कोणत्याही प्रकारच्या सामाजिक परिस्थितीत असलेले सत्ताकारणाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अस्तित्व बाल-लैंगिक अत्याचारास पूरक ठरू शकते. सध्या घडत असलेल्या आणि समोर येत असलेल्या बाल-लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्यासाठी नवीन नाहीत. त्या आपल्यासाठी नवीन नाहीत, हे मी दोन अर्थांनी म्हणते. एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर हा विषय ‘न बोलण्याचा’ मानला जात असला तरी गेल्या काही वर्षांत हळूहळू या घटना पुढे येऊ लागल्या आहेत, आपल्यापर्यंत पोहचू लागल्या आहेत, हे नक्की. दुसरे म्हणजे, आपल्यापैकी बहुतेकांनी या ना त्या प्रकारे बाल-लैंगिक अत्याचाराचा अनुभव घेतला आहे. त्याअर्थीही हा विषय आपल्याला परिचयाचा आहे.
बाल-लैंगिक अत्याचारांच्या घटनांची आकडेवारी, विभागणी, कायदे, आवश्यक त्या उपाययोजना हे आणि इतरही बरेच मुद्दे विस्तृतपणे चर्चा व्हावी असेच आहेत. त्याचबरोबर बाल-लैंगिक अत्याचारांच्या घटनांना आणि त्याला कारणीभूत ठरणाऱ्या मानसिकतेला पूरक ठरणारे किंवा ठरू शकणारे काही सामाजिक पैलूही अभ्यासले जाणे आवश्यक आहे. त्यातील काहींचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न. कुठल्याही प्रश्नाशी निगडित सामाजिक पैलूंचा विचार करताना विविध पातळ्यांवर आढळून येणारे सत्तासंबंध लक्षात घेणे गरजेचे ठरते. बाल-लैंगिक अत्याचाराच्या बाबतीतसुद्धा सत्तासंबंधांचा आणि सत्ताकारणाचा संबंध हा व्यक्तींच्या मानसिकतेशी आणि त्या त्या वेळच्या परिस्थितीशी जोडलेला असतो. हे सत्तासंघर्ष ज्या सामाजिक संदर्भात आढळून येतात, त्यांची ढोबळ वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येईल: १) संस्कृती २) जातिव्यवस्था ३) वर्गव्यवस्था ४) लिंगभाव
भारतीय समाजव्यवस्थेत या गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आढळून येतात. त्यामुळेच त्यातून डोकावणारे सत्ताकारण आणि बाल-लैंगिक अत्याचाराला पूरक ठरणारे वा ठरू शकणारे घटक यांचा अभ्यास गरजेचा आहे.
१) संस्कृती: संस्कृतीचा अर्थ जर ढोबळमानाने पिढ्यानुपिढ्या होणारे संस्कार, कुटुंबव्यवस्था, नातेसंबंधांचे (विशेषतः भारतीयांच्या जीवनातील) स्थान, कुटुंबाची अब्रू, धर्माचा पगडा इ. प्रकारे लक्षात घेतला तर अनेक घटक बाल-लैंगिक अत्याचारासाठी पूरक ठरू शकतात असे ध्यानात येते. वयाने मोठ्या माणसांना उलटून बोलू नये, हा आपल्या