनच बहुतांश वेळा वसूल केली जाते. आणखी एक मुद्दा असा की स्पर्धा आणि मुक्त व्यापार यांना एकाधिकारशाही, कर कायदे, भ्रष्टाचार यांच्यापासून कायम धोका असतो.
या सर्व कारणांमुळे स्मिथचे असे मत होते शासनाची व्यापारातील भूमिका अगदी कमी, म्हणजेच सुरक्षा, सेवा पुरविणे, बांधकाम आणि शिक्षण याच्यापुरती मर्यादित असावी.
उत्पादन, निर्मिती आणि विनियोग
Wealth of Nations या पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्मिथने उत्पन्न आणि विनियोग यावर भाष्य केले आहे. पिन बनविण्याच्या कारखान्याचे उदाहरण देऊन स्मिथने दाखविले की प्रत्येक उत्पादनप्रक्रिया वेगळ्या घटकांमध्ये विभागल्यास उत्पादनक्षमता कितीतरी पटीने वाढू शकते. या वाढलेल्या उत्पन्नातून सर्व स्तरांतील लोकांना फायदा होतो.
बऱ्याचदा वस्तुनिर्मिती करणारे स्वतःच्या फायद्यासाठी बाजारपेठ वापरू लागतात आणि शासनाच्या मदतीने कधीकधी एकाधिकारशाही प्रस्थापित करतात. म्हणून स्मिथ यांचे म्हणणे होते की मुक्त बाजारपेठेत जर निर्बंध नसतील तर चांगली स्पर्धा होऊन सामान्य जनतेला गरजेच्या वस्तू योग्य भावात मिळू शकतील. पण शासनाचे कायदे बाजापेठेतील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी, एकाधिकारशाही मिटवण्यासाठी नक्कीच चांगले काम करू शकतील.
भांडवल जमविणे
स्मिथने ठामपणे मांडले की जास्तीतजास्त भांडवल जमविणे हे आर्थिक विकासासाठी गरजेचे आहे. उत्पन्नातील काही भाग बाजूला ठेवून त्यातून नवी गुंतवणूक केल्याने श्रम वाचविणारी साधन-सामग्री घेता येते. जेवढी जास्त गुंतवणूक केली जाते, तेवढी कार्यक्षमता वाढते आणि ही भांडवलपुंजी वाढत गेल्याने सर्वांची समृद्धी वाढत जाते. पण हे जमाभांडवल काही कारणांमुळे आपण गमावू शकतो, जसे चोरी, चुकीचे निर्णय घेणे, चुकीच्या प्रशासकीय निर्णयांचा फटका बसणे, इ. त्यामुळे शासनाने गुंतवणूकदारांत गुंतवणुकीमुळे त्यांना योग्य नफा मिळेल हा आत्मविश्वास जागवावा. यावर आधारित कराद्वारे राष्ट्राचेही उत्पन्न वाढत राहील.
आर्थिक नीती आणि सरकारची भूमिका
प्रत्येक राष्ट्राने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांतून उत्पादन करावे. जे तिथे उपलब्ध नाही किंवा जास्त उपलब्ध आहे त्याची आयात वा निर्यात करावी. या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधने लादणे म्हणजे स्वतःचे राष्ट्रीय उत्पन्न कमी करून अनेकांना गरिबीत लोटणे होय असे स्मिथचे मत होते.
स्मिथने व्यापारातील शासनाच्या भूमिकेवर टीका केली. परंतु व्यापार पूर्णपणे शासनमुक्त व अनिर्बंध व्हावे असे त्याचे मत नव्हते. बाजारपेठेचे कायदे व करार व्यवस्थित पाळले तर मालमत्ता सुरक्षित व अर्थव्यवस्था सुदृढ राहील.
संरक्षण हीसुद्धा राष्ट्राची जबाबदारी असून ते अर्थव्यवस्थेस पूरक आहे. परकीय आक्रमणाची भीती घालविता आली तरीसुद्धा अर्थव्यवस्था सुदृढ होते. सामान्य जनतेची शैक्षणिक पातळी उंचावल्याने तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविल्यानेसुद्धा व्यापाराची वाढ होते.
