एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपात भांडवलशाहीचा उदय झाला. तेव्हापासून तिच्याविरुद्ध निरनिराळे मतप्रवाह समाजात प्रचलित आहेत. युरोपातील भांडवलशाहीने सरंजामशाहीशी मोठा लढा दिला. औद्योगिक क्रांती होऊन नवीन उत्पादनपद्धती प्रचलित झाल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या नाड्या भांडवलदारांच्या हातात आल्या व त्यांना राज्यसत्ता ताब्यात घेण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तेव्हा त्यांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे गुलामांची मुक्तता. त्यांना गुलामांबद्दल प्रे होते म्हणून नव्हे, तर त्यांना कारखान्यात काम करायला स्वस्तात मजूर हवे होते म्हणून. दुसरी गोष्ट, त्यांनी राज्यसत्ता आणि चर्च यांची फारकत व्हावी आणि राज्यसत्ता निधर्मी राहावी अशी मागणी करून तिची अंलबजावणी केली. त्यांना निरंकुश सत्ता हवी होती. यासाठी त्यांनी ब्रिटिश राजाचा शिरच्छेद केला आणि फ्रान्समध्ये राज्यक्रांती घडवून आणली. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये समाजातील सर्व थरांचा समावेश होता. म्हणून त्यांची घोषणा ‘स्वातंत्र्य समता बंधुभाव’ अशी करण्यात आली. परंतु त्यात एक मेख होती. तेथे खाजगी मालमत्तेच्या अधिकाराचाही मूलभूत स्वातंत्र्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे स्वातंत्र्य समता बंधुभाव या मानवतावादी संकल्पनांचे अवमूल्यन झाले.
भांडवलशाहीने आपले वर्गीय हितसंबंध सांभाळणारे पक्ष निर्माण केले. तसेच कारागीरांना कामगार बनवून आपल्या विरुद्ध एक वर्ग निर्माण केला, ज्याचे वर्गीय हितसंबंध भांडवलदारांच्या विरोधात होते. त्या उत्पादनपद्धतीमुळे हे अनिवार्यपणे घडून आले. एवढे करून ते थांबले नाहीत तर पहिल्याप्रथमच त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेचे अर्थशास्त्र, समाजशास्त्र व तत्त्वज्ञानदेखील उभे केले. आपले वर्ग म्हणून असलेले हितसंबंध व राज्यकर्ता वर्ग म्हणून असलेले हितसंबंध यात भेद करण्याइतका चाणाक्षपणा सुरुवातीपासूनच भांडवलदारवर्गाने दाखविला. म्हणून सर्व वर्गांना सामावून घेणारी लोकशाही पद्धत आणण्यास त्यांनी हळूहळू सुरुवात केली. त्यासाठी ग्रीक तत्त्ववेत्ते अॅरिस्टॉटल, प्लुटो व सॉक्रेटिस ह्यांना कितीतरी शतकांनी त्यांनी पुन्हा जिवंत केले. त्यांच्या लोकशाही संकल्पनेचा विस्तार केला. तीत मनुष्याला केंद्रस्थानी आणले. भांडवलशाही युरोपात घडलेल्या रेनेसान्स हे त्याचे फळ आहे. त्यातूनच लिओनार्दो दा व्हिन्सी, मायकेल एंजेलो ह्यांच्यासारखे महान कलावंत निर्माण झाले. मार्क्स आणि मार्क्सवादाचे वेगळेपण मार्क्स आणि इतर स्वप्नाळू मध्यमवर्गीय समाजवादी ह्यांच्यामधील महत्त्वाचा फरक हा आहे की, ह्या समाजवाद्यांनी भांडवलशाहीवर फक्त टीकाच केली, मात्र मार्क्सने टीका करण्यापूर्वी भांडवलशाहीच्या ऐतिहासिक क्रांतिकारी भूमिकेचे महत्त्वही सांगितले आहे.
भांडवलशाहीची शास्त्रीय समीक्षा करताना मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना त्याने स्पर्श केला आहे. अर्थशास्त्रापासून तत्त्वज्ञानापर्यंत आणि राज्यसत्तेपासून कुटुंबव्यवस्थेपर्यंत सर्व संस्थांना कवेत घेणारी समीक्षा दुसरी नाही. इ. स. १८४८ मध्ये फ्रेडरिक एंगल्सच्या मदतीने लिहिलेला ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ हे मार्क्स व एंगल्स ह्यांच्या कुशाग्र बुद्धीबरोबरच त्यांच्या व्यवहार- सिद्धान्त – व्यवहार ह्या तत्त्वज्ञानाचे फळ आहे. इ. स. १८४८ पूर्वी कामगारांनी दिलेल्या अनेक लढ्यांची ती फलश्रुती आहे.
