अंधश्रद्धानिर्मूलनाचे वाटसरू श्री. नरेन्द्र दाभोलकर ह्यांची हत्या झाली. तेव्हापासून ह्या विषयावर बरीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ह्यानिमित्ताने, श्रद्धा काय आहे. अंधश्रद्धा कशाला म्हणायचे, हे समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या व चिंतनास प्रवृत्त करणाऱ्या विनोबांच्या विचारपुष्पांना मी त्यांच्याच भाषेत आपल्यापुढे ठेवीत आहे –
१) श्रद्धा आणि बुद्धी * श्रद्धा आणि बुद्धी यां ध्ये फरक जरूर आहे, परंतु विरोध मात्र मुळीच नाही. बुद्धीचे उगमस्थान विचारशक्ती आहे, तर श्रद्धेचे उगमस्थान प्राण-शक्ती आहे. * बुद्धीचे काम आहे ज्ञान सांगणे, श्रद्धेचे काम त्या ज्ञानावर स्थिर करणे आहे. श्रद्धेतून प्रयोग होतो. तो प्रयोग अनुभवसिद्ध झाला तर त्याची अनुभूती येते. नंतर त्याची निष्ठा बनते, जी श्रद्धेला दृढ करते. मग अंतर्मनात सहज संकल्प स्फुरण पावतात. * चांगल्या विचारावर बुद्धी स्थिर करणे, ह्याचेच नाव श्रद्धा. * श्रद्धा ही दिशा-सूचक ध्रुवतारा आहे. श्रद्धा अव्यक्त असू शकते. व्रत म्हणजे आपल्याला ज्यावरून जायचे आहे तो मार्ग. व्रत मात्र व्यक्त असावे. * श्रद्धेपासून सुरुवात करावी लागते. मग अनुभवाने ज्ञानप्राप्ती होते. * बुद्धीला स्पर्श करणारे ते तत्त्व, हृदयाला स्पर्श करणारा तो रस. * शास्त्राशिवाय श्रद्धा काही कामाची नाही. अनुभव-वचनाला शास्त्र म्हणतात. * आपल्याकडे जी निर्णयशक्ती आहे, ती म्हणजे बुद्धी. तिच्या पलीकडे अंतर्ज्ञानी परमेश्वर आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे साधनही बुद्धीच आहे. बुद्धी शुद्ध करणे हेच साधनेचे सार आहे. * जेथे बुद्धी चालते, तेथे समर्पण नसते. जेथे समर्पण असते, तेथे बुद्धी कुंठित होते. परंतु ती मूर्खता नसून बुद्धीच्या पलीकडची स्थिती आहे. * बुद्धी एकीकडे श्रद्धेसारखी अपंगही नाही व दुसरीकडे श्रद्धेप्रमाणे बलवानही नाही. श्रद्धा एका मर्यादेहून अधिक दूर जाऊ शकत नाही. बुद्धी मात्र जाऊ शकते. श्रद्धा सुरुवातीला बलवान असते तर बुद्धी अखेरीस बलशाली असते. श्रद्धेप्रमाणे बुद्धी कधीच दुर्बल होऊ शकत नाही. श्रद्धा जेवढी दुर्बल बनू शकते, तेवढी बुद्धी बनू शकत नाही. सुरुवात श्रद्धेतून होते, आणि बुद्धीचा विकास झाल्यावर श्रद्धेचे काम पडू नये. श्रद्धाच बुद्धियुक्त बनावी.
२) आस्तिक/नास्तिक
साऱ्या जगभरहात परमेश्वरास न मानणारे काही लोक आहेत, ज्यांना नास्तिक असे म्हणतात. परंतु ते सज्जन व मानवतेची कदर करणारे आहेत. मानवता मानणे आणि ईशर मानणे ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत.