जेव्हा कर लावयाचे असतील तर ते लोकांच्या कुवतीप्रमाणे एक ठळक परिमाण निवडूनच लावावे. ते भरणे सोपे असले पाहिजे आणि त्याद्वारे एखाद्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत नसला पाहिजे. सरकारने भांडवलावर कर लावू नये. कारण नवीन भांडवल निर्मितीद्वारेच राष्ट्राचे उत्पन्न वाढत असते.
सरकारचे बहुतांश सर्व व्यय हे सध्याच्या वर्तमानातील वापरावर खर्ची होते. त्यामुळे सरकारने मोठे कर्ज घेऊ नये. अन्यथा जमा भांडवल पुंजी ही नव्या निवेशाऐवजी कर्ज चुकविण्यात घालवावी लागते.
स्वातंत्र्यावर आधारित समाज रचना
मानवीय समूह एकमेकांसोबत कसे कार्य करतात याबाबत स्मिथ चे स्वतःचे काही विशिष्ट मत होते. त्याने सांगितले की मनुष्य जेव्हा जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा शोध घेऊ लागतो आणि एकमेकांसोबत काम करू लागतो तेव्हा नैसर्गिकरीत्या समाजामध्ये एकसंधता आणि चैतन्य पसरते. स्वातंत्र्य आणि स्वहित जपणे यामुळे समाज अधिक समंजस होतो. आणि जसजसा लोकांचा एकामेकांशी संवाद वाढतो, तसतशी राष्ट्राची साधनसंपत्ती योग्य दिशेने वापरली जाऊन सकल राष्ट्रीय उत्पादन वाढून लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र फरक घडून येतो. त्यामुळे Wealth of Nations हे पुस्तक फक्त अर्थशास्त्राशी संबंधित नसून त्यात सामाजिक मानसशास्त्राचेसुद्धा विवेचन आहे.
नीतिमूल्यांबाबतचे मानसशास्त्र
स्मिथला Wealth of Nations या पुस्तकापेक्षा त्याच्या Theory of Moral Sentiments ह्या नीतिमूल्यांवरील पुस्तकाने अधिक कीर्ती मिळवून दिली. मानवी मूल्यांचा पाया स्मिथने सामाजिक मानसशास्त्रात शोधण्याचा प्रयत्न केला. मनुष्याला एकमेकांप्रति एक साहजिक कळवळा असल्यामुळे त्याला स्वभावाला मुरड घालून सामाजिक संतुलन टिकविता येते. हेच आपल्या नैतिक आचरणाचे मूळ आहे.
स्वहित आणि नैतिक आचरण
स्मिथने वर्णन केलेले स्वहित आणि एकमेकांबद्दलचा कळवळा हे एकत्र कसे नांदू शकतात हे बघण्यासारखे आहे. स्मिथ म्हणतो की माणूस कितीही स्वार्थी असला तरी त्याच्या निसर्गदत्त स्वभावात असे काही गुण असतात ज्यामुळे तो इतर लोकांच्या भरभराटीबद्दल आपुलकी दाखवतो. त्याचा स्वतःचा कोणताही स्वार्थ साधला जाणार नसला तरी तो इतरांच्या आनंदात आपला आनंद मानतो. दुसऱ्या शब्दांत, मानवी स्वभाव हा व्यामिश्र आहे. आपण स्वहित जपणारे असलो तरी आपल्याला इतरांना मदत करायला सुद्धा आवडते. स्मिथचे पुस्तक याला दुजोरा कसे देते. त्यात स्वहित जपणारी माणसे शांततामय आणि उपयुक्त आयुष्य जगू शकतात यावर प्रकाश टाकला आहे.
Wealth of Nations या पुस्तकात संपत्तीच्या अतिलोभाचे अजिबात समर्थन केलेले नाही, जसे बऱ्याचदा मांडले जाते. स्वहित हे देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेते आणि ही एका प्रकारे चांगली ताकद आहे. परंतु मुक्त स्पर्धा आणि दंडुकेशाही, जाचक नियम यांना हद्दपार केले तरच हे शक्य होईल. या आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचा फायदा शेवटी गरिबांनाच होतो.
