अनवरत भंडळ (६)

आध्यात्मिक साधनाः सुंदर जगण्यासाठी योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्मांडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विशातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवाद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळ्यांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळ्या/अज्ञानी प्रकृतीच्या/निसर्गाच्या गर्भातून गुप्तपणे त्या प्रकृतीच्या विकासाला आधार देत राहिले. सृष्टीचा विकास धडपडत/चाचपडत झाल्यासारखा दिसतो कारण बाह्यतः हा जड/अचेतन ऊर्जेचा/पदार्थाचाच प्रवास आहे. आणि तरीही त्या प्रवासाला एक दिशा दिसते कारण त्या दिशेकडे प्रकृतीला पडद्याआडून घेऊन चालणारे चैतन्यही तिच्याच उदरात आहे. हा सर्व प्रवास जडातून चैतन्याकडे, असंवेदनेकडून संवेदनेकडे, अनेकत्वातून एकत्वाकडे, विसंगतीतून सुसंगतीकडे, निम्न पातळीवरून उच्च पातळीकडे – म्हणजे सच्चिदानंदाकडे वाटचाल करीत आहे.

तुकडोजी गहाराजांनी त्यांच्या काव्यातून अशीच गागणी केलेली आहे:
‘है प्रार्थना गुरुदेवसे यह स्वर्गसम संसार हो
अतिउच्चतम जीवन रहे, परमार्थय व्यवहार हो’

ज्ञानदेवांच्या पसायदानात देखील अशाच आशयाची प्रार्थना आढळून येते. भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानांतला मौलिक भेद असा आहे की तार्किक बुद्धीपेक्षा वेगळ्या पातळीवरील जाणिवेच्या प्रत्यक्ष अनुभूतीला भारतीय आध्यात्मिक दर्शनांनी मोलाचे स्थान दिले. सांख्य, जैन, बौद्ध, वेदान्ती, अद्वैतवादी अथवा द्वैतवादी अशा सर्वच दार्शनिकांनी केवळ बुद्धीला कस लावून तार्किक निष्कर्ष काढण्यावर भर न देता स्वत: ध्यानधारणेच्या, योगसाधनेच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून आपल्या जाणिवेला एकाग्रतेने उच्चतर पातळ्यांवर केंद्रित करून ती अनुभूती त्यांना झाली, तिचे वर्णन बुद्धीच्या पातळीवर तात्त्विक मांडणीद्वारे शक्य होईल तितके केलेले आहे. बुद्ध, महावीर, कृष्ण, शंकर (आचार्य), गोरख, कबीर, नामदेव, तुकाराम ही नांवे भारतीयांसाठी फक्त फिलॉसॉफर्स किंवा कवी म्हणून वंदनीय नाहीत, तर आपापल्या जीवनात खडतर तपस्येतून त्यांनी ‘अलौकिक’ असे काही अनुभवले व बाह्य विशात प्रसारित केले, त्यामुळे ते पूजनीय ठरले आहेत.
पाश्चात्त्यांचा भर ग्रीक तत्त्वज्ञांच्या प्राचीन काळापासून बुद्धी व तार्किक विचारांवर राहिला आहे. बुद्धी कितीही सूक्ष्म, तरल व उत्तुंग झेप घेणारी असली तरी तिच्या प्राकृतिक मर्यादा आहेत. त्यामुळे बहुतेक पाश्चात्त्य तत्त्वज्ञ अखेरीस अज्ञेयवादाचा आश्रय घेतात. बुद्धीच्या पातळीपेक्षा वेगळा अनुभव जाणिवेत असला तरी त्या अनुभवाला दुय्यम स्थान देऊन तार्किक बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहण्याकडेच पाश्चात्त्य तत्त्वज्ञांचा कल असतो. भारतीय दार्शनिकांनी मात्र अनुभूतीपेक्षा दुय्यम स्थान तार्किक बुद्धीला दिले.

