गेल्या महिन्यात छत्तीसगडमध्ये जे हत्याकांड झाले, ते माणुसकीला काळिमा फासणारे होते. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. हिंसाचार आणि दहशतवादाचे समर्थन होऊच शकत नाही. छत्तीसगडमधील हिंसाचार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी लेनिनवादी) – यांना माओवादी किंवा नक्षलवादी असेही म्हणतात – यांनी केला असल्यामुळे साधारणपणे समाजात हे कृत्य मार्क्सवाद मानणाऱ्या, माओत्सेतुंग विचाराच्या, स्वतःला मार्क्सवादी लेनिनवादी (नक्षलवादी) म्हणवून घेणाऱ्या लोकांनी केले आहे असे चित्र उभे राहणे स्वाभाविक आहे, परंतु ते तसे नाही. वस्तुस्थिती बरीच वेगळी आहे. मार्क्सने मानवी स्वतंत्र्याचे जे उत्तुंग स्वप्न पाहिले त्यात हे कुठेच बसत नाही. माध्यमां धून होणाऱ्या अशा प्रकारच्या प्रचारामुळे मार्क्स-तत्त्वज्ञान बदनाम होते. तसे होऊ नये म्हणून हा लेख.
गौतम बुद्धाची एक गोष्ट आहे. भर रस्त्यात एक माणूस त्याच्यावर शिव्यांचा भडिमार करीत होता. बुद्ध मात्र त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हता. शेवटी त्या शिव्या देणाऱ्याने वैतागून बुद्धाला विचारले, मी तुला एवढ्या शिव्या देऊनही तू त्यावर काहीच कसे बोलत नाहीस? बुद्धाने उत्तर दिले, तुम्ही मला शिव्या दिल्या, पण मी त्या स्वीकारल्याच नाहीत. तर आता त्या तुच्याकडेच राहिल्या आहेत. मला बोलून दाखवण्यासारखे काहीच नाही.
मार्क्सवादावर जेव्हा हिंसाचाराचा, दहशतवादाचा आरोप होतो, तेव्हा मला ही बुद्धाची गोष्ट आठवते. असा आरोप करणाऱ्यांनी मुळात मार्क्स, लेनिन व माओ हे एक तर नीटपणे वाचलेले तरी नाहीत किंवा संदर्भ सोडून वाचले आहेत. अशा लोकांशी कसा संवाद साधायचा हा एक प्रश्नच आहे.
मार्क्स, मार्क्सवादी आणि हिंसा
भारतामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप) हे दोन पक्ष सतत निवडणुका लढवीत असतात. निवडणुकांच्या मार्गाने ते केरळ व बंगालमध्ये सत्तेवरही आले आहेत. त्यामुळे ते हिंसाचारी आहेत असे त्यांच्याबद्दल कोणी म्हणू शकणार नाही. ट्रॉट्स्कीवाद्यांचा प्रभाव भारतात फारच कमी आहे. म्हणून त्यांच्याबद्दलही कोणी असे बोलणार नाही. आता राहिला प्रश्न तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी लेनिनवादी) नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्षाचा. मुळात हा एक पक्ष नसून अनेक पक्ष आहेत. त्यांपैकी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी लेनिनवादी) रेड फ्लॅगने छत्तीसगड कांडाचा जाहीर निषेध केला आहे. इतर नक्षलवादी पक्षही वेळोवेळी माओवाद्यांच्या बेर्वत हिंसाचाराचा आणि ते पसरवीत असलेल्या दहशतवादाचा जाहीर निषेध करतच असतात. सामान्य माणसांवर हिंसाच काय पण त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये, हे मार्क्स व लेनिन दोघांचेही मत होते. ते त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीने सिद्ध केले आहे. लेनिनचा भाऊ नार्दोनिक जो दहशतवादी होता, त्याला तर फासावर चढविण्यात आले. आपण थोडे इतिहासात डोकावून पाहू या. इ.स.१९६७ मध्ये चारु मजुदार ह्यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) याचा राजीनामा देऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा.ले.) काढला. त्यांचा सशस्त्र क्रांतीवर विशास होता. भाकप आणि माकपने सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडून दिला आहे असे चारु मजु दार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मत होते. त्यानी पहिला उठाव प. बंगालमधील नक्षलबाडी नावाच्या गावात केला. म्हणून त्याला नक्षलवादी उठाव व पक्ष असे म्हणण्यात आले. पण तेव्हा त्यांनी दोन मोठ्या चुका केल्या. ‘माओ आमचा चेअरमन’ अशी घोषणा व काही जमीनदारांची हत्या. यातून जमीनदारशाही नष्ट झाली नाही आणि परक्या देशातील नेत्याला आपला नेता मानणे हे वासाहतिक मानसिकतेचे लक्षण आहे हेही त्यांना कळले नाही. यातून धडा घेत, नंतर बरेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा.ले.) तयार झाले. त्यांनी ह्या गोष्टी टाळल्या. आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) अपवाद सोडला, तर इतर कोणाकडेही शस्त्रे नाहीत. त्यामुळे या अन्य नक्षलवादी पक्षांवर भारत सरकारने बंदी घातलेली नाही. ते खुलेपणाने काम करीत आहेत. त्यांच्या ट्रेड युनियन्स आहेत. त्यातील बहतेक पक्ष निवडणुकीतही सहभागी होतात. भारतीय भांडवली लोकशाहीच्या प्रगल्भतेचे हे उत्तम उदाहरण आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा.ले.) पीसीसी गट तर आम्हाला बहुपक्षीय व्यवस्था हवी आहे असे म्हणतो. आम्ही राज्यावर आलो तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जमाते इस्लामी ह्यांच्यावरही बंदी घालणार नाही. आम्ही त्यांच्याशी राजकीय दृष्ट्या लढू. के त्यांचे म्हणणे, ते लोकशाही मानत असल्याचे लक्षण नव्हे काय ? आपण आता एका वेगळ्या मुद्द्याकडे येऊ. आजच्या भांडवली लोकशाहीत आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने स्वैराचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. ज्या भांडवली लोकशाहीत स्त्रियांवर रोज बलात्कार व त्यांच्या हत्या होत आहेत व त्याला स्त्रियाच जवाबदार असल्याचे म्हटले जात आहे, ज्या भांडवली लोकशाहीत आजही दलितांवर अत्याचार होत आहेत (महाराष्ट्रातील दोन गावां ध्ये दलितांवर काही दिवसांकरिता का होईना पण बहिष्कार घातला गेला होता), ज्या भांडवली लोकशाहीत एका जमातीच्या हत्याकांडास जबाबदार असणारा मुख्यमंत्री पंतप्रधान बनण्याचे स्वप्न रंगवत आहे आणि वृतपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमे त्याचे मार्केटिंग करीत आहेत. (प्रचार हा शब्द मुद्दाम वापरत नाही) अशा राज्यव्यवस्थेस आपण खऱ्या अर्थाने लोकशाही मानायचे का?
आपल्या संविधानात, भारत हे एक निधर्मी लोकशाही समाजवादी प्रजासत्ताक आहे असे म्हटले आहे. मराठी पत्रकार व विचारवंत आपल्याला लोकशाहीची किती चाड आहे, हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यांची ही जाणीव किती सीमित परिघात फिरते हे पाहण्यासारखे आहे. ज्यांना हिंदूराष्ट्र निर्माण करायचे आहे, असे भाजपाचे नेते रोज मराठी वृत्तपत्रातून व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून झळकत असतात. त्यांच्याशिवाय कुठल्याही वाहिनीवरची चर्चा पूर्ण होत नाही. जमाते इस्लामी किंवा मुस्लीम लीगच्या प्रवक्त्याला मात्र तेथे बोलावले जात नाही. ह्याला लोकशाही म्हणायचे का?
मार्क्सवाद व्यक्ती व व्यक्तित्वाचा विचार करत नाही, असा एक समज आहे. सार्वत्रिक मुक्त विकास हा व्यक्तिगत मुक्त विकासाशी निगडित आहे, मानवी समाजात एकजण सर्वांसाठी व सर्वजण एकासाठी आहेत. असे जेव्हा मार्क्स म्हणतो, तेव्हा तो व्यक्तिकेंद्रित लोकशाहीविषयीच बोलत असतो. रशियन राज्यक्रांतीनंतर लेनिन म्हणतो, ह्या क्रांतीने टॉलस्टॉयचे स्वप्न साकार केले आहे. तेव्हा लेनिनसमोर टॉलस्टॉयचा आदर्श होता हे दिसून येते. हे चित्र गांधीजींच्या आदर्श समाजाच्या चित्रापेक्षा वेगळे आहे काय ? माओ म्हणतो, शंभर फुले फुलू द्या, शंभर विचारसरणीना परस्परांशी झगडू द्या. हे विधान लोकशाहीवादी नव्हे काय ? हिंसा, हिंसाचार व दहशतवाद हे सारे खरे असले तरी या तथाकथित समाजवादी देशांना समाजवादी लोकशाही राबवता आली नाही हे वास्तव आहे. म्हणून तर त्यांचा पाडाव होऊन तेथे पुन्हा भांडवलशाही आली. तरीही या देशांतील समाजवादी राज्य भांडवली राज्यांपेक्षा अधिक कल्याणकारी होते. मात्र तेथे लोकशाहीचा अभाव होता हे हेही वास्तव आहे.