भांडवलशाही अनेक परस्परविरोधी, अंतर्विरोधपूर्ण परिस्थिती निर्माण करत असते. म्हणून मार्क्सनंतरच्या सर्व शास्त्रीय समाजवाद्यांध्ये अंतर्विरोधपूर्ण विधाने आढळतील. ती परिस्थित्यनुरूप केलेली असतात. तेव्हा, त्या त्या परिस्थितीचा विचार न करता नुसती सुटी वाचली तर गंगाधर गाडगीळांसारखी अवस्था होईल. ते म्हणतात, ‘मार्क्सवाद हे हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणेच भोंगळ तत्त्वज्ञान आहे.’ मी हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. म्हणून त्याविषयी मी एकही विधान करणार नाही. परंतु गेली चाळीस वर्षे मार्क्सवादी चळवळीत असल्यामुळे मार्क्सवादाबद्दल, खरे तर शास्त्रीय समाजवादाबद्दल मी निश्चित काही मते मांडू शकतो. काही दशकांपूर्वी मार्क्सवादी चळवळीत मार्क्सवादावर चर्चा झाली होती. तिचा रोख असा होता की मार्क्सवादाचे काय करायचे? तो श्रद्धा म्हणून जोपासायचा की विज्ञान म्हणून विकसित करायचा? मी व जगातले बहुतांश मार्क्सवादी तो विज्ञान म्हणून विकसित करण्याच्या पक्षाचे आहोत. मॉरिस कान्फोर्थ हा ब्रिटिश विचारवंत आहे. तो आपल्या कम्युनिझम अँड ह्यून व्हॅल्यूज ह्या पुस्तकात म्हणतो, ‘आत्तापर्यंत तरी भांडवलशाहीची अधिक चांगली आणि सर्वांगीण समीक्षा मार्क्सवाद सोडून कोणी केलेली नाही.’ त्याच पुस्तकात साधन व साध्य याबद्दल ऊहापोह करताना तो म्हणतो, ‘माणसे हेच साध्य आहे, समाजवाद हे साधन आहे.’ हे वचन शास्त्रीय समाजवादाचा ओनामा आहे.
एंगल्सनी एके ठिकाणी म्हटले आहे की कम्युनिस्ट हे हिंसेच्या सर्वाधिक विरोधात आहेत. दुसरीकडे मार्क्सवाद्यांवर हिंसेचा आरोप करण्यात येतो. विनोबा भाव्यांसारखे थोर विचारवंत साम्यवादातून हिंसा वजा केल्यावर जो राहतो तो सर्वोदय होय, असे म्हणतात. ह्याची सांगड कशी घालायची? ह्या अंतर्विरोधाचे स्पष्टीकरण असे की मार्क्सवादी प्रतिहिंसेबाबत बोलत असतात. हिंसेबद्दल नाही. गांधीजीनी शासनसंस्था ही संघटित हिंसा आहे असे म्हटले आहे. आता शासनसंस्थेविरुद्ध लढायचे तर बहुतांश वेळा सशस्त्र क्रांतीशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. तरीसुद्धा मार्सने शांतिपूर्ण क्रांती शक्य आहे असा लेख लिहिला आहे. हे किती जणांना माहीत आहे ? कम्युनिस्टांचा संसदीय लोकशाहीवर विशास नाही असे नव्हे. संसदीय राजकारणाच्या चौकटीत त्यांना सरकारच चालवू दिले जात नाही. चालवू दिलेच तर पश्चिम बंगालसारखे तडजोडी किंवा भांडवली पद्धतींनी दादागिरी करूनच. एक उदाहरण पाह. जगात निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेले पहिले