मूळ लेखक: अनन्या वाजपेयी
फुले-आंबेडकर विचार ह्या विषयावरील सम्मेलनासाठी मी जानेवारीमध्ये नाशिक येथे गेले होते. महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यापीठांतून तेथे वक्ते आले होते. माझ्यासारखे काही बाहेरूनही आलेले होते. विद्याक्षेत्रातील विभूतींशिवाय, वाहरू सोनावणे आणि लक्ष्मण गायकवाड ह्यांसारखे साहित्यिक, उदित राज व राजा ढाले सारखे राजकारणीदेखील तेथे आले होते. सम्मेलनाचा केंद्रबिंदू साहित्य, आत्मचरित्र, चरित्रे, कादंबऱ्या, नाटके, काव्य, साहित्यिक समीक्षा असावा अशी अपेक्षा होती, पण मराठीत चाललेली ती चर्चा पुढे दलित जीवनाचे सर्वच पैलू, जसे राजकारण, इतिहास ह्यांकडे वळू लागली. बाहेर कॉलेजच्या प्रांगणात पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते. त्यामध्ये दलित लेखकांच्या हिंदी मराठी कृतींसोबतच गौतम बुद्ध, कबीर, महात्मा फुले, डॉ आंबेडकर, वि. दा. सावरकर, छत्रपती शिवाजी ह्यांच्यावरील वा त्यांच्या विचारांवरील पुस्तकेही उपलब्ध होती. गम्मत म्हणजे ह्या थोर पुरुषांत ऍडॉल्फ हिटलर व बराक ओबामा ह्यांचाही समावेश होता. आरक्षणाचे धोरण, मानवी हक्क व भारताचे संविधान ह्यांच्यावरील पुस्तिकाही लक्ष वेधून घेत होत्या. जहाल आणि प्रतिक्रियावादी दोन्ही प्रकारची पुस्तके बाजूबाजूच्या टेबलांवर एकमेकांच्या शेजारी विसावली होती. हिवाळ्याच्या दुपारी प्रसन्न उन्हात पसरलेले ते प्रदर्शन म्हणजे आज महाराष्ट्रातील दलित विमर्शात असलेल्या परस्परविरोधी वृत्ति-उक्तींचे प्रतिबिंबच होते म्हणाना!
त्यानंतर, सम्मेलनातील काही सहाध्यायांशी व कार्यकर्त्यांशी बोलत असताना मला प्रथमच हे समजले की स्वतःला आंबेडकरवादी, बौद्ध वा नवबौद्ध म्हणवून घेणारे लोक दलित ही संज्ञा पसंत करीत नाहीत. असे का बरे? मी विचारले.
कारण त्या शब्दातून अवहेलना प्रतीत होते; उत्तर होते; आणि तो शब्द हिंदू जातिव्यवस्थेशी निगडित आहे म्हणून.
पण ह्या अवहेलनेधूनच तर सात्त्विक संताप आणि बंडखोरी ह्यांचा उदय होतो ना? दुसरे असे की हिंदू जातिव्यवस्था आपण मागेच, अस्पृश्य, महार, अंत्यज ह्या आणि गांधींच्या हरिजन शब्दाचा त्याग करून नाकारली नाही का? ह्या माझ्या विधानाशी कुणी सहमत झाले नाही. आम्ही बौद्ध आहोत आणि आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आम्हाला भूतकाळाशी, हिंदुधर्मातील जुन्या श्रेणीव्यवस्थेशी आता काहीही कर्तव्य नाही. हेच त्यांचे ठाम सांगणे होते. पण मग आंबेडकरांच्या बौद्धतर अनुयायांशी – जसे की उत्तर व दक्षिण भारतामधील अनुयायांशी आपल्या सामाजिक-राजकीय स्थानाचे निदर्शक म्हणून स्वतःला दलित वा दलित-बहुजन म्हणवून घेणाऱ्यांशी तुम्ही कसा काय ऐक्यभाव प्रस्थापित करता ? ह्यावर काहीच उत्तर नाही. तो प्रश्न अनेक प्रकारांनी विचारूनसुद्धा नाही.
