काही आठवड्यांपूर्वी ‘झी टॉकीज्’वर ‘धागेदोरे’ हा सिनेमा दाखविला गेला. स्त्रियांच्या संदर्भात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सध्या वातावरण प्रचंड तापलेले आहे. व ते योग्यही आहे. परंतु ह्या प्रश्नाची दुसरी बाजू, जी संख्यात्मकदृष्ट्या स्त्रियांवरील अत्याचारांच्या संख्येपेक्षा बरीच छोटी असू शकेल, ह्या चित्रपटात यथार्थपणे अधोरेखित केलेली आहे. त्यासंबंधी थोडे विश्लेषण व चिंतन आवश्यक आहे. श्रीमंत आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलेल्या आपल्या मुलीला तिच्या नवऱ्याने मुद्दाम खिडकीतून खाली ढकलले व त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप तिचे आईवडील करतात. केस कोर्टात उभी राहते. आरोपीची वकील मैत्रीण – जी त्याच्या मृत झालेल्या बायकोचीही बालमैत्रीण असते – त्याची केस कोर्टात लढवून त्याची आरोपातून मुक्तता करते. आपली मृत मैत्रीण अॅक्रोफोबियाने ग्रासलेली असते, ह्याच भयगंडातून खिडकीला पडदा लावण्यासाठी ती वर चढते तेव्हा तेथून खाली बघितल्यावर तिचा तोल जाऊन ती पडते व तिचा मृत्यू होतो असे वकील मैत्रीण कोर्टात सांगते.
अॅक्रोफोबिया झालेल्या आरोपीच्या बायकोचा स्वभाव, तिचे विचित्र आणि मनस्वी वागणे, वकील मैत्रिणीने कोर्टात सादर केलेले पुरावे ह्या सर्व गोष्टी अतिशय कलात्मकतेने व संयतपणे चित्रपटात मांडलेल्या आहेत. अशा चित्रपटांचा फारसा बोलबाला होत नाही हे मराठी भाषेचे दुर्दैव! आरोपीचा बचाव करण्याच्या संदर्भात वकील मैत्रिणीने केलेले भाषण लक्षवेधी व चिंतनीय आहे. निरपराध व्यक्तीवर खुनासारखा गंभीर आरोप झाल्यानंतर त्याचे संपूर्ण कुटंब बदनाम होते. चित्रपटात मुलाच्या वडिलांना निलंबित केले जाते. दबावामुळे आई नोकरीचा राजीनामा देते. ह्या कुटुंबाला विनाकारण झालेल्या बदनामीमुळे झालेल्या मानसिक क्लेशाला जबाबदार कोण? असा सवाल वकील कोर्टापुढे टाकते.
माझ्या बघण्यात अशीच घटना परंतु वेगळे वळण घेतलेली आहे. शेतकरी कुटुंबातील एक मुलगी दुसऱ्या शेतकरी कुटुंबात लग्न होऊन जाते, अतिशय लहरीपणाने वागते. मनात असले तर काम करावयाचे नाहीतर झोपून रहावयाचे असा तिचा खाक्या असतो. घरातील लहान मुलांवर ओरडणे, त्यांच्याशी भांडण करणे असेही चाले. सासरची माणसे सज्जन होती. वय लहान आहे, हळूहळू बदलेल म्हणून ते संभाळून घेत. परंतु एके दिवशी सकाळी विहिरीवर पाणी आणावयास गेली आणि विहिरीत उडी मारून तिने जीव दिला. शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली व त्यांना पकडून नेण्यात आले. माहेरच्यांना हे कळल्यावर ते हादरले व तातडीने पोलीस ठाण्यावर गेले. त्यांनी तिथे सांगितले, पोलीसदादा, आम्ही माळकरी आहोत. खोटे बोलणार नाही. अहो, आमची मुलगीच गरम डोक्याची होती, एकदा तर तिने स्वतःला पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला. ही तिच्या सासरची माणसेही माळकरी आहेत. देवमाणसे आहेत. त्यांना सोडून द्या. तिच्या माहेरच्यांनी अशी साक्ष दिली म्हणून प्रकरण थोडक्यात मिटले. अशी साक्ष दिली नसती तर? ते संपूर्ण कुटुंब निरपराध असूनही उद्ध्वस्त झाले असते. अशा अनेक घटनांचे दाखले देता येतील. अपराधी माणसाला शिक्षा व्हावयास हवी हे खरे परंतु निरपराध लोकांना शिक्षा होऊ नये हे अधिक खरे आहे.
ह्या संदर्भात टाइम्स ऑफ इंडिया (सोवार, ११ मार्च, पृ.१२) ह्या पेपरमध्ये आलेल्या बातमीमुळे अस्वस्थ वाटू लागले. बलात्काराच्या आरोपातून निर्दोष म्हणून सुटका झालेली व्यक्ती सर्वोच्च यायालयाला सांगते. — माझा आत्मसन्मान मला मिळवून द्या. (“return my dignity, man absolved of rape tells SC’) २००६ साली घडलेल्या मायापुरी बलात्कारप्रकरणी निरंजनकुमार मंडलला चार वर्षे तुरुंगात काढावी लागली. कायदेशीररीत्या चौकशीनंतर त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली. त्याच्या अटकेच्या बातमीची माध्यमांनी गाजावाजा करीत ब्रेकिंग न्यूज केली. ह्याबद्दल मंडल ह्यांचा आक्षेप नव्हता. परंतु निर्दोष म्हणून सुटका झाल्यानंतर त्याच्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी पूर्ववत् बसविण्यासाठीही माध्यमांनी पुढाकार घ्यावयास हवा होता. त्यांच्या वकिलांनी ही गोष्ट कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या सुटकेच्या बातमीला योग्य ती प्रसिद्धी द्यावी व तो निर्दोष होता हा मुद्दा लोकांसमोर आणावा. कोर्ट तसा निर्देश विविध माध्यमांना देते. परंतु कोणत्याही दूरदर्शन वाहिनीने किंवा वर्तमापत्राने त्याची दखल घेतली नाही.
ह्या संदर्भात मंडल म्हणतात – केस कोर्टात उभी राहण्यापूर्वी मी चार वर्षे तुरुंगात होतो व नंतर कोर्टाकडून निर्दोष म्हणून माझी सुटका करण्यात आली. परंतु ही बातमी लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे मी केलेल्या अपराधाची चार वर्षे शिक्षा भोगूनच परत आलो आहे असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे माझ्या बायकोला व मुलांना अतिशय अवहेलना व दुःख सहन करावे लागत आहे. माझी मुले अतिशय हुशार आहेत. परंतु सोसायटीतील शेजारी आपल्या मुलांना माझ्या मुलांशी संबंध ठेवू देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम झालेला आहे. आपले समाजातील स्थान व मान परत मिळवून देण्यासाठी व आपले आयुष्य पूर्ववत् करण्यासाठी कोर्टाने आपल्याला मदत करावी अशी विनंती मंडल ह्यांनी केलेली आहे. माध्यमांनी आपली व्यावसायिकता सांभाळताना अशा घटनांची नोंद घेणेही अत्यावश्यक आहे.
मुंबई, (दूरभाष : ०२२-२४४५७७१२)