कम्युनिस्ट सरकार हे केरळमधील कॉ. नंबद्रीपादांचे होते. हे सर्वांना माहीत आहे. ते पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर कोणी बरखास्त केले? तर केंद्रातील नेहरू सरकारने. चिलिमध्ये अलेंदे यांचे सरकार निवडणुकीच्या मार्गाने निवडून आले होते. तर त्यांचा खून कोणी केला? अर्थात अमेरिकेच्या हस्तकांनी. समाजवाद जगातील एकट्या दुकट्या देशात शक्य नाही असे ट्रॉटस्कीने सांगितलेच आहे. दुसरीकडे स्टालिन व माओ ह्यांना आपापल्या देशांत समाजवाद टिकवायला किती कसरती कराव्या लागल्या, हेही सर्वांना माहीतच आहे. त्याचीच परिणती सोविएत संघाचा पाडाव होण्यात झाली. त्यानंतर चीनने भांडवलशाही स्वीकारली. या घटनेचा सरळ साधा अर्थ, मार्क्सवाद कालबाह्य झाला असा लावण्यात आला. पण तो बरोबर होता का ? गांधीजींची हत्या झाल्यावर त्यांचे हत्यारेच सत्तेवर आले आणि आता तर त्यांची हिंदू पराळाकडे जोरात घोडदौड सुरू आहे. तरी गांधीवाद हा कालबाह्य झाला आहे असे बिगर मार्क्सवादी पुरोगामी म्हणतात का? विश हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया ‘गुजरातला २०१५ साली हिंदू राज्य घोषित करणार’ असे जाहीरपणे म्हणतात. अशा रीतीने ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ असे म्हणणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात ते बोलत असताना आंबेडकरवाद कालबाह्य झाला आहे असे बिगरमार्क्सवादी पुरोगामी म्हणतात का? मग सोविएत संघाने केलेल्या चुका लक्षात घेऊन नंतर चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती होऊनसुद्धा, मुळात समाजवाद एकट्या देशात तगून राहणे शक्य नव्हतेच, मार्क्सवाद प्रश्नांकित होण्यास एकटा सोविएत संघ जबाबदार नाही अशा दृष्टिकोनातून ह्या घटनांकडे का पाहिले जात नाही? मार्क्सवादाचा आधार घेऊन इतरही काही देशांत केलेले प्रयोग फसले, पण म्हणून मार्क्सवाद कालबाह्य झाला आहे अशी ओरड करण्यास कोणता शास्त्रीय आधार आहे ?
रशियन राज्यक्रांतीनंतर रोझा लुक्झेंबर्ग यांनी लेनिन व ट्रॉटस्की यांना सांगितले होते, की तुम्ही ज्याला कामगारवर्गाची हुकूमशाही असे म्हणता तीमध्ये मतभिन्नतेला वाव नाही आणि ती अंतिमतः घातकच ठरेल. स्वातंत्र्य हे मतभेद व मतभिन्नता व्यक्त करता येणे ही स्वातंत्र्याची कसोटी त्यांना अभिप्रेत होती. त्या म्हणतात, प्रश्न लोकशाही की हुकूमशाही असा नाहीच, तर भांडवली लोकशाही की समाजवादी लोकशाही असा आहे. समाजवादी लोकशाहीची संकल्पना मांडून फार पूर्वीच मार्क्सवादी नेत्या रोझा लुक्झेंबर्ग यांनी, त्याचा आग्रह धरला होता.