संस्कारांचा पहिला कित्ता असतो, तो वारंवार गिरवला जातो. उलटून न बोलणे, मोठ्यांच्या कुठल्याही प्रश्नाकरता ‘मी मोठा/मोठी आहे म्हणून’ हे उत्तर तयार असणे, मोठ्यांनी केलेल्या कृतीची कारणमीमांसा न होणे, मोठ्यांनी केलेली कृती ही आपल्या भल्यासाठीच असते ही धारणा असणे या आणि अश्या कित्येक गोष्टी वयाने मोठ्या असणाऱ्यांचे स्थान बळकट तर करतातच पण त्याचबरोबर त्यांच्या मोठ्या वयाकडे आपसूकच चालत आलेले अनेक (गैर)फायदेही त्यांना देऊ करतात. यामुळे अत्याचाराच्या घटनांध्ये बऱ्याचदा बालक अत्याचारी व्यक्तीच्या वयामुळे दबून जाते व प्रतिकार वा विरोध करताना गोंधळूनही जाते. ज्या घटनांध्ये अत्याचारी व्यक्ती कुटुंबातीलच एक असते तेव्हा तर मूल अजूनच अडचणीत सापडते कारण आपल्या कुटुंबव्यवस्थेत घरातील व्यक्तींचे आणि विशेषतः ज्येष्ठांचे स्थान फार महत्त्वाचे असते. या नातेसंबंध व ज्येष्ठत्वाच्या दडपणाखाली कित्येकदा बालकाचे पालकही सर्व काही ठाऊक असून गप्प बसतात. अनेकदा याप्रकारचे दडपण कुटुंबाच्या पोशिंद्याला ‘तळे राखील तो पाणी चाखील’ असे मोकाट स्वातंत्र्य पुरवते. अत्याचाराची घटना घरात घडत असो वा घराबाहेर, त्याबद्दल बोलले गेले तर कुटुंबाचीच अब्रू धुळीला मिळेल या भीतीतून या घटना दाबल्या जातात. सारेच जण हे ‘चांगल्या घराण्यातील’ असल्याने मुलांवरही आपोआप ‘घराण्याची अब्रू’ जपायचे बंधन येते. केवळ भारतीयच नाही तर कुठल्याही समाजव्यवस्थेवर असणारा धर्माचा पगडा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठलाही धर्म ‘दमन’ शिकवत नसला तरीही धार्मिक अधिष्ठान देऊन प्रचलित केल्या गेलेल्या अनेक गोष्टी सत्ताकारणाच्या सोईसाठी केल्या जातात ही गोष्ट नाकारता येत नाही. धर्मगुरूंना विरोध न करणे, एखाद्या कृतीमुळे देवाचा कोप, धार्मिक अधिष्ठान देऊन खालच्या पातळीवर ठेवलेले स्त्रियांचे स्थान इ. गोष्टी कुणा एकाचे स्थान बळकट व्हावे यासाठी तयार केल्या जातात. कुठलीही गोष्ट प्रश्नांकित करता येण्याजोगी असली तरी तिला धार्मिक अधिष्ठान असेल तर त्याबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत. ही शिकवण लहानपणापासूनच मनावर बिंबवली जात असते. याचेच पर्यवसान काही प्रमाणात, प्रश्नच न विचारणे, तशी गरजच न भासणे, आहे ते चालवून घेणे या प्रकारच्या मानसिकतेत होते. या मानसिकतेचा, तथाकथित धार्मिक कल्पनांचा वापर करून बालकांचे लैंगिक शोषण करणारे कमी नाहीत.