मार्क्सवादातील लोकशाही व व्यक्तिवाद ह्यांचा विचार केल्यानंतर आता आपण मार्क्सवाद व हिंसाचार ह्यांच्या परस्परसंबंधाकडे वळू. मार्क्सवादात क्रांती व त्यासाठी हिंसाचार अनिवार्य मानले गेले आहेत का? त्यांचा अतूट संबंध जोडला गेला आहे का ? हा प्रस्तुत लेखातील कळीचा गुद्दा आहे. ह्याचे उत्तरही आपल्याला इतिहासालाच विचारावे लागणार आहे. रशियन राज्यक्रांतीत हिंसा झाली की नाही? तर हो. थोड्या प्रमाणात झाली. पण तशी हिंसा फ्रेंच राज्यक्रांतीतही झाली. ती तर लोकांची क्रांती होती. तिचा मार्क्सवादाशी काहीच संबंध नव्हता. परंतु ती भांडवलदार वर्गाच्या पुढाकाराने झाली होती. तीत राजा सोळावा लुई व अनेक उमरावही मारले गेले. जगभरातील पुरोगामी ज्या इंग्लंडच्या लोकशाहीचे कौतुक करतात तीदेखील राजाचा शिरच्छेद करूनच प्रस्थापित झाली ना? ते करणारे लोकही मार्क्सवादी नव्हते. हिंसा तशी अगोदरच्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातही झाली आहे.
लेनिन वा माओ यांनी क्रांती केली नाही. क्रांती लोकांनी केली आणि लेनिन व माओ यांनी तिचे नेतृत्व केले. यात थोडीबहुत हिंसा घडली, पण लोकांचा उठाव असल्यामुळे त्यात हिंसाचार झाला नाही, किंवा सामान्य लोकांवर दहशतही निर्माण केली गेली नाही. जेव्हा जेव्हा समाजात मोठे बदल घडतात, तेव्हा बहुतेक वेळा हिंसा होते. पण हिंसा वेगळी, हिंसाचार वेगळा आणि दहशतवाद वेगळा. हिंसाचार म्हणजे हिंसेने केलेला आचार. तो दीर्घकालीन असतो. आणि दहशतवाद म्हणजे मानसिक, मनोवैज्ञानिक व शारीरिक हिंसाचाराद्वारे आपल्या विरोधी मत, श्रद्धा, जात, जमात असणाऱ्या व्यक्ती वा समूहांवर एक भयंकर भीतीचे साम्राज्य उभे करणे, जसे २००२ साली गुजरातमध्ये मुसलमानांविरुद्ध झाले आणि हजारो वर्षे दलितांविरुद्ध झाले. इतिहासातील अशी हिंसा मार्क्सवाद्यांनी नव्हे तर ज्यांना राज्यावर यायचे होते त्या वर्गाने वेळोवेळी केली आहे. तेव्हा हिंसा म्हणजे मार्क्सवाद हे समीकरण चुकीचे आहे.
आणखी उदाहरणे देतो. अल्लाउद्दिन खिलजीने देवळे पाडली व लुटालूट केली. बाबराने राममंदिर पाडले. ह्याबद्दल नेहमी बोलले जाते, पण हिंदू राजा पुष्यमित्र शुंगाने बुद्धविहार नष्ट केले हे का सांगितले जात नाही? या देशात जन्माला आलेल्या बुद्धाचा धम्म या देशातूनच कोणी हद्दपार केला? व तो अहिंसक मार्गाने केला का? अमेरिकेचा शोध लावणाऱ्या कोलंबसाने व नंतर तेथे स्थलांतरित झालेल्या स्पॅनिश लोकांनी ज्या निघृणपणे तेथील मूळ रहिवासी असलेल्या रेड इंडियन्सच्या कत्तली केल्या, त्या हिटलरने केलेल्या ज्यूंच्या कत्तलींनाही लाजविणाऱ्या होत्या. कोलंबस व स्थलांतरित स्पॅनिश हे नक्षली नव्हते व मुसलमानही नव्हते.
