डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा आणि माझा परिचय साधारणपणे १९९४-९५ च्या दरम्यान झाला. आम्ही सारे त्यांना डॉ. दाभोलकर वा नुसते डॉक्टर म्हणत असू पण त्यांच्या पुस्तकांवर दाभोलकर असे लिहिले जाते. त्यावेळी वास्तुशास्त्रावर दादरला एक सभा होती. एक वास्तुशास्त्रावर बोलणारे वकील, एक प्रतिवाद करणारे आर्किटेक्ट, दाभोलकर आणि अध्यक्ष एक निवृत्त न्यायमूर्ती अशी ती सभा होती. दाभोलकरांचे भाषण विनोदी आणि वास्तुशास्त्राची खिल्ली उडवणारे होते. मुद्दे इतके बिनतोड होते की प्रतिवाद करण्याची संधी मिळूनही वकील महाशयांना फारसे काही बोलता आले नाही.
ह्याच दरम्यान माझा ‘आजचा सुधारक’शी परिचय झाला. दि.य.देशपांड्यांनी ‘आजचा सुधारक’ हे मासिक त्यावेळी जवळपास एकहाती चालवले होते. ‘आजचा सुधारक’ हा १९९० साली सुरू झाला आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ची स्थापनाही त्याच वेळची. सुधारक हा देव-धर्म ह्या अंधश्रद्धा आहेत असे सांगणारा तर अंनिस हे या दोन बाबतींत तटस्थ असणारे, असे स्वरूप आहे. दि.य.देशपांड्यांचा ‘आजचा सुधारक’ विशुद्ध विवेकवादाची पाठराखण करत असल्याने त्याच्या तात्त्विक बैठकीत उणिवा नव्हत्या. याशिवाय उत्तम तत्त्वज्ञ असलेले संपादक हे या विषयावर मुद्देसूदपणे लिहीत असत. पहिल्या काही वर्षांत सुधारक आणि दाभोलकर यांच्यात याबाबतीत संवाद झाला होता. त्यात देव-धर्माबद्दल तटस्थता बाळगू नये असा एक सल्ला दियदेंनी दिला होता. असेच काहीसे म्हणणे डॉक्टरांचे मित्र श्रीराम लागू यांचेही होते. पण अंनिस चळवळीने ही भूमिका स्वीकारली नव्हती.
डॉक्टरांची तटस्थतेची भूमिकाही अशीच समावेशकतेतून आली होती. याची कारणे कदाचित त्यांच्या कुटुंबात असतील आणि तो त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा एक भाग असेल. डॉक्टर हे त्यांच्या मोठ्या कुटुंबातील सर्वांत धाकटे अपत्य. वडील सुशिक्षित धार्मिक, सातारचे नामांकित वकील तर आई अर्धशिक्षित पण निधार्मिक. आईचा जन्म १९००-१९१० दरम्यानचा असावा. आईने मंगळसूत्र घातले नाही, कुंकू लावले नाही, आणि मृत्यूनंतर आपले शरीर दान केले होते. सत्यनारायण, हळदीकुंकू असे प्रकार घरी होत नसत. त्याचवेळी वडील दत्तभक्त, रोज दत्तमंदिरास भेट, वार्षिक गाणगापुरास जाणे, गुरुचरित्राचे पारायण असा शिरस्ता. मुलांची नावेही देवदत्त, दत्तप्रसाद अशी. पण दोघांचे एकमेकांशी उत्तम जमायचे. डॉक्टरांची सर्वसमावेशकतेची ही कौटुंबिक पोर्श्वभूमी. तर त्यांचा तरुणपणापासून समाजवादाकडे ओढा होता. त्यातही गांधींच्या संघटनात्मक कार्याबद्दल तसेच त्यांच्या तळागाळातील लोकांबद्दलच्या आत्मीयतेबद्दल डॉक्टरांना अतीव आदर वाटत असे. या दोन्ही आदरांतून त्यांनी त्याच्या चळवळीचे स्वरूप साकारले असावे.