श्री अरविंदांचे बालपणापासून सर्व शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. भारतातील बुरसटलेल्या धार्मिक वातावरणापासून व परंपरांपासून त्यांना दूर ठेवण्याच्या उद्देशानेच त्यांच्या वडिलांनी त्यांची बालपणीच इंग्लंडला रवानगी केली व त्यांनी चुकूनही भारतीय संस्कृतीच्या संपर्कात येऊ नये याचीही दक्षता घेतली. त्यामुळे इंग्लंडच्या वास्तव्यात श्री अरविंदांनी केवळ पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, साहित्य व संस्कृतीचा अभ्यास केला. इंग्लंडमध्येच ते आय.सी.एस. ची परीक्षा इतर सर्व विषयांत उत्तीर्ण झाले, परंतु सरकारी नोकरीचा तिटकारा असल्यामुळे मुद्दाम ओशारोहणाच्या परीक्षेकडे फिरकले नाहीत. सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात देऊ केलेली नोकरी स्वीकारून श्री अरविंद तरुणपणी जेव्हा भारतात परतले तेव्हा भारताच्या किनाऱ्यावर त्यांना प्रथम एक विलक्षण आध्यात्मिक अनुभूती मिळाली. पुढे स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेत्यांच्या पंक्तीत त्यांना मानाचे स्थान मिळाले. काँग्रेसची सूत्रे जहालमतवादी गटाकडे खेचून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. एका बॉम्ब प्रकरणात अटक होऊन वर्षभर त्यांना तुरुंगवास घडला. त्या काळात त्यांना सातत्याने अनेक अध्यात्मिक अनुभव येत गेले व त्यांची योगसाधना अधिक वेगवान झाली. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी निवडक सहकाऱ्यांसह पांडिचेरी (पदुचेरी) येथेच कायमचे वास्तव्य केले व तीस वर्षांहन अधिक काळ त्यांनी तिथे एकांतात साधना केली.

पांडिचेरी येथील वास्तव्यात श्री अरविंदांनी स्थापन केलेल्या आश्रमाची सूत्रे त्यांच्या पट्टशिष्या मूळ फ्रेंच नागरिक असलेल्या माताजींनी सांभाळली. त्या आश्रमजीवनात त्यांनी शेती, उद्योग, शिक्षण, व्यायाम, संगीत व कलाक्षेत्रात विविध अभिनव प्रयोग केले. जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्यांनी आध्यात्मिक साधनेसाठी वर्ण्य वा त्याज्य मानले नाही. म्हणूनच या अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा आवाका प्रचंड मोठा वाटतो.