२) जातिव्यवस्थाः आपल्या देशातील जातिव्यवस्थेचे राजकारण आणि सत्ताकारण याबद्दल चर्चेची वेगळी आवश्यकता नाही; परंतु बाल-लैंगिकअत्याचारासंदर्भात जातिव्यवस्थेतील सत्तासंघर्ष ठळकपणे दिसून येतात. तथाकथित उच्चजातीयांना जे विशेष अधिकार मिळत गेले त्यातून इतर जातींवर मालकी हक्क गाजवण्याचा परवानाही मिळाला असे म्हणण्यास हरकत नाही. कनिष्ठजातीय हे कायमच उच्चजातीयांच्या विविध गरजा पुरवण्याचे हक्काचे साधन होते आणि आजही हे चित्र मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या गरजा घरातील शौचालय स्वच्छ करणे, गावातील घाण साफ करणे इथपासून ते उच्चजातीय पुरुषांच्या लैंगिक गरजा पूर्ण करणे इथपर्यंत असतात. आजही अनेक गावांतून कनिष्ठ जातीतील मुली-स्त्रियांना उच्चजातीयांकडे ‘लावून देणे’ सर्रास घडते. भारतात आजही काही गावांध्ये पायांत चपला फक्त उच्चजातीयच घालतात. एखाद्या कनिष्ठजातीयाच्या घराबाहेर चपला काढलेल्या दिसल्या की घरमालकही आत जात नाही; कारण त्यावेळी कुणी उच्चजातीय पुरुष त्या घरातील मुलगी, स्त्री यांच्याशी संबंध ठेवायला आलेला असतो. कायमच मालकी हक्क गाजवण्याची सवय लागलेल्या उच्चजातीयांना ‘खालच्या’ जातीतील लोक पुढे गेलेले सहन होत नाही. अहंकाराला धक्का लागला की ते त्यांच्यापेक्षा कनिष्ठ जातीयांना आपली ‘जागा’ सोडल्याची जाणीव करून देतात. यात जसे त्यांना मारणे, घर जाळणे, उकळत्या तेलात हात बुडवणे यांचा समावेश होतो, त्याचप्रमाणे त्यांच्यावर बलात्कार करणे, मुली व स्त्रियांची नग्न धिंड काढणे हेदेखील हुकमी अस्त्र म्हणून वापरले जाते. यामध्ये अल्पवयीन मुलींबरोबरच मुलग्यांवरही लैंगिक अत्याचार होतात. जातींमधील सत्तासंघर्षांचे भयानक रूप लहान वयातच या बालकांसमोर येते. त्यातून उच्चजातीयांचे हे हक्कच आहेत आणि कनिष्ठजातीयाने ते चालवून घ्यायचेच असतात ही मानसिकता दोन्ही गटांतील बालकांध्ये तयार होऊ शकते. अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवलाच तर ‘उच्चजातीय पुरुष असे कृत्य करणारच नाही’ किंवा ‘उच्चजातीयांचा तो अधिकारच आहे’ असे निवाडे देणाऱ्या पंचायतीही आपल्या देशात आहेत. यामध्ये जशी दमन करण्याची वृत्ती तयार होते तशीच सूडबुद्धीही तयार होऊ शकते, तेही तेवढेच घातक आहे.
३) वर्गव्यवस्थाः वर्गव्यवस्थेतील सत्तासंघर्ष हे बाल-लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात फार ठळकपणे दिसून येत नसले तरी वर्गांधील वाढत्या दरीमुळे बालकांची वाढती तस्करी आणि शरीरविक्रय हा फार गंभीर प्रश्न निर्माण होतो. प्रचंड गरिबीमुळे आईवडीलच मुलांची विक्री करतात. यातील बहुसंख्य मुले वेश्याव्यवसायात ढकलली जातात. वयाने लहान आणि कुमारिका मुलींना प्रचंड मागणी असते. घरकाम करणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणावर पण छुप्या पद्धतीने चालते. या मुलींचे पगार त्यांच्या कुटुंबाकडे दूर कुठल्या गावी पाठवले जातात आणि त्याबदल्यात या मुली वेठबिगारासारखे काम करतात. त्यांच्या गरिबीचा आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांना छुप्या मार्गांनी वेश्याव्यवसायात ढकलले जाते. अर्थात केवळ गरीब घरांधूनच बालकांवर लैंगिक अत्याचार होतात असे नाही. उच्चवर्गीयांध्येही हे प्रमाण मोठे आहे. अनेकदा आर्थिक सुबत्ता व प्रतिष्ठा असणाऱ्या घरांधून बालकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आईवडील आवाज उठवत नाहीत; कारण अत्याचारी व्यक्तीचा घरातील आर्थिक हातभार मोठा असतो. अशा वेळी त्या व्यक्तीला विरोध केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसण्याची भीती असते.