३) सगुण/निर्गुण
शाळिग्राम आकाराने असतो तर फार छोटा पण त्याच्यात भावनावश ब्रह्मांडाच्या पूजेचा आरोप केला जातो. म्हणजे त्याचा आकार लहान असला तरी खूप मोठा आहे. * मूर्तीमध्ये जे अमूर्त लपले आहे, त्याचा विचार न करता जर मूर्तीची पूजा केली तर ती जडपूजा होईल. * मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. मूर्तिपूजा हे अभ्यासाचे एक साधन आहे. हे साधन असल्याची जाणीव ठेवली तर ते साधन म्हणून उपयोगी पडते. * अर्थ लक्षात न घेता मूर्तीच्या ऐवजी एखाद्या ग्रंथाला जरी ब्रह्मरूप मानले तरी ती मूर्तिपूजाच होईल. * एका छोट्याशा वस्तू ध्ये संपूर्ण विशाचा अनुभव करायला शिकणे म्हणजे मूर्तिपूजा, मूर्तिपूजा जेव्हापर्यंत निर्गुण असते तोपर्यंतच ती निर्दोष राहू शकते. परंतु निर्गुणतेची मर्यादा सुटताच ती सदोष अशी सगुण पूजा बनते. * तुम्हाला जर मूर्तिपूजेला सुटी द्यायची असेल तर ज्ञानप्रसार करावा लागेल. मूर्तिपेक्षाही महान अशी दुसरी कुठली गोष्ट समोर ठेवावी लागेल. मूर्तीमध्येच परमेश्वर आहे असा भ्र राहू नये यासाठी मूर्तीला शेवटी बुडवून टाकले जाते. (गणेश विसर्जन) वेदां ध्ये म्हटले आहे की उपासनेची जर आसक्ती झाली, तर ती उपासना सोडून द्यावी. * कोणतेही आलंबन घेणे किंवा न घेणे ही वेगळी गोष्ट आहे. परंतु त्या आलंबनाचा अर्थ स्थूल होऊन जाणे आणि ज्या सूक्ष्म वस्तूच्या आकलनासाठी ती घेतली असेल ती वस्तू गौण होऊन जाणे, दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आलंबनालाच महत्त्व प्राप्त होणे आणि ज्या विचारासाठी त्याचा आधार घेतला आहे तो विचार त्यामध्ये लपून जाणे, ही धोकादायक परिस्थिती आहे. आलंबन घेतले नाही तर विचार विखरून जातो. सद्भावना अव्यक्त रूपातही पसरत जाते परंतु विचार मात्र अव्यक्त रूपात ध्वनिभूत होत नाही. मग सर्वसामान्य जनतेला त्याचे आकर्षण वाटत नाही. अशा रीतीने आलंबन घेण्यात एक धोका, तर आलंबन न घेण्यात दुसरा धोका आहे.
मी (विनोबा) जमीनप्रकरणाचे आलंबन जरूर घेतले परंतु त्याच्यामार्फत साम्ययोगाचा, करुणेचा विचार मला प्रसृत करायचा होता. * गावाला चांगल्या सवयी लावण्यासाठी मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात अंधार असतो. तेथे ज्योत लावण्याची प्रथा आहे. * सगुण व निर्गुण ह्यांत काही फरक नाही. व्यक्ती सगुण असते तर तत्त्व निर्गुण. सगुणाशिवाय निर्गुण कमजोर बनते.
४) विज्ञान व आत्मज्ञान
* विज्ञान हे विश्लेषण आहे तर आत्मज्ञान हे संश्लेषण. यांपैकी एक गोष्ट बाह्य प्रमाणांवरून निश्चित होते तर दुसरी आंतरिक प्रचीतीने कळते. * विज्ञान शक्तीची उपासना करते तर अध्यात्म शुद्धीची. विज्ञान गती देते तर आत्मज्ञान दिशा दर्शविते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर आत्मज्ञान डोळ्यांप्रमाणे दिशादर्शक आहे व विज्ञान पायाप्रमाणे गतिसूचक. * विज्ञानाने जगाच्या जीवनाला रूप दिले. आत्मज्ञानाने आकार दिला. साहित्याने चेतना जागविली. * आज जगभरात या मुद्द्यावरून संघर्ष सुरू आहे की विज्ञान पुढचे पाऊल उचलते व आत्मज्ञान पुढचे पाऊल उचलण्यास तयार नसते. प्रत्यक्षात याउलट व्हायला पाहिजे. आत्मज्ञानाने पुढे पाऊल टाकावे व विज्ञानाने त्याचे अनुसरण करावे. वैज्ञानिकांना ज्या दिशेने शोध घ्यायचा असेल तेथे आत्मज्ञानाने त्यास पूरक बनले पाहिजे.