विसाव्या शतकात चार मोठ्या घटना घडल्या. रशियन राज्यक्रांती, चिनी राज्यक्रांती, गांधीजींचा अहिसंक स्वातंत्र्यलढा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामूहिक धर्मांतर (ज्यामुळे स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या मुखंडांनी हद्दपार केलेला बुद्धधर्म या देशात परत आला.) खरे पाहिले असता गांधी विरुद्ध मार्क्स असे द्वन्द्व उभे करण्याची गरज नाही. मोठे बदल घडवायचे असतील तर सशस्त्र क्रांती हा एकमेव मार्ग नाही हे गांधीजींनी आपल्या आचरणातून जगाला पटवून दिले. त्यातून मार्क्सवादाला खरे तर खूप फायदा झाला आहे. मार्क्सच्या तत्त्वज्ञानातील मूळ माणुसकीला आवाहन करण्याच्या अद्भुत चैतन्याला त्यामुळे एक वेगळेच परिमाण मिळाले आहे.
भांडवलवाद व लोकशाही – एक द्वन्द्व
आता पुढच्या मुद्द्याकडे येऊ. भांडवली लोकशाही किती भांडवली (भांडवलदार वर्गाचे हित जपणारी) व किती लोकशाही (सर्व लोकांचे, सर्व समाजाचे हित जपणारी) आहे यावर समाजवादी लोकशाहीकडे जाण्याचा मार्ग शांततामय असणार की बिगर शांततामय हे ठरणार आहे. तेव्हा किमान भांडवली लोकशाही नसलेल्या देशांत ती प्रस्थापित करणे व तेथील लोकशाही संघटना व संस्था मजबूत करणे हा सर्व लोकशाहीवाद्यांसाठी अग्रक्रमाचा मुद्दा आहे. ग्रामशी ह्या इटालियन मार्क्सवाद्याने फॅसिझमविरुद्ध लढताना नागरी समाजाचा आग्रह धरला होता, हे येथे लक्षात घ्यावे. तसेच आपल्याकडे आणीबाणी हटविण्यासाठी व सांसदीय लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी केलेल्या आंदोलनात भाकप वगळता सर्व मार्क्सवाद्यांनी जो भाग घेतला त्यामागचे कारणही हेच आहे. सांसदीय लोकशाहीच्या नंतर भांडवली लोकशाहीमधील निरनिराळ्या संस्था व संघटनांत लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून तेथील भांडवलाचे वर्चस्व कमी करत नेले पाहिजे व लोकशाहीचे प्रमाण वाढविले पाहिजे, असे मार्क्सवाद मानतो. ज्यांच्या हाती सर्वंकष सत्ता आहे, असे शहरी आणि ग्रामीण भांडवलदार व त्यांच्या परदेशी दोस्तशक्ती ह्यांची मिळून झालेली जागतिक भांडवलशाही अखेरीस आपले हितसंबंध जपेल, हे उघड आहे. त्यासाठी ह्या शक्ती देशात व जगात लोकशाही संस्था-संघटनांना बळकटी देण्याऐवजी, त्या खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न करतात असा इतिहास आहे.
ह्यावरून हे लक्षात येईल की खरी लोकशाही व हिंसाचार एकत्र नांद शकत नाहीत. हिंसेची खरी मैत्री आहे ती भांडवलदारीशी. लोकशाही टिकवण्यासाठी अहिंसक लढेच अनुकूल ठरतात ह्याचेही इतिहासात अनेक दाखले आहेत. गांधीजींकडून प्रेरणा घेऊन अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग ज्यु. ह्यांनी वर्णविरोधात अहिंसक मार्गानी लढा दिला. आफ्रिकन अमेरिकन लोकांना लोकशाही हक्क मिळवून दिले. वर्णभेद नष्ट करण्याची प्रक्रिया जोरात सुरू केली. यातून अमेरिकन भांडवलशाही गोऱ्यांच्या वर्चस्वातून मोठ्या प्रमाणात मुक्त झाली. नेल्सन मंडेलानी आफ्रिकेतला वर्णद्वेष व वर्णभेद नाहीसा करण्यासाठी तीस वर्षे जो तुरुंगवास भोगला, तोदेखील कृष्णवर्णीयांचा लोकशाही लढाच होता. युरोपमधील चर्च संरजामशाहीच्या बाजूने होते तेव्हा भांडवलशाहीने तर्कवादाचा आधार घेत चर्च आणि राज्यसत्ता यांची फारकत केली. आज हीच भांडवलशाही काय करीत आहे? भारतीय स्वातंत्र्यलढ्याचेच उदाहरण घेऊ. गांधीजींनी महान असा अहिंसक स्वातंत्र्यलढा दिला. अखेरीस भांडवली लोकशाही मानणाऱ्या ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले. पण ते देताना भारताची फाळणी केली . धर्माच्या आधारावर पाकिस्तानसारखे एक खोटे राष्ट्र निर्माण केले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी येथील भांडवलदार वर्गाला मुक्त करून जागतिक भांडवलदार वर्गाशी जोडून घेतले. त्याला आपल्या जागतिक युतीतील जुगारी, दलाल, कनिष्ठ भागीदार बनवले. ह्या वर्गाचे हितसंबंध येथील जनतेशी जुळलेले नाहीत, तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांशी जुळलेले आहेत, हे स्पष्ट आहे. पाकिस्तानचे सर्व राजकारण गेली सहा दशके जागतिक भांडवली सत्तेच्या इशाऱ्यावर सुरू आहे. तेथील धर्माधिष्ठित शक्तीना बळ पुरवून, खऱ्या लोकशाहीवादी शक्तींना खच्ची करण्याचे काम ह्याच भांडवली शक्ती करीत आहेत. अमेरिकेचे मध्य-पूर्वेतील राजकारणही ह्याहून वेगळे नाही .
