आपल्याच पिल्लांना आपण विटाळावे, त्यांचे बाल्य कुस्करावे असे कुणी माणूस वागते का, असे खरोखर घडते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. वय, लिंग, नाते, या सर्वांपलीकडे जाऊन सर्वत्र दिसणारी अधम प्रवृत्ती बघितली की माणूस हा विचार करू शकणारा प्राणी आहे या मूळ गृहीतकालाच छेद जातो. हे जग किती सुंदर आहे, प्रेक्षणीय आहे, सुखदायक आहे, याचे अनेक दाखले तुच्या आमच्याकडे असतील, पण त्या सुंदरतेचे एक मोठे कारण असलेल्या लहान मुलांवरच जिथे लैंगिक अत्याचार होतात, तसे करणारे नराधम जिथे असतात, इतकेच नाही तर हे माहीत असूनही मुकाट राहणारे लोकही जिथे मान वर करून जगतात ते हे जग खचितच असह्य भयंकर आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराची सावलीसुद्धा पडणे गैर आहे, असे असताना प्रत्यक्षात फार मोठ्या प्रमाणात लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. इतकेच नाही, तर त्याविरुद्ध आवाजही उठवता येत नाही. त्रास देणाऱ्याला साधा जाब विचारला जाणे हीदेखील चैनच म्हणावी, इतक्या क्वचित ठिकाणी तसे घडते. लहान मुलांचे लैंगिक शोषण हा विषय मुळातच भयंकर असल्यामुळे असेल, पण आपल्या आसपास कुठेही असे काही घडू शकते, पण तसे होऊ नये यासाठी आपण जागरूक असले पाहिजे, अशी एकंदर विचार जाणीव आपल्या समाजात नाही. जणू एखादा तांत्रिक किंवा अवास्तव विषय असावा, अशा प्रकारे याबद्दल लोक बोलतात.
काईट रनर या गाजलेल्या चित्रपटात दोन ठिकाणी दोन लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होण्याची दृश्ये आहेत. हा चित्रपट अनेकांनी पाहिलेला असेल. हा दोनही दृश्यांध्ये शोषित मुले अत्याचार निमूट सहन करतात असे दाखवले आहे. हा सिने च आहे, सत्य नाही; पण त्यात दर्शविलेले हे चित्र मात्र बहुसंख्य बालकांबाबत खरे आहे. प्रौढांच्या जगात मुले अंग चोरून जगत असतात. आसपासच्या परिस्थितीचे नियम, रीती, पद्धती, आणि नीतीचे निकषही अशी सर्वच व्यवस्था प्रौढांनी लावलेली असते. बालकांच्या दृष्टिकोणातून पाहिले, तर ही व्यवस्था रचण्याचेही आणि बदलण्याचेही अधिकार प्रौढांनाच असतात. तसे असणे साहजिक असले तरी त्यामुळे बालकांच्या सुरक्षेची जबाबदारीही प्रौढांचीच असते हे विसरून चालणार नाही. समाजात अनेक गुन्हे घडत असतात, अनेक अनुचित प्रकार होत असतात हे खरेच आहे, तरीही त्यांचे प्रमाण सामान्य जनजीवनाचा साकल्याने विचार करता अपवादात्मकच असते. बहुतांशी लोक शक्यतो सरळपणाने जगत असतात. एकमेकांची आठवण ठेवतात, अडचणीत मदतीला येतात, नातेवाईक, कुटुंबीय, स्नेहीसोबती यांच्याप्रती आपुलकी बाळगतात ; चार चांगली कामे, संस्था उभ्या राहाव्यात असाच त्यांचा विधायक दृष्टिकोण असतो. अनावर परिस्थिती ओढवेपर्यंत माणसे शांतच राहतात, तेव्हा लहान मुलांचेही जीवन काही प्रश्न, अडचणी, दोष, कुपोषण इ. बाबींनी भरलेले असले तरीही सभ्य सुशील सामान्य पालकांच्या सहवासात सुरक्षितच असते असे आपण मानतो. तसे ते असतेही पण, तरीही बहुसंख्य मुलींच्या आणि निम्म्याहून अधिक मुलग्यांच्या जीवनात लैंगिक शोषण होण्याची वेळ येते हे दिसते तेव्हा ही विकृत इच्छा माणसांच्या मनात का बळावते, अनेक बालके हा छळ का सहन करतात, आणि आजच्या आपल्या न्यायव्यवस्थेत या गुन्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही जागा आहेत का, यांसारख्या प्रश्नांचाही वेध घेणे आवश्यकच ठरते.
समाजातल्या नातेसंबंधातल्या सत्ताकारणात लहान मुले नेहमीच कमी पडतात, आणि त्याचा गैरफायदा प्रौढ घेतात असे चित्र दिसते. मुलगी असली तर पुरुषप्रधान व्यवस्थुळे तिच्या यातना वाढणार आणि मुलगा असला तर त्याच्यावर लैंगिक अत्याचार होतो हेच कुणाला पटणार नाही. अत्याचार मात्र दोघांवरही होत राहणार. अल्पवयीन मुलींना आणि मुलग्यांनाही फसवून नेऊन शरीरविक्रयाच्या व्यवसायाला लावणे ही या अनाचाराची एक बाजू आपण ऐकलेली असेल. त्याविरुद्ध सरकार आणि संघटना यांची एकजूट आहे, तरी तोही प्रश्न संपूर्ण आटोक्यात आलेला नाही. केवळ शरीरविक्रयाच्या व्यवसायात वापरणे एवढेच नाही तर बालकाला कुठलाही लैंगिक त्रास शरीराला स्पर्श न करता लांबून दिला तरीही तो आता कायद्याच्या चौकटीत गुन्हा आहे, मात्र हे म्हणायची जागा आत्ताआत्ताशी कुठे मिळते आहे.
घरात असणाऱ्या बालकाची जशी काळजी घ्यायला हवी तशीच काळजी बालकांसोबत काम करणाऱ्या सर्व संस्थांध्येही घ्यायला हवी. आमच्याकडे असे घडतच नाही असे न मानता तसे कधीही होऊच नये यासाठी प्रत्येक संस्थेने स्वतःचे असे बालसुरक्षा धोरण बनवून ते जाहीर करायला हवे.
– संजीवनी कुळकर्णी