भांडवलशाहीची शास्त्रीय समीक्षा
मार्क्सवाद काय आहे ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा या लेखात माझा प्रयत्न आहे. परंतु ते देत असताना भांडवलशाही काय आहे आणि भारतात ती कोणत्या रूपात वास करीत आहे हे प्रथम सांगावे लागेल, कारण मार्क्सवाद ही भांडवलशाहीची पहिली शास्त्रीय समीक्षा आहे. गेली दोन शतके अव्याहतपणे घोडदौड करीत असलेली ती एक जागतिक व्यवस्था आहे. स्थापना जरी युरोपमध्ये झाली असली तरी तिच्या स्वतःच्याच गतीमुळे ती एका देशात किंवा खंडात सीमित राहू शकत नाही. तिला जगभर पसरावावेच लागते. आज जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण ह्या धोरणांची ज्या पद्धतीने चर्चा करून तिचा विरोध वा समर्थन केले जाते ते खरे तर निरर्थक आहे. भांडवलशाही जागतिक होणार ; खाजगीकरण हे तिचे वैशिष्ट्य असणार ; उदारीकरण तिला करावेच लागणार हे तिच्या स्थापनेपासूनच ठरलेले आहे. भांडवलदारवर्गाला विरोध करणारा जो कामगारवर्ग तिनेच जन्माला घातला आहे, तोच तिचा अंत करेल, हे मार्क्सचे म्हणणे आजही शंभर टक्के खरे आहे. म्हणून तर मार्क्स जगातील कामगारांना एक व्हायला सांगतो. तसेच भांडवलशाही स्वतःचे थडगे रचते असेही तो म्हणतो. तर आता प्रश्न असा, की ही भांडवलशाही अजून टिकून कशी आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर भारतात भांडवलशाही कशी आली आणि तिचे आजचे स्वरूप काय हे पाहू. तसेच भारतातल्या साम्यवाद्यांनी आतापर्यंत काय काय केले हेही समजून घेतले पाहिजे. भारतात ब्रिटिशांचे साम्राज्य असताना त्यांनी येथे भांडवलशाही आणली. एवढेच नाही तर येथील जातिव्यवस्थेला धक्का न । लावता यरोपातल्या सरंजामशाहीसारखी रयतदारी आणली. पण साम्राज्य टिकविण्यासाठी त्यांना ह्या धोरणात काही बदलही करावे लागले. ब्रिटिश हे त्यांच्याही नकळत भारतीय समाजजीवनाच्या बदलाचे इंजिन बनले असे मार्क्स म्हणतो, तो ह्याच अर्थाने. तसेच भारतात ‘आशियाई उत्पादनपद्धती’ आहे असेही म्हणतो. तो भारतात सरंजामशाही आहे असे म्हणत नाही. आशियाई उत्पादनपद्धती म्हणजेच जातीच्या आधारावर उत्पादनपद्धती. ब्रिटिशांना नको असताना सुद्धा जागतिक भांडवलशाहीच्या रेट्यामुळे भारतात भांडवलदार वर्ग तयार झाला. टाटा-बिलापासून ते थेट किर्लोस्करांपर्यंत. जातिव्यवस्थेला जरी त्यांनी धक्का लावला नाही, तरी सुरुवातीला वरच्या जातीचे लोक आणि त्यानंतर शाहू, फुले आंबेडकरांळे बहुजनसमाजातील लोक तसेच स्त्रियाही शिकू लागल्या. १८४८ साली महात्मा फुले यानी मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले ह्यांच्या पहिल्या शिष्या मुक्ता मांग साळवे व फातिमा शेख होत्या. महर्षि कर्वे ह्यांनी स्त्रियांचे पहिले महाविद्यालय सुरू केले. स्वातंत्र्यानंतरही सोविएत संघाने भारताला भिलाईसारखा पोलाद प्रकल्प उभारायला मदत केली. नेहरूंनी त्यांच्या पंचवार्षिक योजना समोर ठेवून आपल्या आखल्या. नेहरूंनी भारतीय भांडवलदारांचे हितसंबंध जपूनही सुरुवातीपासूनच कल्याणकारी राज्याच्या संकल्पना साकारल्या व मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्याचे दृश्य रूप म्हणजे ५०-६० च्या दशकांत झालेली सामाजिक प्रगती. इंदिरा गांधींनी संस्थनिकांचे तनखे बंद केले. बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. राष्ट्रीयीकृत बँका गावोगावी नेल्या. महाराष्ट्रात जमीनसुधारणा झाल्या. सहकारी उद्योग आणि सहकारी साखर कारखाने सुरू झाले. कुरीअन यांची धवल क्रांती व पंजाबमधील हरित क्रांती यामुळे शेतीव्यवसायातही विकास झाला. जातीवर आधारलेली उत्पादनपद्धती हळूहळू लयास जाऊ लागली.