४) लिंगभावः लिंगभावाशी निगडित कल्पनां ध्ये सत्तासंघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि उघडपणे दिसून येतात. हे सत्तासंघर्ष आणि संबंध गुंतागुंतीचे असतात. यांचे उगमस्थान म्हणजे पितृसत्ता, असे माझे मत आहे. याचे ढोबळ रूप म्हणजे पुरुषाला मिळणारे विशेष अधिकार, त्याचे बळकट सत्तास्थान आणि त्या स्थानाला धक्का लागू नये यासाठी स्त्रीला दिलेले दुय्यम स्थान. याचा खोलात शिरून विचार केला तर अनेक पैलू लक्षात येतात. पितृसत्तेध्ये अनेक मूल्ये आपण बौद्धिक, मानसिक आणि व्यावहारिक पातळीवर अंगीकारत असतो; ती बाल-लैंगिक अत्याचाराला पूरक ठरत असतात. उदाहरणादाखल बोलायचे तर, स्त्रियांनी सहनशील असावे, लज्जा हा स्त्रीचा अलंकार असतो, मुली-बाळींनी आपल्या इच्छा मारायलाही शिकले पाहिजे, मुलग्याने रडणे म्हणजे कमकुवतपणा इत्यादी. मुळातच काही भावनांना स्त्रीसुलभ भावना आणि पुरुषी भावना अशा वर्गवारीत बसवले जाते. यामुळे पुरुषत्वाची किंवा मर्दानगीची व्याख्या म्हणजे न रडणे, भावनांचा उद्दामपणा, शरीराचा रांगडेपणा, आक्रमक लैंगिक गरजा आणि त्या गरजा पूर्ण करण्याची मुभा, अशी काहीशी असते. त्याचवेळी स्त्रीत्व म्हणजे संकोच, नाजूकपणा, भावनिक अवलंबित्व, सहनशीलता आणि पुरुषाच्या गरजा पुया करण्यासाठी तत्पर समर्पण. मुलीला लहानपणापासूनच एक आदर्श स्त्री म्हणून घडवण्याचे प्रयत्न केले जातात. तिच्यावर लादलेल्या बंधनाळे तिला पुरेशा संधी मिळत नाहीत. परिणामी आत्मविशास खालावतो. आदर्श स्त्रीच्या कल्पनांध्ये बसत नसल्यास स्व-प्रतिमा कमकुवत होते. अशी मानसिकता असणाऱ्या मुली अत्याचारी व्यक्तींना बळी पडू शकतील. अत्याचार झाला तरी आपल्या शरीराबद्दल बोलताना किंवा काय झाले याबद्दल बोलताना वाटणारा संकोच, सहन करण्याची वृत्ती यामुळे मुली याबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. त्याचबरोबरीने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या ‘अब्रू’ची जबाबदारी त्या मुलीवरच असते. झालेल्या गोष्टीबद्दल बोलल्याने बेअब्रू होण्याची भीती असते. अशा वेळी याबद्दल बोलले जाणार नाही, याची अत्याचारी व्यक्तीला चांगलीच कल्पना असते. आपल्याकडील पोलिसही बऱ्याचदा ‘कशाला घराची बेअब्रू करून घेताय?’ असे म्हणून तक्रार नोंदवायला आलेल्यांचे मनोबल खच्ची करतात. बहुसंख्य स्त्रिया आयुष्यात कधीतरी लहान-मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या असतात. अश्यावेळी त्यांची ‘बाईच्या जातीला हे भोगावंच लागतं’ यासारखी टिप्पणी झालेल्या घटनेला बोथट करते. आजही स्त्रियांना आपली लैंगिकता आणि लैंगिक अधिकारांबद्दल बोलायची मोकळीक नाही. स्वतःच्या लैंगिक गरजांची मागणी करणे तर दूरच पण इच्छा नसताना लैंगिक संबंधांना ‘नाही’ म्हणण्याची