आता आपण पुन्हा भारतीय राजकारणाकडे येऊ. एकीकडे येथील राज्यकर्ता वर्ग समाजवाद, मार्क्सवाद कालबाह्य झाला असे ठरवीत आहे, दुसरीकडे अंधश्रद्धेला खतपाणी घालून देवा-धर्माचे स्तो माजवून ब्राह्मणी वर्चस्वाचे पुनरुज्जीवन करून निधर्मीवादाला जय महाराष्ट्र, जयहिंद म्हणत आहे. जो बुद्ध, ‘मी प्रेषित नाही मी देव नाही’ असे म्हणाला, त्याला भगवान बुद्ध म्हणणे वा त्याला विष्णूचा नववा अवतार म्हणणे हे कशाचे द्योतक आहे? आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देशिके (प्रीअँबल)मध्ये असे म्हटले आहे की भारत हे लोकशाही, समाजवादी, निधर्मी, प्रजासत्ताक आहे. या भूमिकेला पहिला विरोध कोणता वर्ग करत आहे? हिंदुराष्ट्राच्या संकल्पनेला कोण खतपाणी घालीत आहे? देशातील बहुसंख्यांकांच्या धर्माच्या आधारे राष्ट्र उभारणीला चालना दिली तर हा किंवा कोणताही भांडवली लोकशाही देश निधर्मी कसा काय राहू शकेल ? भांडवली व्यवस्था मुळातच पुरोगामी आहे, धर्मसंस्थेशी तिने लढा दिला आहे, हा सारा प्रचार किती पोकळ आहे, हे ह्यावरून ध्यानात यावे. तर अशा भांडवलदार वर्गाशी आज आपल्याकडे असलेल्या संस्था, संघटना वा व्यासपीठांवरून कसा आणि कितपत संवाद साधता येईल ? त्यासाठी नवीन संस्था, संघटना आणि व्यासपीठे उभारावी लागतील. समाजासाठी व कष्टकरी वर्गासाठी समाजवादच नव्हे तर समाजशाही आणण्यासाठी हे आवश्यक आहे. हे शांततामय मार्गाने करायचे असेल तर ते कष्टकऱ्यांच्या नेतृत्वाखाली करावे लागेल. गांधीजी म्हणत असत, गरिबी ही सर्वांत मोठी हिंसा आहे. आज गरिबी न हटवण्यात कोणत्या वर्गाचे हितसंबंध जोडले गेले आहेत ? मग हिंसा कोण करत आहे ? रोज होणारे बलात्कार, खूनबाजी, हत्या, अपहरण हे कोण करत आहे? थोडक्यात हिंसाचार आणि भांडवलशाहीचा थेट संबंध आपल्याला दिसत । नाही काय? मग त्या विरोधात आपण काय करत आहोत ? या लेखाचा शेवट प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत ट्रॉट्स्की ह्याच्या अवतरणाने करतो. वास्तवाला नीटपणे भिडणे — संकल्पनांना समर्पक संबोधने देणे, कितीही कटू असले तरीही लोकांसमोर सत्य मांडणे, छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत खऱ्याचीच पाठराखण करणे….. वेळ येईल तेव्हा कृती करण्याचे धाडस दाखविणे, हे (क्रांतीच्या शास्त्राचे) नियम आहेत. मार्क्सवादाच्या भांडवलशाहीविरोधाचा नैतिक आशय मांडण्यास ह्याहून अधिक समर्पक शब्द कोणते असू शकतील ?
सी ३५ ए, अनंत निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई २८. भ्र.ध्व. ९००४६१४५९४, ई-मेल : raj27k@ymail.com