कोणत्याही संकुचित धर्म/संप्रदायवादी, वर्ण/जातिवादी, वंशवादी अथवा राष्ट्रवादी भूमिकेस त्यांच्या अध्यात्मात मुळीच स्थान नाही. तसेच एखादी विशिष्ट अनुभूती अंतिम सत्याचे स्थान घेऊ शकत नाही, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. महावीर, बुद्ध, कृष्ण, शंकराचार्य इत्यादी महामानवांच्या अनुभूती सत्यच आहेत, परंतु त्या सत्याचा एक-एक पैलू दर्शविणाऱ्या आहेत, समग्र सत्य नव्हे, असे श्री अरविदांचे प्रतिपादन दिसते. परमसत्याचे एक स्वरूप स्थिर, शांत, अविद्या, सर्वव्यापी ब्रह्मचेतनेचे आहे तर दुसरे स्वरूप अत्यंत गतिमान, क्रियाशील, आनंदमयी चेतनेचेही आहे. नीरव, निराकार, स्तब्ध शून्यवत् असेही परमसत्याचे आणखी एक रूप आहे. ज्याप्रमाणे पदार्थातील अणु हा स्थिर भासतो, परंतु प्रत्यक्षात प्रचंड गतिमान आहे, त्याप्रमाणे ध्यानावस्थेतील आमच्या जाणिवेला अस्तित्वाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर वैशिक सत्याची वेगवेगळी अनुभूती येऊ शकते. भौतिक पातळीपेक्षा अधिक उच्चस्तरांवर अस्तित्वात असलेल्या अतिचेतन पातळ्यांवरील दिव्य सामर्थ्यांना या भौतिक पातळीवर उतरून इथले जीवन अधिकाधिक ज्ञानमय, आलोकित व संपन्न घडवावयाचे आहे. भौतिक प्रकृतीचा एकूण प्रवासही त्याच दिशेने आहे. परंतु हा प्रवास जडातून, अवचेतनेतून, अज्ञानातून, अहंकारातून होत असल्यामुळे त्याची गती संथ व वेडीवाकडी वाटते. मानव हा भौतिक जगात परमात्म्याचाच सर्वाधिक सचेतन अंश असल्यामुळे जागरूकतेने व तळमळीने स्वत:मधील ईशत्व प्रगटवून मानव-उत्क्रांतीची ही गती वाढवू शकतो, हे श्री अरविंदांच्या योग-तत्त्वज्ञानाचे सार आहे. परंतु आमच्या प्राणिक/मानसिक इच्छा/वासना तृप्त व्हाव्या म्हणून दिव्य सामर्थ्यांची भक्ती करणे वेगळे आणि परमोच्च परमात्म्याने आमच्यात प्रगटून त्याच्या कार्याचे आम्ही स्वत:ला केवळ साधन/उपकरण होऊ देणे वेगळे! ही दुसऱ्या प्रकारची साधनाच अध्यात्मास अभिप्रेत आहे.
आमच्या भौतिक इच्छाआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कोण्या देवाच्या/समाधिस्थ संताच्या/गुरूच्या सामर्थ्यांची पूजा करतो व त्याविषयी भक्तिभाव बाळगतो. परंतु या भावनेतून/वासनेतून केलेली पूजा/भक्ती आध्यात्मिक साधनेचा हिस्सा होऊ शकत नाही. आमच्या प्रकृतीचे त्यामुळे उन्नत रूपांतरण होऊ शकत नाही; उलट आम्ही अधिकच दुर्बल व परावलंबी होतो. मात्र अंतरात्म्याचा शोध घेऊन त्याच्या हाती सूत्रे सोपविल्यास आमची स्वभाव-प्रकृती तर उन्नत, शांत, समंजस, शहाणी, ज्ञानी, सक्षम, प्रेळ व सामर्थ्यवान होतेच; शिवाय भोवतालच्या भागावरही त्याचे चांगले परिणाम होताना जाणवतात. म्हणून ही आध्यात्मिक साधना मानवाला दुर्बल अथवा परावलंबी करत नसून जगण्यासाठी अधिक सक्षम व स्वावलंबी बनविरो. खरा कर्मयोग आपल्या अंत:करणाच्याही मागे खोलवर दडून असलेल्या अंतरात्म्याचा जाणिवेच्या सहाय्याने शोध घेणे, त्या अंतरात्म्याने पृष्ठभागी येऊन आपल्या मन- बुद्धीचे, विचार, इच्छा, भावना, वासनांचे व अगदी शारीरिक हालचालींचे, कर्मांचे नियमन व नियंत्रण करावे यासाठी प्रयत्न करणे; त्या अंतरात्म्याच्या सहाय्याने विशरूप व विशातीत अशा परमात्म्याचे आवाहन करून त्याच्या उच्चतम पातळीवरील सामर्थ्याने, चैतन्याने, प्रकाशमय ज्ञानाने, शक्तीने, शांतीने व व्यापकतेने आमच्या व्यक्तिरूप अस्तित्वात अवतरून आमच्या वैयक्तिक जीवनाला अधिकाधिक उंच पातळीवर न्यावे व त्या परमात्म्याने आम्हाला त्याच्या वैशिक कार्याचे एक उपकरण बनवावे अशी तळमळ बाळगणे ही खऱ्या अर्थाने आध्यात्मिक साधना होय व हेच आमच्या जीवनाचे प्रयोजनही आहे, असा श्री अरविंदांच्या आध्यात्मिक मांडणीतील साधनाविषयक गाभा आहे. भारतीय अध्यात्माने ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग असे साधनेचे तीन मुख्य प्रकार मानले आहेत. श्री अरविंदांनी त्या तिन्ही पद्धतींना समान महत्त्व दिले असून प्रत्येक साधकाने स्वत:च्या जीवनात एकाच वेळी या तीनही प्रकारांनी साधना करावी, असे सुचविले आहे. विशात जे काही अस्तित्वात आहे, ते मूळ स्वरूपात एकच एक सर्वव्यापी, सर्व व सर्वशक्तिमान असे तत्त्व असून त्यास आत्मतत्त्व, परमात्मा, परब्रह्म इ. नावांनी संबोधिले आहे. त्याचे खेरीज इतर कशाचेही भिन्न स्वरूपात वेगळे अस्तित्व नाही, ही जाण बौद्धिक/मानसिक स्तरावर जरी साधक व्यक्तीमध्ये रुजली, तरी त्याच्यातील द्वेष, ईर्षा, मत्सर, कत्सितपणा, अहंभाव, तुच्छता, भेद-भाव, इ. विकार काही प्रमाणात कमी होण्याची सुरुवात होऊ शकते. तसेच माझ्या बुद्धीत/मनात अज्ञान ठासून भरलेले आहे, कारण माझ्या प्रकृतीची निर्मिती जडातून, अज्ञानातून, अंधकारातून झालेली असून मला वाटचाल मात्र चैतन्याकडे, ज्ञानाकडे व प्रकाशाकडे करावयाची आहे, याचे भान राखणे हाही ज्ञानयोगाचाच प्रकार आहे.