Theory of Moral Sentiments या पुस्तकातील प्रमुख मुद्दे
या पुस्तकात असे प्रतिपादन केले आहे की मानवाचे नैतिक विचार व आचरण हे त्याच्या सामाजिकतेतून उपजले आहे. ज्यामुळे समाज टिकून राहतो व उत्तरोत्तर प्रगती सुद्धा करू शकतो, अशा मूलभूत नियमांचे त्यात वर्णन केले आहे. स्वहित आणि एकमेकांबद्दलचा कळवळा.
व्यक्ती म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया स्वतःची काळजी घेणे ही असते. हे सामाजण्यासारखे आहे. आणि तरी सुद्धा एक समाजशील प्राणी म्हणून आपल्यामध्ये एकमेकांबद्दलचा कळवळा, एकानुभूती ही तितकीच नैसर्गिक असते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आनंदी किवा दुखी बघतो तेव्हा आपल्याला तिच्याबद्दल भावना निर्माण होतात, जरी त्या स्वतःबद्दल निर्माण होणाऱ्या भावानेइतक्या प्रबळ नसतात. त्याच पद्धतीने इतर लोक आपली एकानुभूती प्राप्त करू इच्छितात आणि आपल्याबद्दलसुद्धा काही भावना त्यांचा मनात असते. जेव्हा या भावनेचा आवेग वाढतो, एकानुभूती त्यांच्या मनाला आपल्या मनातील भावनेसोबत एकरूप, किवा जवळपास यायला मदत करते. जसे जसे आपण लहानपण ते प्रौढ अवस्था असे मोठे होत जातो तसा इतर लोकांना की मान्य आहे आणि काय मान्य नाही हे शिकतो. नैतिक मूल्य हे याच सामाजिक उत्तदायित्वातून आणि नैसर्गिक स्वभावातून शिकता येते.
न्याय आणि मदत करण्याची भावना
जरी आपण स्वहित जपणारे असू तरीसुद्धा एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहण्यासाठी आपल्याला काही पद्धती निर्माण कराव्या लागतात. समाज टिकून राहण्यासाठी राबविलेले हे महत्त्वाचे न्यूनतम निर्बंध होत. जेव्हा लोक त्याही पलीकडे जाऊन एकमेकांची मदत करतात, काही सकारात्मक गोष्टी करतात तर ते चांगलेच आहे. परंतु न्यायासारखे या गोष्टीला आपण सर्वांवर लादू शकत नाही.
नैतिक आचरण
विवेक, न्याय आणि मदत करण्याची भावना हे सर्व महत्त्वाचे आहे. परंतु आदर्शवत असे असायला हवे की जेव्हा कधी एखादी निःपक्षपाती व्यक्ती आपल्या भावना आणि आचरण यांना पूर्णपणे एकानुभूतीने बघण्यास सक्षम होते. याला आत्मसंयम आणि स्वयंशिस्त लागते आणि याच्यातच खरी नैतिकता प्रकट होते.
मूल्य
हे काही मोजमाप करून ठरवायचे नाही असे स्मिथचे प्रतिपादन होते. हे नैसर्गिकरीत्या आपल्यात समाजशील असल्यामुळे उतरले असते. काही अपवाद
वगळता जेव्हा आपल्याभोवती आनंदी किंवा दुःखी लोक आपण बघतो तेव्हा पर्यायाने आपणसुद्धा आनंदी किवा दुःखी होतो. जेव्हा आपल्याद्वारे किंवा समाजाद्वारे स्वीकृत गोष्टींचा अंगीकार लोक करतात, तसे वर्तन करतात तेव्हा आपल्याला आनंद होतो. आणि जेव्हा हे असे घडत नाही तर हे योग्य होत नाही असे वाटून आपल्याला दुःख होते.
हे खरे आहे की इतरांच्या भावना आपल्याला त्याच पद्धतीने समजत नाहीत. तरीसुद्धा आपल्यात अंगीभूत एकानुभूतीद्वारे आपण थोडेफार समजू शकतो की अधिक राग, दुःख, किंवा अशाच तीव्र भावना इतरांना दुःखी करतात. आपण आपल्या स्वतःच्या भावना नियंत्रित करून त्या इतरांच्यासोबत आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यात साधर्म्य निर्माण व्हावे. त्याच्याही पुढे जाऊन, कुणाही त्रयस्थ व्यक्तीला इतरांबद्दल एकानुभूती निर्माण होईल इथपर्यंत आपण आपल्या या सामाजिक विचारांचे उन्नयन करतो.
