कर्मयोगातील हानी
— विनोबा
… आपल्या संस्थांचा जीवनरस उडून जात आहे, त्याचे कारण स्वाध्यायाचा अभाव हे आहे. आपण कर्मयोगात पडलो आहोत. कर्मयोगात लाभाबरोबर हानीहि होते. शंकराचार्य, रामानुज, बुद्ध, महावीर आदींच्या अनुयायांचे जे काही दोष होते, ते आपण सुधारले आहेत ही गोष्ट खरी. आपण कर्मयोगावर जास्त जोर दिला. ही सुधारणा जरुरीची होती. परंतु ते लोक आत्मज्ञानात जितके खोल उतरत होते, तितके खोल आपण उतरत नाही. यामुळे कार्याच्या विकासाबरोबर आपली विचारनिष्ठा नि तत्त्वनिष्ठा घटत जाते. आपल्या कामाचा बोजा वाढत जातो, पण त्यातील तत्त्व नष्ट होत आहे. माणूस निघून जातो, संस्था मागे राहते आणि नंतर ती निस्तेज – फिक्की – पडत जाते, दृष्टि उथळ बनत जाते. — विनोबा (गांधीः जसे पाहिले जाणिले विनोबांनी पुस्तकातून)