१९८० नंतरच्या काळात लहू कानडे यांची कविता पुढे आली. आत्मभानाचा सशक्त आविष्कार करणाऱ्या या कवितेची नाळ विद्रोही युगजाणिवेशी आहे. लहू कानडे यांच्या कवितेला असणारा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यव्यवस्थेचा संदर्भ या कवितेचा महत्त्वाचा गुणविशेष आहे. क्रांतिपर्व (१९८३ आणि टाचा टिभा हे लहू कानडे यांचे सुरुवातीचे दोन कवितासंग्रह याची साक्ष देतात. याचाच पुढचा टप्पा म्हणजे त्यांचा अलीकडे २०१२ मध्ये प्रकाशित झालेला ‘तळ ढवळताना’ हा कवितासंग्रह होय.
ज्ञान-संपत्ति-अधिकारांपासून दूर ठेवण्यात आलेल्या वर्गाला भारतीय राज्यघटनुळे मानवी अधिकार मिळाले. त्यांच्या कर्तृत्वाला संधी मिळून त्यांच्या अभिव्यक्तीची कवाडे खुली झाली. परिवर्तनाच्या विचारांळे शोषणात आणि दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाला सुखसंपन्न जीवनाचे स्वप्न साकारता येणे शक्य झाले. समाजव्यवस्थेत भरडल्या गेलेल्या वर्गातून एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून लहू कानडे या कवीचे कर्तृत्व बहरून आले. उच्चपदस्थ अधिकारी झाल्यानंतरही त्यांची सामाजिक जाणीव कायम राहिली हे विशेष. ज्या परिवर्तनवादी विचाराने आपणास येथवर पोहचवले, त्याविषयी त्यांची बांधिलकी आहे आणि त्यामुळे मागे राहिलेल्या आपल्या सर्व शोषित समूहाच्या उत्थानासाठी ‘तळ ढवळण्याचा’ त्यांचा सक्रिय विचार आहे. याच सामाजिक उन्नयनाच्या विचारातून आणि तळमळीतून उत्कटतेने अभिव्यक्त झालेला लहू कानडे यांचा ‘तळ ढवळताना’ हा कवितासंग्रह होय.
सर्वहारा समाजाच्या उत्थानाची तळमळ ह्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळतानाही सामान्य माणसांत रमणारा हा कवी अवतीभवतीची माणसे नि समाज-वास्तव मांडत आला आहे. गाव-खेड्यांपासून तर महानगरापर्यंतचा परिस्थितीचा रेटा त्यांनी जवळून बघितला आहे. त्यामुळेच सामान्य माणसांच्या प्रश्नांचा ते लक्षणीय वेध या कवितासंग्रहातून घेताना दिसतात. ‘बाप्पा, नव्या सहस्रका…!’ या कवितेचा प्रारंभच ‘नव्या सहस्रकाच्या’ स्वागताने करताना स्वागत मात्र कोणत्या पद्धतीने करावे हा पेच कवीला पडतो.
‘नवं सहस्रक दारात आलंय,
त्याच्या हातावर काय ठेवू? …
कालच्या शतकानं तर घेतला
दऱ्याखोऱ्यांतून वाहणाऱ्या गाण्याचा घोट
मूठभरांच्या भल्यासाठी बेवारस केलं
कंदमुळ्यांवर जगणारं पोट ….
विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही काल
सामूहिक हत्यांना सती म्हणत उधळला जाणारा गुलाल
किती मोजून सांगावेत लेकींचे गर्भाशयातीलच खून
बापा नव्या सहस्रका
तुझ्या स्वागतासाठी अब्जावधींचा धूर करून
उजळताहेत लक्ष लक्ष ज्योती ….