भारतीय साम्यवाद्यांनी सुरुवातीपासून उत्पादन आणि सेवा क्षेत्रात युनियन्स बांधल्या. एवढेच नव्हे तर सफाई कामगारांच्या (ज्यात फक्त दलित जात आहे) पहिल्या युनियन्स या उत्तर प्रदेशातील चंदौसी व मुंबई ह्या ठिकाणी कम्युनिस्टांनीच बांधल्या. तसेच मुंबईतील कापड गिरण्यांध्ये दलितांना काही साच्यांवर काम करू देत नसत. ही प्रथा लाल निशाण पक्षाच्या कापड कामगार संघटनेने मोडून काढली आणि सर्व जातीच्या कामगारांना निदान कामाच्या जागी एका पातळीवर आणले. कॉ. आर बी मोरे ह्यांनी कम्युनिस्ट पक्षात राहून आंबेडकर जयंती जोरात साजरी करायला सुरुवात केली. सुधीर बेडेकरांच्या मागोवा मासिकाने आणि त्यांच्या लिखाणाने तरुणांसमोर नवमार्क्सवादाचे दालन खुले केले. गोदूताई परुळेकरांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा आदिवासींचे संघटन करून त्यांच्यातील माणूस जागा केला. सत्तरीच्या दशकात शहादा येथे श्रमिक संघटना काढून दिनानाथ मनोहर, कुमार शिराळकर, विजय कान्हेरे ह्यांनी लोकशाही समाजवाद, स्त्रीमुक्ती आणि लोकोपयोगी विज्ञान ह्यांचा प्रसार आदिवासींमध्ये केला. त्यातूनच वाहरू सोनावणेसारखा एक आदिवासी कार्यकर्ता व कवी तयार झाला.
बाहात्तर साली दुष्काळ पडला होता. तेव्हा लाल निशाण पक्षाने रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे दुष्काळात कोणीच मृत्युखी पडले नाही, हे सर्वांनी मान्य केले आहे. तसेच बाबरी मशीद पाडश यानंतर कॉ. विलास सोनवणे यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषद स्थापन केली. तसेच मुस्लिम ओबीसी चळवळ सुरू केली. दि. के. बेडेकरांनी तर मराठीत साहित्यापासून समाजशास्त्रापर्यंत मोलाची भर घातली आहे. इथे मला मार्क्सवाद्यांची टिमकी वाजवायची नाही. तर मार्क्सवाद्यांनी सर्व मर्यांदांसकट निरनिराळ्या समाजविभागांत व निरनिराळ्या अभ्यासविशांत काय काम केले आहे एवढेच नम्रपणे नमूद करायचे आहे.
भांडवलशाहीची हुशारी
मार्क्सने पुढारलेल्या भांडवली देशांत म्हणजे युरोपात क्रांती होईल असे म्हटले होते. परंतु पहिली क्रांती झाली ती रशियात, जो अप्रगत भांडवली देश होता. आणि जेथे झारशाही होती. रशियन कामगारांनी १९०५ साली स्वयंस्फूर्तीने सोविएतची स्थापना केली हे जरी खरे असले तरी, रशियातील भांडवलशाही प्रगत नव्हती हे वास्तव आहे. म्हणून तेथे क्रांती झाल्यानंतर आणि १९२९ साली जोरात मंदी आल्यानंतर भांडवलशाहीने स्वतःमध्ये प्रचंड प्रमाणात बदल करून घेतले. कल्याणकारी राज्याची कल्पना त्यांनी पुढे आणली. तसेच सार्वजनिक क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेत शासनसंस्थेचा हस्तक्षेप मान्य केला. यातून कामगारांना ट्रेड युनियनद्वारे लढून का होईना पण आपले जीवनमान सुधारणे शक्य झाले. तसेच त्यांना निवृत्तिवेतन, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय मदत तसेच शैक्षणिक सुविधा देण्यास सुरुवात झाली. मध्यमवर्गाचा जाणीवपूर्वक विकास करण्यात आला. यातून भांडवलशाहीला समर्थन देणारा एक स्तरच जागतिक भांडवलशाहीने घडवून आणला. या स्तराकडे उत्पादनाची मालकी नव्हती. परंतु नंतर हळूहळू त्यांनी आपल्या खाजगी कंपन्यातून समभाग वाटायला सुरुवात केली. मध्यमवर्गच नव्हे तर कामगारवर्गाचा एक भागही हे समभाग विकत घेऊ लागला आणि जणू काही आपण त्या कंपन्यांचे भागीदार म्हणजे अंशतः मालक आहोत असे एक आभासी चित्र त्यांच्या मनात कोरले गेले. आजही तेच चित्र आहे. ह्या बाबतीत भांडवलशाहीच्या हुशारीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. भांडवलशाही व्यवस्थेने आशिया, आफ्रिका खंडामध्ये मोठमोठी साम्राज्ये उभारली. त्यांची आर्थिक लूट केली. बाजारपेठेवर कब्जा मिळवला, आणि एक विशिष्ट ऐतिहासिक टप्प्यावर ही साम्राज्यशाही स्वतःहूनच नष्ट केली. त्या देशातील जनतेने आणि देशातील भांडवलदारांनी स्वातंत्र्यलढे दिले. हे जरी खरे असले, तरी युरोप अमेरिकेतील भांडवलदार वर्गाला आशिया-अफ्रिकेतील नवस्वतंत्र देशांतील भांडवलदार वर्गालाही मुक्त करायचे होते. त्यांना आपले दलाल बनवायचे होते. आपल्यासारखे जुगारीही बनवायचे होते आणि जागतिक बाजारपेठांच्या लुटीमध्ये सहभागी करून घ्यायचे होते.