डॉक्टर हे तत्त्वज्ञ नव्हते. त्यामुळे त्यांनी विवेकवादाची वा चळवळीची तात्त्विक बैठक मांडलेली दिसत नाही. पण ते एक उत्तम विचारवंत होते. त्यांचे वाचन आणि ज्ञान या दोन्ही बाबतींत विवेकवादी चळवळीत ते एकमेवाद्वितीय असावे. एक विचारवंत म्हणून चळवळीला त्यांचे हे योगदान सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी त्यांनी मांडलेल्या श्रद्धा-अंधश्रद्धा या पुस्तकाचा खूप उपयोग होतो. त्यांची विचार मांडायची एक हातोटी होती. सर्वसामान्यांच्या भावना दुखावतील असे काही त्यात नसावे असा त्यांचा कटाक्ष असे.
खरे तर अंधश्रद्धा आणि त्यांचे निर्मूलन या दोन्ही शब्दांत सश्रद्ध माणसाला मनाला लागण्यासारखे बरेच आहे. ‘अंधश्रद्धा म्हणजे दुसऱ्याची, श्रद्धा ती माझी’ अशी एक अंधश्रद्धेची काहीशी विनोदी पण कदाचित सयुक्तिक व्याख्या आहे. आपण ज्यावेळी एखाद्याची अंधश्रद्धा दूर करीत असतो त्यावेळी त्याच्या श्रद्धेलाच हात घालीत असतो. तेव्हा चळवळीला विरोध होणे साहजिक आहे. पण हा विरोध चळवळीची व्यापक भूमिका समजल्यावर मावळू शकतो. याचे कारण चळवळीचा मुख्य रोख हा पिळवणूक घडवणाऱ्या अंधश्रद्धांबाबत आहे. त्यातही यातून फायदा उकळणाऱ्या काहीश्या संघटित व्यक्तींविरुद्ध आहे. या संघटितांकडून फसवल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध नाही. यामुळे सश्रद्ध व्यक्तींच्या वैयक्तिक बाबींत ढवळाढवळ करण्यात समितीस काहीही रस नसतो. आणि खऱ्या अर्थाने बहुतांशाने देव आणि धर्म यांतील श्रद्धांबाबत समिती काहीच भूमिका घेत नाही. इतकेच काय तर समितीचा कार्यकर्ता याबाबत सश्रद्ध असला तरी त्यास इतर कार्यकर्त्यांनी टोकू नये अशी अपेक्षा असते.
चळवळीची ही नेमकी दिशा दाभोलकरांनी निश्चित केली. एक विचारवंत म्हणून त्यांचे हे योगदान फार महत्त्वाचे आहे. ही दिशा समजावण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. ज्यांना ती समजली त्यांनी या चळवळीस पाठिंबा दिला. मात्र ही चळवळ अशी नाही. ती देवाधर्माविरोधी आहे. तिच्यात सामील व्हाल तर तुम्हाला नास्तिक व्हावे लागेल. अशा प्रकारचा प्रचार संघटितरीत्या केला जातो. कदाचित याच प्रकारच्या प्रचारातून दाभोलकरांची हत्या झाली असावी. चमत्कार करून लोकांना नादी लावणे आणि त्यातून माया जमा करणे हा भारतातील तथाकथित साध्हात्म्यांचा नेहमीचा शिरस्ता. यास कदाचित प्रथम आह्वान दिले ते डॉ. कोवांनी. त्यांनी दिलेल्या आह्वानांच्या कहाण्या साठ आणि सत्तरच्या दशकात गाजल्या. बी.