आपणास एक नवी संस्कृती निर्माण करावयाची आहे याची जाणीव आम्ही सतत ठेविली पाहिजे. तीनशे वर्षांपूर्वी युरोपखंड आधुनिक युगात आले, भौतिकविद्येत त्यांनी आघाडी मारली. भौतिक सत्याचे संशोधन करीत असताना आप्तवाक्य व शब्दप्रामाण्य यांच्यापुढे जाऊन बुद्धिवाद आणि आत्मप्रामाण्य यांचा आधार घेतला. बुद्धिवादातून बुद्धिस्वातंत्र्य जन्मास आले आणि या बुद्धिस्वातंत्र्यासाठीच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार प्रथम करण्यात आला. त्यांच्या संरक्षणासाठी राज्यक्रांत्या कराव्या लागल्या व तशा त्या ब्रिटिश, अमेरिकन व फ्रेंच लोकांनी केल्याही. पण त्या क्रांत्या केल्यानंतर व्यक्तिस्वातंत्र्य आर्थिक व्यवहारात प्रभावी बनले. सत्यसंशोधन आणि समाजसेवा ही व्रते घेणाऱ्यांसाठी ते जितके हितावह होते तितकेच ते आर्थिक व्यवहारांत अनर्थावह ठरले आहे. प्रत्येकाला वाटेल तितका धनसंग्रह करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि सर्वांना सर्वांशी अनिबंध स्पर्धा करण्याची पूर्ण मुभा दिली म्हणजे समाजाचे, राष्ट्राचे व जगाचे हित आपोआप होते असे नाही. आर्थिक व्यवहारांचे अनियंत्रण हेच आजच्या सर्व मानवी अनर्थांचे आद्य कारण आहे, हे तत्त्व अर्थशास्त्रात आता सुप्रतिष्ठित झाले आहे. आपल्या संघराज्यातील राज्यघटनेतही ते अंतर्भूत झाले आहे. पण यद्यपि एक-वर्ग-समाजघटनेचे ध्येय आमच्या आर्थिक व राजकीय घटनेत सुप्रतिष्ठित झालेले नाही. ते होईपर्यंत आपण नवसंस्कृतीच्या निर्मितीस योग्य असा पाया घातला आहे असे म्हणता येणार नाही.
— आचार्य शं.द.जावडेकर नवभारत, ऑक्टो.१९४७ मधून साभार