तसेच जेव्हा आपण इतरांबद्दल काळजी व्यक्त करतो तेव्हा आपल्याला माहिती असते की आपल्यासमोरची कुणी निःपक्षपाती व्यक्ती ते ऐकून आपल्या कळवळ्याला स्वीकृती देईल आणि त्याच्या मनात आपली प्रतिमा चांगली होईल. ही निःपक्षपाती व्यक्ती बऱ्याचदा अस्तित्वातही नसते, पण आपण त्याचा आधार घेऊन आपली दिशा ठरवत असतो. अशा अनुभवातून आपण समाजात वागण्याची एक व्यवस्था निर्माण करतो, ती म्हणजे मूल्य.
शिक्षा आणि पारितोषिक यांचा समाजात खूप मोठा प्रभाव असतो. समाजाला फायद्याच्या ठरणाऱ्या गोष्टींबद्दल आपण लोकांना पुरस्कृत करतो, शाबासकी देतो आणि नुकसान करणाऱ्या गोष्टीला आपण नकार देतो, त्याबद्दल शिक्षा करतो. निसर्गाने आपल्याला काही गोष्टींचा स्वीकार किवा धिक्कार करण्याचे मत मांडण्याचा अधिकार दिला आहे, ज्यामुळे एखादा अदृश्य हात आपल्याला मार्गदर्शन करत असल्याप्रमाणे आपण आपल्या समाजाचे आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व अबाधित राखू शकू.
न्यायाबद्दल सांगताना असे म्हणता येईल की समाजाला टिकवून ठेवण्यासाठी काही कायदे असले पाहिजेत जेणेकरून मनुष्य एकमेकांना हानी पोहोचवू शकणार नाही. स्मिथने म्हटले आहे की हे संभाव्य आहे की चोर, लुटारूंचासुद्धा समाज अस्तित्वात असू शकतो. परंतु तिथेही एकमेकांना न मारण्याचा व न लुटण्याचा कायदा असावाच लागेल. तरच तो समाज टिकून राहील.
एखाद्याने जर चांगल्या गोष्टीची परतफेड ही चांगले वागून केली नाही किवा चांगले वागण्याची संधी असूनसुद्धा तो तसा वागला नाही तर त्याला आपण त्यासाठी शिक्षा करू शकत नाही. पण त्याच्या वागणुकीमुळे खरेच कुणाचे नुकसान झाले तरच तिथे कायद्याचा अंमल सुरू होईल आणि शिक्षा करता येईल. कायद्याचे पालन करण्याचे बंधन आपण लोकांवर घालतो कारण त्याशिवाय समाज अस्तित्वातच राहू शकत नाही.
सदसद्विवेकबुद्धी
निसर्गाने मानवाला असे काहीतरी दिले आहे जे समाजाने दिलेल्या शिक्षेपेक्षाही कठोर आहे; ते म्हणजे स्वतःच केलेली स्वतःची समीक्षा आणि टीका. या सदसद्विवेकबुद्धीमुळे आपण निःपक्षपातीपणे बघू शकतो आणि त्यातूनच आपल्याला हे भान येते की इतर लोकसुद्धा तेव्हढेच महत्त्वाचे आहेत.
नैतिक मूल्य
समाजात घडणाऱ्या अगणित मुद्द्यांवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण हळूहळू व्यक्तीच्या वर्तनाबद्दल काही नियम तयार करतो. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत आपल्याला नव्याने विचार करायची गरज राहत नाही.
स्मिथने Theory of Moral Sentiments या पुस्तकाच्या अखेरीस, खरी विवेकशील व्यक्ती कशी असेल यावर भाष्य केले आहे. त्याच्या मते अशी व्यक्ती ही न्याय, सदसद्विवेकबुद्धी, परोपकार, स्वयंशिस्त व आत्मसंयम ह्या गुणांनी युक्त असते.