प्रेमानंदांनी यातून प्रेरणा घेऊन चमत्कार कसे केले जातात यावरची प्रात्यक्षिके दाखवण्याचा सपाटा लावला. त्यांनी भारतभर दौरे केले. महाराष्ट्राचा दौरा १९८३ मध्ये केला होता. त्यास भरपूर प्रतिसाद मिळाला. यातून पहिल्यांदा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८५ साली अस्तित्वात आली. डॉक्टर या उपक्रमात हिरिरीने सामील झाले. पुढे काही कारणास्तव त्यांना ही समिती सोडावी लागली आणि महाराष्ट्र अंनिसची (१९८९) स्थापना झाली. अंनिसचा (दोन्ही) एक मुख्य गाभा म्हणजे चमत्कारांचे सादरीकरण करणे, त्या चमत्कारांची उकल करणे आणि त्या अनुषंगाने बळी पडू नका असे सांगणे. असे प्रयोग करणारे १९८३ साली एकटे प्रेमानंद होते. आता चळवळीतील शंभराच्या आसपास (हा आकडा अंदाजाने दिला गेला आहे). वर्षाला हजारो प्रयोग केले जातात. जादूच्या प्रयोगासारखे असल्याने या प्रयोगांना मागणी चांगली असते. यासोबत भांडाफोड करून चमत्काराचा दावा करणाऱ्यांविरुद्ध मोहिमा रचल्या जातात. चमत्काराचा दावा करणाऱ्यांना सिद्ध करून दाखवा आणि २१ लाख मिळवा असे आह्वान दिले जाते. हे कार्यक्रम कोवूर आणि प्रेमानंदांपासून आलेले. त्यात डॉक्टरांनी मोठी भर टाकली.
कार्यकर्त्यांसाठी शिबिरे, नियमित प्रसिद्ध होणारे वार्तापत्र, विविध शैक्षणिक उपक्रम, विविध सणांतून होणारी हानी टाळण्याचे उपक्रम (फटाकेमुक्त दिवाळी, विसर्जित गणपती दान, होळीची पोळी दान करा इत्यादी.) याशिवाय प्रासंगिक चळवळी हा महाराष्ट्र अंनिसचा पुढचा गाभा होतो. सर्व महाराष्ट्रात व्याख्याने देऊन त्याद्वारे शाखा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्याला चांगलेच यश येऊन सध्या २००च्या वर शाखा आहेत. कार्यकर्त्यांसमोरचे दाभोलकर हे सभा-लेखांतून दिसणाऱ्या दाभोलकरांपेक्षा मला जास्त भावले. अतिशय साधेपणा आणि भरपूर मेहनत घेणारे दाभोलकर त्यातून मला दिसले. अंनिसची शिबिरे काटकसरीची आणि स्वयंचलित अशी असतात. त्यांची भाषणे मोठी असत, पण त्यानंतर ते थकलेले दिसत नसत.
सकाळी लवकर उठून व्यायाम करीत असत. प्रवास साध्या एस.टी.ने, तरी प्रवासाची, दगदग, भाषणांचा ताण, रात्रीची थोडीफार जागरणे यातून त्यांनी स्वत:ला उत्तमरीत्या सांभाळले होते. त्यांचे वजन ६१च्या वर खाली अर्धा किलो एवढेच बदलायचे.
दाभोलकरांचे विरोधक आणि त्यातून झालेली त्यांची हत्या महाराष्ट्रात बहुतेकांसाठी काळजाला धक्का लावणारी घटना होती. इतर विवेकवादी चळवळीतून त्यांना विरोध असे, परंतु तो वेगवेगळ्या कारणाने. अ.भा.अंनिस आणि त्यांच्यातील संघर्ष सुरुवातीच्या काळात होता. हा संघर्ष काहीसा अनाकलनीय होता. ‘स्वसोहन’ शिकविण्यावर आक्षेप असल्याने दुसऱ्या अंनिसमध्ये सहभागी व्हायचे नव्हते. पण याव्यतिरिक्त दोन अंनिसच्या कार्यपद्धती सारख्या होत्या. याचप्रमाणे अंनिस मर्यादशील वागते, कित्येक आक्षेपार्ह गोष्टींवर आक्षेप घेत नाही असा आरोप त्यांच्यावर व्हायचा हा ही एक प्रकारचा विरोधच.