आजचे चित्र असे आहे की, जगातले भांडवलदार एक झालेले आहेत. परंतु जगातील कामगारांना एक होणे फार कठीण आहे. भांडवलशाहीच्या सुरुवातीला आणि नंतर बराच काळ अगदी आता आतापर्यंत कामगार एखाद्या मोठ्या यंत्रांवर एकत्रपणे उत्पादन करीत. त्याला असेंब्ली लाईन प्रॉडक्शन असे म्हणत. तेव्हाचे कामगार नेते कॉ. डांगे यांचे कामगारांना उद्देशून केलेले एक प्रसिद्ध भाषण आहे. ते म्हणतात, गिरण मालक बाहेर असले व तुम्ही गिरणीत असाल तर गिरण चालणार की नाही ? तर होय. आपल्याला तेच करायचे आहे. गिरणीमालकाला गिरण्यांतून कायमचे बाहेर काढायचे आहे ते एकदा झाले की गिरण्या आपल्या ताब्यात आल्याच. नेकी हीच गोष्ट भांडवलदारांना समजली आणि नव्या तंत्रज्ञानांचा उपयोग त्यांनी कामगारांचे उत्पादनावरील नियंत्रण कमीत कमी करण्यासाठी करून घेतला. त्याचबरोबर एका क्रयवस्तूचे उत्पादन सहसा एकाच ठिकाणी होणार नाही याची खबरदारी घेतली. उत्पादन विखुरले गेले. सुटे भाग निरनिराळ्या राज्यातच नव्हे, तर परदेशातून बनवून मग त्याचे एकत्रीकरण करण्यात येऊ लागले. त्यातून मोठ्या संख्येने कामगार एकत्र येऊ शकत नाहीत, त्यामुळे जुनी ट्रेड युनियन चळवळ मोडीत निघाली आहे. सेवाक्षेत्रात मात्र वाढ झाली आहे. तेथे युनियन्स पण आहेत. म्हणजे बँकिग क्षेत्रात आहेत.
आय.टी. व कॉल सेंटरमध्ये नाहीत. कारण ह्या क्षेत्रांचा संबंध थेट जागतिक पातळीवर असतो आणि मुदलात तेथेच युनियन्स नाहीत. युनियन करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाही कधीही कामावरून हाकलून देण्यात येते. आज कामगारांप्रमाणेच कंत्राटी प्राध्यापकही मोठ्या प्रमाणावर आहेत आणि अधिक वेतन देणाऱ्या खाजगी क्षेत्रात काम मिळण्याची वा टिकण्याची हमी नाही. त्यामुळे उच्च वेतन घेणारे सर्वजण अस्थायी नोकरीत असतात. कंत्राटीकरण व अस्थायीपण हे आजच्या रोजगाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि इतर काही उद्योग वगळता सर्व ठिकाणी हेच चित्र आहे. व्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी बहुतांशी बँका या सार्वजनिक क्षेत्रात ठेवाव्याच लागतात. तसेच पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या उद्योगांना खूप मोठा गर्भवहन काळ असतो. म्हणून त्या क्षेत्रांत उद्योगपती पडत नाहीत व हे सारे उद्योग सार्वजनिक क्षेत्राकडे जातात. हे ठरलेलेच आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पायाभूत सुविधा सार्वजनिक क्षेत्राने पुरवायच्या आणि खाजगी उद्योगांनी त्यांचा फायदा घेत नफा मिळवायचा हे ठरलेलेच आहे. वो सुबह कभी तो आयेगी।