मलाही वाटतं रे करावं तुझं स्वागत
पेटवून सर्व अभद्रांचा करावा मोठ्ठा जाळ
रात्रीच्या बेवारस गर्भाच्या डोळ्यात उजाडू दे सकाळ
तुला खरंच, देऊ इच्छितोय मी
दवात न्हालेल पहाटेचं फूल अन्
माणूस नावाच्या महान सृजनाचं
नुकतंच उपजलेलं निरागस मूल’
(बाप्पा, नव्या सहस्रका…! पृ.क्र.३-५)
या कवितेच्या प्रारंभाने नव्या सहस्रकाबरोबर येणारी कुरूपता ते अधोरेखित करतात. पहाटपट्टीतील आदिवासी जीवन आणि नव्या व्यवस्थेत त्यावर वाढलेले अतिक्रमण या विरूपाचे रेखाटन कवी करतो. अपरिवर्तनीय ग्रागीण गानसिकतुळे सुधारणा आणि विकासाला निर्माण होणाऱ्या अवरोधाचे विविध कंगोरे कवी प्रकर्षाने गांडतात.
शेतीला केंद्रस्थानी ठेवून गावाकडे बघणे वेगळे आणि ग्रामरचनेतील गावकुसातून ग्रामवास्तवाला समजून घेणे वेगळे असते. गावकुसातून ग्रामवास्तवाला समजून घेणे हे गावाच्या दुरवस्थेच्या शस्त्रक्रियेसाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरते. हे लहू कानडे यांच्या आप्पाला ‘टाकून दे जुना गाडा’ असे सांगणाऱ्या कवितेतून तीव्रतेने लक्षात येते.
‘गावकामगारही हल्ली राहत नाही गावात
निम्मा गाव पोटापाण्यासाठी परांगदा झालाय
कुजबुजतात काही की
तुझ्या सनातन गावगाड्यानं गारद केलाय …
खिल्ली उडवत गुणांची त्यांनी श्रमांना फाटा मारलेला
ज्याची धनदौलत मोठी तोच मालक झालेला
सत्ता मुठीत ठेवण्यापायी केला विषमतेचा शिवारभर पेरा
आणि दुभंगतच गेलं गाव मरून पडला एकमेळाचा वारा
(टाकून दे जुना गाडा…! पृ.क्र.९१-९४)
ग्रामपंचायत, ग्रामसभा आणि ग्रामीण विकास या शासकीय, प्रशासकीय अंगाने गावाचे विश्लेषण करून त्याच्या विकासाला हात घालणारी अशी ही जीवनानुभवी कविता आहे. खऱ्याखुऱ्या कळवळ्याच्या जातकुळीची ही नवीन कविता, गावाच्या खऱ्या समृद्धीचा आशय व्यक्त करणारी आहे.
नागरी जीवनव्यवस्थेत, तिथल्या महामाया गर्दीत जगण्याची घडी बसवताना दुरावणारे जन्मगाव आणि हरवलेल्या नात्यांचा गहिरा भावबंध यांविषयीची दुखरी सल या कवितेतून कवी हळुवारपणे व्यक्त करतात. त्याचवेळी नागरी जीवनातील बकाल वास्तवाचा दाहही कवीला उद्विग्न करीत राहतो. पुरोगामी विचारांनी घडलेला आणि बदलत्या जीवनमानातही या विचारांशी प्रामाणिक राहणारा कवी जीवनाचा वास्तवाच्या अंगाने वेध घेतो. सर्वहारा समाजातील समस्या निकालात निघाल्या यासाठी परिवर्तनाच्या उपाययोजनांना कवी महत्त्व देतो. त्याच्या अभिव्यक्तीचे मूळ हे सामाजिक विषमतेचे बळी पडलेल्या माणसांच्या असंख्य वेदना होय. म्हणून ‘मी’ च्या सुखसंपन्नतेत कवी मशगुल न होता समष्टीचे दुःख नाहीसे करण्यासाठी, त्यांच्या सुखासाठी धडपडत राहतो, हे या कवीचे आणि कवितेचे मोठेपण म्हणावे लागेल. समाजाच्या उत्थानासाठी, त्याचा तळ ढवळून काढण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा फुले, लोकहितवादी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या अनन्यसाधारण कार्यांविषयी विनम्रपणे कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. या देशात सर्वांत आधी विषमतेला नाकारून समाजव्यवस्थेचा तळ ढवळून काढणाऱ्या तथागतांना कवी विनम्र अभिवादन करतो. कवीच्या आत्मगत लेखनाचे येणारे संदर्भ सामाजिक वास्तवाचे रेखाटन म्हणून येतात. व्यक्तिगत जगण्याला मांडण्याचा सोस म्हणून ते येत नाही. तर त्यातील सामाजिक आशयप्राधान्याने जाणवत राहतो, हे विशेष.