जातीच्या पुरस्कर्त्यांकडून आलेला आणखी एक टीकेचा मुद्दा म्हणजे, महाराष्ट्रातील स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या काही चळवळी ब्राह्मणद्वेषातून आल्या आहेत. त्यांचा ब्राह्मणद्वेष सहज समजता येण्यासारखा आहे. ब्राह्मणप्रोहितवर्ग हा हिंदू धर्मातील अंधश्रद्धा जपून/स्वत:ची पोळी भाजून घेत असे. त्यांनी आपल्याला मागास ठेवले. म्हणून हिंदू परंपरा झुकारून देताना या वर्गावर कठोर प्रहार करणे साहजिकरीत्या योग्य ठरते. या चळवळींची अशीही एक धारणा असावी की ब्राह्मण एवढे कावेबाज आहेत की त्यांनी पुरोगामी चळवळीतही शिरकाव केला आहे. त्यांचा मूळ उद्देश मात्र या चळवळीतून लोकांना दूर नेणे आहे पण कावा करून तसे ते दाखवत नाहीत.
एकदा मनुष्य कटकारस्थानाच्या सिद्धान्तात अडकला की त्याच्या जंजाळातून बाहेर पडणे अशक्य असते. ही कटकारस्थान सिद्धान्तवाली मंडळी मग ज्या त्या गोष्टीत कावाच बघतात. बुशने अफगाणिस्तान-इराकवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेच्या दोन इमारती पाडल्या, इंदिरा गांधीने डोईजड मुलाला मारले, मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांनी दंगल घडवली इत्यादी कटवादी सिद्धान्त या प्रकारचे. या एक प्रकारच्या अंधश्रद्धा मानल्या पाहिजेत. निदान पुरावा मिळेस्तोवर. मात्र दाभोलकरांना या ब्राह्मणी कटाचे पुरस्कर्ते मानणे हास्यास्पद वाटते. तरीदेखील, या प्रकारचा विरोध चांगले विचारवंत विशेषतः शिवधर्म प्रस्कर्ते यांच्या भाषणात/लिखित स्वरूपात व्यक्त झालेला दिसतो.
या ब्राह्मणद्वेषी वर्गातून चळवळीस झालेल्या विरोधातील काही तथ्ये येथेमांडणे योग्य ठरेल. हिंदू संस्कृतीच्या इतिहासात उच्चवर्णीयांनी केलेली दुष्कृत्ये आहेत. त्यांत शंबूकाचा वध करणारा राम सहभागी आहे, चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारा श्रीकृष्ण आहे, ब्राह्मण मुखातून तर शूद्र पायातून जन्मले असे सांगणारा वेदही आहे. या मोठ्या प्रतीकांवर घणाघाती हल्ले करणे हे विशुद्ध विवेकवाद्यांना सहज जमते. पण दाभोलकरांसारख्या मर्यादशील विवेकवाद्यास हे करणे सहज नव्हते. त्यांचा या प्रतीकांना जाहीर विरोध नव्हता असे नाही. ते म्हणत, “धर्माची चिकित्सा करणे गरजेचे आहे आणि ही चिकित्सा करताना रामाची, कृष्णाची वा वेदांचीही जी बाजू न पटणारी आहे तेवढ्याचा त्याग केला पाहिजे.” दाभोलकरांची ही बाजू समजून घेतल्यास ते संत परंपरेच्या आणि धार्मिक सुधारण्यावाद्यांच्या जास्त जवळ असल्याचे लक्षात येते. आक्षेपार्ह तेवढे बाजूला काढा; सगळेच बाजूला काढायची गरज नाही हे या दोन गटांचे म्हणणे. या दोन्ही गटांना समाजाकडून विद्रोही गटांपेक्षा जास्त पाठिंबा मिळतो.