मुभा बऱ्याचजणींना नसते. घरातील लहान मुले हे बघत असतात. त्यातून मुलींना शिकवण मिळते ती ‘नाही’ न म्हणता समर्पण करण्याची आणि मुलग्यांना शिकवण मिळते ती हवे तेव्हा हवे ते मिळवण्याची. ही मानसिकता मुलींच्या बळी पडण्यामागे मोठा हातभार लावते. वर उल्लेख केल्याप्रमाणे कुटुंबाची अब्रू ही घरातील मुली, स्त्रिया यांच्या अब्रूशी जोडलेली असते. त्यामुळे वैयक्तिक वैर असताना सूड घेण्यासाठी वैद्याच्या घरातील स्त्रियांवर बलात्कार केले जातात. यात अल्पवयीन मुलींवरही केवळ त्या बहिणी, मुली आहेत म्हणून अत्याचार होतात. वैयक्तिक दुश्मनीत घरातील महिलांचा याप्रकारे बळी जाण्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेतच. लिंगभावातील सत्तासंबंधळे मुलींचे बाल-लैंगिक अत्याचारास बळी पडणे हे उघडपणे दिसून येते. पण हाच घटक मुलग्यांच्या बळी पडण्यामागेही कारणीभूत ठरतो.
वर म्हटल्याप्रमाणे पुरुषत्वाच्या काही विशिष्ट कल्पना आपल्या समाजव्यवस्थेत आहेत. त्या कल्पनांध्ये न बसणाऱ्यांना पुरुष मानले जात नाही, वेगळ्या आणि उपहासात्मक पद्धतीने पाहिले जाते. आजही आपल्या समाजात तृतीयपंथी व समलैंगिक लोकांना योग्य स्थान नाही. त्यांच्याबद्दल घृणा, तिरस्कार आढळून येतो. ज्यावेळी पुरुष मुलग्यांवर अथवा मुलगे मुलग्यांवर अत्याचार करतात त्यावेळी त्याची वाच्यता केल्यास आपल्यावर समलिंगी असल्याचा शिक्का बसेल ही भीती मुलाच्या मनात असते. त्याचबरोबर मुलगा असून असा अत्याचार घडला म्हणजे मी पुरुषच नाही का, असा प्रश्न पडतो. त्याप्रकारची हेटाळणी होऊ नये म्हणूनही त्याबद्दल बोलणे टाळले जाते. त्याचबरोबर लैंगिकतेचे प्रदर्शन आणि अभिव्यक्ती म्हणजे पुरुषत्व ही धारणा फार लहान वयापासून तयार झालेली असते. अशावेळी ते पुरुषत्व सिद्ध केलेच पाहिजे अशी गरज अर्धवट वयात वाटू शकते. मित्रमंडळींच्या दबावामुळे ऐन पौगंडावस्थेत आपल्याहून लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांपैकी अनेक मुले सांगतात की त्यांना आपली ‘मर्दानगी’ जोखून बघायची होती.
लैंगिकतेबद्दल असणाऱ्या अनेक चुकीच्या समजुती, कल्पना एकाच वेळी अत्याचाराच्या घटनांना दाबून टाकत असतात आणि त्याचवेळी अत्याचार करण्याला कारणीभूत ठरणारी मानसिकताही तयार करत असतात. समाजातील सत्ताकारणाचे गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात घेता उद्याच्या नागरिकांच्या मनांची मशागत आरोग्यपूर्ण होण्याची जबाबदारी कसोशीने पार पाडायला हवी. याचे भान प्रत्येकानेच ठेवणे आवश्यक आहे.
[मृणाल राव या पुणे स्थित ‘बालहक्क कृती समिती’ या संघटनेच्या समन्वयक म्हणून काम करत आहेत.] द्वारा एम. ए. चांदककर, फ्लॅट क्र. ७ विघ्नहर अपार्टेटस, गणंजय सोसायटी, कोथरूड, पुणे ४११००६. इ-मेलः raoma2250@gmail.com