समकालीन जीवनातही जातवास्तव तीव्रतेने अनुभवास येते. ‘तोंड दाबून’ मिळणाऱ्या बुक्क्यांचा मार कवी आपल्या व्यक्तिगत जीवनानुभवातून पुढे करतो. या ठिकाणी कवीने व्यक्त केलेला हा व्यक्तिगत अनुभव, समाजाचे विदारक वास्तक मांडतो. म्हणून तो अनुभव ‘मी’ची सीमा ओलांडून समष्टीचा उद्गार ठरतो –
थोडासा विराम घेऊन म्हणाला,
‘आपका वॉचमन तो चम्हार है साब,
तोबा-तोबा! पानी पिया कितने दिन उसके हातका
मालू ही नहीं था, कल देखा रास्ते में चमारी करते
हमें तो बहुत शर्मिंदगी महसूस हुई’
पण मी मात्र उसवलोच गेलो आरपार,
जणु टरबूज समजून भोसकावं,
एखाद्याला टार-टार
किती काळ सोसायचा
हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार
किती काळ झेलायचे, अपमानांचे प्रहार (तोंड दाबून, पृ.क्र.६४)
ही कविता म्हणजे जातिव्यवस्थेत भरडल्या जाणाऱ्या सामान्यांच्या दुःखांचा, वेदनांचा आक्रोश आहे. विषमतेविरुद्धचा विद्रोह आहे. सोबतच ही कविता परविर्तनवादी विचारांशी बांधिलकी सांगणारीही आहे. असे असूनही ती मात्र अभिनिवेशी नाही, हे या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. शोषण करणाऱ्या व्यवस्थेला अधिक परिणामकारकपणे भेदणारी नि परिवर्तनाला साद घालणारी अशी ही कविता आहे. या कवितेची भाषा बदलत्या काळाला आत्मसात करणारी आहे. तिची प्रतिमासृष्टी ही तीव्र संवेदनक्षम नि प्रत्ययकारी जाणवते. आशयानुरूप अधिक सघन करते. या कवितेच्या अभिव्यक्तीला आशयाची गरज म्हणून बघावे लागते. त्यामुळे ही अभिव्यक्ती सहज, स्वाभाविक ठरते. बोली, प्रमाण तसेच हिंदी-मराठी भाषेचा मिश्र वापर हा स्वानुभवाचा भाग म्हणून सहजतेने येतो.
अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी महत्त्वपूर्ण असणारी ही कविता आपले तीव्र सामाजिक भान विसरत नाही वा आकर्षित करणाऱ्या भोवतालाच्या मोह-मायेला भाळून विचलित होत नाही. आपला विपर्यास होऊ देत नाही. तर व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी ती अविचल मार्गक्रमण करीत राहते. समकालीन कवितेत तिचे हे ठाम निश्चयी रूप हे फार मौलिक आहे. इतके या ठिकाणी नमूद करावेसे वाटते.
(तळ ढवळताना, लहू कानडे, लोकवाङ्मयगृह, मुंबई, मूल्य – २०० रु.)
सहयोगी प्राध्यापक, पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. (भ्रणध्वनी : ९४२२१५५०८८)