कुठल्याही भांडवली अर्थप्रक्रियेत अतिरिक्त मूल्य निर्माण होते. त्यात भांडवलदाराचा काही दोष नाही. कुठलाही सुस्वभावी, दयाळू, सज्जन भांडवलदार ते रोखू शकत नाही. उत्पादनप्रक्रियाच अशी आहे की, त्यात कामगार आपले शारीरिक वा बौद्धिक श्रम विकरा असतो. त्याला मिळणारे वेतन हे तो काम करीत असलेल्या काही तासांचेच असते. उरलेल्या तासांचे मूल्य हे भांडवलदाराकडे जमा होते. हा भांडवली अर्थव्यवस्थेचा मूलभूत नियम आहे. एकोणिसाव्या शतकातून आता आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला तरी हा नियम बदललेला नाही. उत्पादनप्रक्रियेत कितीही परिवर्तन झाले, त्याचे अद्ययावत संगणीकीकरण झाले, तरीही. हजार रुपये कमवणारा कामगार असो वा लाख रुपये कमवणारा अभियंता. त्याच्या कामातून अतिरिक्त मूल्य तयार होतेच. ते कळू नये म्हणून भांडवलदार वर्ग व त्याच्या व्यवस्थापनशास्त्राने कितीही प्रयत्न केला तरीही ते कधी ना कधी कळणारच आहे. तेव्हा ही व्यवस्था केवळ बेकार, कुपोषित, अनारोग्यकारक वस्तीत राहाणाऱ्या लोकांचेच नाही तर उच्च वेतन मिळविणाऱ्यांचेही शोषणच करत असते. हे ज्या दिवशी त्यांना कळेल तेव्हा ते कामगार म्हणून भांडवलदार वर्गाविरुद्ध लढतील. आता तो काळ जवळ आला आहे. जगभरच सर्व थरांत या व्यवस्थेबद्दल असंतोष आहे. पण नुसता असंतोष असून चालत नाही. तर त्यासाठी संघटित होणे व जागतिक स्तरावर संघटित होणे आवश्यक आहे. एवढेही करून भागणार नाही, तर एका खूप वेगळ्या औद्योगिक क्रांतीची गरज आहे. ही क्रांती मनुष्यश्रमकेंद्री असेल. जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनांवर समाज आपला ताबा पुन्हा मिळवून ह्या पृथ्वीला खऱ्या अर्थाने सुजला, सुफला करील. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असे ज्ञानेशरांनी म्हटले आहे. मार्क्सला अभिप्रेत असलेला शास्त्रीय समाजवाद तरी दुसरे काय मांडतो? एक जण सर्वांसाठी आणि सर्वजण एकासाठी, (हे व्यक्ती व समष्टी यांच्या नात्यावर केलेले विधान आहे) तसेच प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे मिळो असे मार्क्स म्हणतो. मार्क्सचे तत्त्वज्ञान माणुसकीला, माणसातील आदिम चैतन्याला आह्वान करते. हे आह्वान मानवजातीला एक ना एक दिवस स्वीकारावेच लागेल; कारण त्यातच तिचे भले आहे.
लेखाचा शेवट रोझा लुक्झेंबर्गच्या वाक्याने करतो- ‘कामगारांसाठी नव्हे तर सर्वानवजातीसाठी समाजवाद येणे गरजेचे आहे, नाही तर भांडवलशाही रानटी अवस्थेत जाईल.’
आज रोज होणारे बलात्कार, खूनबाजी, अपघात, घातपात, माफिया, बॉम्बस्फोट, जातीपातीच्या, धर्मांतर्गत लढाया हेच दाखवीत आहेत की आपण रानटी अवस्थेत जगत आहोत. भाडवलशाही ही सुसंस्कृततेच्या विरुद्ध दिशेला रोज एक एक पाऊल पुढे टाकीत आहे. तेव्हा प्रश्न असा आहे की, आपण या भांडवलशाहीचा बीमोड करणार की नाही. मार्क्स असे म्हणाला होता की, समाजात वर्गसंघर्ष असतोच. मी फक्त तो तुच्यासमोर उलगडून दाखवला. शैलेन्द्र म्हणतो,
तू जिंदा है तो जिंदगी की जीतपर यकीन कर
अगर कहीं पे स्वर्ग है, उतार ला जमीनप
ब्राह्मण नाहीं, हिंदूहि नाहीं न मी एक पंथाचा असे म्हणणाऱ्या कवी केशवसुतांनी स्वर्ग समक्षतेची कल्पना मांडली आहे. मार्क्सवादी शैलेंद्र तरी वेगळे काय म्हणतोय ?
सी ए, अनंत निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई २७.