५) साधनापथ
* ज्ञान त्याच्याच उपयोगी पडेल जो विद्वान असेल. कमजोर व्यक्तींसाठी तर भक्तीच उपयोगी पडेल. * संशोधन म्हणजे ध्यान आणि आकलन म्हणजे ज्ञान. ध्यान बुद्धीने करावे. बुद्धीची परीक्षा करणे म्हणजे ज्ञान होणे आणि त्यानंतरचा अनुभव म्हणजे साक्षात्कार. * जे कार्य ज्ञानी पुरुष (राम) ज्ञानपूर्वक करतो तेच कार्य श्रद्धावान (हनु न) श्रद्धेने करू शकतो. * दुर्जनांचा प्रतिकार म्हणजे दुर्जनतेचा प्रतिकार. म्हणजेच बाहेर दिसणाऱ्या दुर्जनतेचा आपल्या मनात शोध घेणे. * विचारांचे आपल्याला आकलन करून घ्यावयाचे आहे, प्रचार नव्हे. आकलन हृदयाच्या, जीवनाच्या मार्फत होते तर प्रचार तोंडाने, वाणीने होतो. आकलन मौनानेही होऊ शकते. * प्रार्थनेत दैववाद व प्रयत्नवाद यांचा समन्वय आहे. दैववादात पुरुषार्थाला स्थान नसल्यामुळे तो मूढ आहे. प्रयत्नवादामध्ये नम्रतेची, निरहंकाराची वृत्ती नसल्यामुळे तो गर्विष्ठ आहे. म्हणून दोहोंचेही मिलन होऊ शकत नाही. दैववादातील नम्रता आणि प्रयत्नवादातील पराक्रम ह्या दोहोंचा मेळ घातल्यावर त्याला प्रार्थना म्हणता येईल. * सर्वोदयात असे म्हटले आहे की जो सिद्धान्त सर्व न्यि आहे परंतु त्याचा अनादर होत आहे त्यासाठी सत्याग्रह केला जाऊ शकतो. परंतु जो सिद्धान्त सर्व न्यि नाही परंतु आपल्याला मान्य आहे तो शिकण्याचा विषय आहे. विनोबांच्या शब्दांत श्रद्धा-अंधश्रद्धा मीमांसा
मनुष्यप्राण्याला दोन वैशिष्ट्य बहाल केली. एक नम्रता व दुसरी बुद्धी. नम्रता श्रद्धेत परिवर्तित होते. बुद्धीने माणूस अमूर्त विचार करू शकतो, स्वप्ने पाहू शकतो, संशोधन करू शकतो. मनुष्यप्राण्याच्या उत्क्रान्त मेंदूचे दोन भाग आहेत.
डावा मेंदू बुद्धीचे क्षेत्र आहे. गणित तर्कबुद्धी, विज्ञानाचे शोध हे त्याचे काम आहे. मनुष्यप्राण्याच्या बुद्धिप्रामाण्यतेतून, विश्लेषणक्षमतेतून विज्ञानयुगाचा जन्म झाला आहे. म्हणून डाव्या मेंदूचा अधिक बोलबाला आहे. तो वरचढ मेंदू मानला जातो. तो आमचा मेंदू.
उजवा मेंदू वेगवेगळ्या संवेदनांचे संश्लेषण करून आकलन घडवून आणतो. समग्रता हाच त्याचा पिंड आहे. तो संगीत, रंग, भावनिक भाषा इत्यादी जाणतो. तो म्हणजे आमचे हृदय आहे. आमच्या आतील निसर्गाचे चेतनतत्त्व आहे. श्रद्धेचे निदान आहे. ज्या वेळी ह्या मनात समाधान, कृतकृत्यता, मैत्री, प्रे , आनंद, शांती ह्या संवेदना एकत्र होतात तेव्हा समजावे की त्याक्षणी आपण निसर्गाशी एकरूप झालो आहोत.