ज्ञान आणि माहिती यात महदंतर आहे. ऐकून, वाचून आम्हाला पुष्कळ गोष्टींची माहिती मिळते. परंतु ती माहिती केवळ बौद्धिक स्तरावर राहते. आमच्या जाणिवेने एखाद्या घटनेशी/व्यक्तीशी/वस्तूशी एकरूप होणे म्हणजे ज्ञान होय. केवळ माहितीने अथवा तार्किक अंदाजांनी अशी एकरूपता साधली जात नाही. जेव्हा एखाद्या विषयाबाबत आमच्या बुद्धीला, मनाला (अगदी अवचेतन मनाला देखील) कोणताही संशय रहात नाही, संपूर्णपणे नि:शंक अवस्था प्राप्त होते, तेव्हाच आम्हाला त्या विषयाचे ज्ञान झाले असे म्हणता येईल. अन्यथा आम्ही अज्ञानामध्ये चाचपडत ज्ञानेंद्रियांार्फत व तार्किकबद्धीच्या आधारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीची धडपड करीत राहतो. आमच्या जाणिवेला अधिकाधिक संवेदनशील, तरल, लवचीक, सूक्ष्म व व्यापक करण्याची साधना म्हणजे ज्ञानयोग होय.
जाणिवेचा ज्ञानाच्या दिशेने हा प्रवास मी माझ्या सध्याच्या सामर्थ्यावर करू शकत नाही, त्या वाटचालीसाठी परमात्म्याने मला सहाय्य करावे म्हणून जी उत्कट विनवणी करू, ती भक्ती होय! अंतरात्मा जागृत होऊन त्याने आमच्या व्यक्तित्वाच्या समोरील भागाकडे येणे (किंवा आमच्या जाणिवेने खोलवर अंतरात्म्याच्या दिशेने जात राहणे) वाढत गेल्यास भक्तीची शुद्धता व तीव्रताही वाढत जाते. परमात्म्याचा स्व-भाव आनंदरवरूप असल्यामुळे उत्कट भक्ती ही तुकाराग महाराज म्हणतात तसा,
‘आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
प्रत्यक्ष प्रत्ययही देऊ शकते.