खरे तर अखिल भारतीय दलित चळवळ उभारण्यामधील खरी गोची हीच आहे की दलितांधील अनेक पंथोपपंथांसाठी, अगदी मूलभूत पातळीवर आपापल्या अस्मिता जागृत करण्याच्या तसेच अलिकडच्या किंवा जुन्या इतिहासामधून आपल्या प्रतिमांना उजाळा देण्याच्या वा त्या उत्क्रांत करण्याच्या पद्धती निरनिराळ्या आहेत. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील असणारे महाराष्ट्रीय बौद्धजन जे मला नाशकात भेटले, ते दलितच नाही तर अनुसूचित जाती ह्या संज्ञेबाबत देखील समाधानी नव्हते. अनुसूचित जाती व जमातींची प्रमाणपत्रे कुठल्या ना कुठल्या रूपात सामाजिक न्याय वा राजकीय आरक्षण मिळवून देणारी साधने असल्याचे जरी त्यांना मान्य असले, तरी आरक्षणाबरोबर छुपेपणाने येणारी, दलितांच्या बाजूने ध्वनित होणारी असमानता, अक्षमता आणि इतरांच्या तुलनेत आपण अपात्र असल्याची भावना ह्या सर्व गोष्टी त्यांना नकोश्या होतात. ह्यावर बौद्धधर्म हा तात्पुरता तरी उतारा आहे. हिंदू जातिव्यवस्थेतून तो फुटून बाहेर निघतो, पण तो हानिपूरणात्मक भेदभावाची जी आधुनिक रूपातील भेट देतो, तीही सूक्ष्म पातळीवरील अवहेलनाच आहे. म्हणजे दलित वा तसे शब्द टाळून काही मूळ प्रश्न टळतो असे नाही, मात्र गेल्या जवळपास पाऊण शतकभर ज्या अनेक पिढ्या जातिव्यवस्था वा जातिअंताच्या चर्चेच्या चक्रव्यूहात अडकल्या होत्या त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना थोडी उसंत मिळते. त्यानंतर माझ्या संस्थेत अलिकडेच, अलाहाबाद येथील गोविंद वल्लभ पंत समाज विज्ञान संस्थेशी संबंधित असलेले कवि, विचारवंत प्रा. बद्री नारायण ह्यांचे उत्तर प्रदेशातील दलित राजकारण ह्या विषयावर व्याख्यान झाले. तेव्हा त्यांनी दलित, दलित-बहजन हे शब्द तर उच्चारलेच, पण त्यानंतर कांशीराम व मायावती ह्यांसारख्या नेत्यांचा आश्रय मिळाल्यामुळे चांभारांसारख्या काही विशिष्ट जाती उत्तरप्रदेशमधील इतर जनजातींपेक्षा बहुोल विशेषाधिकार व उच्च दर्जा कसा उपभोगीत आहेत, ह्याचेही यथासांग वर्णन केले. ह्यामुळे दलित समाजांतर्गत नवीन असमानता आणि असंतुलने उद्भवली आहेत. बहुसंख्यक हिंदू आणि अल्पसंख्यक मुसलमान, उच्च जाती वा मागास जाती आणि उत्तरप्रदेशच्या सामाजिक विश्वातील सर्व ज्ञात समस्या ह्यांध्ये त्याने आणखीच भर पडली आहे. प्रा. नारायण ह्यांनी सांगितले की सार्वत्रिक शिक्षण, उच्च वर्गाचा उदय, बुद्धिमंतांचे कृतिकार्यक्रम, जातीच्या इतिहासाची जाणीव आणि तो लिखित रूपात उपलब्ध असणे, ह्या सर्व गोष्टी चांभारांना मूल्य आणि दृश्यमानता प्रदान करतात. इतर समूह मात्र त्या मानाने मागे पडतात. बद्री नारायण ह्यांनी असेही नमूद केले की बौद्धधर्माची चित्रमय भाषा, संकल्पना आणि शब्दसंपत्ती ह्यांचा उपयोग करून अत्यंत मागास अशा दलित गटांना संबोधणे हा, त्यांचा खालचा दर्जा, न्यूनगंड आणि आत्मविश्वासाचा अभाव, शतकानुशतके जातीयतेच्या कर्दीत रुतून बसल्याची भावना हृावर चांगला उतारा होता.
बद्री नारायण ह्यांनी ह्या मुद्द्याचा अधिक विस्तार केला नाही. पण कदाचित असा काही मार्ग असावा ज्यामध्ये केवळ स्वतःला उघडपणे बौद्ध म्हणवून घेण्याचे राजकारणच त्यांना सक्षमता प्रदान करीत असेल असे नव्हे, तर बौद्ध ज्ञानमीमांसादेखील मुक्तिदायिनी ठरत असेल. (सत्याच्या अधिक जवळ जाण्यासाठी आकलनाची इयत्ता वाढविणे किंवा वस्तुस्थितीचा स्वीकार करण्याच्या दृष्टीने भ्रांतिचे धुके नष्ट करणे) नवबौद्ध आणि बौद्धेतर दलित आपले आत्मभान, स्वायत्तता तसेच सक्षमता जागवण्यासाठी आणि आपली वेगवेगळी अस्मिता जपण्यासाठी वेगवेगळे डावपेच लढवतील आणि अस्मिता जागविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधून समान उद्दिष्ट साकार करतील, तेव्हा कदाचित बौद्धधर्म अंगीकारण्यामागील बाबासाहेब आंबेडकरांचे द्रष्टेपण आपल्याला अधिक चांगले आकळून येईल.
पत्ताः अनन्या वाजपेयी