बुद्धीला जर विवेकात परिणत व्हायचे असेल (योग्य मार्गावरून चालायचे असेल) तर श्रद्धेवर घासून अनुभव घ्यावा लागतो. म्हणजे डाव्या मेंदूचा तर्क उजव्या मेंदूच्या आकलनशक्तीने पारखून घ्यावा लागतो. त्यातून येणारा अनुभव निसर्गतुल्य असला तर तो अनुभूतीपर्यंत पोचतो. मग अनुभूती अढळ स्थान प्राप्त करते.
सारांश, बुद्धी जेथे थकते, तेथे उजव्या मेंदूच्या समग्र संश्लेषणाद्वारे निसर्गाला/ सत्याला ओळखता येते. अंतरात्म्याचा हा आवाज ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ असतो.
श्रद्धा ही कर्मशक्ती आहे. श्रद्धेने कर्मात सातत्य राहते. बुद्धीचा स्वभाव आहे झेप घेणे. तिचे मर्म आहे गतिशीलता. अशा गतिशील बुद्धीला मार्ग दाखवणाऱ्या अध्यात्माची सुरुवात श्रद्धेतून होते. इतकेच नव्हे तर बुद्धी थकून गेल्यावर शिल्लक राहिलेली वाटचालही श्रद्धेने होते. अंधश्रद्धा कुणाला म्हणावयाचे हे स्वतःला शोधावे लागते. अनुभूतीच्या आधारावर जोपर्यंत सत्यासत्यता पारखून पाहिली जात नाही तोपर्यंत कोणत्याही विचाराला अंधश्रद्धा म्हणणे अयोग्य होईल. अशा वेळी साक्षात्कारालाही भ्राचे रूप दिले जाऊ शकेल. बुद्धिप्रामाण्यवादी जर अनुभूतीच्या साह्याने परीक्षा करू शकला नाही तर त्याने निदान एवढा तटस्थ दृष्टिकोण ठेवावा की मी निवाडा करू शकत नाही; कारण अंधश्रद्धा जितकी वाईट तितकीच अंध-अश्रद्धाही वाईट आहे. (एकदा विनोबाजींना कोणीसे विचारले की, “भूतयोनि असते का?” तेव्हा त्यांनी असे उत्तर दिले की, ‘मी अद्याप त्यासंदर्भात कोणतीच अनुभूति घेतली नसल्यामुळे भूतयोनि असते किंवा नाही हे मला माहीत नाही.”)
अविवेकी श्रद्धा अंधश्रद्धेकडे झुकू शकते; परंतु तसे झाल्यास ते आपल्या न्यूनगंडाचे द्योतक आहे. त्याला समर्पण म्हणू नये. समर्पण अत्यंत जागृत असते. त्याचप्रमाणे बुद्धिप्रामाण्यता जर श्रद्धेने पारखून घेतली नाही तर उद्दामपणाकडे झुकू शकते.
साधनेच्या मार्गावर सिद्धी प्राप्त होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. त्या साधनेच्या मार्गातील व्याधी आहेत. ह्या व्याधींचा प्रचार करणारी व्यक्ती मार्गच्युत म्हटली गेली पाहिजे. हातचलाखीने सिद्धी प्राप्त झाल्याचे नाटक करणे म्हणजे ढोंगी बुवाबाजी. त्यावर प्रहारच केला पाहिजे. संमोहनविद्येने प्राप्त केलेल्या प्रावीण्याला साधना म्हणता येत नाही. अर्धनिद्रित अवस्थेत चिंतन करण्याची क्षमता नसते. संमोहनविद्येने घडवून आणलेले परिवर्तन कायम टिकत नाही. तसेच ते वृत्तीमध्ये सुधारणा घडवून आणू शकत नाही. म्हणून संमोहनातील तंद्रीला साधना म्हणणे हीदेखील एक अंधश्रद्धाच आहे.
(सर्व उद्धृते विनोबा समग्र वायय मधून)
धन्वंतरी वसाहत, सेवाग्राम मार्ग, वरूड, वर्धा दूरध्वनी : ०७१५२-२५०५८४