‘कर्मयोग’ हा शब्दप्रयोग भारतीय तत्त्वज्ञानात दोन वेगवेगळ्या अर्थांनी केला जातो. विशिष्ट देवतेला/देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी जे यज्ञयाग,होहवन, पूजाविधी केले जातात, त्या मार्गांचा अवलंब आध्यात्मिक साधनेसाठी करणे याला ‘कर्म गर्ग’ अथवा ‘कर्मयोग’ असे एका अर्थाने म्हटले जाते. परंतु श्री अरविंदांना हा अर्थ अभिप्रेत नाही. गीतेत श्रीकृष्णाने ‘कर्म’ हा शब्द व्यापक अर्थाने उपयोजिला आहे. फळाची लालसा न बाळगता कर्म करण्याचा जो संदेश श्रीकृष्णाने दिला, तो सर्व प्रकारच्या व्यावहारिक कर्मांच्या/कामांच्या/क्रियांच्या संदर्भात होता. तमोगुणाच्या/आळसाच्या आहारी जाऊन कोणतेच कर्म न करण्याच्या वृत्तीचा जसा गीता निषेध करते, तसाच भौतिक इच्छा/वासनांच्या पूर्तीची लालसा ठेवून रजोगुणाने प्रेरित कर्म-वृत्तीचाही ती धिक्कार करते. समाजात/कुटुंबात परंपरेने तुच्या वाट्याला आलेले अथवा तुम्ही जागरूकपणे स्वतः निवडलेले कोणतेही कर्म करत रहा, ते कर्म अधिकाधिक चांगले व ने के करण्यासाठी प्रयत्नरत रहा, परंतु त्याचे फळ तुम्हाला मिळालेच पाहिजे असा आग्रह राखू नका. कारण प्रत्येक कर्माचे फळ तु च्या हाती नसते. लाभ-हानी, जय-पराजय या बाबतीत समत्व बुद्धी बाळगणे हे सत्त्वगुणाचे एक लक्षण आहे. या सत्त्वगुणाची वृद्धी व्यक्तीमध्ये होत गेल्यास त्याला गुणातीत असलेल्या परमात्म्याप्रत पोचणे तामसी अथवा रजोगुणी व्यक्तींच्या तुलनेने अधिक सुलभ ठरते. म्हणून निष्काम कर्मयोगाची शिकवण श्रीकृष्ण देतो.

माझ्या स्वत:चा अनेक वर्षांपासून वकिली व्यवसायाचा पेशा आहे. निष्काम कर्मयोगाच्या साधनेसाठी वकिली हे उत्तम क्षेत्र मला वाटते. आपल्या अशीलाची बाजू आपण आपल्या कुवतीनुसार शक्य तितक्या उत्तम प्रकारे लढवावी, आणि निकाल बाजूने लागो वा विरुद्ध लागो, त्याची चिंता करू नये. कारण तो निकाल केवळ वकिलाच्या कौशल्यावर अवलंबून नसतो. दोन्ही बाजूंची तथ्ये, उपलब्ध पुरावे, प्रचलित कायदा व न्यायाधीशाची समज असे अनेक घटक निकालास प्रभावित करतात. शिवाय जिंकणारा किंवा हारणारा पक्षकारच असतो, वकील नव्हे! वकिलाला त्याची फीसुद्धा आधीच मिळालेली असते. ती फी निकालावर अवलंबून नसते. त्यामुळे फळाची आशा न बाळगता अधिकाधिक चांगल्या प्रकारे कर्म करत राहण्यासाठी या व्यवसायाचे क्षेत्र उत्तम वाटते. अर्थात सर्व प्रकारच्या नोकरदार वर्गाला (वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून चपराशापर्यंत) शिक्षक, डॉक्टर, आर्किटेक्ट इ. व्यावसायिक सेवा पुरविणाऱ्या वर्गांना आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना देखील निष्काम कर्मयोगासाठी सुलभ क्षेत्र याच कारणांळे उपलब्ध असते.

परंतु याच्या एक पाऊल पुढे जाऊन श्री अरविंद म्हणतात की कौटुंबिक/ सामाजिक परंपरांमुळे अथवा माझ्या स्वभावप्रकृतीला आवडते असलेले कर्म तर मी करत असतोच; परंतु आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात एक टप्पा असाही आला पाहिजे की मी कोणते कर्म करावे, याबाबतचे मार्गदर्शन मला सामाजिक परंपरा, बौद्धिक माहिती अथवा माझ्या स्वभाव-प्रकृतीच्या आवडीतून न होता, परमात्म्याच्या उच्चतम पातळीवरील चेतनेकडून माझ्या अंतरात्म्याने ग्रहण केलेल्या स्पंदनांद्वारे होत रहावे, मग ते कर्म भलेही परंपराविरोधी अथवा माझ्या स्वत:च्या स्वभाव/प्रकृतीविरोधी असो! हा खरा कर्मयोग होय.

(समाप्त)

१२, विनोद, स्टेट बँक कॉलोनी, कॅम्प, अमरावती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.