कम्युनिस्टांचे विवेकी विचाराचे एक थोडेसे वेगळे तत्त्वज्ञान आहे. मुख्य धर्मपरंपरा आणि जनधर्मपरंपरा असा एक संघर्ष असतो. लोकायत म्हणजे जनधर्मपरंपरेतील एक भाग. त्यात जारण-मारण इत्यादींचा समावेश करता येतो. (स.मा.गर्गे यांचे लोकायतावरील विवेचन) या धर्मपरंपरेत पुरोहितवर्गाचे वर्चस्व नसल्याने ती मुख्य धर्मप्रकारापेक्षा जास्त पुरोगामी आहे असे काहीसे हे तत्त्वज्ञान आहे. याउलट जादूटोणा आणि अघोरी प्रथा या अंधश्रद्धा निर्मूलनात पहिल्या क्रमांकाच्या अंधश्रद्धा ठरवल्या गेल्या आहेत. या दोन्हीतील विरोध त्यामुळे स्पष्ट होतो.
परंपरावादी विचारसरणीच्या लोकांना दाभोलकर न पचणे साहजिक आहे. दाभोलकर आपला धर्म बुडवायला निघाले आहेत. त्यांच्या नादी लागू नका असे सांगणारे हे लोक. या लोकांत प्रामुख्याने दोन गट आहेत. एक सनातनवादी तर दुसरा विहिंप व त्याचा गोतावळा. यातील सनातनवादी लोकांनी दाभोलकरांविरुद्ध सर्वांत जास्त विखारी प्रचार केला होता.
धार्मिकातील उदारमतवादी असा आक्षेप घेत, की दाभोलकर फक्त हिंदू धर्माविरुद्ध बोलतात; इतर धर्मीयांबद्दल फारसे बोलत नाहीत. या आक्षेपातून असे ध्वनित होते की हिंदूंना दुसऱ्या धर्मात ढकलण्याची ही एक चाल आहे. अर्थात अंनिसच्या इतर धर्मीयांच्याबाबतच्या कार्यक्रमाकडे पाहिले तर या आरोपात तथ्य नसल्याचे जाणवते. जगातील जवळपास सर्व विवेकी विचारवंतांनी आपापल्या धर्माबाबतच अधिक विवेचन केलेले आढळते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत हिंदुधर्मीय बहसंख्येने असल्यामुळे तिचा कल तिकडे जास्त असणे स्वाभाविक आहे. दाभोलकरांची हत्या त्यांच्या विरोधकाकडून झाली असणार. अंनिसमध्ये राहून अंनिसच्या चळवळीच्या ताकदीची मर्यादाच जास्त प्रमाणात जाणवत असे. निवडणुकीच्या राजकारणात नसताना कायद्यासाठी दबाव गट म्हणून प्रयत्न करणे हे कदाचित समितीच्या ताकदीबाहेरचे होते. केवळ मतपरिवर्तनातून हा कायदा होऊ शकेल अशी कार्यकर्त्यांची भावना, तर राजकारण्यांना, त्याने किती मतांचा फरक पडेल ह्यात स्वारस्य. या दोन्हींत प्रचंड तफावत होती.
आपल्या समाजात काही दाभोलकरांपेक्षाही कट्टर असे अंधश्रद्धाविरोधक आहेत. पण दाभोलकरांचे विरोधक त्यांच्या वाटेला गेले नाहीत. यामागे कुठेतरी दाभोलकरांची सौम्य पण मनापासून बदल घडवून आणण्याची त्यांची हातोटी असावी असे वाटते. ‘विचार तर कराल’ हे दाभोलकरांचे एक पुस्तक. कृती केली नाहीत तरी हरकत नाही पण विचार करून बघा तुम्हाला आमचे म्हणणे पटेल. विचार करण्यास प्रवृत्त करणे हीच त्यांची ताकद होती. आणि तीच विरोधकांच्या वर्मी लागली असणार.
बी ४/११०१ विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कम्पाउंड, ठाणे(प.)-४००६०१.