सर्वांबद्दल हिताची आणि उपकारक भावना बाळगून असणारे लोकसुद्धा सामाजिक जीवन उंचावतात कारण त्यांच्या वागण्याने इतर लोकांना बाकीच्यांच्या हिताबद्दल विचार करायला चालना मिळते. हे कुणावर बंधनकारक नसते परंतु समाजाकडून याचा गौरव केला जातो. स्वयंशिस्त व आत्मसंयमाद्वारे आपण आपल्या भावनांचे योग्य प्रकारे नियंत्रण व समाजविघातक विचारांचा निचरा करू शकतो. स्मिथ शेवटी म्हणतो की स्वातंत्र्य आणि निसर्ग हे खात्रीलायकरीत्या आपल्या सर्वांचे दिशानिदेशक आहेत आणि यांच्या द्वारे समाज एकोप्याने कार्यान्वित राहू शकतो. हे अत्यंत मूलभूत निकष असून त्रिकालाबाधित सत्य आहेत.
आदम स्मिथचे खाजगी आयुष्य
आदम स्मिथ सुरुवातीपासूनच स्वतःमध्ये गुंग असणारे व्यक्तिमत्त्व होते. अनेकदा तंद्रीत असताना ते काय करत, कुठे जात याचे त्यांना काहीच भान नसायचे. परंतु ते प्रखर बुद्धिमतेचे धनी होते. विद्यार्थ्यांचे आवडते होते. Glasgow विद्यापीठ सोडतेवेळी त्यांना असे वाटले की त्यांनी विद्यार्थ्यांकडून जास्त फी
आकारली आहे. (The Theory of Moral Sentiments मध्ये त्यांनी लिहिले होते की शिक्षकांचा पगार हा तो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये किती लोकप्रिय आहे यावरून ठरवावा). मग एके दिवशी वर्गात थैली भरून पैसे नेऊन विद्यार्थ्यांना पैसे परत करू लागले. विद्यार्थी हे बघून अचंबित तर झालेच, परंतु त्यांनीसुद्धा आपल्या आवडत्या शिक्षकाला सांगितले की आम्ही तुम्हाला दिलेल्या पैशाची पै न पै आधीच वसूल झाली आहे.
आदम स्मिथ आजीवन अविवाहितच राहिले. मी माझ्या आयुष्यात फक्त पुस्तकांवरच प्रेम करतो हे स्वतःबद्दल त्यांनी काढलेले उद्गार खरे करून दाखविले. स्वतःच्या आईवर त्याचा विलक्षण लोभ होता. वयाच्या 67 व्या वर्षी आदम स्मिथ चे निधन झाले. त्याच्या चार महिन्यांपूर्वीच त्यांची आई वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू पावली होती.
आजच्या युगात Wealth of Nations चे महत्त्व
स्मिथचे युग आणि आजचे औद्योगिक क्रांतीनंतरचे युग ह्यात खूप फरक झाला असला तरीसुद्धा स्मिथने मांडलेले अनेक निष्कर्ष आज कोणत्याही अर्थव्यवस्थेला लागू पडतात. मुक्त अर्थव्यवस्था, त्याला लागणारे कायदे, संरक्षण, बचत आणि योग्य निवेश यांचा आधिकारिक दंडाशिवाय समन्वय. या सर्व बाबी आजही अनेक राष्ट्रांना लागू पडतात आणि भविष्यात जी काही आव्हाने येतील त्यांना उत्तर देण्यासाठी आपण परत स्मिथच्या या पुस्तकाकडेच येऊ.
याच्या पुढचा कालखंड हा अनेक थोर अर्थाशास्त्र्यांचा होता. त्यांच्या विचारांनी संपूर्ण जगावर राज्य केले आणि आजही करत आहेत. त्यांच्या काही सेना नव्हत्या. पण यांनी आपल्या अलौकिक बुद्धीच्या जोरावर जग चालविणारे विलक्षण सिद्धांत मांडून ठेवले आणि या जगाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला.
अशाप्रकारे स्मिथ ने त्याच्या दोन पुस्तकातून माणसाला जगाकडे बघण्याचा एक नवीन आयाम प्रदान केला. निःसंशय आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या सर्वश्रेष्ठ पुस्तकांच्या यादीत त्यांचे नाव आहे. यावरूनच आपण आदम स्मिथ ची उंची जाणू शकतो. म्हटले जाते की जगाच्या इतिहासात दोन प्रमुख कालखंड आहेत. एक आदम स्मिथ च्या आधीचे जग आणि दुसरा आदम स्मिथच्या नंतरचे ! ! !
(The Worldly Philosophers या पुस्तकाच्या आधारे)